भागवतमाहात्म्य - अध्याय २ रा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१२
बोले नारद भक्तीसी । चिंता न करावी ऐसी ॥१॥
स्मरें कृष्णपादपद्मां । भक्तांसी तो विसरेना ॥२॥
रक्षियेलें द्रौपदीसी । तेंवी संकटीं गोपींसी ॥३॥
कोठें गेला न तो कृष्ण । प्रिय तूं त्या प्राणाहून ॥४॥
पाचारणें तुझ्या देव । घेई नीचगृहीं धांव ॥५॥
एकमेव कलीमाजी । साधन तूं मोक्षाप्रति ॥६॥
करीं भक्तांचा उद्धार । वचन मानिलें त्वां थोर ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसें । कथी नारद भक्तींतें ॥८॥
१३
मुक्ति तुझ्या द्वारीं काढीतसे केर । वैराग्य किंकर ज्ञानसवें ॥१॥
वैकुंठ निवासी पातलांती खालीं । युगत्रय झाली कीर्ति बहु ॥२॥
पाखंडरोगानें मुक्ति होई ग्रस्त । पुत्र तुझे वृद्ध तेणेंचि हे ॥३॥
कलीसम परी नसे अन्य युग । चिंता लवमात्र करुं नको ॥४॥
वचन तुजसी देतों मी या युगीं । स्थापीन तुजसी घरोघरीं ॥५॥
ज्ञान-वैराग्यही करीन जागृत । यत्न अहर्निश करुनियां ॥५॥
वासुदेव म्हणे सनत्कुमारांसी । नारद हें कथी वृत्त सारें ॥७॥
१४
भक्ति तयावेळीं बोले नारदासी । सावध बाळांसी करीं माझ्या ॥१॥
नारदें त्यावेळीं अंगावरी हस्त - । फिरवूनि, वेद-वेदान्ताचा- ॥२॥
उच्चावर करुनि, गीतापाठ केला । जागृति त्या काला येई तयां ॥३॥
जराजीर्णत्रस्त पुनरपि दोघे । टाकिती भूमीतें अंग वेगें ॥४॥
तदा ईश्वराचा धांवा करी मुनि । होई नभोवाणी तयावेळीं ॥५॥
नारदा न करीं चिंता साधु तुज । कथितील मार्ग न करीं खेद ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनि नारद । साधुदर्शनार्थ हिंडूं लागे ॥७॥
१५
हिंडतां हिंडतां बदरिकाश्रमीं । सनकादि मुनि भेटले त्या ॥१॥
विनवितां तयां कथिती ज्ञानयोग । कथाश्रवण मार्ग असे ज्याचा ॥२॥
भागवतग्रंथ सप्ताह करावा । वर्णिलें माधवा जये ग्रंथीं ॥३॥
मुनि म्हणे साध्य नसे जें वेदांतें । कैसें भागवतें लाभेल तें ॥४॥
कुमार बोलती उपनिषत्सार । बोलला तें कीर भागवत ॥५॥
वृक्षस्थ रसाची रुचि जैं फळांत । दुग्धाहूनि स्वाद घृतामाजी ॥६॥
इक्षुदंडाहूनि गोडी शर्करेची । तैसी भागवतीं अपूर्वता ॥७॥
वासुदेव म्हणे भागवत ग्रंथ । केला प्रकाशित ज्ञानार्थ हा ॥८॥
१६
वेद-वेदान्तज्ञ गीतेचा जो कर्ता । ऐके भागवता तदा शांत ॥१॥
चतु:श्लोकरुपें त्वांचि तें कथिलें । समाधान झालें व्यासांचें तैं ॥२॥
ऐसें तें साधन ऐकवीं भक्तीसी । क्लेश दैन्य नाशी क्षणार्धे तें ॥३॥
ऐकूनि नारद आनंदित होई । शरण त्या जाई जगदीशासी ॥४॥
अनंतजन्मींच्या पुण्यें तो लाभतां । पावूनि विवेका शांतिलाभ ॥५॥
वासुदेव म्हणे स्थान सप्ताहाचें । कथिती कुमार तें ऐका आतां ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 31, 2019
TOP