अभ्यासनीय आणि वाचनीय ग्रंथ
नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.
संस्कृत-प्राकृतांतल्या अनेक सद्ग्रंथांचा परिपाक बनलेला हा ग्रंथ केवळ अभ्यसनीय नसून वाचनीयही आहे.
’ महाराष्ट्र गीर्वाण । अर्थपूर्ण येकचि ॥’ (१.१०५)
अशा उदार दृष्टीनें आदिनाथांनी संस्कृत वाड्मयाचा पैतृक वारसा आपल्या महाराष्ट्र-वाणीत नव्या समृध्दीने सांठवला आहे. संस्कृतप्रचुरतेनें प्रौढगंभीर बनलेली, शब्दार्थालंकारांनी सर्वांगी सजलेली, सुवचनांच्या दीप्तीनें दीप्तिमान् दिसणारी आणि परमानुभवानें पुष्ट-तुष्ट झालेली आदिनाथांची वाणी अध्यात्मप्रवण वाचकांना खिळवून ठेवल्यावाचून राहाणार नाहीं. ’ सामरस्याचे बोहल्यावरी । शिवशक्ति साजिरी । ’ (२.९७) अशा शब्दांत
शिवशक्तीचा प्रीतिसंगम अनुभवणारा हा ग्रंथकार ज्ञानेश-मुक्तेशांच्या वाणीची लेणीं लुटून जेव्हां आपलें वाग्वैभव उधळूं लागतो, तेव्हां त्याच्या कथा-कथनाच्या ओघांत श्रोता विरघळून जातो.’ ’मुद्रा तळपतीदेदीप्य श्रवणीं । चंद्र-सूर्यासारिख्या ।’ (२.१४१) ’ दुष्टा दुष्काळ दयेचा ’ ( ६.२५०), ’ पुन्हा क्षोभली क्षुधासर्पिणी ।’ (७.२०) ’ प्रपंचवृक्षीं जीव शिव । पक्षी बैसले अभिनव । साक्षी शिव स्वयमेव । विषयफळें जीव भक्षी ॥ ( १०.११६-’ द्वा सुपर्णा -’ या श्रुतिवचनाचा अनुवाद ), ’ भव्य भाळी भस्म चर्चित ’ (१३.३३), ’ तुझे कुचकंडला पय । तें पान करवीं मजसी माय ।’ (१३.६६) , ’ वृष्टि करी मेघ उदार ।
जीवनीं जीववी जीवांतें ॥’ (२२.८५) अशी पानोपानीं आढळणारी सुंदर शब्दावली किती म्हणून उदधृत करावी. कधी सुंदर विचारांनीं, कधीं मार्मिक दृष्टान्तांनींम, तर कधीं प्रासमय आणि अलंकारखचित शब्दसंहतीनें वाचकाचें चित्त खेचून घेण्याची किमय आदिनाथांच्या कवनसरणींत आहे. प्रदीर्घरुपकाचें तर त्यांना वेडच आहे.
समग्र अद्रिपूर्ण कज्जल । समुद्रशाई स्मृद्धिजल । सुरद्रुमशाखा लेखणी सबळ । पत्र विशाळ कुंभिनी ॥
लेखक स्वयें सरस्वती । वक्ता वाचक वाचस्पति । तरी तव गुणमहिमा न पावती । तेथें मी किती मतिमंद ॥ (१०.४-५)
यांसारख्या ओव्यांत संस्कृत वचनांचा अनुवाद असला, तरी त्यांत आदिनाथांच्या शैलीची सफाई स्पष्ट जाणवते. ते पचवून लिहितात; केवळ अनुवाद करीत नाहीत, असे सहज जाणवतें. परंतु ते जेव्हां स्वतंत्रपणें वाग्विलास प्रकट करतात, तेव्हां त्यांच्या खर्या सामर्थ्याची कल्पना येते. त्यांनी पांडुरंगावर रचलेले वृक्षाचें रुपक कसें सर्वांगीं बहरले आहे तें पाहा :
जो निरंजनवनींचा वृक्ष थोर । पुंडरीकास्तव आला महीव्वर । मुमुक्षुपक्ष्यांसी फळसंभार । द्यावयातें तिष्ठत ॥
निवृत्ति ब्रह्मींचा बीजांकुर । शाखापल्लव ज्ञानेश्वर । सोपान सुमन मनोहर । मुक्त परिपक्व मुक्ताबाई ॥
नामयाचेंचि नामफळ । परम सुरस सुरसाळ । परिमळाचा अहळबहळ । ब्रह्मांडपाताळा भेदला ॥ (२८.२५४-२५६)
ग्रंथकाराला नाथपंथाचा विलक्षण अभिमान आहे :
सर्वाद्य जो नाथपंथ । साधकां दावी परमार्थ । त्याचे लक्षणाची मात । अनिर्वाच्च जाण पैं ॥ (२०.७४)
अशा शब्दांत त्यानें तो अभिमान अनेकवार गाजवला आहे. या अभिमानाला आणखीही एक बलवत्तर कारण आहे-
शस्त्राश्रय न देचि जयांप्रति । तेचि वंद्य केले येचि त्रिजगतीं । नाथसंप्रदायाची धन्य ख्याति । तेथे श्रुतिशास्त्र मौनावें ॥ (२८.१७९)
ज्यांना शास्त्रानें आश्रय नाकारला, त्या उपेक्षितांना नाथसंप्रदायानें मुक्तपणें आश्रय देऊन त्रिजगांत धन्य केले, ही त्या संप्रदायाची अलौकिक थोरवी होय. त्या संप्रदायाच्या या औदार्यापुढें श्रुतिशास्त्र थिटें पडलें आहे, असा नाथसंप्रदायाचा यथार्थ गौरव ज्ञानदेवांच्या चरित्रसंदर्भात आदिनाथांनीं केला आहे. ज्ञानदेव हे त्यांना गोरक्षनाथा इतकेच प्रिय वाटतात. बाविसाव्या अध्यायांत (ओ. १००.११५) त्यांनी गुरुसेवनाचें जे लोभस वर्णन केले आहे, ते ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील ’ आचार्योपासना ’ वरील भाष्याचें स्मरण घडविणारें आहे.
’ पिंडे पिंडाचाही ग्रास । हा तों नाथसांप्रदायी दंश ।’ (२०.७७) हे आदिनाथांचे वचन म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ’ पिंडें पिंडाचा ग्रासु । हा तो नाथसंकेतिचा डंसु ।’
( ज्ञा ६.२९१) या वचनाचा सरळ प्रतिध्वनि आहे. ज्ञानेश्वरांच्या हरिहरैक्यभावाचेही आदिनाथ हे भोक्ते आहेत. दत्तगोरक्षभेटीच्या संदर्भात ( अ.२६)
त्यांनी
मूळ दत्तनाथसंप्रदाय । पाहतां असती अद्वय । एका स्थळीचे मार्ग उभय । परि अवसानीं एकचि ॥
मुख्य स्मार्त भागवत । शैव तरी तो वैकुंठनाथ । परम वैष्णव उमाकांत । एवं हरिहरैक्य पैं ॥ (२६.५-६)
असे हरिहरैक्य पुरस्कारिलें आहे.
अशा प्रकारें हा ग्रंथ अनेक दृष्टीनीं अभ्यासनीय आणि वाचनीय बनला आहे. त्यांतील नाथसिध्दांच्या कथा अत्यंत रोचक शैलीत निवेदिलेल्य़ा आहेत. या कथांतून ऐतिहासिक सत्याची बीजेंही विखुरलेली आहेत. उदाहरणार्थ, परिमला राणीचें मल्याळ देशांतील स्त्रीराज्य आणि त्यांत मस्त्येंद्रनाथांचा प्रवेश ही हकीकत ऐतिहासिकदृष्टया विचारणीय आहे. गोरक्षनाथांच्या ’ महार्थमंजरीं ’ त मत्स्येंद्रांचा चौलदेशाशीं सांगितलेला संबंध आणि ’ महार्थमंजरी ’ वरील स्वोपज्ञ टीकेचें ’ परिमला ’ हे नांव यांचा विचार वरील कथेच्या संदर्भात करण्यासारखा आहे. एकूण नाथसंप्रदायाचा इतिहास आणि त्या संप्रदायाची विचारसरणी अभ्यासण्यास उपयोगी पडणार एक सुंदर समृध्द ग्रंथ म्हणून नाथलीलामृताचें महत्त्व निःसंशय आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2020
TOP