तमागतमभिप्रेत्य मुनयो दीर्घसत्रिणः । अभिनंद्य यथान्यायं प्रणम्योत्थाय चार्चयन् ॥२१॥

दीर्घसत्रींचे समस्त ऋषी । आला ऐकूनि बळरामासी । प्रत्यभिगमनें भजले त्यासी । जैसें ज्यासि यथोचित ॥६९॥
एकीं केलें प्रत्यभिगमन । यथान्यायें अभिवंदन । एकां वंदी संकर्षण । लोटाङ्गणः घालूनियां ॥१७०॥
जैसें जैसें ज्या ज्या उचित । तिहीं तैसा रेवतीकान्त । सम्मानिला तो वृत्तान्त । अल्प संकेत सूचविला ॥७१॥
नमस्कारूनि यथाविधी । मुनींहीं राम ईश्वरबुद्धी । पूजिला सर्वोपचारसमृद्धी । अर्पूनि त्रिशुद्धी सप्रेमें ॥७२॥
या वरी वर्तलें जें अपूर्व । तें कुरुवर्या ऐकें सर्व । सुकृत साधितां पर्वें पर्व । घडलें अनर्ह त्या माजि ॥७३॥

सोऽर्चितः सपरीवारः कृतासनपरिग्रहः । रोमहर्षणमासीनं महर्षेः शिष्यमैक्षत ॥२२॥

परिवारेंसीं पूर्णकाम । मुनींहीं पूजिला तो बळराम । आसन देऊनि परमोत्तम । परमादरें बैसविला ॥७४॥
रामें पाहिली मुनिवरसभा । आपणा सूत न ठाके उभा । अनम्र देखूनि भाविलें दंभा । चढला क्षोभा ते काळीं ॥१७५॥
कृष्णद्वैपायनाचा शिष्य । तुङ्गासनीं रोमहर्ष । देखोनि विषाद बळरामास । आला विशेष तो ऐका ॥७६॥

अप्रत्युत्थायिनं सूतमकृतप्रह्वणांजलिम् । अध्यासीनं च तान्विप्रांश्चुकोपोद्वीक्ष्य माधवः ॥२३॥

मधुकुळीं जयाचा अवतार । या लागीं माधव नामोच्चार । देखोनि सूतातें अनम्र । क्षोभें उत्तर काय वदे ॥७७॥
सक्रोध पाहूनि क्रूरदृष्टी । म्हणे हा प्रतिलोम सूत तुमचे मठीं । अवलंबूनि अनार्यराहटी । वर्ते श्रेष्ठीं श्रेष्ठत्वें ॥७८॥
येणें न केलें अभ्युत्थान । अल्प मस्तक ही लववून । बद्धाञ्जलि न वोडवून । उच्चासनीं बैसला ॥७९॥
समस्तां विप्रांहूनि तुङ्ग । प्रतिलोमज हीनभाग । बैसला स्तब्धत्वें अयोग्य । आर्यमार्ग लंबूनी ॥१८०॥
ऐसियातें देखोनि राम । अनय मानूनि क्षोभला परम । बोलता झाला यदूत्तम । तो अनुक्रम अवधारा ॥८१॥

कस्मादसाविमान्विप्रानध्यास्ते प्रतिलोमजः । धर्मपालांस्तथैवास्मान्वधमर्हति दुर्मतिः ॥२४॥

प्रतिलोमज हा दुर्मति । शरण गेला आपुले जाती । तुङ्गासनीं स्तब्धवृत्ती । बैसला चित्तीं न लाजूनी ॥८२॥
धर्मपाळक हे द्विजवर । ब्रह्मनिष्ठ थोर थोर । यांतें न गणूनि हा पामर । कोण्या कारणा स्तव पूज्य ॥८३॥
आम्ही धर्मसंस्थापक । अधर्मनिष्ठां शिक्षापक । त्या आम्हांतें ही तैसाचि मूर्ख । न गणी नावेक आढ्यत्वें ॥८४॥
ऐसिया स्तब्ध सगर्वातें । हनन योग्य शास्त्रसंमतें । ऐसें वदूनि रेवतीकान्तें । पुढती मुनींतें काय वदे ॥१८५॥

ऋषेर्भगवतो भूत्वा शिष्योऽधीत्य बहूनि च । सेतिहासपुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः ॥२५॥

नेणत्या योग्य हें अनुचित । हा तंव जाणता बुद्धिमंत । शिष्य व्यासाचा म्हणवित । श्रुताधीत सर्वज्ञ ॥८६॥
बहुत अध्ययन केलें येणें । सहित इतिहास पुराणें । श्रुतिस्मृतींचे निर्णय जाणे । शास्त्रें संपूर्ण धर्मरूपें ॥८७॥
भगवान कृष्णद्वैपायन । शिष्य तयाचा होऊन । श्रुतिस्मृतिधर्मनिर्णयप्रवीण । शास्त्रसंपन्न होत्साता ॥८८॥
ऐसा सज्ञान असोनियां । उत्पथ यांची ऐसी क्रिया । तस्मात उपदेश अनधिकारिया । होय केलिया प्रतिकूळ ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP