सिद्धसिद्धांन्तसंग्रह - तृतीयोपदेश

काशीचे पण्डित बलभद्र यांनी १८व्या शतकाच्या शेवटी  सिद्ध-सिद्धांत पद्धति ग्रंथ संक्षिप्त करून सिद्ध सिद्धांत संग्रह नामक ग्रंथ लिहीला होता.


पिंडसंवित्तिरधुना क्रथ्यते योगिसंमता ।
यस्या: समाश्रयाद्‍ भाति तत्त्वज्ञानमदूरत: ॥१॥
आता योगिलोकांना मान्य असलेली पिंडसंवित्ती सांगतो. ( संवित्ती म्हणजे ज्ञान अर्थात्‍ कुंडलिनी शक्ती होय. ) या ज्ञानाच्या म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या आश्रयामुळे तत्त्वज्ञान जवळ असल्याप्रमाणे किंवा हाती आल्यासारखेच वाटते.

ब्रह्मांडवर्त्ति यत्किंचित्तत्पिंडेऽप्यस्ति सर्वथा ।
इति निश्चय एवात्र पिंडसंवित्तिरुच्यते ॥२॥
जे काही ब्रह्मांडगोलात आहे ते सगळेच पिंडात म्हणजे या देहातही आहे. अशा ज्ञानाला किंवा निश्चयालाच पिंडसंवित्ती असे म्हणतात.

कूर्म: पादतलेऽडगुष्ठात्पादपृष्ठे महातलम्‍ ॥३॥
(सर्व पृथ्वी धारण करणारा) कूर्म पायाखाली आहे. पायाच्या अंगठयाखाली पाताल आहे. अंगठयाच्या पुढच्या भागात तलातल असून पायाच्या पृष्ठभागी महातल आहे.

गुल्फे रसातलं प्रोक्तं जंघायां सुतलं मतम्‍ ।
वितलं जानुदेशे स्यादतलं मूल इष्यते ॥४॥
घोटयाला रसातल म्हटले आहे व जांघेला सुतल कल्पिले आहे. गुडघ्यात वितल आणि मूलाधारात अतल आहे असे समजावे.

ऊर्द्ध्व: स्वभावो य: पिंडे स स्यात्कालाग्निरुद्रक: ।
पातालपदवाच्यानां सत्त्वानामधिदेवता ॥५॥
या पिंडातला ऊर्ध्व स्वभाव हा कालाग्निरुद्र आहे. तो पातालगत म्हणजे शरीरातील खालच्या स्थानांची अधिदेवता आहे.

भूरादिलोकत्रितयं गुह्ये लिंगाग्रमूलयो: ।
तत्राधिदेवता शुक्र: पिंडेऽथ्तविनायक: ॥६॥
भूर्लोक, भुवलोक आणि स्वर्लोक हे तीनही गुह्य लिंगाच्या अग्राच्या व मूळाच्या ठिकाणी आहेत. येथील अधिदेवता इंद्र आहे. पिंडातील मूलाधारात विनायक देवतेचे स्थान आहे.

दंडाग्रे दंडकुहरे महर्लोको जनस्तथा ।
तपो दंडतले सत्यं मूले योमान एतदीट्‍ ॥७॥
मेरुदंडाच्या अग्रभागी महर्लोक असून मेरुदंडाच्या आत जनलोक आहे. तसेच मेरुदंडाच्या तळात तपोलोक आणि मेरुदंडाच्या मूळ भागात सत्यलोक आहे अशी कल्पना केलेली आहे.

अनेकव्यापक: पिंडे धर्मोऽयमहसोऽच्युत: ।
स्वर्लोकभूतकुक्षे: स देवतात्वेन संमत: ॥८॥
या पिंडात धर्म सर्वत्र व्यापून असतो. त्याची देवता अच्युत होय. हा अच्युतच स्वर्लोकरुप कुक्षीची (कूस-पोटाच्या दोन बाजू) अधिदेवता आहे.

हृदये रुद्रलोकोऽस्ति रुद्रस्तत्राधिदेवता ।
उग्र: स्वभावो य: पिंडे तत्स्वरुप: स संमत: ॥९॥
हृदयात रुद्रलोक असून तेथील देवता रुद्र आहे. पिंडातील उग्रस्वभाव हे त्याचे स्वरुप मानले आहे.

वक्षसीश्वरलोकोऽस्ति तत्राधीश्वर ईश्वर: ।
पिंडे तृत्पिस्वरुपेण तिष्ठतीति मतं सताम्‍ ॥१०॥
वक्षभागात म्हणजे छातीच्या परिसरात ईश्वरलोक आहे तेथील अधिदेवता ईश्वर आहे. हा ईश्वर या देहात तृप्तिरुपाने राहतो असे तज्ञांचे मत आहे.

कंठं सदाशिवनिवासमुदाहरंति
तत्राधिनायकतया स सदाशिवोऽस्ति ।
पिंडे जितेंद्रियगणैरनुभूयमान:
सौम्यस्वभाव इति य: प्रथितप्रतिष्ठ: ॥११॥
कंठ हे सदाशिवाचे स्थान असून तेथील अधिदेवता सदाशिवच आहे. या पिंडात जितेंद्रिय लोकांच्या अनुभवास येणार्‍या सौम्य स्वभावाचे तो प्रतीक आहे. सौम्यस्वभाव हा सदाशिव होय.

श्रीकंठलोक: खलुकंठमध्ये श्रीकंठ एवात्र भवेदधीश: ।
सनातनत्वात्मकतां दधान: पिंडांतरे वाधिकृताधिवास: ॥१२॥
कंठामध्ये श्रीकंठलोकाचे स्थान आहे. येथील मुख्य देवता श्रीकंठ होय. हा श्रीकंठ या देहात सनातन आत्मरुपात वास्तव्य करतो.

लंबिकामूलकै भैरवोऽधीश्वरस्तत्र यत्कीर्तितस्तस्य लोको बुधै: ।
प्राणिनां सर्वदा सर्वकार्य्योद्यमो भैरवख्याधर: पिंडमध्ये मत: ॥१३॥
लंबिकेच्या म्हणजे पडजीभेच्या मुळात भैरवदेव असतात. तेथील अधिदेवता भैरवच आहे. त्या स्थानाला भैरवलोक असे नाव विद्वानांनी दिले आहे. या शरीरामध्ये सर्व कार्यांविषयी जो उत्साह वाटतो ते भैरवाचे स्वरुप आहे.

तालुद्वारे शैवलोक: प्रसिद्ध: तत्राधीश: स्याच्छिवो विश्ववंद्य: ।
विद्वद्वर्य्यैर्योगशांति: प्रतीता तद्रूपोऽसौ पिंडमध्ये विभाति ॥१४॥
तालुस्थानाला शिवलोक म्हणतात. तेथील अधिष्ठात्री देवता विश्ववंद्य असा शिव आहे. हा शिव या शरीरात योगशांतीच्या रुपाने अनुभवास येतो असे विद्वानांचे मत आहे.

तालोरभ्यंतरे भाति सिद्धलोकोऽत्र देवता ।
महासिद्ध: प्रबोधात्मा पिंडमध्येऽनुभूयते ॥१५॥
टाळूच्या अंतर्भागात सिद्धलोक आहे. या स्थानाची देवता ज्ञानस्वरुप महासिद्ध आहे. विशेषत्वाने बोध झालेला जो जीवात्मा आहे म्हणजे श्रीगुरुकृपेने अर्थात्‍ शक्तिपाताने ज्याची आत्मशक्ती कुंडलिनी जागृत झाली आहे त्याला याची अनुभूती शरीरातच येते.

ललाटेऽनादिलोकोऽस्ति तत्रानादिरधीश्वर: ।
पराहंतास्वरुपेण पिंडमध्येऽवतिष्ठते ॥१६॥
ललाटभागात म्हणजे भालप्रदेशात अनादि लोक असून त्या स्थानी अनादि नामक देवता आहे. ही देवता शरीरात पराहंतारुपाने वास्तव्य करते.

शृंगाटे कुललोकोऽस्ति तत्र देव: कुलेश्वर: ।
पिंडमध्ये सदानंदस्वरुपेणावतिष्ठते ॥१७॥
शृंगाट म्हणजे कानशिलाच्या स्थानात कुललोक आहे. या स्थानाची देवता कुलेश्वर ही असून ती येथे सदानंदस्वरुपात वास करते.

ब्रह्मारंध्रे परब्रह्मलोकस्तत्राधिदेवता ।
परब्रह्माभिधा पिंडे परिपूर्णस्वरुपत: ॥१८॥
या शरीरातील ब्रह्मरंध्रात परब्रह्मलोकस्थान असून परिपूर्णरुप परब्रह्म ही येथील देवता होय.

परापरस्य लोकोऽस्ति तत्र देव: परेश्वर: ।
अस्तित्वरुपत: सोऽयं पिंडमध्येऽनुभूयते ॥१९॥
या पिंडामध्ये परापरलोक आहे. तेथे परमेश्वर देवाचे वास्तव्य आहे. अस्तित्वरुपाने त्याचा शरीरात अनुभव येतो. (देहाचे अस्तित्व त्या परमेश्वरावर अवलंबून आहे. )

त्रिकूटे शक्तिलोकोऽस्ति परा शक्तिस्तु देवता
सर्वकर्तृ त्वसामर्थ्य परावस्थात्मता तनौ ॥२०॥
त्रिकूटात शक्तिलोक आहे. या स्थानाची देवता पराशक्ती आहे. या शक्तीमुळेच शरीरातील सर्व कर्तृत्वाचे सामर्थ्य व परावस्थारुपत्व आहे.

पिंडे सप्ततलानि स्युर्लोकाश्चात्रैकविंशति: ।
वृत्ते विप्रो नृप: शौर्य्ये उद्यमे विड्‍ भर्येघ्रिज: ॥२१॥
या पिंडात सप्त तल (अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल व पाताल) व एकवीस लोक अर्थात्‍ स्थाने आहेत. या देहात, चार वर्ण आहेत. आचारात ब्राह्मण, पुरुषार्थात अर्थात्‍ शौर्यात क्षत्रिय, उद्योगात म्हणजे व्यवसायात वैश्यजाती व भयात शूद्रजाती आहे असे समजावे.

स्युर्जम्बूशाल्मलीप्लक्षकुशक्रौंचकगोमया: ।
श्वेतोमज्जास्थिनाडीषु मांसे त्वचि कचे नखे ॥२२॥
जम्बू, शाल्मली, प्लक्ष, कुश, क्रौंच, गोमय व श्वेत ही या शरीरातील सप्तद्वीपे मज्जा, अस्थी, नाडी, मांस, त्वचा, केस व नखे या ठिकाणी आहेत.

मूत्रं शुक्रं कफो मेदो वसा प्रस्वेदरेतसी ।
क्षारेक्षुदधिसर्पीषि मधुवारिपयांसि च ॥२३॥
शरीरातील पदार्थात सप्तसमुद्रही कल्पिले आहेत. मूत्र, शुक्र, कफ, मेद, त्वचा, स्वेद व रेत या सातात क्षार, इक्षुरस, दही, तूप, मध, पाणी व दूध यांचे सागर असल्याची कल्पना आहे.

नवसु द्वारदेशेषु नवखंडान्यकीर्त्तयन्‍ ।
अथ शैलादिकान्‍ ब्रूमो यथाभागमवस्थितान्‍ ॥२४॥
शरीरातील नऊ द्वारांत नऊ खंडांचे अस्तित्व सांगितले आहे. आता या शरीरात यथाभाग असणार्‍या पर्वतादिकांचे वर्णन करतो.

मेरुदंडे मेरुरस्ति कैलासो ब्रह्मशंखके ।
पृष्ठे हिमाद्रिर्मलयो वामेंऽशे मंदर: पर: ॥२५॥
विंध्यार्द्रिर्दक्षिणेकर्णे वामे मैनाकपर्वत: ।
श्रीपर्वतो ललाटे स्यादेवमष्टौ कुलाचला: ॥२६॥
मेरुदंडात म्हणजे पृष्ठवंशात मेरुपर्वत, ब्रह्मरंध्र व कानशिल यात कैलास, पृष्ठभागात हिमालय, डाव्या बाजूस मलयाद्रि व उजव्या बाजूला मंदरपर्वत आहे. उजव्या कानात विंध्यपर्वत, डाव्या कानात मैनाकपर्वत व भालप्रदेशी श्रीपर्वत असे आठ कुलाचल आहेत.

चतु:षष्टिर्मता वर्णा योगिन्य: सकलास्तथा ।
हस्तांगुलिषु राजंते सर्व एवोपपर्वता: ॥२७॥
चौसष्ट वर्ण हे चौसष्ट योगिनी होत. हाताच्या अंगुलींमध्ये अर्थात्‍ बोटांच्या पे‍र्‍यातून सर्व उपपर्वत असल्याचे सांगितले आहे.

गंगा सरयूर्यमुना चंद्रभागा सरस्वती ।
वितस्ता शतरुद्रा च नर्मदैरावती शिरा: ॥२८॥
द्वासप्ततिसहस्त्राणि नद्यो या: परिकीर्तिता: ।
अन्या नद्युपनद्याद्यास्ता ज्ञेयास्तत्त्वदर्शिभि: ॥२९॥
या शरिरात ज्या बहात्तर हजार नाडया आहेत त्यांच्या रुपाने गंगा, शरयू, यमुना, चंद्रभागा, सरस्वती, वितस्ता, शतरुद्रा, नर्मदा, इरावती आदि नद्या व इतर सर्व उपनद्या पसरलेल्या किंवा वाहत आहेत असे समजावे. ही गोष्ट तत्त्वद्रष्ट्यांनी सांगितली आहे.

नक्षत्रराशिग्रहतारकाणि तथा तिथीनां वलयेऽत्र कोष्ठा: ।
द्वासप्ततिर्ये विलसंति तेषु निवासमाहु: श्रुतितत्त्वविज्ञा: ॥३०॥
नक्षत्र, राशी, ग्रह, तारका व तिथीचे चक्र हे सर्व शरीरातील बहात्तर हजार मांसपेशीत निवास करतात असे श्रुतितत्त्वांचे तत्त्वज्ञ किंवा जाणकार सांगतात.

अनेकतारानेत्रांतस्तेज: पुंजे कृताश्रया: ।
त्रयस्त्रिंशत्कोटिदेवा रोमकूपसमाश्रया: ॥३१॥
नेत्रातील तेजोगोलात अनेक तारा राहिल्या आहेत. तेहतीस कोटीदेव रोमकूपाच्या आश्रयाने राहतात.

अनेकमुनिसंधाता: कक्षरोमकृताश्रया:
पीठोपपीठा येऽनेके श्मश्रुस्थाने वसति हि ॥३२॥
अनेक मुनींचे समुदाय काखेतील केसांच्या आश्रयाने आहेत. पीठ व उपपीठ हे श्मश्रूंच्या म्हणजे दाढी-मिशांच्या ठिकाणी राहतात.

भूतप्रेतपिशाचराक्षसगणा दैत्यास्तथा दानवा: ।
सर्वे कीकससंधिसंगतिकरा: संतीति सिद्धोदितम्‍ ॥
नागा अक्षितनूरुहेषु सकला ये तूपनागा मता: ।
तेषामस्ति निवासभूमिरुद्रप्रोद्‍भूतरोमोद्‍गमे ॥३३॥
भूत, प्रेत, पिशाच्च, राक्षसांचे समुदाय, दैत्य व दनुकुलोत्पन्न दानव हे सगळे अस्थिसंधींमध्ये असतात असे सिद्धांचे वचन आहे. नाग अर्थात्‍ सर्पजाती डोळ्यांच्या पापण्यांवरील केसात राहतात व उपनाग म्हणजे सामान्य सर्पजात किंवा सरपटणारे प्राणी पोटावरील रोमावळीमध्ये राहतात असे सिद्धांचे म्हणणे आहे.

नानाविधेष्ववयवेषु वसंति चान्ये
गंधर्वकिन्नरगणाप्सरसोऽथ यक्षा: ।
या: स्यु: परा इह सदा खलु देवताश्च
वाच्येषु रश्मिविततेषु समुल्लसंति ॥३४॥
या देहातील नानाविध अवयवांमध्ये गंधर्व, किन्नर, यक्ष व अप्सरा राहतात आणि इतरही असलेल्या काही देवता शारीरिक ओज-तेजाच्या किरणसमूहामध्ये राहतात.

खेचर्य्यो मातरश्चान्या डाकिन्याद्युग्रदेवता: ।
वायुवेगे वसन्त्यत्र जलदा अश्रुपातगा: ॥३५॥
खेचरी, सप्तमातर आणि डाकिन्यादि उग्रदेवता वायुवेगात अर्थात्‍ श्वासोच्छ्‍वासात राहतात. मेघ हे अश्रुधारात वास्तव्य करतात.

मर्मस्थानेष्वनेकेषां तीर्थानामस्ति संश्रय: ।
मतिप्रकाशेष्वावास: सिद्धानामपि कीर्तित: ॥३६॥
देहातील मर्मस्थानात सर्व तीर्थे राहतात. बुद्धिप्रकाशात अर्थात्‍ बुद्धीच्या वेगवेगळ्या दालनात सिद्धांचे वसतिस्थान आहे.

सूर्य्यचंद्रमसोर्वासो नेत्रद्वय उदीरित: ।
लतागुल्मतृणादीनां जंघारोमसु संश्रय: ॥३७॥
सूर्य आणि चंद्र हे दोन डोळ्यांमध्ये राहतात असे सांगितले आहे. वेली, झुडपे, गवतादि अर्थात्‍ दर्भादि स्थावरांचे वास्तव्य जांघेतील केसांमध्ये आहे.

कृमिकीटपतंगाद्या: पुरीषे कृतसंश्रया: ।
यत्सुखं स भवेत्सर्गो यद्‍दु:खं नरकं हि तत्‍ ॥३८॥
कृमीकीटपतंगादि क्षुद्रजीव विष्ठेत किंवा मलात राहतात. (देहोद्‍भुत) सुख हा स्वर्ग व (देहगत) दु:ख हा नरक होय.

निर्विकल्पो भवेन्मोक्षो निद्रादौ जागरोत्तरम्‍ ।
स्वस्वरुपदशेत्युक्तं पिंडसंवित्तिहेतवे ॥३९॥
निद्रेच्या आधीची म्हणजे पूर्वीची किंवा जागृतीच्या नंतरची अर्थात्‍ उत्तरकालीन असस्था ही स्वस्वरुप दशा किंवा शिवदशा समजावी. पिंडज्ञान होण्यासाठी हे सारे वर्णन केले आहे.

अखंड परिपूर्णात्मा विश्वरुपो महेश्वर: ।
घटे घटे चित्प्रकाशस्तिष्ठतीति प्रबुध्यताम्‍ ॥४०॥
अखंड व परिपूर्णरुप आत्मा हा विश्वस्वरुपी महेश्वर होय. तो प्रत्येक देहात चित्प्रकाशरुपाने वास्तव्य करतो असे जाणावे.
इति पिंडसंवित्तिस्तृतीयोपदेश: ॥
अशा प्रकारे पिंडसंवत्तिरुप तृतीयोपदेश समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP