अध्याय ७८ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अजानतैवाचरितस्त्वया ब्रह्मवधो यथा । योगेश्वरस्य भवतो नाम्ना योऽपि नियामकः ॥३१॥
यद्येतद्ब्रह्महत्यायाः पावनं लोकपावन । चरिष्यति भवांल्लोकसंग्रहोऽनन्यचोदितः ॥३२॥
म्हणसी योगेश्वरा मातें । ब्रह्महत्येचें अघ केउतें । तरी हें सत्यचि तथापि निरुतें । मुनिवचनातें अवधारीं ॥२३०॥
वेदही योगेश्वरा न नियमी । कीं तो नित्य मुक्त नैष्कर्मीं । तथापि लोकसंग्रहकामीं । अविहित तुम्हीं नाचरिजे ॥३१॥
सहसा न वधिजे ब्राह्मण । ऐसें प्रमाण वेदवचन । लोकसंग्रह लक्षून पूर्ण । हत्यानिरसन तां कीजे ॥३२॥
मान देईजे वेदवचना । कीजे स्वधर्मसंस्थापना । पुढें प्रवृत्ति लाविजे जना । स्वयें आचरण करूनियां ॥३३॥
त्रिजगत्पावन तूं संकर्षण । तुज न बाधी ब्रह्महनन । तथापि प्रायश्चित्त पूर्ण । लोकसंग्रहास्तव कीजे ॥३४॥
तुज नियामक दुसरा नाहीं । नियमूं न शके वेदही । तुझा तूंचि लोकसंग्रहीं । प्रवर्तसी जरी कारुण्यें ॥२३५॥
तरी ब्रह्महत्यानिरसनार्थ । अवश्य कीजे प्रायश्चित्त । तुझा देखूनि आचारपथ । लोक दुष्कृत निस्तरती ॥३६॥
जरी तूं जासी पूर्णपणें । ब्रह्महत्या नाणिसी गणने । तरी प्राकृत अज्ञान भ्रंशती तेणें । आम्नायवचनें नादरिती ॥३७॥
ऐसें ऐकूनि मुनींचें वचन । षड्गुणैश्वर्यसंपन्न । धर्मस्थापक भूभारहरण । वदे संकर्षण तें ऐका ॥३८॥
श्रीभगवानुवाच - करिष्ये वस्धनिर्वेशं लोकानुग्रहाकम्यया ॥
नियमः प्रथमे कल्पे यावान्स तु विधीयताम् ॥३३॥
राम म्हणे भो मुनीश्वरा । ब्रह्महत्येचिया परिहारा । वेदनिर्णय मुख्य विवरा । ममाधिकारा अनुरूप ॥३९॥
ब्रह्महत्येचा निर्वेश । उत्तम मध्यम कनिष्ठ पक्ष । त्यामाज प्रथम जो विशेष । तो मज अशेष निरूपा ॥२४०॥
लोकसंग्रहाचीं कारणें । निगमनिर्णीत ब्राह्मणवचनें । प्रायश्चित्त म्यां अगत्य करणें । निरसे जेणें ब्रह्महत्या ॥४१॥
आणखी एक वदतों तुम्हां । आज्ञापिजे भो मुनिसत्तमा । जैसा तुमचा असेल प्रेमा । मी त्या संभ्रमा साधीन ॥४२॥
दीर्घमायुर्बतैतस्य सत्वमिन्द्रियमेव च । आशासितं यत्तद्ब्रूत साधये योगमायया ॥३४॥
बत ऐसिया निर्धारणे । मुनीश्वरा प्रति राम म्हणे । तुमचिये आज्ञेप्रमाणें । अभीष्ट करणें म्यां तुमचें ॥४३॥
दीर्घ आयुष्य ओज बळ । इंद्रियपटुता प्रज्ञा अमळ । यासि अपेक्षाल तरी बोला सकळ । मी हें तत्काळ साधीन ॥४४॥
योगमायेच्या सामर्थ्यें । तुमचे मनोरथ साधीन पुरते । प्रायश्चित्त याहीवरतें । कथाल निरुतें तें करीन ॥२४५॥
ऐसें ऐकूनि रामवचन । मुनिवर करिती आज्ञापन । तें तूं राया करीं श्रवण । म्हने सर्वज्ञ शुक योगी ॥४६॥
ऋषय ऊचुः - अस्त्रस्य तव वीर्यस्य मृत्योरस्माकमेव च । यथा भवेद्वचः सत्यं तथा राम विधीयताम् ॥३५॥
मुनि म्हणती भो भो रामा । तुझा अस्त्रप्रतापमहिमा । याचिया मृत्यूची अलोट सीमा । मिथ्या नोहे तें करीं ॥४७॥
आमुचें वरद वाक्य ही सत्य । होय तैसेंचि साधीं कृत्य । त्या माजि तूं विवेकवंत । सर्वज्ञ समर्थ ईश्वर पैं ॥४८॥
ऐसें ऐकूनि मुनींचें वचन । तोषूनि बोले संकर्षण । राया होऊनि सावधान । तें व्याख्यान अवधारीं ॥४९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP