अध्याय ७८ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एवं योगेश्वरः कृष्णो भगवाञ्जगदीश्वरः । ईयते पशुदृष्टीनां निर्जितो जयतीति सः ॥१६॥
धरूनियां मानुषी नट । लीलालाघवें करी अचाट । वधिले बालवेशें बलिष्ठ । महादुष्ट दुरात्मे ॥२६॥
एवं विजयी श्रीभगवान । सूर्य नित्यत्वें प्रकाशमान । तैसा जो कां जयसंपन्न । पराजय कोठून त्या स्पर्शे ॥२७॥
जड अज्ञान प्राकृत पशु । ऐसे सामान्य जे नरविशेषु । ते म्हणती हा हृषीकेशु । कोठें अपयश यश लाहे ॥२८॥
पळाला जरासंधा भेणें । समरीं पिटिला कालयवनें । जयापजयांचीं लाञ्छनें । भाविती अज्ञानें पशुदृष्टी ॥२९॥
कृष्ण नित्यत्वें जयवान । सूर्य जैसा प्रकाशमान । त्यासि तमाचें प्रावरण । चक्षुर्हीन भाविती ॥१३०॥
म्हणती जळासि लागली तृषा । पृथ्वी पळोनि गेली परदेशा । अग्नि हिंवाचा पडिला वळसा । नभ आकाशा हुडकीतसे ॥३१॥
ऐसें जयांचें कोमळ ज्ञान । तेचि पशुदृष्टी अज्ञान । म्हणती जयाजय पावे कृष्ण । मनुजा समान मानूनी ॥३२॥
कृष्ण नित्यत्वें यशस्वी । हाचि निश्चय घडे केंवि । तरी यदर्थीं गोष्टी ऐकावी । जें वदला कवी शुक वक्ता ॥३३॥
तरी योगेश्वर आणि भगवान । परमैश्वर्याचें कारण । दोन्ही हेतु वदला पूर्ण । नित्य जयवान या योगें ॥३४॥
अचिन्त्यैश्वर्यपरिपूर्ण । यास्तव म्हणिजे तो भगवान । योगमाया ज्या अधीन । तो श्रीकृष्ण योगीश्वर ॥१३५॥
अनंत ब्रह्माण्डें घडी मोडी । ऐसी जिये मायेची प्रौढी । सत्तायोगें जडाजडीं । जियेच्या कोडी जो नियमी ॥३६॥
तो योगेश्वर श्रीकृष्ण । मायानियंता परिपूर्ण । यास्तव म्हणिजे तो भगवान । जय पराजय कोठून ते ठायीं ॥३७॥
पशुदृष्टी जे केवळ जड । कृष्णमहिमा नेणती मूढ । मनुष्यवेश देखोनि उघड । जयाजय रूढ त्या म्हणती ॥३८॥
एवं राया कुरुवरिष्ठा । ज्ञानाज्ञानें द्विविध विष्ठा । कृष्णीं प्रेमा ज्ञानियां श्रेष्ठा । द्वेष पापिष्ठा दुष्टातें ॥३९॥
असो कोण्हे एके परी । कृष्णवेध अभ्यंतरीं । लागतां मोक्ष रावे घरीं । हें निर्द्धारीं जाणावें ॥१४०॥
द्वेषें अनुरागें कां मैत्रें । प्रेमें स्नेहें हो व्यभिचारें । भयें प्रलोभें कां वैरें । कृष्णीं आदरें समरसिजे ॥४१॥
ऐसा कथिला श्रीकृष्णमहिमा । या वरी ऐकें कुरुसत्तमा । कुरुक्षेत्रींच्या समरोद्यमा । ऐकोनि रामा सुख न वटे ॥४२॥
वैकुण्ठभुवनींचे पार्षद । त्रिजन्मध्यानें होऊनि शुद्ध । वक्रदंत शिशुपाळ चैद्य । पावले स्वपद हरिहस्तें ॥४३॥
तो हा इतिहास संपला । भाषा दयार्णवें विवरिला । तीर्थयात्रे बलराम गेला । या वरी लीला ते ऐका ॥४४॥
श्रुत्वा युद्धोद्यमं रामः कुरूणां सह पाण्डवैः । तीर्थाभिषेकव्याजेन मध्यस्थः प्रययौ किल ॥१७॥
पाण्डवांसीं कौरवाचा । समरोद्यम ऐकूनि साचा । कुरुक्षेत्रा जावयाचा । उद्योग करी बळराम ॥१४५॥
तीर्थस्नानयात्रामिसें । जावें कुरुक्षेत्राला आपैसें । युद्धीं मध्यस्थ व्हावया तोषें । जाता जाला कळवळूनी ॥४६॥
ते तीर्थाची अनुक्रमणी । नृपा संक्षेपें बादरायणी । वदला तैशीच भाषा कथनीं । दयार्णवदनें हरि वदवी ॥४७॥
स्नात्वा प्रभासे सन्तर्प्य देवर्षिपितृमानवान् । सरस्वतीं प्रतिस्रोतं ययौ ब्राह्मणसंवृतः ॥१८॥
पाचारूनि श्रेष्ठब्राह्मण । करूनि विध्युक्त स्वस्तिवाचन । यात्राङ्गसंकल्प करून । प्रभासपाटन ठाकिलें ॥४८॥
हिरण्या मिनली रत्नाकरा । सुस्नात होऊनि तेथ सागरा । माजि तर्पिलें देवर्षिपितरां । देऊनि नीरा मनुजादिकां ॥४९॥
पूजूनि सोरठीसोमनाथ । अर्चिलीं ब्रह्मवृंदें समस्त । यात्राविधान यथोचित । संपादूनियां तेथींचें ॥१५०॥
प्राचीसरस्वतीसंगम । तेथ सुस्नात होऊनि राम । तीर्थविधान उत्तमोत्तम । यथानुक्रम सारूनियां ॥५१॥
महाभारतीं गदापर्वीं । रामे तीर्थयात्रा बरवी । केली ते येथ लिहितां आघवी । गाधा गुर्वी वाढेल ॥५२॥
तेथ समस्त यादवगण । तीर्थाभिलाषी प्रजाजन । सेनापरिवार सहब्राह्मण । गेला घेऊन बळराम ॥५३॥
हेम रत्नें धान्यें धनें । वसनाभरणें पशु गोधनें । द्विजार्पणार्थ संकर्षणें । द्वारकेहूनि आणिलीं ॥५४॥
आणि देशोदेशीं शासनपत्रें । प्रजा भजती सर्वोपचारें । हा विस्तार पराशरकुमरें । गदापर्वीं कथिलासे ॥१५५॥
आणि समस्त तीर्थावळी । उत्पत्ति माहात्त्म्यें सहित कथिलीं । ती येथ श्रोतयां सूचविली । शंका समूळीं निरसावया ॥५६॥
या वरी ऐका शुकाची वाणी । प्राचीसंगमीं मुसळपाणी । तीर्थविधान संपादूनी । पुढें तेथुनी चालिला ॥५७॥
दक्षिणहस्तें सरस्वती । घालूनि चालिला रेवतीपती । संगमा पासूनि उगमाप्रति । प्रतिलोमगती प्रदक्षिणा ॥५८॥
समागमें सुब्राह्मण । तीर्थावळी प्रशंसून । तेथ तेथ करविती स्नान । विधिविधान बोधूनी ॥५९॥
तेथूनि पृथूदक सेविलें । तीर्थविधान संपादिलें । बिन्दुसरोवर ठाकिलें । तेथ अर्चिलें सुरपितरां ॥१६०॥
पृथूदकं बिन्दुसरस्त्रितकूपं सुदर्शनम् । विशालं ब्रह्मतीर्थ च चक्रं प्राचीं सरस्वतीम् ॥१९॥
यमुनामनु यान्येव गंगामनु च भारत । जगाम नैमिषं यत्र रूषयः सत्रमासते ॥२०॥
त्या नंतरें संकर्षण । स्त्रितकूपा प्रति जाऊन । यथाविधि तीर्थस्नान । देव ब्राह्मण अर्चिले ॥६१॥
सुदर्शनतीर्थ तया वरी । स्नानादि यथोक्त प्रकारीं । आचरूनि मग पुढारीं । तीर्थयात्रा आदरिली ॥६२॥
विशाळतीर्था केलें गमन । तेथ सारूनि तीर्थविधान । ब्रह्मतीर्था प्रति जाऊन । देव ब्राह्मण समर्चिले ॥६३॥
पुढें ठाकिलें चक्रतीर्थ । सारूनि तेथील आचारकृत्य । प्राचीसरस्वतीचा प्रान्त । केली समस्त तीर्थयात्रा ॥६४॥
त्या नंतरें यमुनातीरें । जितुकीं तीर्थें पृथगाकारें । ते ते स्थळींच्या विधानतंत्रें । रोहिणीकुमरें संपादिलीं ॥१६५॥
भागीरथीच्या उभयकूळीं । अनुक्रमें जे तीर्थावळी । प्रदक्षिणाविधानें सकळी । मुसली हली आचरला ॥६६॥
तेथूनि नैमिषांरण्या प्रति । जाता झाला रेवतीपति । जेथ समस्त मुनीश्वर करिती । दीर्घसत्र हरिप्रेमें ॥६७॥
क्षेत्रा आला संकर्षण । शौनकप्रमुखां होतां श्रवण । तिहीं केलें अभ्युत्थान । तें संपूर्ण अवधारा ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP