अर्धसमवृत्तें - १६६ ते १७५
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
विबुधप्रिया : - ( रसौ जजौ भरसंयुता करिवाणरवैर्हरनर्तनम् ) : -
रासजासभरागणीं घडते पहा विबुधप्रिया ।
राधिका सखि आज ती मज आणि भेटिस राजसे ।
देतसें धन फारसें तव मानसा अवडे तसें ॥
चित्त हें तिज पाहुनी भ्रमलें दुजी न सुचे क्रिया ।
प्राण जाइल वाटतो जरि येइना विबुधप्रिया ॥१६६॥
==
कनकप्रभा: - सजसा जगौ च यदि मंजुभाषिणी ॥
सजसाजगीं घडल मंजुभाषिणी ॥
मुखपद्म ज्यावरि कचाग्र शोभलें ।
धन पीन तुंग कुच देखणे भले ।
बहु पुण्य जो करिल त्यास ती वरी ॥
कनकप्रभा न इतरास नोवरी ॥१६७॥
==
वरतनु : -
(भवति नजावथ मालिनी जरौ ) : - वरतनु हें घडतें नजाजरीं
नमिशि जरी भजशील राघवा ।
हरिल तरी भवरोग आघवा ॥
सकल वडील तरावयास रे ।
वरतनु लाभलि यास हें बरें ॥१६८॥
==
कुड्मलदन्ती : -
( बाणरसै: स्यात्ड भतनगगै: श्री: ) : -
कुड्मलदंती भतगगांनीं ।
भास्कर तूतें धनसुत देतो ।
रोगहि सारे सहज हरीतो ॥
नित्य तयातें नम नियमानें ।
कुड्मलदन्ती तुज वरि मानें ॥१६९॥
==
प्रसंग: - ( ननरलगुरुभिश्च भद्रिका ) ननरलगुरु यांहि भद्रिका ।
रजनिपतिमुखी पहावया ।
हरि बहु दिससां अला तया ॥
रमवि तयिं पती उभा पहा ।
युवतिस घडला प्रसंग हा ॥१७०॥
==
चामर - ( तूणकं समानिका पदव्दयं विनान्तिमम् ) : -
राजराजरागणीं घडेल वृत्त चामर ।
राधिका पहावयास जातसे रमापती ।
प्राकृतासमान त्यांस वृध्दगोप कोपती ॥
तो कळे न हा हरीच गोकुळांत पामरां ।
नीच मार्जनीसमान मानितात चामरां ॥१७१॥
==
मदिरा : - ( सप्तभकारयुतैकगुरुर्यदि सेयमुदारतरा मदिरा ) : -
सात भकार गुरु तदनंतर एकचि त्या मदिरा म्हणती ।
भिक्षुक भाविक भास्करभक्तहि भामिनिभूत उभें न पुढें ।
सज्जन मानिति पंडीत वानिति वाटतसे मनिं नाक चढे ॥
ज्यांसि निरंतर वंदुनियव वर पावल जनकिनाथपदां ।
मोहिल त्यासहि सेविलिया जरि ही मदिरा घडवी अपदा ॥१७२॥
==
चंपकमाला: - ( रुक्मवती सा यत्र भमसगा: ) - भामसगांनीं चंपकमाला ।
ज्या तरुणींसीं संग करितो ।
मन्मथवन्ही उष्ण हरितो ॥
त्या गुणपात्रा गोकुळपाला ।
द्या अतिवेगें चंपकमाला ॥१७३॥
==
चंद्रवर्त्म : - ( चंद्रवर्त्म. निगदंति रनभसै: ) : - चंद्रवर्त्म घडतेंच रनभसीं ।
राधिका पुलिनिं ये रजीमुखीं ।
कृष्ण येईल अतां म्हणुनि सुखी ।
आस्य पाहुनि तिचें मनिं विरला ।
चंद्र वर्त्म अपुलें ( हि) विसरला ॥१७४॥
==
भद्रिका : - ( ननरलगुरुभिश्च भद्रिका ) : - ननरलगुरु यांहि भद्रिका ।
यदुपतिपदिं या मनास रे ।
धीर तरि भववासना सरे ।
मिळतिल तुज फार मुद्रिका ॥
बसल घरिं सदैव भद्रिका ॥१७५॥
==
पहिलें ८ एव गादित: श्लोकसंख्या १८०
रामचंद्र गणकें हरिलीला ।
वर्णुनी करि विसत्व कलीला ॥
मंद जे तदुपयोगि सुवृत्तें ।
पूर्ण मंगल मही मितवृत्तें ॥१॥
येथें उणें अधिक जें वदलों असेल ।
तें ज्यांचिया मतिस वाइटसें दिसेल ॥
त्यांनीं कृपा करुनि शुध्दि घडे तसेंची ।
केलें तरी गुरु सुधा वदनांत सेची ॥२॥
इति छंदोमंजरी ग्रंथ : समाप्त:
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP