N/Aकवींद्र म्हणाला :-
इकडे भक्तवत्सल भगवती तुळजादेवीनें जगज्जेत्या शिवाजीला आपलें दर्शन दिलें. ॥१॥
जणूं काय टवटवीत कल्पलताच समोर उभी आहे अशी रत्नालंकारयुक्त, आरक्त - चरण, सोनचाफ्याच्या फुलाप्रमाणें कांतिमान्, झगझगीत नील वस्त्र परिधान केलेली, काळ्या बुचड्यानें खोप्यानें - शोभणारी, अत्यंत सुकुमार, कुमारीचा वेष धारण करणारी, पूर्णेंदुप्रमाणें सुंदर मुख असलेली, इंदीवरा ( नील कमला ) प्रमाणें सुंदर नेत्र असलेली, मंद स्मित करणारी, नव्या पोंवळ्याप्रमाणें लाल ओठ असलेले, तेजस्वी कुंकुम तिलक लावलेली, रत्नजडित कर्णभूषणें घातलेली, सुंदर नासिकेंत चित्र विचित्र रत्नजडित नथ घातलेली, कोमळ भुज असलेली, कमळाप्रमाणें हात असलेली, नाजूक बोटें असलेली, रत्नांच्या तेजानें चमकणार्या बांगड्या घातलेली, शुभ लक्षणी, गळ्यांत मोत्यांचे अनेकपदरी लहानमोठे हार व रत्नांची कंठी घातलेली, जरीच्या फुलांची काळी चोळी घातलेली, नाभीपर्यंत लोंबणारा हार घातलेली, रत्नजडित कमरपट्यनें शोभआण्री, वरदात्री अशी ती विश्वमाता राजानें पाहिली. ॥२॥३॥४॥५॥६॥७॥८॥
नंतर तिच्या दर्शनाच्या आनंदानें अत्यंत गोंधळून गेलेल्या त्यानें नम्रतापूर्वक त्या आदिमायेला वारंवार नमस्कार केला. ॥९॥
प्रणाम करणार्या त्या भक्ताला त्या जगदीश्वरी देवीनेंहि आपल्या हातानें उठवून त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनें पाहिलें. ॥१०॥
नंतर असहस्रनामांनीं स्तुति करून ती सुदंती हंसतमुखी देवी आपल्यापुढें उभा राहिलेल्या त्याला असें म्हणाली. ॥११॥
देवी म्हणाली :-
जो हा अफजलखान नांवाचा यवनश्रेष्ठ जवळ येत आहे तो, हे वत्सा, कपटी असून तुझ्याशीं युद्ध करूं पाहात आहे. ॥१२॥
तो हा कलिकालरूपी वृक्षाचें मूळ, देवांचा शत्रु असा यवनरूपी उन्मत्त दानवच समज. ॥१३॥
सर्व देवांना अवध्य असा जणूं काय दुसरा रावणच, सर्व सैन्यासह माझ्या मायेनें मोहित होऊन, अंतक अशा तुझ्या समीप एकाएकीं आला आहे, हे राजा, तो हा मेलेलाच आहे असें तूं समज. ॥१४॥१५॥
धर्माचा निरोध करण्यासाठीं वारंवार या लोकीं उत्पन्न होणार्या त्याला तलवारीच्या जोराच्या वारानें भूमीवर पाड. ॥१६॥
गळणार्या रक्ताच्या धारांनीं अवयव भिजलेला, मुंडकें तुटलेला, बाहु गळालेला, पाय अस्ताव्यस्त पसरलेला, गिधाड, कोल्हे, कुतरे आणि कावळे यांनीं सर्व आंतडीं ओढून काढलेला, अशा त्या सर्व देव भूमीवर पाडलेला पाहूं देत. ॥१७॥१८॥
जेव्हां तूं वासुदेव झालास तेव्हां मी नंदाच्या घरीं तुला साहाय्य करण्यासाठीं स्वर्गांतून अवतीर्ण झाल्यें होत्यें. ॥१९॥
हे दैत्यशत्रो, सध्यांसुद्धां तुळजापूर सोडून तुझ्या साह्यार्थच मी स्वतः जवळ आल्यें आहें असें समज. ॥२०॥
मूर्ख कंसानें पूर्वीं ज्याप्रमाणें माझा अपमान केला त्याचप्रमाणें हल्लीं या पाप्यानें सुद्धा माझा अपमान केला आहे. ॥२१॥
तुझ्या ह्या हातानें त्याला मृत्यु व्हावा अशी ब्रम्हदेवानें योजना केली आहे. म्हणून हे राजा, मी तुझी तलवार होऊन राहिल्यें आहें. ॥२२॥
याप्रमाणें बोलून भवानी त्याच्या तलवारींत शिरली आणि तो जागृतावस्थेंत असूनही त्यानें तें स्वप्न आहे असें मानलें. ॥२३॥
मग तो आपल्या अंतःकरणांत तुळजादेवीचें वारंवार ध्यान करून सगळा पृथ्वीचा भार आपण नाहींसा केलाच, असें मानिता झाला. ॥२४॥
प्रतापगडच्या शिखराच्या तटाच्या आंतील सभेंत बसून त्यानें पायदळाच्या सेनापतींना आणवून असें ( पुढील ) भाषण केलें. ॥२५॥
मी बोलावल्यावरून सैन्यासमवेत तो मोठा आश्रय असलेला यवन संधि करण्याच्या इच्छेनें इकडेच येत आहे. ॥२६॥
म्हणून आज माझ्या आज्ञेनें तुमच्याकडून अडथळा न होता, आलेली ही शत्रुसेना हें अरण्य पाहूं दे. ॥२७॥
एकान्तांत माझ्या भेटीची इच्छा करणारा तो, शस्त्रास्त्रांनीं सज्ज असलेले तुम्ही मजबरोबर आहांत असें ऐकून, कदाचित् भीतीची शंकाहि घेईल. ॥२८॥
म्हणून तुम्ही सर्वांनीं जवळच सज्ज असूनही गहन अरण्याच्या आंत शत्रूंना न कळत दडून रहावें. ॥२९॥
स्वतः करार करून सुद्धां जर तो संधि करणा नाहीं तर आमच्या दुंदुभीचा ध्वनि होतांच त्याची सेना कापून काढावी. ॥३०॥
त्या राजश्रेष्ठानें याप्रमाणें त्यांना एकान्तात जणूं काय रहस्यच उपदेशिलें, आणि शत्रूंसुद्धां सेनेसह त्या मार्गावर येऊन पोंचला. ॥३१॥
भयंकर दगडांवर घासल्यामुळें ज्यांच्या गुडघ्यांची घट्ट कातडी गळूं लागली आहे, असे हत्ती त्या पर्वतावर मोठ्या मेटाखुटीनें चढले. ॥३२॥
माहातांनीं हांकलेल्या हत्तींनीं खालीं घसरण्याच्या भीतीनें रस्त्यावरील झाडांचे बुंधे सोंडेच्या शेंड्यानें वेटोळें घालून धरले. ॥३३॥
( पाठीवरील ओझ्याचा ) मोठा भार उतरल्यामुळें हलके झालेल्या हत्तीच्या छाव्यांना चढणिच्या रस्त्यावर आपलीं शरिरेंच भारभूत वाटलीं. ॥३४॥
मोतद्दारांनीं हळू हळू नेले जाणारे घोडे पाठीवरील स्वार उतरले असतांहि कष्टानें चढलें. ॥३५॥
चढणीवरून पडण्याच्या भीतीमुळें हातांनीं धरलेलीं झुडपें उपळून पडलीं असतां कांहीं जण खालीं तोंडघशीं पडले. ॥३६॥
वर चढणार्या मस्त हत्तींच्या पायांच्या तडाक्यांनीं निष्टून पडणार्या मोठमोठ्या घोंड्यांच्या योगें खालचे लोक नाश पावले. ॥३७॥
वेलींच्या प्रतानांनीं गुरफटलेल्या बांबूच्या बेटांमधून जाणार्या त्या सेनेचीं निशाणें व छत्र्या हीं फाटून गेलीं. ॥३८॥
अत्यंत मस्त हत्तींच्या सोंडेच्या स्पर्शाच्या भीतीनें तेथें कांहीं जणांनीं कड्यावरून पडून प्राण सोडला. ॥३९॥
उंच कड्याच्या कांथावरून हातपाय घसरून पडणार्या कांहीं जणांनीं दुसर्याहि पुष्कळ जणांना आपले जोडिदार केलें ( त्यांच्या धक्यानें तेहि खाली पडले ). ॥४०॥
याप्रमाणें त्या पर्वतावर चढून ती यवनांची सर्व सेना अतिशय थकली असतांहि तिनें धैर्य धरून पलीकडची उतरण उतरण्याची इच्छा केली. ॥४१॥
पर्वतासारखे हत्ती तो पर्व चढून आपला मद हळूहळू टाकीत उतरले. ॥४२॥
ज्याप्रमाणें तो पर्वत चढून त्यांनीं स्वर्ग पाहिला त्याप्रमाणें तो उतरून त्या लोकांनीं जणूं काय पाताळ पाहिलें. ॥४३॥
नंतर पर्वताच्या मध्यभागीं असलेली, गुहेप्रमाणें खोल, सिंह, वाघ, डुक्कर, अस्वलें, तरस यांणीं आश्रय केलेली, इंद्रनील मण्याप्रमाणें काळीकुट्ट झाडी, असलेली, जणू काय वज्राचीच केलेली, अंधःकाररूपी सागरांत उत्पन्न झालेली, जणूं काय लांबलचक विषलता, जणूं काय पातालभूमि, तिन्ही लोक जिंकणार्या उत्कृष्ट गुणशाली शिवाजीनें नित्य रक्षिलेली, सूर्याच्या किरणांचा तळी स्पर्श न झालेली, गर्द छायेनें व्यापलेली, अशी ती जावळी जवळ येऊन अफजलखानानें पाहिली. ॥४४॥४५॥४६॥४७॥
तो बलाढ्य अफजलखान त्या जावळीजवळ आल्यावर “ ही माझ्या हातीं आलीच ” असे तो आपल्या मनांत मांडे खाऊं लागला. ॥४८॥
तो जावळीजवळ आलेला ऐकून शिवाजीराजास सुद्धा हा सुदैवानें आयताच माझ्या तावडींत सापडला, असें वाटलें. ॥४९॥
नंतर भीतीनें जणूंकाय निरुत्साही होऊन वेळूच्या बेटांनीं व्याप्त अशा कुमुद्वतीच्या तीरावर शत्रूनें तळ दिला. ॥५०॥
ज्या भयंकर स्थलीं त्याने ते सैनिक घाबरून गेले, तेथें तो एकटा अफजलखान मात्र भ्याला नाहीं. ॥५१॥
अत्यंत उंच आणि भव्य तंबूंनीं सुशोभित, साखळदंडांनीं खुंटाला बांधलेले मस्त हत्ती असलेलें, जमिनींत पुरलेल्या मेखांना बांधलेल्या घोड्यांच्या रांगांनीं युक्त, नुकत्याच बांधलेल्या अनेक उंटांच्या तांड्यांनीं व्यापलेलें; विक्रीच्या पदार्थांनीं भरलेल्या दुकानांनीं गजबजलेल्या बाजारानें शोभणारें, जाणार्य़ा येणार्या व इकडे तिकडे भटकणार्या लोकांच्या गलबल्यानें भरून गेलेलें, अतिशय लांब असूनही त्या वनप्रदेशांत अगदीं छोटें दिसणारें असें ते सैन्य दृश्य असूनही त्याठिकाणीं अदृश्य झालें. ॥५२॥५३॥५४॥५५॥
शिवाजी आणि अफजलखान या दोघांनींही कुशल विचारण्याकरितां आपापले वकील एकमेकांकडे पाठविले. ॥५६॥
शिवाजीचें अंतःकरण अफजलखानानें ओळखलें आणि अफजलखानाचेंहि शिवाजीनें ओळखलें. विधात्यानेंच तेवढा तो खरा प्रकार ओळखला. इतर लोकांस तो तह होत आहे असें समजलें. ॥५७॥
या आलेल्या पाहुण्याला व त्याच्या पुत्रांनासुद्धा कसेंहि करून मी आपल्या शिष्टाचारास अनुसरून देणग्या दिल्या पाहिजेत. ॥५८॥
( त्याजबरोबर ) मुसेखान, अंकुशखान, याकुत, अंबर, त्याचप्रमाणें हसनखान आणि इतर या सर्वांना; तसेंच मोठा चुलता मंबाजीराजे यालाहि वेगवेगळ्या ( देणग्या ) दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या रत्नांची परीक्षा करविली पाहिजे. ॥५९॥६०॥
अशाप्रकारें त्या राजानें जेव्हां व्यापारी बोलाविले तेव्हां त्या अफजलखानाच्या आज्ञेवरून ते शिवाजीच्या जवळ आले. ॥६१॥
मग आपापली आणलेलीं तीं रत्नें त्या व्यापार्यांनीं ताबडतोब घेणार्या शिवाजीला दाखविली. ॥६२॥
त्या अफजलखानाच्या सैन्यांतून तेथें बोलावलेल्या व्यापार्यांपासून त्यानें सर्व रत्नें घेतलीं आणि त्या सर्वांना आपल्याजवळ ठेविलें. तेव्हां त्या लोभी व दैवानें बुद्धि नष्ट केलेल्या मूर्ख व्यापार्यांनीं पुष्कळ लोभाच्या आशेनें आपण पर्वतशिखरावर सर्व बाजूंनीं कोंडलें गेलों आहों हें ओळखलें नाहीं. ॥६३॥
त्या शिवाजीराजानें माझ्यावर विश्वास ठेविला आहे म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन सांप्रत सख्य करण्याचें कपट करून आपली गुप्त कट्यार स्वतः त्याच्या पोटांत खोल खुपसून आज ताबडतोब देवाच्या मंदिरामध्यें सुद्धा अतिशय भय उत्पन्न करीन. ॥६४॥
याप्रमाणें त्या यवनानें आपल्या मनांत योजलेलें हें कपट जाणून तो शिवाजी त्या सगळ्याचें फळ त्याला युद्धामध्यें देण्यास कसा सज्ज झाला हें सर्व मी सांगेन. त्याच्या यशाचा गोड असा वृत्तांत हेंच अमृत होय; त्याच्यापुढें अमृताची गोष्ट व्यर्थ होय. ॥६५॥