नवचक्राणि देहेस्मिन् भवन्तीति विनिश्चितम् ।
तेषां विभागो ज्ञातव्य आधारादिक्रमादय ॥१॥
या देहामध्ये नऊ चक्रे असतात हे निश्चित आहे; परंतु आधारादिक्रमाने त्यांचे विभाग, विभाजन किंवा फोड जाणून घ्यावयास पाहिजे.
ब्रह्मचक्रं त्रिधावर्त भगमंडलकाकृति ।
आधारे तदध:कंदे ध्यायेच्छक्तिं हुताशभाम् ॥२॥
ब्रह्मचक्र हे तीन वेढ्यांचे असून त्याचा आकार भगमंडलाप्रमाणे आहे. त्याच्या खाली मूलाधारात अग्नितुल्यकांतीच्या शक्तीचे ध्यान करावे.
कामरुपाभिधं पीठं सर्वकामप्रदायि तत् ।
तदत्र भवतीत्युक्तं सिद्धसिद्धान्तवेदिभि: ॥३॥
तेथे हे कामरुपनामक पीठ आहे. ते सर्व कामना पूर्ण करणारे आहे असे सिद्धसिद्धान्तवेत्त्यांनी सांगितले आहे.
स्वाधिष्ठानाभिधं चक्रं द्वितीयं यच्चतुर्दलम् ।
पद्मं तत्र प्रवालाभं लिंगं ध्यायेत् पराडमुखम् ॥४॥
स्वाधिष्ठाननामक दुसरे चक्र आहे. ते चार पाकळ्यांच्या कमळाच्या आकाराचे आहे. तेथे प्रवाळवर्णीय म्हणजे गुंजांच्या रंगाच्या लिंगाचे ध्यान करावे. या चक्राचे मुख उलट दिशेला आहे म्हणजे हे कमल अधोमुखी आहे.
तत्रैवोड्यानपीठं स्याज्जगदाकर्षसिद्धिदम् ।
भवतीति महासिद्धा: सिद्धान्तं चक्रिरे पुरा ॥५॥
त्याच ठिकाणी जगाला आकर्षण करण्याची सिद्धी बहाल करणारे उड्ड्यानपीठ आहे असा सिद्धान्त थोर अशा सिद्धपुरुषांनी पूर्वी करुन ठेविला आहे.
तृतीये नाभिचक्रे तु पंचावर्तादिसन्निभे ।
ध्यायेत् कुंडलिकाकारे बालार्कद्युतिकुंडलीम् ॥६॥
तिसरे नाभिचक्र आहे. याला पाच वेढे किंवा वेटोळे आहेत. ते कुंडलाकार आहे. तेथे बालसूर्यासमानकांतीच्या कुंडलीचे अर्थात् कुंडलिनेचे ध्यान करावे.
तुर्य्यं हृदयचक्रं यत्तत्राष्टदलवारिजे ।
लिंगं ध्यायेत् कर्णिकाअन्तेर्ज्योतिर्खतारभोज्ज्वलम् ॥७॥
चौथे हृदयचक्र आहे. त्याला आठ पाकळ्यांच्या कमळाचा आकार आहे. त्या कमळाच्या मध्यभागांतील कर्णिकेमध्ये कांतियुक्त, उज्ज्वल व अत्यंत प्रकाशमान लिंगाचे ध्यान करावे.
सैव हंसकला ख्याता सर्वेंद्रियवशंकरी
योगिभिर्विधिवद् ज्ञाता सर्वलोकान् वशं नयेत् ॥८॥
तिलाच हंसकला म्हणतात. ती सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवणारी आहे. योग्यांनी या हंसकलेचे यथाविधी ध्यान केल्यास सर्व लोक वश होतात.
पंचमं कंठचक्रं तु चतुरंगुलबिन्दुभम् ।
तद्वामदक्षचंद्रार्कनाड्योर्ध्यायेत् सुषुम्णिकाम् ॥९॥
पाचवे कंठचक्र आहे. ते चार अंगुले लांब, रुंद व बिंदुप्रमाणे वर्तुलाकार असून कांतिमान् आहे. त्याच्या डाव्या व उजव्या बाजूने जाणार्या चंद्रसूर्यनाड्यांमधील सुषुम्नेचे ध्यान करावे.
अनाहतकला सैव विख्याता योगिनां मते ।
अनाहतमहासिद्धिविश्राणनधुरंधरा ॥१०॥
योग्यांच्या मताने (योगशास्त्रात) जिला अनाहतकला म्हणतात ती हीच होय. ही अनाहतकला मोठमोठ्या सिद्धींची प्राप्ती करुन देण्यात कुशल व श्रेष्ठ आहे.
तालुचक्र षष्ठमत्र सुधाधाराप्रवाहभृत् ।
घंटिका राजदन्तान्तर्ध्यायेत् शून्यं मनोलये ॥११॥
सहावे तालुचक्र आहे. हे अमृतधारांचा वर्षाव करणारे आहे. मुखात लिंगाकार घंटिका किंवा पडजीभ असून राजदन्त नावाचे बिळ किंवा ज्याला शंखिनी विवरही म्हणतात ते आहे. त्यांच्या मध्यभागी हे चक्र आहे. या ठिकाणी मनोलय करुन शून्याचे ध्यान करावे.
नवमं ब्रह्मचक्रं यत्सहस्त्रदलवारिजम् ।
ध्यायेद्गोक्षीरभं तत्र हंसं तत्तन्मयो भवेत् ॥१२॥
नववे ब्रह्मचक्र आहे. हे हजार पाकळ्यांच्या कमळासारखे आहे. त्या ठिकाणी गाईच्या दुधाप्रमाणे सौम्यकांती असलेल्या हंसाने ध्यान करावे व तन्मय व्हावे.
नवचक्रविचारोयं कथित: परमार्थद: ।
अथाहं षोडशाधारान् वक्ष्यामि कृपया गुरो: ॥१३॥
परमार्थ प्राप्ती करुन देणारा हा नवचक्रविचार सांगितला. यानंतर गुरुकृपेने मी सोळा आधारांविषयीचे वर्णन करतो.
पादांगुष्ठात्परं ध्यायेत्तेजस्वत्प्रथमं यदि ।
दृष्टि: स्थैर्य्य समायाति नैरन्तर्य्येण निर्मला ॥१४॥
पादांगुष्ठाच्या वरील भागी तेजोमय तत्त्वाचे निरंतर ध्यान केल्याने दृष्टीला स्थिरता व निर्मलता येते.
मूलसूत्रं समाल्म्ब्य स्थातव्यं पादपार्ष्णिना ।
यदा तदानीमाधारो द्वितीयोऽग्निप्रदीपन: ॥१५॥
मूळसूत्राचे आलंबन करुन म्हणजे लिंग व गुदा यांच्या मध्यभागी असलेल्या शिवणीवर डाव्या पायाची टाच दाबून ठेवावी हा दुसरा आधार होय. यामुळे अग्निदीपन होते अर्थात् या आसनामुळे अपान ऊर्ध्व होऊन अग्नी प्रज्वलित होतो.
विकाससंकोचनतो गुदमाकुंचयेद्यदा ।
तृतीयोधार उक्तस्तदपानस्थैर्य्यकारक: ॥१६॥
या आसनावर बसल्यावर गुदद्वाराचे आकुंचन व प्रसरण करावे. हा तिसरा आधार होय. यामुळे अपानवायूची स्थिरता साधते.
संकोचनेन मणिकस्य परत्र तुर्य्ये
दंडाध्वनैव चरमेण निवेश्य चित्तम्
वज्रोदरे सगतिबंधनभेदिदर्प्यां
भृंगस्य चेद्विदिदरे (?) खलु बिंदुबन्ध: ॥१७॥
चौथा आधार मणिक किंवा लिंग हा आहे. या आधाराच्या संकोचनाने चित्ताला पृष्ठमण्यातील मार्गामध्ये म्हणजे सुषुम्नेमध्ये ठेवून तेथेच अडवावे. असे केले म्हणजे कमळात सापडलेल्या भुंग्याप्रमाणे चित्ताची स्थिती होते व ते स्थिर होते. चित्त स्थिर झाले की, शुक्रस्थैर्यही होते अर्थात् बिंदू म्हणजे वीर्य ढळत नाही व साधक ऊर्ध्वरेता होतो.
एषा वज्रोलिका प्रोक्ता सिद्धसिद्धान्तवेदिभि: ।
ज्ञानादेव भवेदस्या: सिद्धमार्ग: प्रकाशित: ॥१८॥
या स्थितीला सिद्धसिद्धान्तवेत्त्यांनी वज्रोली असे म्हटले आहे. केवळ या वज्रोलीच्या ज्ञानाने सिद्धमार्ग प्रकाशित किंवा ज्ञात होतो.
नाड्याधारे पंचमे तु सन्निवेश्य मनोनिलम् ।
जारणं भवति क्षिप्रं योगिनां मलमूत्रयो: ॥१९॥
पाचव्या नाडीच्या आधाराने अर्थात् उड्डियान व मूलाधार यांच्या बंधनाने साधक-योगाच्या मलमूत्राचे जारण होते अर्थात् त्याला शुष्कता येते किंवा ते कमी होते.
नाभ्याधारे तथा षष्ठे प्रणवोच्चारणक्रियाम् ।
कृत्वेकाग्रेण मनसा नादोदयमुपैत्यलम् ॥२०॥
सहाव्या नाभिचक्रात प्रणवोच्चारपूर्वक अर्थात् ॐकाराचे उच्चारण करीत मनाची एकाग्रता केल्यास अनाहत नादाची उत्पत्ती व त्यात शब्दाचा अर्थात् शक्तीचा लय होत जातो.
सप्तमे हृदयाधारे प्राणवायुं निरोधयेत् ।
तदा तदैवांबुरुहं विकासमधिगच्छति ॥२१॥
सातव्या हृदयाधारात प्राणवायूचा निरोध करावा. त्यामुळे लगेच हृदयकमलाचा विकास होतो.
कंठाधारेऽष्टमे कंठं चिबुकेन निपीडयेत् ।
इडापिंगलयोर्वायुस्थैर्य्यभावस्तदा भवेत् ॥२२॥
आठव्या कंठाधारात हनुवटीने कंठकूप दाबावा. त्यामुळे इडापिंगलेतून वाहणारा वायू स्थिर होतो अर्थात् संसाराची प्रवृत्ती शांत होते.
नवमे घंटिकाधारे जिह्वां संघट्टयेत् क्रम्मत् ।
सुधाकलापरिस्त्रावस्तदा स्यादमरत्वद: ॥२३॥
नवव्या घाटीच्या म्हणजे पडजिभेच्या आधारात जिव्हा क्रमाक्रमाने चाळवीत किंवा लांबवीत उलटी लावावी. त्यामुळे त्या जागी सहस्त्रदलकमलातील चंद्रमंडलातून टिबकणार्या अमृतबिंदूंच्या स्त्रावाचे पान घडते व त्यामुळे साधक अमर होतो. (सिद्धयोगसाधनेत जीभ आपोआप उलटी वळूण सुधामृतस्त्रावपानासाठी खेचरीमुद्रा आतूनच लावावीशी वाटते.)
जिह्वां चालदोहाभ्यां दीर्घीकृत्य निवेशयेत् ।
दशमाधारताल्वन्त: काष्ठा भवति सा परा ॥२४॥
दहावा ताल्वाधार हा पडजिभेच्या मागील छिद्राच्या शेवटी आहे. रोज चालन म्हणजे जीभ आडवी हलवून व दोहन म्हणजे गाईच्या कासेतून धार काढल्याप्रमाणे छिद्रात प्रवेश करावा. साधकयोग्याला काष्ठाप्रमाणे निश्चलता प्राप्त करुन देणारी ही सर्वोत्कृष्ट स्थिती होय.
एकादशे रसाधारे जिह्वाग्रमथनास्त्फुटम् ।
परमानंदसंदोहकारिणी कविता भवेत् ॥२५॥
अकराव्या रसाधारात जिव्हेचा अग्रभाग वरचेवर किंवा वारंवार आतल्या भागात पडजिभेजवळ लावल्याने परमानंददायक कविता करण्याची शक्ती येते किंवा कविता आतून प्रकट होते.
द्वाद्शोद्धूर्वरदाधारे जिहवाग्रं ग्रंथयेद् दृढम् ।
व्याधय: क्षणमात्रेण परिक्षीणा भवन्त्यलम् ॥२६॥
बाराव्या राजदंताच्या आधारात अर्थात् हिरड्यात जिव्हाग्राचे दृढ घर्षण केल्याने व्याधी क्षणमात्रात नामशेष होतात.
त्रयोदशो नासिकाख्य आधारो य: प्रकीर्तित: ।
तदग्रं लक्षयेन्नित्यं मनो भवति सुस्थिरम् ॥२७॥
तेरावा नासिकाधार आहे म्हणून सांगितले आहे. त्या नासिकाग्राचे वारंवार निरीक्षण केल्याने म्हणजे दोन्ही डोळ्यांनी नाकाचे टोक सतत पाहिल्याने मन:स्थैर्य प्राप्त होते किंवा मन स्थिर होते.
कपाटाकारमाहुर्यन्नासामूलं चतुर्दशम् ।
तत्र दृष्टिनिबन्धेन षण् मासाज्ज्योतिरीक्षणम् ॥२८॥
कवाडाच्या आकाराचे जे नासामूल आहे तो चौदावा आधार म्हटला आहे. तेथे दृष्टी स्थिर केल्याने सहा महिन्यात ज्योतिर्मंडल दिसू लागते अर्थात् प्रकाश दिसू लागतो.
भ्रुवाधारं पंचदशं पश्चेच्चेदूर्वचक्षुषा ।
पुरोऽवलोकयेतश्रीमान् किरणाकारमुज्जवलम् ॥२९॥
पंधरावा आधार भ्रूकुटीमध्य आहे. ऊर्ध्वदृष्टीने भ्रूमध्याचे अवलोकन केल्यास तेजस्वी किरणांचे गोल मंडल दिसू लागते.
षोडशं नयनाधारमूद्धूर्वभागे प्रचालयेत् ।
अंगुल्या चेदयांगे स्वे ज्योति:पुंजं प्रयश्यति ॥३०॥
सोळावा नयनधार आहे. बुबुळांची गती ऊर्ध्वभागाकडे करावी व स्वत:च्या बोटांनी नेत्रांच्या बाहुल्या अपांगाकडे न्याव्यात. त्यामुळे तेजाचा पुंजका दिसू लागतो.
सदा कृन्तनमेवाऽथ लोकयेन्निर्मलाशय: ।
इत्युक्ता: षोडशाऽऽधारा लक्ष्यत्रयमथोच्यते ॥३१॥
निर्मलचित्त साधकाने असे नेहमी पाहावे किंवा साधन करावे. अशा प्रकारे सोळा आधार सांगितले. आता लक्ष्यत्रय सांगतो.
मूलकन्दाद्दंडलग्नां ब्रह्मनाडीं सितप्रभाम् ।
ब्रह्मरंध्रावधिध्यायेत् सन्मध्ये विद्युदुज्जवलाम् ॥३२॥
मूलाधारापासून पाठीच्या कण्याला चिकटून ब्रह्मनाडी ही ब्रह्मरंध्रापर्यंत गेली आहे. ही ब्रह्मनाडी शुभ्र वर्णाची, प्रकाशमान व विजेसारखी उज्ज्वल आहे.
मूर्ति तां लक्ष्ययेन्नित्यं बिसतंतुनीयसीम् ।
सर्वसिद्धिप्रदाने सा कल्पवल्लीयते सताम् ॥३३॥
कमलतंतुप्रमाणे अतिशय सूक्ष्म अशा त्या मूर्तीचे अर्थात् ब्रह्मनाडीचे नित्य ध्यान करावे; कारण ही नाडी सर्व प्रकारच्या सिद्धी देण्याच्या कामी कृल्पवृक्षासारखी आहे.
ललाटोर्ध्वेऽथवा ताराकारं गुह्याटमंडलम् ।
लक्षयेद्वालिकुहरे रक्तं मधुकराकृतिम् ॥३४॥
ललाटाच्या ऊर्ध्वभागी तार्याच्या आकाराचे एक गुप्तमंडळ आहे. ते भुंग्याच्या आकारासारखे असून लाल रंगाचे आहे.
तर्ज्जनीमुखनिरुद्धकर्णको योऽथवा भवति पुरुषोत्तम: ।
मूर्द्धमध्यगतसिंहहाटके तस्य नाद उदयेत धुंध्विति ॥३५॥
जो साधकयोगी आपल्या तर्जनींनी कान बंद करतो त्याला त्या सिंहहाटकस्थानातून अर्थात् मधुकराकृति गुप्तमंडलातून धूं धूं असा भरीव नाद ऐकू येतो.
चक्षूर्मध्ये पुत्तलीसन्निभं का नीलज्योतीरुपमुद्यत् प्रकाशम् ।
नैरन्तर्य्याल्लक्षयेदेतदुक्तं प्राज्ञैरन्तर्लक्ष्यमल्लब्धचित्तै: ॥३६॥
डोळ्यांमध्ये पुतळी अर्थात् बाहुलीसारखे दिसणारे नीलवर्णाचे व प्रकाश पसरविणारे जे एक साकार तत्त्व आहे तिकडे निरंतर लक्षपूर्वक पाहिल्याने अंतर्लक्ष्यता येते योगी विद्वानांनी सांगितले आहे. (ही क्रिया अर्धोन्मीलित दृष्टीने किंवा नेत्र बंद करुन करावयाची असते.)
एकांगुलचतुर्मार्गे नासाग्राद्बहिरंबरम् ।
श्यामलज्योतिरुपमं नैरन्तर्य्येण लक्षयेत् ॥३७॥
नासाग्रापासून पुढील भागी निळसर कांती असलेले एक बोट रुंद व चार बोटे लांब असे आकाश (स्थान) सतत पाहात राहावे.
नासाग्रतो बहिर्व्यापि सततं द्वादशांगुले ।
लक्षयेद्धरितालाभं पुर: पार्थिवमंडलम् ॥३८॥
नासाग्राबाहेर बारा बोटांपर्यंत व्यापलेले हिरव्या रंगाचे पार्थिवमंडल सतत पाहण्याचा सराव ठेवावा.
वायूतत्त्वं धूम्रवर्णं नासाग्रात् षोडशांगुलम् ।
लक्षयेत्तन्मुखं वा खं स्थिरदृग्गोकुलेक्षणे ॥३९॥
इति सिद्धसिद्धांतसंग्रहे निर्मलीकरणम् ॥
तसेच नासाग्राबाहेर सोळा बोटांपलीकडे धुरकट रंगाचे वायुतत्त्व पाहावे किंवा वायुसंयुक्त आकाशीय तत्त्व दृष्टी स्थिर करुन पाहण्याचा सराव ठेवावा. सिद्धसिद्धांतसंग्रहात सांगितलेल्या या कृतीला निर्मलीकरण म्हणतात. (यामुळे दृष्टी स्थिर व निर्मळ होण्यास मदत होते.)
ऊर्द्धर्वदृष्टयान्तरालम्बे लक्षयेत्सिद्धवर्त्मग: ।
ज्योतिर्मयूखा दृश्यन्ते तदाऽकस्मादितस्तत: ॥४०॥
ऊर्ध्व दृष्टी करुन एका विवक्षित गगनभागात पाहात राहिल्याने अकस्मात् चकूकडे पसरलेले प्रकाशकिरण दिसतात. ते सिद्धांच्या मार्गातील तत्त्वे किंवा टप्पे होत.
अथवा यत्र कुत्रापि व्यौमेव परिक्षयेत् ।
आलंबते स्थिरत्वं दृक् योगिनोऽभ्यासत: सदा ॥४१॥
किंवा कोठेही आकाश म्हणज शून्यतत्त्वाकडेच दृष्टी ठेवावी. अशा प्रकारच्या सतत अभ्यासाने दृष्टीला स्थैर्य येते.
द्वादशांगुलभारभ्याष्टादशांगुलकावधि ।
शिरस्यूद्धर्वेऽथवा पश्येज्ज्योति: पुंजं विमुक्तिदम् ॥४२॥
किंवा मस्तकाच्या वरील भागात बारा बोटे ते अठरा बोटांपर्यंतचा भाग तेज:पुंजकिरणयुक्त आहे अशी कल्पना ठेवून पाहावा. त्यामुळे साधकाला मुक्तिलाभात साहाय्य होते.
दृष्टयग्रे तप्तभर्माभां लक्षयेद्वा वसुंधराम् ।
दृष्टि: स्थिरत्वमेतीति बहिर्लकक्ष्यमनेकधा ॥४३॥
साधकयोग्याने आपल्या दृष्टीसमोर तेजोयुक्त पृथ्विगोल पाहावा. त्यामुळे दृष्टीला स्थिर होण्याची सवय लागत. अशा रीतीने बहिर्लक्ष्याच्या म्हणजे बाहेर पाहून चित्त एकाग्र करण्याच्या अनेक युक्त्या आहेत.
सितं पीतं रक्तं हरितमथवा श्यामलनिभं
प्रदीपाकारं वाधिगततुलनं धूमशिखया ।
स्फुरज्ज्योतीरुपं हिमकिरणबिंबाकृति तथा
दिनेशाकारं वा नवयवकमीक्षेत मनसा ॥४४॥
आपल्या दृष्टीपुढे यवाच्या म्हणजे सातूच्या आकाराचे नऊ प्रकारच्या विविध रंगांचे भाग आहेत असे मनाने कल्पून ते पाहावेत. पांढरा, पिवळा, तांबडा, हिरवा, काळसर किंवा श्यामल, प्रदीपाकार म्हणजे केशरी, धूर ओकणार्या दीपाप्रमाणे, स्फुरण पावणार्या ज्योतिप्रमाणे किंवा विजेप्रमाणे, शीतकिरण चंद्राप्रमाणे व प्रखरप्रकाशी सूर्य किरणांप्रमाणे विविधवर्णप्रकाश पाहण्याचा अभ्यास करावा.
मध्यलक्ष्यमिदं प्रोक्तमिति लक्ष्यत्रयीरिता ।
सिद्धसिद्धान्तविज्ञातं व्योमपंचममुच्यते ॥४५॥
हे मध्यलक्ष्य होय. अशा रीतीने तिन्ही लक्ष्यांचे स्वरुप सांगितले. आता व्योमपंचक सांगतो.
बाह्याभ्यंतरदेशमुज्ज्वलतमं शून्यं खमालोकयेत्
ध्वांताकारधरं परं खमथवा कल्पान्तकालाग्निभम् ।
आहोस्विद् गमनं महत्पदमुत प्रद्योतरुपं नभस्तत्त्वाद्यं
दिनरत्नकोटिरुचि वा सूर्य्याम्बरं संततम् ॥४६॥
आत-बाहेरील प्रदेशात प्रकाशोज्ज्वल असे शून्याप्रकाश पाहावे. गडद अंधकारव्याप्त असा आकाशभाग पाहावा. किंवा प्रलयकालीन असे अग्नितुल्य प्रकाशमान आकाश पाहावे. किंवा प्रकाशझोतांनी युक्त महद्गगन अर्थात् महदाकाश पाहावे. किंवा कोटयवधिरत्नप्रकाशासारखे असलेले असे सूर्यावर म्हणजे सूर्यमंडल पाहावे.
व्योमपंचकविलोकनात् पुमान् जायते कुलिशतुल्यविग्रह: ।
इत्यवेत्य विमलेन चेतसा व्योमपंचकमिदं प्रपंचितम् ॥४७॥
या आकाश पंचकाकडे पाहण्याने साधकाला वज्रतुल्य बळकट शरीराचा लाभ होतो म्हणून निर्मल मनाने, निष्कपट चित्ताने किंवा करुणादृष्टीने व्योमपंचकाचे विस्तृत विवेचन केले आहे.
नवांगं षोडशाधारं त्रिलक्ष्यं व्योमपंचकम् ।
समानं यो न जानाति स योगी नामधारक: ॥४८॥
(इति प्राचीनोक्ति:)
नऊ अंगे, सोळा आधार, तीन लक्ष्य आणि व्योमपंचक यांचे ज्ञान, त्या त्या परिणांमासह ज्याला असत नाही तो केवळ नावाचा म्हणजे नाममात्र योगी समजावा, अशी प्राचीन उक्ती आहे.
योगांगानि भवंत्यष्टौ यमो नियम आसनम् ।
प्राणायामस्तथा प्रत्याहार: स्यादय धारणा ॥४९॥
ध्यानं समाधिरेतेषां पृथगर्थानथ ब्रुवे ।
द्वंद्वदु:खादिसहनं यम इत्यभिधीयते ॥५०॥
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी योगाची आठ अंगे आहेत. या प्रत्येक अंगाचा अर्थ स्पष्ट करुन सांगतो. शीतोष्णादि द्वंद्वदु:खे सहन करणे याला यम म्हणतात.
वृत्तीनां मानसीनां हि यै: स्यान्नियमनं स्फुटम् ।
नियमास्ते प्रकीर्त्यन्ते संतोषप्रमुखा बुधै: ॥५१॥
ज्यांच्यामुळे मानसिकवृत्तींचे नियमन होते त्यांना योगिजनांनी नियम हे नाव दिले आहे. संतोष, शौच, ईश्वरप्रणिधानादिकांना नियम म्हणतात.
स्वस्वरुपे सदासन्नभाव आसनमुच्यते ।
सुखस्वस्थाम्बुजादीनां भेदात्तद् बहुधा मतम् ॥५२॥
स्वस्वरुपाजवळ नेहमी राहण्याच्या अवस्थेला आसन असे म्हणतात. सुखासन, स्वस्थासन, पद्मासन इत्यादि भेदांनी आसनांचे अनेक प्रकार आहेत.
प्राणानां स्थैर्य्यहेतुर्य्य: स प्राणायाम इष्यते ।
नि:श्वासतारे चक्राद्यै: सम्पुटीकरणं यथा ॥५३॥
प्राणाच्या स्थिरतेला हेतुभूत अशी जी क्रिया तिला प्राणायाम म्हणतात. नि:श्वास-तार-चक्रादिकांनी वायूला कोंडणे व संपुट करणे या प्राणायामांतर्गत क्रिया होत.
चेतोवृत्तितरंगाणां विषयेभ्यो निवर्तनम् ।
प्रत्याहार: स उत्पन्नो विकारग्रासकारक: ॥५४॥
चित्ताच्या वृत्तिरुप तरंगांना विषयांपासून परतविणे याला प्रत्याहार म्हणतात. हा प्रत्याहार मनात उत्पन्न झालेल्या सर्व विकारांना गिळून टाकतो.
उत्पन्नोत्पन्नवृत्तीनां निर्विकारे हि धारणम् ।
धारणेति समाख्याता नियम्यैकाऽवधारणा ॥५५॥
उत्पन्न होणार्या सर्व वृत्तीणां निर्विकारी मनात धारण करणे म्हणजे सर्व मनोवृत्ती मनातच लय पावून मन निर्विकार होईपर्यंत स्थिर राहणे याला धारणा हे नाव आहे. नियमपूर्वक एकत्वाची निश्चयात्मिका वृत्ती हे धारणेचे स्वरुप आहे.
परमात्माऽस्ति निर्द्वद्व: स्वात्मारामोत्र यद्भवेत् ।
यत्तत्स्वरुपमित्यन्तर्वृत्तिर्ध्यानमिति स्मृतम् ॥५६॥
परमात्मा हा स्वात्मारामा व द्वंद्वरहित असा आहे, अशा स्वरुपाची जी अंतर्वृत्ती निर्माण होते, ते ध्यान होय.
सर्वतत्त्वसमावस्था समाधिरिती कीर्तित: ।
निरुद्यमत्वानायासावेकशीलैकभावते ॥५७॥
निर्विकल्पत्वमेते ते संति भेदा: समाधिजा: ।
अष्टांगयोग इत्येष निरुपित इह स्फुटम् ॥५८॥
सर्व तत्त्वांची सम अवस्था असणे याला समाधी असे म्हणतात. उद्योगराहित्य, आयास किंवा श्रमराहित्य, एकशीलता, एकभावता व निर्विकल्पता असे समाधीचे भेद आहेत. असा अष्टांगयोग या ठिकाणी स्पष्ट करुन सांगितला आहे.
॥ इति सिद्धसिद्धांतसंग्रहे पिंडविचारे द्वितीयोपदेश: ॥
अशा प्रकारे सिद्धसिद्धांतसंग्रंहातील पिंडविचारातील दुसरा उपदेश समाप्त झाला.