वज्रसूचिकोपनिषदाचा प्रतिध्वनि

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


आदिनाथांच्या प्रगाढ व्यासंगाच्या कक्षेंत वज्रसूचिकोपनिषद्‍ नांवाचा क्रांतीकारक ग्रंथही आलेला होता, असें निश्चयानें मानायला आधार आहे. वज्रसूचिकोपनिषद हे जन्मजात श्रेष्ठतेवर आघात करणारें एक नव्य उपनिषद‌ आहे. त्याचें कर्तृत्व परंपरेनें शंकराचार्यांना बहाल केलें आहे. या उपनिषदांत अत्यंत निःसंदिग्ध शब्दाम्त जन्मजात श्रेष्ठतेच्या कल्पनेचें खंडन केलेले आहे. या ग्रंथाचें एक संस्करण ( कदाचित्‍ तेंच त्याचें मूळरुप असेल ) बौध्दधर्माच्या वातावरणांत अश्वघोषाच्या नांवावर प्रचलित होतें.

आदिनाथांनीं नाथलीलामृताच्या सत्ताविसाव्या अध्यायांत वज्रसूचिकोपनिषदाचा उपयोग शंकराचार्याचें चरित्र सांगतांनाच केला आहे ( २७.२५३-२७४ ). दिग्विजय प्राप्त करुन शंकराचार्य काशी येथें आले असतां काशीचा क्षेत्रपाल भैरव यानें आचार्यांची परीक्षा पाहाण्यासाठीं देवतेला चांडाळरुपी त्यांच्याकडे पाठविलें. तो चांडाळ जवळ येतांच आचार्यांनीं तिरस्कारानें त्याला ’ जा जा ’ म्हटले. यावर त्या चांडाळरुपी देवतेनें आचार्यांना छेडलें. या प्रसंगी आदिनाथांनी चांडाळाच्या मुखीं जे उद्गार टाकले आहेत, ते वज्रसूचिकोपनिषदाचा संक्षेपानें अनुवाद करणारेच आहेत:

तुज ब्राह्मणाचा अभिमान । तरी मी करितों तूंतें प्रश्न । अष्टोविकल्पीं समाधान । करी माझे सुजाणा ॥
प्रथम मुख्य चार वर्ण । त्यांत श्रेष्ठत्व ब्राह्मणा । ज्ञान कीं जीव की देह की वर्ण । धर्मज्ञान कीं पांडित्य ॥
जीव ब्राह्मण म्हणसी जरी । तरी जीवसृष्टीच हे निर्धारी । चांडाळादि देहधारी । ब्राह्मण कैसेनि ते होती ॥
देह ब्राह्मण म्हणतां जाण । तरी नैश्वर्य पावे निधन । तया देहा करिती दहन । तेथे संशय येतसे ॥
वर्ण ब्राह्यण जरी निर्दोष । तरी वर्ण असती अष्टादश । श्वेत रक्त पीत कृष्ण भास । ते वर्ण केवीं ब्राह्मण ॥
अनेक वर्ण बहु असती । तरी रंगें ब्राह्मण कदा न होती । जरी म्हणसी ब्राह्मणयाति । तरी नीचयोनींत संभवे ॥
महर्षि ऋषि करीम श्रवण । मातंग शृंगी कौशिक जाण । वसिष्ठ विश्वामित्र बादरायन । कुशस्थ गौतम श्रेष्ठ जो ॥
धीवरीपासाव झालें जनन । तोचि स्वयें व्यास भगवान । हरिणीगर्भशुक्तिकेंतून । ऋष्यशृंग जन्मला ॥
उर्वशीचे गर्भजठरीं । उद्भवे वसिष्ठ निर्धारी । उत्पन्न कलशीं गर्भवोवरीं क। अगस्ति ऋषि जन्मले ॥
मातंगीचे गर्भपुटांत । मातंगऋषि परम विख्यात । तरी ब्राह्मण निश्चित । नव्हे निश्चय जाण पां ॥
जन्मतांचि तो शूद्र । संस्कारें तो द्विजवर । वेदाभ्यासी तोचि विप्र । ब्रह्म जाणे तो ब्राह्मण ॥ (२७.२६३-२७४)

वज्रसूचिकोपनिषदांतील पुढील कांहीं अंश पाहिल्यावर वाचकांना हें स्पष्टपणें प्रतीत होईल कीं, आदिनाथांनी येथें वज्रसूचिकोपनिषदच उद्‍धृत केलें आहे :
" ब्रह्मक्षत्रियवैश्यशूद्रा इति चत्वारो वर्णास्तेषां ब्राह्मण एक प्रधान इति वेदवचनानुरुपं स्मृतिभिरप्युक्तम् । तत्र चोद्यमस्ति
को वा ब्राह्मणो नाम । किं जीव : किं देह : किं जाति: किं ज्ञानं किं कर्म की धार्मिक इति ।
 
तत्र प्रथमो जीव ब्राह्मण इति चेत्तन्न । अतीतानागतवर्तमानानेकदेहानां जीवस्यैकरुपत्वाद् । एकस्यापि कर्मवशादनेक-देहसम्भवात् । सर्वशरीराणा जीवस्यैकरुपत्वाच्च । तस्मान्न जीवो ब्राह्मण इति ।

तर्हि देहो ब्राह्मण इत चेत्तन्न । आचाण्डालादिपर्यन्तानां मनुष्याणां पाश्चभौतिकत्वेन देहस्यैकरुपत्वाज्जरामरणधर्मादि-साम्यदर्शनाद‍ । ब्राह्मण : श्वेतवर्ण : क्षत्रियो रक्तवर्णो वैश्य: पीतवर्ण : शूद्र : कृष्णवर्ण इति नियमाभावात्‍ । पित्रादिशरीरदहने पुत्रादीनां ब्रह्महत्यादिदोषसम्भवाच्च । तस्मान्न देहो ब्राह्मण इति ।

तर्हि जातिर्ब्राह्मण इति चेत्तन्न । तत्र जात्यन्तरजन्तुष्वनेकजातिसम्भावा महर्ष्यो बहव: सन्ति । ऋष्यशृंगो मृग्या: । कौशिक : कुशात् जाम्बूको जम्वूकादू । वाल्मीको वाल्मीकादू । व्यास : कैवर्तकन्यकायाम्‍ शशपृष्ठादू गौतम: । वसिष्ठ उर्वश्याम् विश्वामित्र : क्षत्रियायाम् अगस्त्य : कलशे जात इति श्रुतत्वाद्‍ । एतेषां जात्या विनापि सम्यगज्ञानविशेषादू ब्राह्मण्यमत्युत्तमं श्रूयते । तस्मान्न जातिर्ब्राह्मण इति ।........

तर्हि को वा ब्राह्मणो नाम । य: कश्चित् ... कामरागादिदोषरहित: शमदमादिसम्पन्न :... स एव ब्राह्मण इति श्रुतिस्मृति-
पुराणेतिहासानामभिप्राय : । "

तुकोबांना गुरु करण्यांत जातिविचाराचा अडथळा जेव्हां येऊं लागला, तेव्हां संत बहिणाबाईनेंही याच कृतीचा आसरा घेतला होता. एकोणिसाव्या शतकांत घडलेल्या प्रबोधनांत या कृतीचा वाटा महनीय आहे. नाथलीलामृतकारांनींही वज्रसूचीचा हा अनुकार एकोणिसाव्या शतकाच्या प्रथमार्धातच केला आहे. अर्थात्‍ नाथलीलामृतकार आदिनाथ हे गुरव समाजांत जन्मलेले असून आणि वज्रसूचिकोपनिषदांतल्या विचारांचे पुरस्कर्ते असूनही ब्राह्मणश्रेष्ठत्वाच्या संस्कारांतून सुटलेले नव्हते.
त्यांनी ग्रंथाच्या अखेरीस ब्राह्मणाचे जन्मजात श्रेष्ठत्व स्पष्टपणें उध्दोषिलें आहे :
की अष्टादश वर्ण । त्यांत श्रेष्ठ जेवीं ब्राह्मण । तो भ्रष्ट असो परि श्रेष्ठ जाण । तया नमनचि करावें ॥ (२८.३२० )

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP