शिवभारत - अध्याय एकविसावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवींद्र म्हणाला :-
नंतर एकमेकांच्या भेटीकरितां अत्यंत उद्युक्त, त्या गोष्टीचा ध्यास लागलेल्या तत्पर व आपआपल्या राजनीतीनें वागणार्‍या त्या दोघांचा दूतांच्या ( वकिलांच्या ) द्वारें जसा करार झाला तसा सर्व सांगतों; हे पंडितांनो ? ऐका. ॥१॥२॥
आपलें सैन्य जसें आहे तसेंच ठेवून एकट्या अफजलखानानें स्वतः सशस्त्र निघावें आणि पालखींत बसून पुढें जावें; त्याच्या सेवेसाठीं दोन तीनच सेवक असावेत; तसेंच त्यानें प्रतापगडाच्या पायथ्याजवळ स्वतः येऊन तेथेंच सभा मंडपांत वाट पाहात राहावें. आणि शिवाजीनें सशस्त्र येऊन त्या पाहुण्याचा आदरसत्कार गौरवानें यथाविधि करावा. दोघांच्याहि रक्षणासाठीं सज्ज स्वामिनिष्ठ, शूर व निष्ठावान् अशा दहा दहा सैनिकांनीं बाणाच्या टप्यावर येऊन मागें उभें राहावें; आणि दोघांनींहि भेटल्यावर सर्वच लोकांना अत्यानंदकारक असें गुप्त बोलणें ( खलवत ) तेथें करावें. ॥३॥४॥५॥६॥७॥८॥
याप्रमाणें करार करून व आंतून कपट योजून एकमेकांस भेटूं इच्छिणारे ते दोघे त्या समयीं शोभले. ॥९॥
नंतर तो प्रतापगडाच्या पायथ्यावरील मैदानाकडे येत आहे असें ऐकून शिवाजी महाराज सज्ज होत असतांना शोभूं लागले. ॥१०॥
उपाध्यायानें सांगितल्याप्रमाणें विविध प्रकारांनीं देवाधिदेव शंकराची नित्याप्रमाणें पूजा करून, नित्याचा दानविधि उरकला, थोडेंसें जेवले. स्वतः शुद्ध परिमित जल वारंवार आचमनाप्रमाणें पिऊन त्या तुळजा देवीचें क्षणभर मनांत चिंतन केलें, तत्कालोचित असा आपला वेश केला, जगांत अप्रतिम असें आपलें मुख आरशांत पाहिलें, लगेच आसनावरून उठून आणि पुरोहितास व दुसर्‍या ब्राह्मणांस नमस्कार करून त्या सर्वांचा शुभाशीर्वाद घेतला. दहीं, दूर्वा आणि अक्षता यांस स्पर्श केला, सूर्यबिंब पाहिलें, पुढें उभ्या असलेल्या सवत्स गाईजवळ येऊन लगेच ती सुवर्णासह गुणवान् ब्राह्मणास दिली, आपल्या मागोमाग येण्यासाठीं सज्ज असलेल्या पराक्रमी अनुयायांस प्रतापगडाच्या रक्षणार्थ नेमलें आणि मनांत कपट ठेवून समीप येऊन राहिलेल्या त्या यवनाकडे, तो महाबुद्धिमान् शिवाजी आपल्या पाहुण्याला जसें सामोरें जावें त्याप्रमाणें, स्नेहभावाने गेला. ॥११॥१२॥१३॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥
उत्तम कवच घातलेला शिवाजी राजा भोंसला, तुरा खोंवलेल्या शुभ्र पगडीनें व केशराचा शिडकाव मारलेल्या अंगरख्यानें फारच शोभत होता. त्या वज्रकायास त्या कवचाची काय गरज ? ॥१९॥२०॥
एका हातांत तरवार आणि दुसर्‍या हातांत पट्टा धारण करणारा तो शिवाजी राजा, नंदक खङ्ग व कौमोदकी गदा धारण करणार्‍या प्रत्यक्ष विष्णूप्रमाणें दिसत होता. ॥२१॥
मग गडाच्या कडेवरून सिंहाप्रमाणें बाहेर पडून, झप् झप् पावलें टाकीत अगदीं निकट येऊन उभा राहिलेल्या, अंकुशाग्राप्रमाणें सुंदर, भव्य आणि लांब अशा दाढीनें भीषण दिसणार्‍या, धैर्यवान् व धैर्यदृष्टि अशा वीर शिवाजीस शत्रूनें पाहिलें. ॥२२॥२३॥
इंद्रानें जसें वृत्र आलेला पाहिलें, त्याप्रमाणें शिवाजीनें देखील  तो समोर आलेला पाहून किंचित् हसत स्वतः त्याच्या दृष्टीशीं दृष्टि भिडविली. ॥२४॥
क्रुद्ध यमाप्रमाणें समोर उभा असलेल्या त्या दक्ष वीर शिवाजीचा विश्वास आपल्यावर बसवून घेण्यासाठीं, आपल्या हातांत असलेली अकुंठित तरवार त्या क्रुद्ध, कपटी खलानें जवळ असलेल्या आपल्या सेवकाच्या हातांत दिली. ॥२५॥२६॥
मग खोटा स्नेह दाखवून, प्रतिकूल दैवानें पछाडलेला तो खान त्यास मोठ्या स्वरानें म्हणाला, ॥२७॥
अफजलखान म्हणाला :-
अरे, फुकट युद्धोत्साह धारण करणार्‍या व अत्यंत स्वैर वर्तन करणार्‍या ! नीतिमार्ग सोडून कुमार्ग कां धरतोस ? ॥२८॥
आदिलशहाची, कुतुबशहाची किंवा महाबलवान दिल्लीपतीची सुद्धां सेवा करीत नाहींस, त्यांस मानीत नाहींस आणि मनांत गर्व वाहतोस ! ॥२९॥
म्हणून आज मी तुज उद्धटाला शिक्षा लावण्यासाठीं आलों आहे. हे गड दे, लोभीपणा सोड आणि मला शरण ये. ॥३०॥
मी तुला स्वहस्तानें धरून, विजापुरास नेऊन अल्लशिहापुढें तुझें शीर तुला नमवावयास लावीत आणि त्या प्रतापी प्रभूस प्रणिपात करून विनंती करीन आणि हे राजा, तुला पुनः अतिशय मोठें वैभव ( मिळवून ) देईन. ॥३१॥३२॥
अरे शहाजीराजाच्या पुत्रा, पोरा, आपली शहाणपणाची घमेंड सोडून ( आपला ) हात माझ्या हातांत दे, ये, आलिंगन दे. ॥३३॥
असें बोलून त्यानें त्याची मान डाव्या हातानें धरून दुसर्‍या - उजव्या हातानें त्याच्या कुशींत कट्यार खुपसली. ॥३४॥
बाहुयुद्धनिपुण शिवाजीनें लगेच त्याच्या हातांतून मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीनें दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळून न जातां आपलें अंग किंचित् आकुंचित करून शिवाजीनें आपल्या पोटांत घुसणारी ती कट्यार स्वतः चुकविली. ॥३५॥३६॥
“ हा वार तुला करतों तो घे, मला धर ” असें म्हणतच, सिंहासारखा स्वर, सिंहासारखी गति, सिंहासारखें शरीर, सिंहासारखी दृष्टि, सिंहासारखी मान असलेला व आपल्या दोन्ही हातांनीं फिरविलेल्या नागव्या तरवारीनें शोभणारा तो धैर्यवान् व कर्तृत्ववान् ( करारी ) शिवाजी, त्या वैर्‍याचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्यानें, आपल्या तरवारीचें टोक त्याच्या पोटांतच खुपसलें. ॥३७॥३८॥३९॥
त्यानें शत्रूच्या पोटांत पाठीपर्यंत झटकन् खुपसलेली ती तरवार सर्व आंतडीं ओढून बाहेर पडली. ॥४०॥
क्रुद्ध कार्तिकेय ची शक्ति क्रौंच पर्वतास विदीर्ण करून जशी शोभली, तशी शिवाजीची तरवार अफजलखानास भेदून शोभूं लागली. ॥४१॥
असा पराक्रम शिवाजी महाराजानें जेव्हां दाखविला तेव्हां अफजलखानाचें डोकें गरगर फिरूं लागऊन तो शोभूं लागला. ॥४२॥
नंतर आपल्या रक्ताच्या धारांनीं भूमि भिजवून, झिंगलेल्या माणसाप्रमाणें मूर्च्छेनें झोकांच्या खात खात अतिविव्हल होत्साता तो खान शिवाजीच्या शस्त्राच्या योगनें पोटांतून बाहेर पडलेलीं आंतडीं जशींच्या तशींच सर्व आपलया हातानें धरून “ ह्यानें मला येथें ठार केलें, ह्या शत्रूस वेगानें ठार करा ” असें जों आपल्या पार्श्ववर्ती सेवकास म्हणतो तोंच तो अभिमानी सेवक तीच अफजलखानाची तरवार उगारून ठार मारण्याच्या इच्छेनें एकदम शिवाजीवर चालून गेला. ॥४३॥४४॥४५॥४६॥
“ ब्राह्मणास शिवाजी ठार मारणार नाहीं ” असें जाणून धनी अफजलखानानें त्या ब्राह्मण योद्ध्यास युद्धांत निविष्ट केलें होतें. ॥४७॥
तो ब्राह्मण आहे असें ऐकून जाणत्या व नीतीनें वागणार्‍या शिवाजी राजानें त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाहीं. ॥४८॥
अफजलखानाचे ते सैनिक तेथें पोंचले नाहींत तोंच त्यानें ती तरवार शिवाजीवर हाणली. ॥४९॥
त्यानें मारलेली ती तरवार त्या समयीं शिवाजीनें आपल्या तरवारीनें अडविली. आणि पट्ट्यानें त्याच्या धन्याच्या - खानाच्या डोक्याचेहि दोन तुकडे केले. ॥५०॥
धिप्पाड शत्रूचें पट्यानें कापलेलें डोकें, वज्रानें फोडलेल्या पर्वतशिखराप्रमाणें लगेच खालीं पडलें. ॥५१॥
तेथें हा ( शिवाजी ) जणुं इंद्र झाला, तो म्लेच्छ पर्वत झाला आणि तीक्ष्णाग्राचा पट्टासुद्धां त्या समयी वज्र झालें ! ॥५२॥
एकीकडे धड पसरलें, एकीकडे आंतडीं गळालीं, एकीकडे मस्तक पडलें, एकीकडे पटका पडला, छत्री एकीकडे उडाली, चवरीहि एकीकडे गेली, सर्व प्रकारच्या मोत्यांचा व रत्नांचा तो शिरपेंचहि एकीकडे पडला, वस्त्र एकीकडे तर छत्र एकीकडे - अशी दशा प्राप्त होऊन तो दुष्ट आपल्याच कर्मामुळें भूमीवर लोळला. ॥५३॥५४॥५५॥
त्याच्या त्या सैनिकांच्या डोळ्यांचें पातें लवतें न लवतें तोंच या शिवाजी राजानें त्या यवनास धाडकन् खालीं पाडलें. ॥५६॥
धन्यास ठार मारलेला पाहून, अबदुल सय्यद, बडा सय्यद, अफजलखानाचा पुतण्या उन्मत्त रहिमखान, अत्यंत मानी आणि थोर घरण्यांतील पहिलवानखान, पिलाजी व शंकराजी मोहिते हे दोघे वीर आणि वायूहून अधिक वेगवान, बलवान विध्वंसक व अफजलखानाचे पृष्ठरक्षक असे दुसरेहि चार यवन - असे ते यवनसेनेचे नायक अतिशय क्रुद्ध व वेफाम होऊन, शस्त्रें परजीत, जंभासुराचा नाश झाला असतां इंद्रावर जसे असुर लगेच चालून गेले त्याप्रमाणें< शिवाजी राजास ठार करण्याच्या इच्छेनें सर्व मिळून त्याच्यावर चालून गेले. ॥५७॥५८॥५९॥६०॥६१॥
त्या समयीं ती शस्त्रांची जोडी ( ती दोन शस्त्रें ) फिरवीत त्या शिवाजी राजानें आपल्याभोंवतीं जणुं दीर्घ तटच केला ! ॥६२॥
त्यानें ह्या युद्धामध्यें न गोंधळ ! आकाशांत गरगर फिरत राहून स्पर्धा करणार्‍या ( पाहणार्‍या ) शत्रूंने डोळे अहोरात्र ( एकसारखे ) फिरविले. ॥६३॥
काळ्या तरवारीनें व तीक्ष्ण पट्ट्यानें ( अर्थात ती फिरवून ) त्यानें दिग्वलयांप्रमाणें ( आपल्याभोंवतीं ) वलयें ( कडीं ) केलीं. ॥६४॥
तरवार आणि पट्टा वारंवार फिरवून वलयें ( कडीं ) बनविणारा व मनांत गर्व वाहणारा अशा त्या उग्रकर्म्या शिवाजीराजास शत्रूकडील, तसेच स्वकीयहि सैनिक त्या समयीं युद्धांत पाहूं शकले नाहींत. ॥६५॥६६॥
क्षणभर पृथ्वींत ( भूमींत ) घुसे, क्षणभर आकाशांत शिरे, क्षणभर मध्यें राही; याप्रमाणें तो क्षणभरहि स्तब्ध नव्हता. ॥६७॥
विद्युत्पाताप्रमाणें वेगानें आपल्यावर येणार्‍या अशा विरुद्ध वीरांनी केलेले अनेक खङ्गप्रहार त्या प्रभूनें केव्हां पट्ट्यानेंच, तर केव्हां तरवारीनें आणि केव्हां त्या दोहोंनीं एकदम अडविले. ॥६८॥६९॥
तेव्हां संभाजी कावजी, काताजी ( काट्कः ) इंगळे, कोंडाजी व येसाजी हे दोघे कंक, कृष्णाजी गायकवाड, सूरजी कांटके, त्याचप्रमाणें जिवा माहाला, विसाजी मुरंबक, संभाजी करवव्र, ईभ्राइम शिद्दी ( बर्बर ) अशा ह्या शिवराजरक्षक दहा महावीरांनीं गर्जना करून, म्यानांतून प्रचंड तरवारी उपसून, पर्वतांनीं जसें वायूस आडवावें तसा त्यांना ( खानाकडील योद्ध्यांस ) तेथें विरोध केला. ॥७०॥७१॥७२॥७३॥
त्यांच्या - मुसलमानांच्या आणि त्यांच्या - मराठ्यांच्या गर्जनेनें गगन भरून गेलें असतां, अश्वशालेंत बांधलेला इंद्राचा घोडासुद्धां पळून गेला. ॥७४॥
“ हे राजा, तुझ्यावर हा तरवारीचा वार करतों. तो माझा वार संभाळ. ” असें वारंवार म्हणत त्या वेळीं बडा सय्यद सिंहाप्रमाणें प्रचंड गर्जना करणा‍या व अफजलखानास ठार मारणार्‍या शिवाजीवर पुनः धावून गेला. वेगवान जिवा महालानें, नको म्हटलें असतांहि “ ह्याला मीच ठार करतों, हा माझ्याजवळ येऊं दे ” असें महाराजांचें म्हणणें न ऐकलेसें करून, सय्यदानें उगारलेली ती तरवार आपल्या अंगावर घेतली आणि त्या वीरानें आपल्या तरवारीनें सय्यदाचे दोन तुकडे केले. ॥७५॥७६॥७७॥७८॥
कावजी, दोघे कंक, अभिमानी इंगळे, शूर मुरुंबक, त्याचप्रमाणें करवर, क्रूर कांटके, गायकवाड आणि शिद्दी ( बर्बर ) ह्यांनीं आवेशानें लढणार्‍या दुसर्‍याहि शत्रूंना पटापट पाडलें. ॥७९॥८०॥
खांदे व हात तोडलेलीं, पाय तोडलेलीं, डोकीं व मध्यभाग तोडलेलीं, लाखेसारख्या लाल रक्तनएं माखलेलीं अशीं चोहोंकडे पडलेलीं त्यांची शरीरें तेथें चकाकूं लागलीं. ॥८१॥८२॥
शके १५८१ विकारी नाम संवत्सरीं, मार्गशीर्षमासीं, शुक्लपक्षीं, सप्तमी तिथीस, गुरुवारीं, मध्याह्नीं देवद्वेष्टा अफजलखान शिवाजीनें ठार मारला. ॥८३॥८४॥
बलवान अफजलखानासहि ह्या राजानें बलानें ठार केलें असतां, अत्यंत शीतल, असंख्य पुष्पांच्या सुगंधानें युक्त व मंद असा वायु वाहूं लागला; नद्यासुद्धां निवळ शुद्ध पाण्यानें युक्त झाल्या, लगेच पृथ्वी अत्यंत स्थिर झाली, सर्व देवसुद्धां आपआपल्या स्थानी जाऊन सुखी झाले. ॥८५॥
ह्याप्रमानें आपल्या शत्रूस युद्धांत जोरानें लोळवून सशस्त्र शिवाजी राजा विलसूं लागला असतां लगेंच तीनहि लोक व्यापून टाकणारा, विजय सूचक व गंभीर असा दुंदुमिध्वनि गडावर झाला. ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP