३५
पुढती धुंधुकारे माता धुंधुलीसी । द्रव्यार्थ लत्ताही हाणीतसे ॥१॥
असह्य त्या दु:खे कूपामाजी उडी । घेऊनि बापुडी मुक्त झाली ॥२॥
सुखदु:खातीत निर्वैर गोकर्ण । यात्रेसी सदन त्यजूनि जाई ॥३॥
चौर्यादिक करी धुंधुकारी अंतीं । कुलटा स्त्रियांसी सौख्य देई ॥४॥
दुराचारिणी त्या एकमेकींप्रती । म्हणती राव यासी वधिल अंतीं ॥५॥
आपणचि कां न वधावें यालागीं । स्वार्थे त्याचिमार्गी प्रवर्तल्या ॥६॥
वासुदेव म्हणे अधर्म्य निर्णय । घेऊनियां कार्य करिती मूढ ॥७॥

३६
चिंतूनियां ऐसें दुष्टा त्या मिळोनि । वधिती बांधोनि एक्या रात्रीं ॥१॥
कंठपाशेंही तो न मरे म्हणोनि । वधिला कोंबूनि अग्निमुखीं ॥२॥
दुराचारिणी त्या कूर ऐशापरी । पुरिलें सत्वरी शव त्याचें ॥३॥
पुशितां जनांसी म्हणती द्रव्यार्जना । गेला अन्य ग्रामा वर्ष एक ॥४॥
दुष्टनारीसंग ऐसा करी घात । नरनारी बोध घेवोत हा ॥५॥
वासुदेव म्हणे दुष्टा कांहींदिनीं । जाती अन्यस्थानीं त्यजूनि गृहा ॥६॥

३७
होऊनि पिशाच्च घोर धुंधुकारी । हाय हाय करी हिंडूनियां ॥१॥
गोकर्णासी वृत्त कळतां तयानें । श्राद्ध आनंदानें केलें त्याचें ॥२॥
पुढती कांहींदिनीं गोकर्ण स्वग्रामीं । येऊनि अंगणीं पहुडला ॥३॥
मेष-महिषादि घोररुपें तया । दाविलीं त्या ठाया पिशाच्चानें ॥४॥
गोकर्ण तयासी विचारितां नाम । पिशाच्च रुदन करी तदा ॥५॥
भाषणा असमर्थ जाणूनि गोकर्ण । पापनिवारण उदकें करी ॥६॥
वासुदेव म्हणे सिंचितां उदक । निवेदी वृत्तांत पिशाच्च त्या ॥७॥

३८
ऐकूनि गोकर्ण बोले पिशाच्चासी । श्राद्धें तुजसाठीं केलीं बहु ॥१॥
गयाश्राद्धेंही न मुक्ति तुजप्रति । काय आतां युक्ति सांगें अन्य ॥२॥
पिशाच्च म्हणे त्या शतश्राद्धें व्यर्थ । उपाय मुक्त्यर्थ शोधीं अन्य ॥३॥
शोधितों उपाय बोलूनि गोकर्ण । म्हणे जा स्वस्थान गांठीं सुखें ॥४॥
अन्यदिनीं ज्ञाते भेटीस्तव येतां । कथूनि वृत्तांता मार्ग पुशी ॥५॥
वासुदेव म्हणे योगनिष्ठ ज्ञाते । म्हणती न आम्हांते मार्ग सुचे ॥६॥

३९
अंती सूर्योपासनाचि । मार्ग यालागीं बोलती ॥१॥
तदा सूर्यासी गोकर्ण । विनवी प्रार्थना करुन ॥२॥
स्पष्ट शब्दें तदा सूर्य । म्हणे करावा सप्ताह ॥३॥
ऐकियेली दिव्यवाणी । तयावेळीं त्या ज्ञात्यांनीं ॥४॥
सिद्ध होऊनि गोकर्ण । करी सप्ताहवचन ॥५॥
जनसंभार लोटला । श्रवणांत दंग झाला ॥६॥
वासुदेव म्हणे भाग्य । जनीं लाभतां सन्मार्ग ॥७॥

४०
पिशाच्चही तदा श्रवणासी येई । छिद्र एक पाही वेळूप्रति ॥१॥
सप्तग्रंथियुक्त वेळूंत त्या बैसे । भागवत ऐके भक्तिभावें ॥२॥
प्रथम दिनान्तीं जाहलें आश्चर्य । शब्द होई थोर वेळूमाजी ॥३॥
कडाकड शब्दें फुटे एक ग्रंथी । प्रतिदिनीं ऐसी स्थिति होई ॥४॥
सप्तमदिनीं ते फुटतां अंत्य ग्रंथी । ठाकला पुढती धुंधुकारी ॥५॥
दिव्यरुपें म्हणे गोकर्णासी भावें । गोकर्णा, उपायें मुक्त मी या ॥६॥
वासुदेव म्हणे अहो श्रेष्ठ पुण्य । पातलें विमान तया ठाया ॥७॥

४१
धुंधुकारीप्रति विष्णुदूत नेती । प्रश्न करी त्यांसे बंधुश्रेष्ठ ॥१॥
आम्हां सकलांसी त्यागितां कां एथ । पुण्य तेंचि श्रेष्ठ आम्हांसीही ॥२॥
विष्णुदूत तदा बोलले गोकर्णा । धुंधुकारी जाणा श्रेष्ठ श्रोता ॥३॥
श्रवण-मननें झाला हा पावन । फल कर्मासम लाभे जनीं ॥४॥
वासुदेव म्हणे दूत गोकर्णासी । श्रेष्ठ निवेदिती ज्ञान ऐका ॥५॥

४२
अदृढ तें नष्ट ज्ञान । नासे प्रमादें श्रवण ॥१॥
मंत्र संदिग्ध तो नष्ट । व्यग्रचित्तें नष्ट जप ॥२॥
देश वैष्णवविहीन । श्राद्ध नष्ट अन्नाविण ॥३॥
दान श्रोतियविहीन । कुळ अनाचारें हीन ॥४॥
वासुदेव म्हणे दूत । कथिती शास्त्राचे सिद्धान्त ॥५॥

४३
गुरुवचनीं विश्वास । स्वयें सर्वदा नम्रत्व ॥१॥
मन जयाच्या स्वाधीन । श्रद्धा कथेवरी पूर्ण ॥२॥
ऐसे सद्गुण जयासी । श्रवणफल लाभे त्यासी ॥३॥
घेऊनि हा बोध ध्यानीं । बैसा पुनश्च श्रवणीं ॥४॥
तेणें पावाल वैकुंठ । गोकर्णा, हें घ्या ध्यानांत ॥५॥
वासुदेव म्हणे दूत । कथूनि जाती वैकुंठास ॥६॥

४४
विशुद्ध श्रावणमासीं पुनरपि । सर्व ते बैसती सप्ताहासी ॥१॥
निष्ठापूर्वक तें पूर्ण होतां व्रत । विमानासहित हरि आला ॥२॥
जय जय तेंवी नम: शब्दें नभ । कोंदलें आनंदपूर लोटे ॥३॥
श्रीहरीनें केला पांचजन्यनाद । सरुपतालाभ सकलां घडे ॥४॥
ग्रामीचें त्या अश्व चांडाळही मुक्त । जाती विमानांत बैसूनियां ॥५॥
शांडिल्य मुनीही चित्रकूटस्थित । पठण हे नित्य करी कथा ॥६॥
वासुदेव म्हणे सप्ताहमहिमा । मानव-पितरां उद्धारक ॥७॥

४५
कथिती कुमार सप्ताहपद्धति । सहाय धनादि आवश्यक ॥१॥
आषाढ, श्रावण तेंवी भाद्रपद । आश्विन, कार्तिक, माघमास ॥२॥
त्यागूनि कुयोग आरंभावें व्रत । आप्त इष्टमित्र पाचारावे ॥३॥
पाचारावें देशोदेशींच्या ज्ञात्यांसी । ज्ञात स्त्रीशूद्रादि सकलां होवो ॥४॥
निमंत्रित तेंवी आगंतुकांप्रति । स्थानें वास्तव्यासी नियोजावीं ॥५॥
तीर्थी, वनीं, गृहीं, विशालसें स्थान । मंडप शोधून उभारावा ॥६॥
कदलीस्तंभांनीं युक्त तो करावा । फल - पुष्पें व्हावा विराजित ॥७॥
वासुदेव म्हणे चोंहींकडे ध्वज । वैभवसंयुक्त उभारावे ॥८॥

४६
योग्ग्यां योग्यस्थान अर्पूनि वक्त्यासी । स्थान आदरेंसी नियोजावें ॥१॥
पूर्वाभिमुख कीं उद्ड्मुख व्हावें । अथवा बैसावें यथाशक्य ॥२॥
पूज्य-पूजकांतें मध्य तेचि पूर्वा । वक्ताही असावा कुशल, ज्ञाता ॥३॥
वेदशास्त्रज्ञ तो असावा निस्पृह । ब्राह्मणचि योग्य भक्तिवंत ॥४॥
पाखंडी, स्त्रैण तो पंडितही त्याज्य । जाणा पठणास अयोग्यचि ॥५॥
साह्यार्थ वक्त्याच्या ज्ञाता असो अन्य । वासुदेव धन्य म्हणे तयां ॥६॥

४७
व्रतस्वीकारार्थ पूर्वदिनीं क्षौर । नित्यकर्मे सर्व आटोपूनि -॥१॥
विघ्नवारणार्थ गणेश पूजावा । श्रीहरी स्थापावा मंडलीं तो ॥२॥
प्रार्थनान्त पूजा करुनि ग्रंथही । पूजावा, अंतरीं कृष्णरुपें ॥३॥
वक्ता ईशभावें संतुष्ट करावा । ज्ञानद मानावा शुकचि तो ॥४॥
व्रत स्वीकारावें तयाच्या साक्षीनें । ॐ नमो मंत्रानें यशास्तव ॥५॥
पंचविप्रद्वारा करावा तो जप । नमावें ज्ञात्यांस पुढती भावें ॥६॥
पुढती आसनीं बैसावें निश्चित । सार्धत्रिप्रहर पठण व्हावें ॥७॥
वासुदेव म्हणे मध्यान्हीं विराम । घेऊनि, कीर्तन व्हावें सुखें ॥८॥

४८
वेगविजयार्थ घ्यावा लघ्वाहार । मुने, एकवार हविष्यान्न ॥१॥
सुखसाध्य होइ श्रवण जयानें । वागावें नियमें त्याचि यत्नें ॥२॥
हितकारी तरी भोजनही श्रेष्ठ । त्यजावा उपवास विघ्नहारी ॥३॥
ब्रह्मचर्यादिक नियम पाळावे । विलास त्यागावे सकलही ॥४॥
वर्जावें जडान्न, विकार जिंकावे । चित्त न रमावें निंदेमाजी ॥५॥
वासुदेव म्हणे निषिद्धान्न वर्ज्य । ज्ञाता हें सहज ध्यानीं धरी ॥६॥

४९
रजस्वलान्त्यज तेंवी विप्रद्वेष्टा । वर्जावे सर्वथा भाषणासी ॥१॥
हतभागी, रोगी, पापी, अनपत्य । मोक्षेच्छु नरांस लाभकारी ॥२॥
वंध्या मृतार्भका तेंवी स्त्रवद्‍गर्भा । पावतील लाभा श्रवणें याच्या ॥३॥
यथाशक्ति व्हावें उद्यापन भावें । सामर्थ्यहीनातें दोष नसे ॥४॥
अंतीं ग्रंथाचें तैं वक्त्याचें पूजन । तुलसीमाला जाण प्रसाद तो ॥५॥
वासुदेव म्हणे अर्पावा श्रोत्यांसी । कीर्तनही अंती व्हावें सौख्यें ॥६॥

५०
जय नम; शंखनाद हर्षे व्हावा । संतुष्ट करावा याचकगण ॥१॥
विरक्तें ऐकावी गीता अन्यदिनीं । गृहस्थ हवनीं प्रवर्तावा ॥२॥
दशमस्कंधोक्त प्रतिश्लोकें भावें । हवन करावें तिलादींनीं ॥३॥
अथवा गायत्री मंत्रेंचि हवन । एकाग्र होऊन करितां लाभ ॥४॥
होमद्रव्यांचे वा दानचि करावें । सप्रेम वाचावें सहस्त्रनाम ॥५॥
वासुदेव म्हणे द्वादश ब्राह्मण । घालूनि भोज्न तोषवावे ॥५॥

५१
सुवर्ण धेनु वा स्वर्णसिंहदान । अर्पितां हें पूर्ण होई व्रत ॥१॥
पूजूनि आचार्यां ग्रंथासवें ऐसें । दान देतां तुटे भवबंध ॥२॥
कुमार यापरी माहात्म्य कथूनि । भागवतगानीं दंग झाले ॥३॥
यापरी सप्ताह होतां भक्तिज्ञान - । वैराग्यां यौवन प्राप्त झालें ॥४॥
पाहूनि नारद जाहला कृतार्थ । जाहलें पुलकित अंग त्याचें ॥५॥
वासुदेव म्हणे सद्गद होऊनि । कृताञ्जलि वाणी वदला मुनि ॥६॥

५२
अनुगृहीत मी झालों आजि धन्य । पापहारी कृष्णलाभ झाला ॥१॥
सर्वसाधनीं हें श्रवणची श्रेष्ठ । लाभे वैकुंठस्थ कृष्ण जेणें ॥२॥
इतुक्यांत येती शुक तया स्थानीं । भागवतानीं रंगले जे ॥३॥
सन्मानूनि तयां देती उच्चासन । मधुर भाषण करिती शुक ॥४॥
वासुदेव म्हणे इक्षुदंडफल । तैसेचि हे बोल ऐका आतां ॥५॥

५३
वेदकल्पद्रुम गलित हें फल । अमृतरसाळ शुकमुखें ॥१॥
भाविक हो, करा सद्भावें प्राशन । वारंवार पान घडो याचें ॥२॥
स्वर्गी, वैकुंठी वा सत्यलोकीं कोठें । माधुर्य न ऐसें धरा ध्यानीं ॥३॥
यास्तव भाग्याचे जन हें प्राशिती । कदा न त्यागिती लाभ याचा ॥४॥
इतुक्यांत तेथें हरि प्रगटले । प्रल्हादादि आले भगवद्भक्त ॥५॥
वासुदेव म्हणे आनंदसागरीं । मेघ वृष्टि करी आनंदाची ॥६॥

५४
सिंहासनीं देव बैसले आनंदे । नाचती प्रमोदें भक्तजन ॥१॥
भवानीसहित भव विरंचीही । पातले त्या ठायीं दर्शनासी ॥२॥
प्रल्हाद तो ताल धरी दृढभावें । झांज उद्धवानें वाजविली ॥३॥
ब्रह्मसुत छेडीतसे ब्रह्मवीणा । प्रेमें पार्थ ताना मारी गोड ॥४॥
शचीनाथ तदा वाजवी मृदंग । जयजयकार शब्द कुमारांचा ॥५॥
रसरुप शब्दें भाव करी व्यक्त । वक्ता व्यासपुत्र प्रेममूर्ति ॥६॥
नाचती कीर्तनीं तया भक्ति - ज्ञान - । वैराग्यही, पूर्ण तन्मयत्वें ॥७॥
वासुदेव म्हणे ऐशा रंगी दंग । होई न श्रीरंग केंवी सांगा ॥८॥

५५
देव होऊनि प्रसन्न । प्रेमें बोलला वचन ॥१॥
वर मागा, वर मागा । वर्णू केंवी त्या आनंदा ॥२॥
कर जोडूनियां भक्त । म्हणती सप्ताह हा जेथ - ॥३॥
होई, तेथें प्रगट व्हावें । हेतु भक्तांचे पुरवावे ॥४॥
तुझ्या सान्निध्याविरहित । नलगे कांहीहीं आम्हांस ॥५॥
वासुदेव म्हणे कृष्ण । गेले तथास्तु म्हणून ॥६॥

५६
साष्टांग नमन भगवंताप्रति । सकल करिती तयावेळीं ॥१॥
शुकादिकांप्रति वंदिती नारद । गेले ते आनंद मानूनियां ॥२॥
ससुत ते भक्ति भागवत ग्रंथीं । शुक तैं स्थापिती आनंदानें ॥३॥
यास्तव ससुत भक्ति हृदयांत । प्रगटे हा ग्रंथ अभासितां ॥४॥
वासुदेव म्हणे भवताप शांत । होई भागवत सप्ताहानें ॥५॥

५७
शौनकासी सूत कथी हें शुकोक्त । कदा परीक्षित श्रवण करी ॥१॥
श्रीकृष्णगमनोत्तर त्रिंसदब्दें । लोटतां नृपातें कथिलें शुकें ॥२॥
श्रावण नवमी शुभ तिथीसी । शुक आरंभिती सप्ताहातें ॥३॥
पुढती द्विशत अष्टोत्तरकालीं । गोकर्णे गाईली कथा प्रेमें ॥४॥
त्रिंशव्दर्षोत्तर पुढती कुमार । नारदासी सार कथिती तेंचि ॥५॥
वासुदेव म्हणे इतिहास ऐसा । सूत तो शौनकालागीं कथी ॥६॥

५८
कलीमाजी भवरोगविनाशक । अन्य कांहीं मार्ग असेचिना ॥१॥
पाशहस्त दूतांतेंही कथी यम । करितां हें श्रवण न वधा कोणा ॥२॥
असार संसारीं विषयलंपट । जन हे कां कष्ट भोगिताती ॥३॥
साक्षात्‍ परीक्षित असूनियां साक्षी । मूढ भागवतीं रमतीचिना ॥४॥
जे कोणी हे कथा ऐकती कथिती । असाध्य जगतीं न त्यां कांहीं ॥५॥
वासुदेव म्हणे पद्मपुराणोक्त । पूर्ण भागवतमाहात्म्य हें ॥६॥
इतिश्री वासुदेवकृत अभंग भागवतमाहात्म्य समाप्त
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP