भजनावली - गुरूवारची भजनावली

भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.


श्री गजानना तुझ्याच चरणी ही विनंती
भजनास द्यावी स्फूर्ती ॥धृ०॥
कार्याची सिध्दी करिती । सिध्दी विनायक म्हणवीसी ।
नमन हे विघ्रहर तुजसी । भक्ताने शरण तुज येती ॥१॥
तूं ह्र्दयी वास करावा । एकदंत निशिदिनी गावा ।
घ्यावी ही पदरी सेवा । अनुदिनी पदा सेविती ॥२॥

५७ शारदास्तवन
नमन तुजला वेदमाते । अखंड गाईन तुज
गुण सरिते । जगदंबे मज दी मतीते ॥धृ०॥
निर्गुण हरीची सगुण तू राणी । योग निद्रा प्रभूची मोडुनी ।
नांवरुपाला आणिला त्याते । ब्रह्मा हरिहर शचिवर दिनकर ।
तव आज्ञेने वर्तती भूवर । पार नच कळे सहस्त्र फणीते ॥२॥
भजन प्रसंगी या देवीने । कृपा करावी सरस्वतीने ।
लक्ष्मी कन्या तुला प्रार्थेते ॥३॥

५८ सद्‍गुरु स्तवन
वर्णु किती मी गुरुचा महिमा हरि रे माझ्या रुप नामा ॥धृ०॥
पायीं पडता आपुला म्हणविले । पूर्ण केले सर्व कामा ॥१॥
अयोग्यच मी तुझीया पाया । पदरी घेऊनी दिधला प्रेमा ॥२॥
दत्त अवधूता स्वामी समर्था गर्जितो मी दत्त नामा ॥३॥

५९ रुपाचा अभंग
तीन शिरें सहा हात । तया माझा दंडवत ॥
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ॥१॥
माथा शोभे जटा भार । अंगी विभूती सुंदर ॥२॥
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ॥३॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥४॥

६० बुक्क्याचा अभंग ल
बुक्का वाहुया हर्रिसी नयनी पाहू या ॥धृ०॥
पूर्ण ब्रह्म श्रीरंग सावळा उभा विटेवरी ।
कटी कर ठेऊनिया । हरीसी नयनी पाहू या ॥१॥
तुलसी हार भरदार गुंफिला सुगंध दरवळला ।
कंठी वाहु या । हरीसी नयनी पाहू या ॥२॥
विठ्ठ्ल विठ्ठ्ल घोष चालले भजन वाळवंटी ।
पुनीत होई काया । हरिसी नयनी पाहु या ॥३॥
अभंगवाणी अखंड स्मरणी लक्ष्मी वदे भजनी ।
नमन प्रभू पाया । हरिसी नयनी पाहु या ॥४॥

भजन (गजर)
दत्ता दिंगबरा याहो । दयाळा मला भेट द्याहो ।
सद्‍गुरु नाथ श्रीगुरुनाथ । शरण मी आलो घ्या पदरात ।
सेवा घ्या सुमती द्या । तल्लीन होईन प्रभ्यू भजनात ॥

६१ मध्यंतर
मोतियाचे पाणी रांजण भरिला ।
पिवोनिया घाला । ज्ञानदेव । पिऊनिया घाला ।
अभ्राची साऊली घेवोनीया हाती ॥धृ०॥
निघे तो एकांती । निवृत्तीनाथ । निघे तो एकांती ॥१॥
पुष्पाचा सुगंध वेगळा काढिला । हार तो लेईला सोपान देव ॥२॥
हिर्‍याच्या घुगर्‍या जेवण जेविली । जेवोनिया घाली मुक्ताबाई ॥३॥
इतुक्यांचे वर्म आले असे हाता । चांगदेव स्वतः वर्णितसे ॥४॥

६२ अभंग
साखर घ्याहो घ्याहो सद्‍गुरु नाथा तुमच्या चरणी ठेविन मी माथा ॥धृ०॥
वैराग्याचें दुकान बाजारात हो । राम नाम साखर भरली त्यांत ॥
घेते झाले बहुत साधुसंत हो ॥१॥
साखरेचा घेऊनी अनुभव । शांत झाले कैलासा सदाशिव हो ॥२॥
जनी म्हणे साखईर माझी घ्यावी । जागा आपुल्या चरणांसी मज द्यावी ॥३॥

६३ अभंग
संसार मी केला तुळशीचा मळा । करडा सांवळा
पांडुरंग करडा सांवळा ॥धृ०॥
कृपा वापीवरी चालवितो मोट । खळाळती पाट । वैराग्याचे ॥ खळाळती पाट
बैल होवोनीया वेद राबताती । निंदणी करिती । श्रुती स्मृती । निंदणी करिती ॥२॥
बारमाही येतो पिकांचा सुकाळ येवो कळिकाळ । आदराने । येवो कळिकाळ ॥३॥
डौलात डुलाती । सावळया मंजीरी । आसना अंतरी । फळाची । आसना अंतरी ॥४॥
जन्म मरणाची मज नाही भीती । जिंको माझी शेती । मोक्षालागी । जिंको माझी शेती ॥५॥

६४ गौळण
कोठे गुंतलासी योगियांचे ध्यानी । आनंद कीर्तनी पंढरीच्या ॥१॥
काय काज कोठें पडलीसे गुंती । कनीं न पडती शब्द माझे ॥२॥॥धृ०॥
काय शेषशयनी सुखें निद्रा आली । सोय का सांडिली माझी देवा ॥३॥
तुका म्हणे कोठे गुंतलासी सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥४॥

६५ अभंग
तुझें भक्ती सुख द्यावें मज प्रेम वसे तुझें नाम माझे चित्ती ॥धृ०॥१॥
सुभक्ती विचार राहो माझे चित्ती । हीच कृपामूर्ती द्यावी मज ॥२॥
तुझा दास जगी म्हणवितो विख्यात । पसरिला हात फिरऊं नको ॥३॥
नामा म्हणे देवा इतुके द्यावे मज । ऐकुनी केशवराज होय बोले ॥४॥

६६ अभंग
भेटीलागी जीवा । लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस । वाट तुझी ॥धृ०॥
पौर्णिमेचा चंद्रमा । चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ॥१॥
दिवाळीच्या मुळा । लेकी आसावली । पाहतो वाटुली पांडुरंगा ॥२॥
भुकेलिया बाळ । अती शोक करी । वाट पाहे परी । माऊलीची ॥३॥
तुका म्हणे मज । लागलीसे भूक । धाऊनी श्रीमुख दावी वेगे ॥४॥

६७ अभंग
संपत्ती सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरीसी आवडे मनासी । करी एकादशी आषाढी ये ॥२॥॥धृ०॥
तुका म्हणे ऐसा आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥

६८ गौळण
सांगा बाई कुठे वेणू वाजला । नादाने जीव माझा घाबरला ॥धृ०॥
डोईवर घागर । हातात झारी । गेले पाण्याला । रस्ता चुकले । झापड पडली । भान नाही मला ॥१॥
सकाळचे तर काम करुनी बसले सारवायला । पाणी म्हणोनी दुध ओतले शुध्द नाही मला ॥२॥
नाहुनी धुऊनी बसले मी होते गडे स्वयंपाकाला । हातांत उंडा गडबड गुंडा तव्यावर हात पडला ॥३॥
हात भाजला नाही पाहिला । बारा दिवसाचें बाळ तान्हुलें घेतलें मांडीवरी
नाद मुरलीचा मंजुळ आला मांझ्या कानावरी ॥ खाली ठेविला । बाळ सानुला ॥४॥
सर्व गौळणी टिपर्‍या खेळती कृष्णा संगतीनं ।
भेदा-भेद न कांहींच उरला गोपी कारणे ॥
एका जनार्दनी हरिची लीला प्रभुची लीला ॥५॥

६९ गौळण " यशोदा "
मला सांगू नका ग । माझ्या बाळाची गार्‍हानी ॥धृ०॥
तुम्ही सार्‍या मुली । जाच तुम्ही घरी ।
तुम्ही दही दुध चोरुन खाता । आळ माझ्या बाळावरी का घेता ॥१॥
तुम्ही येता जाता याच्या खोडया करता ।
चेंडू गोटया याच्या लपविता । वर पदराला झोंबतो म्हणता ॥२॥
भरल्या घाग्री त्या खुशाल ओतून देता ।
मिस पाण्याचं ग तुम्ही करिता । सा‍र्‍या मिळोनी यमुनेसी जाता ॥३॥
तिरी ठेऊन घट । गोष्टी करता धीट ।
सार्‍या गावांच्या उचापती करता । तुम्ही खटयाळ सर्वही दिसता ॥४॥
उशीर झाल्यावर येता भानावर ।
कृष्ण वाटेत अडवितो म्हणता । तुम्ही लबाड गौळणी असता ॥५॥
हीच शिक्षा तुम्हां योग्य आता । तुंम्ही शरणचि जा गोपीनाथा ॥६॥

७० गौळण
सहज उभी आंगणांत । वेणू वाजवी कुंजवनांत ॥धृ०॥
यमुनेच्या तीरी खेळे लगोरी । चेंडू बुडाला पाण्यांत हरीचा ॥१॥
दही दूध घेऊनी मथुरेसी जाता । आड उभा रानांत । हरि हा ॥२॥
घुसळण घुसळिता लोणी काढिता । हात घाली डेर्‍यात । हरि हा ॥३॥
यमुनेच्या तीरी कृष्ण क्रिडा करी । दंग गोपी टिपर्‍यांत ॥४॥
एका जनार्दनी म्हणे राधिका । कृष्ण तुझा ह्र्दयांत माझ्या ॥५॥

७१ अभंग
बोलिलीं लेकुरें । वेडी वाकडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिध्द ॥२॥
नाही विचारिला । अधिकार मी आपुला ॥३॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा यापा पै किंकरा ॥४॥

भजन
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ॥
ज्ञानराज माऊली । ज्ञानदेव माऊली ।
ज्ञानोबा माऊली । ज्ञानेश्वर माऊली ।

७२ दत्ताची आरती
त्रिगुणात्म त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोकी राणा ॥
नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनी जन योगी समाधी ये ध्याना ॥१॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळिता हरली भव चिंता ॥धृ०॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात ॥
परा ही परतली तेथें कैंचा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनीया उभा ठाकला । साष्टांग नमूनी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनिया आशिर्वाद दिधला । जन्म मरणाचा फेरा चुकविला ॥३॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हारपलें मन झालें उन्मन ।
मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ॥४॥
गुरुवारचे भजन संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP