अध्याय ८७ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इति तव सूरयस्त्र्यधिपतेऽखिललोकमलक्षपनकथामृताब्धिमवगाह्य तपांसि जहुः ।
किमुत पुनः स्वधामविधुताशयकालगुणाः परमः भजन्ति ये पदमजस्रसुखानुभवम् ॥१६॥
सर्वकारणत्वें तूं वास्तव । ऐसा परमार्थनिर्वाह । श्रुतिही बोलोनि महानुभाव । प्रवृत्तियोगें दृढाविती ॥३२॥
त्रिगुणमायामृगीनर्तन । कर्ता म्हणोन संबोधन । अधिपते हें तुजलागून । श्रुतींहीं पूर्ण केलें असें ॥३३॥
भो भो अधिपते परेशा । सूरि म्हणिजे विवेकीं पुरुषां । तिहीं तुझिया अमळयशा । सेवूनि दोषा त्यागिलें ॥३४॥
ते विवेकी म्हणसी कैसे । जिहीं तव यश अति उत्कर्षें । लक्षिलें तेंचि विशेषणवशें । श्रुतिसंदर्भें अवधारीं ॥२३५॥
अखिल म्हणिजे संपूर्ण लोक । त्यांचे कायिक वाचिक मानसिक । मळक्षपणीं पटुतर देख । कथामृताब्धि हाचि तुझा ॥३६॥
त्यामाजी करून अवगाहन । त्रिविधपापतापांचें दहन । करून टाकिती निपटून । स्वानंदघन मग होती ॥३७॥
कथामात्रें पापताप । त्यागिती ऐसा तव प्रताप । माझें वास्तव चित्स्वरूप । भजोनि संकल्प निरसिती ॥३८॥
चित्स्वरूप तें तव धाम । तन्निष्ठ जे कां आत्माराम । त्यागिती आशयसह गुणधर्म । किमुत परम हें म्हणणें ॥३९॥
आशय म्हणिजे अंतःकरण । एतद्धर्म रागादि पूर्ण । जन्मापासूनि जरामरण । पर्यंत गुण काळकृत ॥२४०॥
अंतःकरणचतुष्टय । मनोधीचित्ताद्यहंतामय । धर्म म्हणिजे तयाचे विषय । अवस्थात्रयात्मक अवघे ॥४१॥
एवं रागद्वेषादिक । तृष्णादुराशावासनात्मक । यांच्या अवलंबें अविवेक । बुडवी निष्टंक भवडोहीं ॥४२॥
ऐसे आशयकाळगुण । सूरि क्षाळिती तुज भजोन । भो भो परम हें संबोधन । करूनि श्रुतिगण काय वदे ॥४३॥
अवलवास्तव त्वद्धामभजनें । आशयकाळगुण क्षाळणें । अखंडैकरससुख भोगणें । किमुत म्हणणें हें नवल ॥४४॥
ऐसे सूरि विवेकनिष्ठ । संप्रज्ञातही वर्ततां स्पष्ट । नलिनीदलवत भावस्पृष्ट । नित्य भ्राजिष्ठ निर्लेप ॥२४५॥
इष्टानिष्टमित्र त्रिविध । येणेंचि कर्मलेपें बद्ध । होवोनि भोगिती कर्म विरुद्ध । तन्मुक्त शुद्ध ते होती ॥४६॥
ऐसा श्रुतिगण कविजनचर्या । प्रमाण करूनि अनुवादलिया । पुढती तव गुणां कां चिन्मयां । न भजती तया धिक्कारिती ॥४७॥
दृतय इव श्वसन्त्यसुभृतो यदि तेऽनुविधा महदहमादयोऽण्डमसृजन्यदनुग्रहतः ।
पुरुषविधोऽन्वयोऽत्र चरमोऽन्नमयादिषु यः सदसतः परं त्वमथ यदेष्ववशेषमृतम् ॥१७॥
ईशावास्योपनिषच्छ्रुति । हरिगुणविमुखां अभक्तांपति । नरदेह पडतां होय जे गति । कथी ते श्रोतीं । परिसावी ॥४८॥
सूर्यपकाशरहित लोक । केवळ असूर्यनामक । अंधतम जो अज्ञानपंक । केवळ अविवेक गाढमूढ ॥४९॥
भजनविमुख त्या लोकांप्रति । मेलिया नंतर वसती जाति । आकल्प जेथें अनिर्गति । आत्महंते म्हणोनि त्यां ॥२५०॥
ऐसा अनेक श्रुतिसमुदाय । भजनविमुखां बोधी भय । ये श्रुत्यर्थीं तो अन्वय । शुकाचार्य निरूपी ॥५१॥
असुभृत म्हणिजे सप्राण नर । जरी त्यां तव भजनीं अनुसर । स्वरूपनिष्ठता अति सादर । अथवा तत्पर गुणश्रवणीं ॥५२॥
अनेक जन्म भोगिले कष्ट । भाग्यें नरदेह लाधले श्रेष्ठ । येथें होऊनि भजननिष्ठ । करिती यथेष्ट परिचर्या ॥५३॥
व्यतिरेकान्वयें ओतप्रोत । बृहद्ब्रह्मचि सदोदित । गुरुमुखें विवरूनि नित्यानित्य । मिथ्या विवर्त अवगमिती ॥५४॥
ब्रह्मात्मबोधें आत्माराम । होवोनि ठेले पूर्णकाम । ज्यांच्या दर्शनेंचि भवभ्रम । निरसे दुर्गम अबळांचा ॥२५५॥
एक ते सगुणा तव परिचर्या । करिती नियमूनि वाङ्मनः काया । तव गुणश्रवणें कथनें माया । निस्तरोनियां समरसती ॥५६॥
यदर्थीं राया भगवद्वचन । सगुणभक्तीं कृतप्रमाण । भीष्मपर्वीं स्वमुखें कृष्ण । पार्थालागून जें वदला ॥५७॥
सम्मतिः - दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥१॥
हरि म्हणे भो धनंजया । दैवी हे जे माझी माया । त्रिगुणद्वारा त्रिजगा यया । प्रसवोनियां भवीं बुडवी ॥५८॥
रजोगुणें सृजी सकळ । सत्वें करीती प्रतिपाळ । पुढती पाहोनि प्रळयवेळ । ग्रासी तत्काळ तमोगुणें ॥५९॥
गुणमयी ऐसी प्रसवोनि गुणां । गोविलें ग्रसना अवना सृजना । तिंहीं सृजिल्या त्रिविधा जना । भवनिस्तरणा अनुपाय ॥२६०॥
अनिष्ट इष्ट मिश्र त्रिविध । प्राणी करूनि कर्मबद्ध । विषयभ्रमें भवविरुद्ध । प्रियतम मानूनि निमज्जती ॥६१॥
दीप कवळूनि पतंग जळती । विषयभ्रमें तैसिया रीती । प्राणिमात्र दुःखावर्तीं । न निस्तरती दुरत्ययीं ॥६२॥
यज्ञादि इष्टकर्में स्वर्ग । भोगूं जातां अमरभोग । पुण्यक्षयीं अधोमार्ग । लाहती मग मनुजत्व ॥६३॥
मिश्रकर्में मनुजभुवनीं । दुःख भोगिती सुख मानूनी । अनिष्टकर्में तिर्यग्योनी । भोगजाचणी अनिवार ॥६४॥
ऐसे मायाप्रवाही पडिले । प्राणिमात्र भवीं बुडाले । त्यांमाजी प्रेमळ जे मज भजले । ते निस्तरले मम माया ॥२६५॥
जरी दुस्तर हे गुणमयी । तरी मद्भक्तांतें कांहीं । बुडवूं न शके कालत्रयीं । जाण निश्चयीं धनंजया ॥६६॥
ऐसी संमत श्रुतीतें स्मृति । तस्मात तव गुण गाती पढती । किंवा निर्गुणीं व्यतिरेक गति । जे समरसती ते धन्य ॥६७॥
तस्मात त्यांचेंचि धन्य जीवित । सफळ त्यांचेंचि प्राणश्वसित । अभक्तांचें भस्रावत । वृथा श्वसित श्रुति वदती ॥६८॥
यदर्थी श्रुति शंका करिती । जे अभक्तही कामादि फळें वारिती । तरी हे प्राकृत वृथा वदंती । कृतघ्नाप्रति वैफल्यें ॥६९॥
अभक्त कृतघ्न कोण्या गुणें । तरी कार्यकारणानुग्रहपणें । जीवनहेतु त्या तुजकारणें । न भजती म्हणोनि कृतघ्न ते ॥२७०॥
यास्तव त्यांचे मनोरथ । निर्फळ ऐसिया आशयें येथ । कार्यकारणानुग्रहकार्थ । प्रतिपादिती प्रभूचे ॥७१॥
अव्यक्त महत् अहंकार । आदि करूनि तत्वें समग्र । ज्याच्या अनुग्रहें होती सधर । अंड पटुतर सृजावया ॥७२॥
अनुग्रह म्हणिजे अनुप्रवेशें । महदादितत्वीं सामर्थ्य ऐसें । समष्टिव्यष्टिमठघटदशे । सृजनावेशें प्रवर्तती ॥७३॥
तेथ अन्नमयादिकोशपंचकीं । तत्तदाकार होवोनि शेखीं । चेतवितोसी त्या तुज मूर्खीं । न भजोनि वरिली कृतघ्नता ॥७४॥
चिदेकरस जो परमपुरुष । तयासी अन्नमयादिकोशविशेष । तदाकारतेचा संस्पर्श । भारतीस केंवि वदवे ॥२७५॥
यदर्थीं श्रुति परिहार करी । अन्नमयादिकोशान्तरीं । अन्वयें तदाकारता खरी । न सरे दुसरी येथ युक्ति ॥७६॥
पुढती शंका करूनि वदे । पंचकोशाकारता नांदे । तैं सत्यत्वअसंगत्वशब्दें । कैसेनि वेदें प्रशंसिजे ॥७७॥
ये शंकेचिया परिहारा । वाक्य श्रुतींचें अवधारा । अन्नमयादि कोशां समग्रां । पासूनि परतरा असंगत्व ॥७८॥
अन्नदिपंचकोशांहूनि पर । चरम ब्रह्मपुच्छ हा उच्चार । सत्यत्व असंगत्व हा निर्धार । केला साचार तिये पदीं ॥७९॥
ब्रह्मपुच्छप्रतिष्ठा इति । सन्मात्रबोधें वदती श्रुति । तो परमात्मा चिन्मूर्ति । पुन्हा यदर्थीं करी शंका ॥२८०॥
ब्रह्मपुच्छप्रतिष्ठामात्र । सत्यत्व असंगत्व पर । तथापि अन्नमयादिकोशाकार । तेथ व्यभिचार झाला कीं ॥८१॥
अन्नमयादिकांच्या ठायीं । तदाकारान्वितत्वें पाहीं । झालिया मग कैसें काई । असंगत्व घडेल ॥८२॥
ये शंकेच्या परिहारा । पंचकोशांहूनि परा । ब्रह्मपुच्छ हे श्रुतींची गिरा । प्रतिष्ठा म्हणोनि प्रतिपादी ॥८३॥
सदसतःपर म्हणोनी । अवशेष ऋतसत्य ऐसी वाणी । स्थूलसूक्ष्मादिकोशांहूनी । व्यतिरेक साक्षीभूतत्वें ॥८४॥
अवशेष म्हणिजे अवशिष्यमाण । स्थूलसूक्ष्माहूनि विलक्षण । अबाधित जें उरलें जाण । तें स्वरूप पूर्ण ऋतसत्य ॥२८५॥
तरी किमर्थ अन्वित झालें म्हणतां । शाखाचंद्रापरी तत्वता । शुद्धस्वरूपबोधार्था । अन्वितत्व जाणावें ॥८६॥
श्रुति म्हणती हाचि पुरुष । अन्नरसमयादिपंचकोश । याचे हेचि अवयव शीर्ष । प्रमुख स्थूळसूक्षक्रमें ॥८७॥
अन्वितत्वें इन्धनाकार । पावक अवगमितां साकार । तैसा पुरुषविधाप्रकार । प्रबोधपर श्रुति वदती ॥८८॥
एर्हवी ग्रावलोहकाष्ठादिकीं । अनळ अगोचर असेचि कीं । तैसा ब्रह्मपुच्छप्रतिष्ठादिवाक्यीं । शुद्धस्वरूप निर्दुष्ट ॥८९॥
तस्मात श्रीपरेशा कारणें । श्रवणें कीर्तनें स्मरणें मननें । भजती त्यांचें सफळित जिणें । अपरां श्वसणें भस्त्रावत् ॥२९०॥
ऐसें परमेश्वराच्या ठायीं । सर्वात्मकत्वें श्रुति सर्वही । भजनीयत्व वदल्या पाहीं । ते अभक्तां निन्दूनी दृढ केलें ॥९१॥
आतां अधिकारपरत्वें श्रुति । अगम्यमहिम्न ब्रह्मप्राप्ति । उपाधि अवलंबें उपासिती । ते पृथक्पद्धती दावितसे ॥९२॥
उदरमुपासते य ऋषिवर्त्मसु कूर्पदृशः परिसरपद्धतिं हृदयमारुणयोद हरम् ।
तत उदगारनन्त तव घाम शिरः परमं पुनरिह यत्समेत्य न पतन्ति कृतान्तमुखे ॥१८॥
कूर्पदृश जे शार्कराक्ष । ऋषिमार्गीं ते धरूनि लक्ष । कैवल्यलाभास्तव प्रत्यक्ष । उदरं ब्रह्मेति उपासिती ॥९३॥
ऋषींचिया संप्रदाय मार्गें । शार्कराक्ष निजाधिकारविभागें । उदर उपासिती निजाङ्गें । कोण्या लिंङ्गें ते ऐका ॥९४॥
कूर्प म्हणिजे सिकतारज । ज्यांचे दृष्टीसी वर्ते सहज । शार्कराक्षनामें त्यांतें बुझ । स्थूळदृष्टी भवभजक ॥२९५॥
हृदयाहूनि स्थूळ उदर । तदुपासनीं जे सादर । म्हणाल कोण देवतापर । उपासनासार पैं त्यांचें ॥९६॥
उदरनिष्ठ जो जठराग्नि । अग्नि देवांचा विष्णु म्हणोनी । प्रतिपाद्य श्रुतिस्मृतींच्या वचनीं । मणिपूरस्थ उपासिती ॥९७॥
अहंवैश्वानरोभूत्वा । ऐसा स्मृत्यर्थ जाणावा । यदर्थीं बलिष्ठ श्रुतींचा यावा । भाषाग्रंथीं नये लिहितां ॥९८॥
येचि स्मृतीचें व्याख्यान । मधुसूदनी टीकेवरून । पाहतां श्रुत्यर्थविवरण । विद्वज्जनीं विलोकिजे ॥९९॥
तस्मात जाठर वैश्वानर । प्रत्यक्ष होऊनि परमेश्वर । प्राणिमात्रांचें वसवी उदर । हा निर्द्धार श्रुतिस्मृतींचा ॥३००॥
जाणोनि केवळ कूर्पदृश । जे म्हणिजेती शार्कराक्ष । स्थूळदृष्टि रजाक्त अक्ष । त्यांचें लक्ष हें कथिलें ॥१॥
आरुणिसंप्रदायक्रम । प्राचीन ऋषींचें अधिष्ठूनि वर्त्म । कूर्प म्हणिजे परम सूक्ष्म । दृष्टि परमात्मपर ज्यांच्या ॥२॥
हृदयस्थ जें परमात्मतत्व । लक्षूनि तत्प्राप्ती उपाव । उदरोपासनेचा भाव । धरिती स्वयमेव तल्लाभा ॥३॥
शार्कराक्षांची कथिली कथा । यावरी ऐका आरुणिपथा । साक्षात्परमात्मया हृदयस्था । सूक्ष्मातेंचि उपासिती ॥४॥
हृदयस्थ सूक्ष्म म्हणाल कैसा । किरणवेष्टित भास्कर जैसा । परिसरनाडींचिया प्रकाशा । माजी आपैसा द्योतक जो ॥३०५॥
तया हृहयस्था परमसूक्ष्मा । माजी लक्षूनियां परमात्मा । उपासिती पूर्णकामा । वास्तव तद्धामा ठाकावया ॥६॥
हृदयारविन्दाभंवती घरटी । शतैकनाडी कणिकापीठीं । किरण जैसे भास्करा निकटीं । तत्परिपाटीं देदीप्य ॥७॥
तयां मध्यग जे कां दहरी । तन्वी नीवारशूकापरी । तेजःपुञ्ज तयेच्या अग्रीं । पीता भास्वती अणूपम ॥८॥
ब्रह्मा विष्णु शिव केवळ । स्वाराट् तोचि आखंडळ । ऐसा महिमा श्रुतींचा मेळ । वर्णिती बहळ व्याख्यानीं ॥९॥
मूळाधारापासूनि दहरी । व्यापक तत्प्रभा सर्व शरीरीं । हृदयापासूनि मूर्ध्नीवरी । सुषुम्नामार्गें उर्ध्वग पैं ॥३१०॥
त्यावरी सुषुम्नावर्त्म अधिष्ठून । जे ठाकिती मूर्ध्निस्थान । भो अनंता ते तुजमाजि पूर्ण । समरसोन विराजती ॥११॥
उत्कृष्ट जें कां तुझें धाम । तें ते पावूनि मुनिसत्तम । टाकिती संपूर्ण संसारश्रम । उत्तमोत्तमसुखलाभें ॥१२॥
पुढती संसार जो कृतान्त । सहसा तन्मुखी न होती पतित । ऐसा श्रुतींचा सिद्धान्त । शुक बोधित कुरुवर्या ॥१३॥
श्रुति म्हणती भो परेशा । झणें तूं म्हणसी जीवांसरिसा । मी ईश्वरही अनुप्रवेशा । पावोनि निवासा पावतसें ॥१४॥
अपरनाडीमार्गें जाती । त्यांची न चुके पुनरावृत्ती । तेथ पुढती शंका करिती । ते तूं नृपती अवधारीं ॥३१५॥
उदरहृदयमूर्ध्निस्थान । उत्तरोत्तर न्यून पूर्ण । ईश्वरासही जीवासमान । तारतम्यें असतां अपिं ॥१६॥
तरी मग कोण्या विशेषणें । उपास्यता ईश्वराकारणें । किमर्थ जीवीं ईश्वरा भजणें । सामान्यपनें तारतम्यें ॥१७॥
ऐसिया शंकेच्या परिहारा । श्रुति म्हणती परमेश्वरा । यदर्थीं सहसा शंका न करा । ऐका उत्तरा भो स्वामी ॥१८॥
स्वकृतविचित्रयोनिषु निशन्निव हेतुतया तरतमतश्चकास्स्यनलवत्स्वकृतानुकृतिः ।
अथ वितथास्वमूष्ववितथं तव धाम समं विरजधियोऽन्वयन्त्यभिविपण्यव एकरसम् ॥१९॥
तरी जीवांचें तारतम्य । सहसा नोहे ईश्वरासम । केंवि तें दोहींमाजि प्रथम । जीवांचेंचि श्रुति वदती ॥१९॥
स्वकृत म्हणिजे निजाचरित । इष्ट अनिष्ट आणि मिश्रित । तदनुसार होती प्राप्त । विचित्रयोनि फळभोक्ता ॥३२०॥
मग त्या विचित्रयोनींमाजी । कर्मसंकल्पफळभोगबीजीं । अनुप्रवेश करूनि सहजीं । आविष्कारें अवभासे ॥२१॥
परिमित निर्मित पुरातनें । योनि म्हणिजे जन्मस्थानें । तेथ जन्मूनि तदभिमानें । देह होवोनि विचंबिजे ॥२२॥
खेचरभूचरजलचरयोनी । स्थावर जंगम वनचर कोण्ही । योनीं माजी देहश्रेणी । अनुकरूनी तारतम्यें ॥२३॥
कुञ्जरयोनी परम थोर । मशक मृकुट अतिलघुतर । तारतम्यें तदाकार । आविर्भूवूनि अनुकरे पैं ॥२४॥
अनळ म्हणिजे पावक जैसा । लहान थोर इन्धना सरिसा । अनुकरूनि निजप्रकाशा । करी तद्वत जीवही पैं ॥३२५॥
स्वकर्मकृता ज्या ज्या योनी । त्यां माजी तैसाचि अनुकरूनी । जीव प्रकाशे म्हणऊनी । स्वकृतानुकृति बुध म्हणती ॥२६॥
तया जिवांचिये परी । तारतम्य परमेश्वरीं । कैसें न घडे तें श्रुतिनिकरीं । वाखाणिजेतें तें ऐका ॥२७॥
न रमे एकाकी म्हणोन । बहुधा चित्र योनि निर्मून । त्यांमाजी तैसाचि अनुकरून । कूटस्थपणें अवभाससी ॥२८॥
स्वकृता योनींच्या अनुकारें । अनुकरूनि तदाकारें । भाससी म्हणोनि तुज बुधनिकरें । स्वकृतानुकृति म्हणिजे तो ॥२९॥
कर्मजनितयोनिप्रभव । आधीं निर्माण होय देह । तेथ प्रवेश करी जीव । तैसा भाव तुज न घडे ॥३३०॥
जैसी तृणजलूका काडी । पुढील धरूनि मागील सोडी । तैशा देहाच्या परवडी । स्वकर्म आवडी जीव धरी ॥३१॥
तैसन घडे तुज ईश्वरा । जेंवि स्वयंभ गगनोदरा । माजी होतां घटमठनिकरा । गमे अंबरा अनुकरणें ॥३२॥
किंवा पावक प्रसवोनि जळ । दुमाकार होय सकळ । तयांचे गर्भीं आपुलें स्थळ । पूर्वींच असे कीं मग निर्मी ॥३३॥
तेंवि स्वकृता योनीमाजी जाण । पूर्वींच अससी तूं विद्यमान । प्रविष्टा परी तदनुकरण । प्राकृत जन अवगमिती ॥३४॥
मिथ्याविवर्तरूपा योनी । त्यां माजी वास्तव तुज वांचूनी । नाहींच ऐसें जाणती ज्ञानी । जें श्रुतिवचनीं प्रतिपाद्य ॥३३५॥
जीव प्रविष्ट एका देहीं । सर्वभूतीं तूं निगूढ पाहीं । भूतान्तरात्मा ठायींच्या ठायीं । सर्वव्यापी साक्षित्वें ॥३६॥
सर्व भूतां माजी वसता । कर्माध्यक्ष साक्षी चेता । केवळ निर्गुण अविकारता । म्हणोनि स्तविती श्रुतिनिचय ॥३७॥
विवर्तरूपा योनि मिथ्या । त्यांचें कारण तूं वस्तुता । इहामुत्रिकफळकर्मरहिता । सन्मात्र तत्वता एकरस तूं ॥३८॥
सांडूनि रजस्तमांचा लेप । विशुद्धमति जे निर्लेप । ज्यांसी नातळे पापताप । जे निष्पंक गुणरहित ॥३९॥
इहामुत्रिकफळाभिलाषी । कर्मव्यवहार न शिवे ज्यांसी । ते तुज जाणती निश्चयेंसीं । सन्मात्रासी स्वात्मत्वें ॥३४०॥
यास्तव विभो तुझ्या ठायीं । उपाधिकृत हें तारतम्य नाहीं । अविच्युत ऐश्वर्य पाहीं । उपास्यत्व तुजचि घडे ॥४१॥
पूर्वशंकेची निवृत्ति । केली असतां येथ पुढती । परमाश्चर्य मानूनि चित्तीं । वदती श्रुति तें ऐका ॥४२॥
स्वकृतपुरेष्वबहिरन्तरसंवरणं तव पुरुषं वदन्त्यखिलशक्तिधृतोंऽशकृतम् ।
इति नृगतिं विविच्य कवयो निगमावपनं भवत उपासऽतेङ्घ्रिमभवं भुवि विश्वसिताः ॥२०॥
श्रुति म्हणती सनातन । अचिंत्यैश्वर्यें तूं पूर्ण । जीवासि न लगे जें लाञ्छन । मां तुज कोठून तें स्पर्शे ॥४३॥
देहादि उपाधि बहुविध । तिहीं जीवचि नोहे बद्ध । मां तूं केवळ परिपूर्णानंद । केंवि संबंध तुज त्यांचा ॥४४॥
अविद्याकामकर्में करून । जीवदशा लब्धचैतन्य । अवलंबूनि विपरित ज्ञान । मरण जनन पावतसे ॥३४५॥
ऐसा संसृतिवरपडा । जीव दिसतांही बापुडा । वास्तवबोधें पाहतां फुडा । भगवद्भाव श्रुति वदती ॥४६॥
जीवदशेचा निरसूनि दोष । श्रुति म्हणती जो परेश । आदित्यरूपें तेजोविशेष । चिदाभास पैं तो हा ॥४७॥
पूर्णव श्रुति प्रतिपादिती । तेचि ऐका लक्षणारीती । भद्रीं देखिला जो कां नृपाती । तो हा म्हणती मृगयेंत ॥४८॥
तो तूं ऐसिया वाक्यविचारें । जीवासि वास्तव पूर्णत्व खरें । बोधिती द्वयोपाधि परिहारें । वस्तुनिर्धारें एकत्वें ॥४९॥
तेथील सांडूनि भद्रासन । मृगयाचाञ्चल्य तुरगासन । केवळ गात्र मात्र लक्षून । नृपत्व पूर्ण अवगमिती ॥३५०॥
तेंव वाच्यांश शबलांश । जीवेशांचे उपाधिविशेष । निरसूनि घेती पूर्णत्वास । शुद्धलक्ष्यांश एकत्वें ॥५१॥
जहदजहल्लणाद्वारा । उपाधित्यागें जीवेश्वरां । अभंग एकत्व निर्धारा । माजी आत्मत्व स्वतःसिद्ध ॥५२॥
लक्ष्य योजनें भानु गगनीं । जरी तो बिम्बला थिल्लरवनीं । तरी तो निर्लेप स्वस्थानीं । तद्दोषगुणीं नाकळतां ॥५३॥
तेंवि जीवेश्वरांच्या ठायीं । बद्धमुक्तता मुळींच नाहीं । उपाधिभेदें भासे कांहीं । मोहप्रवाहीं भ्रमग्रस्तां ॥५४॥
तेथ म्हणती मीमांसक । जीव क्रत्वर्थकर्मपरिपाक । भोगार्थ भ्रमे नाना लोक । फळकामुक होत्साता ॥३५५॥
कर्में नाना देह धरी । कर्में भ्रमे स्वर्गसंसारीं । स्तावक मात्र त्या ईश्वरीं । निगमोच्चारीं स्तविजेत ॥५६॥
परंतु नोहे तो ईश्वर । जीव केवळ कर्मपर । कर्मा वांचूनि दुसरी थार । नाहीं संसार निरसावया ॥५७॥
कर्में नाना योनि वरी । कर्में नाना देह धरी । लक्ष चौर्यांशीं माझारी । देतां फेरी न विसावा ॥५८॥
ऐसें वदती जें याज्ञिक । एकदेशी कर्मठ मूर्ख । तत्त्वमस्यादिवाक्यविवेक । अनोळख ज्यां लागीं ॥५९॥
असो तयांचें बोलणें । व्यर्थ किमर्थ विस्तारणें । वेदान्तवाक्यश्रवणा विणें । बहिर्मुखपणें वर्तणें ज्या ॥३६०॥
यदर्थीं मुख्य सनकादिक । उपासनाकाण्डविवेक । बोलती तो श्रुति सम्यक । पतिपादक अवधारा ॥६१॥
जीव पडिला भवभ्रमपूरीं । कर्मसरिताप्रवाहान्तरीं । करुणा भाकितां त्यांतें तारी । कर्णधार गुरुवर्य ॥६२॥
पंचायतनोपासना । रूपें केवळ पूर्णचैतन्या । उपदेशूनि तत्पादभजना । भक्तिनौके बैसवी जो ॥६३॥
ऐसिया भजनोपनिष्ठां नरां । माजी निवडे भजनाधिकारा । तोचि लंघूनि भवभ्रमपूरा । पावे परपारा पूर्णत्वा ॥६४॥
येरां उपासकांची गोठी । भवीं बुडती कोट्यनुकोटी । ज्यांतें अभेदहातवटी । भजनराहटी माजि न फवे ॥३६५॥
उपास्यदेवतापर ज्या भक्ति । तैसी च गुरुभजनीं अनुरक्ति । अन्यत्र भवभोगीं विरक्ति । ते लंघिती भवनदी ॥६६॥
अनन्यभावें औपास्यभजन । तो मी ऐसें अनुसंधान । ऐक्यभावें सद्गुरुध्यान । करितां ज्ञान त्यां होय ॥६७॥
उपासना चैतन्यधन । अभेदभावें भजतां पूर्ण । तत्त्वमस्यादिवाक्यविवरण । तयांचि लागून उपतिष्ठे ॥६८॥
येर भजती भेदभावें । भवभ्रमसुखचि तिहीं मागावें । इहामुत्रिक ज्यां नाहीं ठावें । स्वबोधशिंवें न पवती ते ॥६९॥
भिषकापासून भेषजग्रहण । करूनि होऊं इच्छिती अरुग्ण । ते त्या भिषका लागीं शरण । सहसा अनन्य नव्हती कीं ॥३७०॥
तैसे गुरूपासूनि उपासना । घेऊनि करिती भेदभजना । भवभ्रमसुखाची कामना । फळें नाना वांच्छिती ॥७१॥
दारा धन सुत स्वजन सदन । तनु निरामय चातुर्यपूर्ण । लोकीं सन्मान शत्रुनिधन । भजनीं भेदज्ञ कामिती हें ॥७२॥
तयां कोठून भवनिवृत्ति । ऐसें न वदोनि वदली श्रुति । असो यावरी पदपदार्थीं । व्याख्यान श्रोतीं परिसावें ॥७३॥
स्वकर्मार्जित विविध पुरें । नरतिर्यगादि जियें शरीरें । भोगायतनें पृथगाकारें । आविष्कारें धरी जीव ॥७४॥
श्रुति म्हणती भो ईश्वरा । तोही पुरुष तवांश खरा । अखिलशक्ति ऐश्वर्यधरा । पृथगाकारीं भासतसे ॥३७५॥
जैसे घटमठादि गगनांश । पृथक न होनि गमती अशेष । तैसेचि जीव हे तवांश । चिदाभास म्हणिजती पैं ॥७६॥
येर्हवीं यथार्थबोधें जीव । तुजसीं अभिन्नचि वास्तव । यदर्थीं शंकेसी नाहीं ठाव । भवभ्रम वाव मृगजलवत् ॥७७॥
अंतर्बाह्यद्वयावरणीं । जीव पडिला कर्मभमणीं । म्हणाल तरी तीं आवरणें दोन्ही । मिथ्या म्हणोनि श्रुति वदल्या ॥७८॥
अंतरावरण तें कारण । बाह्यावरण कार्य जाण । माया अविद्या म्हणोन । वदती सर्वज्ञ ज्यां लागीं ॥७९॥
दोन्ही आवरणें असतां जीवा । ईश्वरीं अभिन्न केंवि म्हणावा । सहसा संशय हा न धरावा । श्रवण करावा विवेक हा ॥३८०॥
पाञ्चभौतिक त्रिगुणात्मक । नेति मुखें निरसितां देख । पूर्णचैतन्य उरलें एक । जीव पृथक मग कैंचा ॥८१॥
ऐसी वस्तुत्वें जीवगति । विचारूनियां निश्चिती । ज्ञानी तव चरणां उपासिती । भवनिवृत्तीकारणें ॥८२॥
तस्मात् मिथ्या उभयावरण । अविद्या माया कार्य कारण । ज्ञानी विवरूनि वेदान्तश्रवण । तन्निरसनीं प्रवर्तती ॥८३॥
भवनिवर्तक तवाङ्घ्रि स्वतंत्र । वेदोक्तकर्मबीजाचें क्षेत्र । तेथ अर्पितां कर्ममात्र । आवरणसूत्र तैं भंगे ॥८४॥
तवाङ्घ्रिक्षेत्रीं प्रेरितां कर्म । सफळ होय तें छेदून भ्रम । हा दृढविश्वासें नेम । करूनि प्रेम पदीं धरिती ॥३८५॥
विश्वासूनि तवाङ्घ्रिभजनीं । नवविधप्रेमें रमती ज्ञानी । अनन्यबोधें भ्रम निरसूनी । कैवल्यभुवनीं विराजती ॥८६॥
तिये भक्तीचें पिकतें क्षेत्र । मर्त्यभुवनीं नृदेह मात्र । अन्य लोकीं विषयतंत्र । कर्मानुसार फळभोक्ते ॥८७॥
आत्मप्राप्तीसी साधन । भक्तीहूनि श्रेष्ठ आन । जें म्हणती तें अनुचित पूर्ण । मुक्तीहून वर भक्ति ॥८८॥
म्हणाल तरी हे श्रुती । वाखाणिजेल पदपदार्थीं । ईच्या श्रवणें सभाग्य श्रोतीं । अभेदभक्ती अनुसरिजे ॥८९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP