मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय चौदावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवींद्र म्हणाला :-
हैबतराजाचा बलाढ्य पुत्र युद्धांत पडला असें ऐकून गर्विष्ठ पत्तेखान शिवाजीवर संतापला. ॥१॥
नंतर मुसेखान प्रभृति बलवान यवनांणीं परिवेष्टित, मत्ताजीप्रमुख राजांनीं रक्षिलेला व हत्तींप्रमाणें मदोन्मत्त असे मांडलिक चोहों बाजूंस असलेला तो ( फत्तेखान ) शिवाराजास जिंकण्याच्या इच्छेनें त्वरित स्वारीवर निघाला. ॥२॥३॥
चालणार्‍या मस्त हत्तींचा समूह हेच कोणी नक्र त्यांणीं गजबजलेला, उड्या मारीत जाणारे चपल आणि उंच घोडे हेच कोणी प्रचंड मासे त्यांनीं भरलेला, वार्‍यानें आंदोलन पावणार्‍या पताकारूपी लाटांनीं शोभणारा, जमिनीपासून उडणारे धुळीचे लोट हेच कोणी मेघ त्यांनीं व्याप्त, दुंदुमिध्वनि हीच कोणी दिशारूप किनारा दुमदुमून टाकणारी गर्जना, पांढर्‍या शुभ्र छत्र्या हेच फेनपिंड त्यांच्या समूहानें पांढरा शुभ्र दिसणारा, कठिण ढाली हींच कोणी कांसवें प्रचंड धनुष्यें हेच कोणी सर्प त्यांनीं चकाकणारा, शत्ररूपी वडवालनानें भयंकर असा सेनासमुद्र युद्धासाठीं वेगानें बरोबर घेऊन चालला असतां आदिलशहाच्या त्या सेनापतीस पुरंदरगड दिसला. ॥४॥५॥६॥७॥८॥
गर्विष्ठ फत्तेखानानें चाल करून जाणार्‍या त्या बलाढ्य सेनेचा तळ त्या गडापासून थोड्याच अंतरावर दिला. ॥९॥
तें शत्रूचें सैन्य समीप आलेलें पाहून शहाजीच्या पुत्रानें ( शिवाजीनें ) गडाच्या शिखरावर युद्धाची दुंदुभि वाजविली. ॥१०॥
वार्‍यानें जसें मानससरोवर एकदम खळवळून जावें त्याप्रमाणें त्या दुंदुभीच्या ध्वनीनें शत्रूकडील सैनिकांच्या मनाचा थरकांप उडाला. ॥११॥
मग समानगुणाचे, महागर्विष्ठ, प्रळयाग्नीप्रमाणें प्रखर आशा उत्कृष्ट तलवारी धारण करणारे, युद्धाची खुमखुमी अंगांत भरलेल, आयुधांनीं सज्ज झालेले, गर्जना करणारे असे मुसेखानप्रभृति पराक्रमी आणि धैर्यवान वीर बरोबर घेऊन मानी फत्तेखान पुरंदरगड लागलीच चढूं लागला. ॥१२॥१३॥१४॥
मेघांना विदीर्ण करून टाकणारी गर्जना करीत ती प्रचंड सेना त्या गडावर चढत असतांना तिच्या पिछाडीस फत्तेखान, आघाडिस मुसेखान, डाव्या बगलेस फलटणचा, राजा आणि उजव्या बगलेस घाटगे होता. ॥१५॥१६॥
ज्यांनीं कधीं जमिनीवर पाऊल टाकलें नाहीं व जे नित्य वाहनांतूनच जावयाचे त्यांना सुद्धां त्या समयीं तो गड आपल्या पायानींच चढावा लागला ! ॥१७॥
नंतरव चोहोंकडून गड चढुं लागलेल्या शत्रूंना पाहून ( शिवाजीच्या सेनाधिपतींनीं ) क्रुद्ध - सिंहाप्रमाणें गर्जना केली. ॥१८॥
तोफांच्या तोंडांतून सुटणार्‍या जळजळीत लोखंडी गोळ्यांचा, बंदुकींच्या गोळ्यांचा, अनेक मोठमोठ्या शिळांचा, दारूच्या शेंकडों बाणांचा, गोफणींतून भिरकावलेल्या पुष्कळ दगडांचा शिवाजीच्या हजारों शूर सैनिकांनीं शत्रूंवर अतिशय वर्षाव केला. ॥१९॥२०॥
पर्वतापासून निखळलेल्या ज्या प्रचंड शिळा शिवाजीच्या सैनिकाणीं खालीं ढकलून दिल्या त्या उंचावरून खालीं पडतांना होणार्‍या धडकेमुळें मार्गांतील मोठ्या शिळांचा मेघांप्रमाणें गडगडाट होऊन धुरळा उसळून व तत्क्षणींच अग्नीच्या खूप ठिणग्या उडून त्यांचे पुष्कळ तुकडे होऊन ते सर्वत्र आकाशांत उडून जवळ आलेल्या त्या शत्रुसैन्यावर जाऊन जोरानें आपटूं लागले. ॥२१॥२२॥२३॥२४॥
तोफांतून उडणार्‍या, विजेप्रमाणें भयंकर, ज्वाळांचे लोळ बनलेल्या अशा अनेक लोखंडी गोळ्यांच्या योगें अदिलशहाच्या सैन्यांतील त्या योध्द्यांचे तुकडे तुकडे होऊन पक्ष्यांप्रमाणें आकाशांत उडून ससाण्यांच्या पंक्तींना तृप्त करूं लागले ( म्हणजे भक्षस्थानीं पडूं लागले. ) ॥२५॥२६॥
( सों सों ) भयंकर आवाज करीत आकाशांतून खालीं पडणारे, समान लक्षणांनीं युक्त असे दारूचे बाण हे विषाग्नीच्या ज्वाळा तोंडांतून सोडणारे जणूं काय सर्पच आहेत असा भास उत्पन्न करीत गरगर फिरून आदिलशहाच्या सैन्याची दणादाण उडवूं लागले. ॥२७॥२८॥
बंदुकींतून सुटलेली एकच जोराची गोळी पुष्कळ यवनांस भेदून त्यांस भूमीवर पाडूं लागली. ॥२९॥
गडावरील लोकांनीं सोडलेल्या शिळांनीं वक्षःस्थळें चूर्ण झालेले कित्येकजण मूर्च्छित होऊन अर्ध्या वाटेंतच पडले. ॥३०॥
त्या गडाच्या तटास बिलगलेले कित्येक लोक मोठ्या दगडांनीं भग्न होत्साते शेंदुराप्रमाणें लाल रक्त ओकूं लागले. त्यांच्या दोस्तांकडून उचलून नेले जाणारे असे ते प्राणरक्षणार्थ परत फिरून वेगानें आपल्या गोटाकडे निघाले. ॥३१॥३२॥
ज्यांचीं शरीरें बंदुकींच्या गोळ्यांनीं विदीर्ण झालीं आहेत, कारंजांच्या फवार्‍याप्रमाणें उडणार्‍या रक्ताच्या चिळकांड्यांनीं जे व्यास झाले आहेत, ज्यांच्या अंगाचा एकसारखा दाह होत आहे, व ज्यांचा स्वव्र अतिशय खोल गेला आहे, असे कित्येक लोक पाणी पाणी करीतच यमाजी भास्कराचा पाहुणचार घेण्यास गेले ! ॥३३॥३४॥
शत्रूनें आपल्या सेनेचा पराभव केलेला पाहून मुसेखान आपल्या सजातीय श्रेष्ठ योध्द्यांस म्हणाला. ॥३५॥
मुसेखान म्हणाला :-
खालीं पडणार्‍या मोठाल्या शिळांचे हे पात जणूं काय पदोपदीं उत्पातच नव्हेत का ? चोहोंकडून पडणारे हे आपल्या सेनापतींना ठार करीत आहेत. ॥३६॥
अहो हा ह्या पुरंदरगडाच्या स्वामीचा ( शिवाजीचा ) मोठा उष्कर्षच. स्वतः चालून येऊन आम्हांसारख्या शूरांचा पराभव करीत आहे. ॥३७॥
ज्या आमची तलवारबहादुरी लोकप्रसिद्ध आहे, त्यांनीं येथून पराड्मुख होणें - हें अत्यंत लांछनास्पद आहे. ॥३८॥
मागें पाऊल टाकूं नका; समोर गडावर दृष्टि द्या. युद्धामध्यें ( स्थिर ) उभा राहणार्‍या मनुष्यास जय प्रायः सोडीत नाहीं. ॥३९॥
नंतर असें बोलत असतांच गर्जना करणार्‍या मोठ्या मेघांनीं युक्त अशा महामेघाप्रमाणें तो मोठ्या मनाचा मुसेखान पराड्मुख न होणारें अफाट सैन्य, आणि स्वसेनायुक्त अशरफशहा, दोनहि शेख, मचाजी राजा, तसाच फलटणचा प्रबळ आजा फत्तेखानाचें सैन्य आणि पुष्कळ मांडलिक यांसह वेगानें पुरंदरगडाची चढण चढूं लागला. ॥४०॥४१॥४२॥
पुरंदरचा चढ चढणार्‍या त्यांस क्रोधानें पाहून लगेच कल्याणकारक व अज्ञान झालेल्या गोदप्रभृति अत्यंत वेगवान योध्यांनीं शस्त्रें उगारून सर्व बाजूंनीं हल्ला केला. ॥४२॥४३॥४४॥
मुसेखानप्रभ्रुतींनींहि ग्रह जसे महाग्रहांवर हल्ला करतात त्याप्रमाणें त्या शत्रुसैन्यांतील योद्ध्यांवर निर्भयपणें चाल करून त्यांच्यावर हल्ला केला. ॥४५॥
तेव्हां अशरफशहाशीं बाहुबलोन्मत्त सदोजी, क्रुद्ध मुसेखानाशीं जगताप, मिनाद व रतन यांच्याशीं भैर्व, शूर घाटग्याशीं अत्यंत चपळ चलाख आयुधांचा वाघ, असे लढूं लागले. ॥४६॥४७॥
अत्यंत मानी, गदाधाई व प्रबल सैन्यानें युक्त असा कावुक दुसर्‍या पुष्कळ सैनिकांशीं खूप लढला. ॥४८॥
युद्धावेश ( युद्धमद ) चढलेले, जोखडाप्रमाणें लांब हात असलेले डोक्यावर उत्कृष्ट शिरस्त्राण आणि अंगांत कवच घातलेले परस्परांशीं विरोध करणारे असे त्या दोन्ही सैन्यांतील प्रमुख योद्धे, धनुष्यें हलवीत व तीक्ष्ण बाण जोडीत, ‘ सांभाळ सांभाळ ’ असें पुनः पुनः गर्वानें म्हणत पुरंदरगडाच्या चढणीवर त्यासमयीं अद्भुत प्रकारें लढले. ॥४९॥५०॥५१॥
त्या वेळीं पुरंदरासाठीं परस्परांवर प्रहार करणार्‍या सैन्यांपैकीं एक ( वरचे लोक ) खालीं उतरूं शकले नाहींत ! आणि ( दुसरे खालचे लोक ) वर चढूं शकले नाहींट ! ॥५२॥
एकमेकांकडे पाहून व नेम धरून एकांनीं बाणांनें पृथ्वीतल व दुसर्‍यांनीं आकाश झाकून टाकलें. ॥५३॥
जो बाण एकाची छाती भेदून दुसर्‍याचा भुज छेदी तोच बाण तिसर्‍याचें शिरस्त्राणयुक्त डोकेंही उडवी. ॥५४॥
क्रोधानें बेफाम ( क्रोधाविष्ट ) झालेल्या गोदाजीनें जोरानें चाल करून मुसेखानाच्या छातींत तीक्ष्ण भाला खुपसला. ॥५५॥
पण त्या शत्रूनें आपल्या छातींत खुपसलेला, कवच भेदून जाणारा तो तीक्ष्ण व भयंकर भाला त्या यवनानें दोन्ही हातांनीं उपटू(सून)न काढून क्रोधानें दांत ओंठ चावून लगेच त्याचे दोन तुकडे करून टाकले. ॥५६॥५७॥
दाट कावेनें रंग माखलेलें शिलातल ज्याप्रमाणें पर्वताला शोभा देतें त्याप्रमाणें रक्तबंबाळ झालेली छाती त्यास शोभा देऊं लागली. ॥५८॥
इतक्यांत ढाल तलवार धारण करणारा धैर्यवान सदाजी हा योद्धा अशरफशहाशीं लढण्यासाठीं वेगानें चालून गेला. ॥५९॥
दोघांनांहीं युद्धावेश चढला होता; दोघांचेहि नेत्र रक्तासारखे लाल झाले होते; दोघेहि आयुधांनीं सज्ज झाले होते; दोघांचाहि उत्साह दांडगा होता आणि दोघेहि आपआपली तलवार फिरवून ( नाचवून ) विजेच्या चमकेप्रमाणें आकाश प्रकाशित करीत होते; ते दोघेहि एकमेकांचें छिद्र पाहण्यास टपलेले असून सिंहासारखी गर्जना करीत होते, ‘ भ्रान्त ’ ‘ उद्भ्रान्त ’ इत्यादि पट्ट्याचे हात दाखवीत असतां ते फारच शोभत होते. ॥६०॥६१॥६२॥
नंतर परस्परांनीं केलेल्या तरवारीच्या वारांनीं शरीरें जखमी होऊन एका क्षणांतच ते रक्तबंबाळ झाले. ॥६३॥
इकडे वाघानें, भयंकर शक्ति धारण करणार्‍या पुरुषश्रेष्ठ घाटग्याच्या खांबासारख्या दंडावर अत्यंत तीक्ष्ण शक्तीनें झटकन प्रहार केला. ॥६४॥
तेव्हां अंगांतून स्रवणार्‍या - वाहणार्‍या रक्तानें रक्तबंबाळ झालेल्या त्या युद्धविशारद घाटग्यानेंहि शक्तीनेंच त्याच्या मनगटावर ( भुजावर ) जोरानें प्रहार केला. ॥६५॥
तेव्हां जणूं काय दुसरा वाघच अशा त्या वाघानें त्याच्याकडून प्रहार होत असतांही स्वतःचें शौर्य दाखवून आपल्या लोकांस हर्षविलें. ॥६‍६॥
मिनाद व रतनु यांनींहि धनुष्य आकर्ण ओढून चालून आलेल्या भैरव चोरास बाणांनीं झाकून टाकलें. ॥६७॥
त्या दोघांनीं सोडलेल्या बाणांनीं विद्ध केलेलें तें त्याचें शरीर चाळणीसारखें दिसूं लागलें. ॥६८॥
हा एकटा आणि ते दोघे असतांहि तेथें पुष्कळ वेळ युद्ध चाललें तथापि भैरव चोरासच विजयश्री प्राप्त झाली. ॥६९॥
क्रुद्ध आणि अग्नीप्रमाणें तेजस्वी कावुकानेंहि जोराच्या गदाप्रहारानें शेंकडों शत्रु लोळविलें. ॥७०॥
ज्यांची उत्कृष्ट कवचें भग्न झाली आहेत व वक्षःस्थळें विदीर्ण झालीं आहेत, जे एकाएकीं मूर्च्छित होऊन ज्यांच्या हातांतून शस्त्रें गळून पडलीं आहेत, ज्यांच्या प्रत्येक अवयवांतून वाहणार्‍या रक्तानें जमीन तांबडी लाल झाली आहे असे रणभूमीवर पडणारे लोक शोभूं लागले. ॥७१॥७२॥
गळणार्‍या रक्तानें लाल शरीरें झालेले ते उत्कृष्ट वीर झर्‍याच्या प्रवाहांत मिसळलेल्या गेरूनें रंगलेल्या पर्वतांप्रमाणें शोभूं लागले. ॥७३॥
वीरश्रीनें विराजणारा वीर शिवाजीहि तेथें त्यांच्या ( मराठ्यांच्या ) व शत्रुच्यामध्यें चाललेल्या त्या युद्धाचें कौतुक त्यासमयीं प्रत्यक्ष पहात होता. ॥७४॥
त्या वेळीं पुरंदरगडाच्या दरडीवरून रक्ताची महानदी गर्जना करीत अत्यंत गर्वानें उन्मत्त झालेली धडाधड वाहूं लागली. ॥७५॥
विमानांत बसून अंतरिक्ष प्रकाशित करणारे सर्व देव तें महायुद्ध वारंवार पाहून त्याची प्रशंसा करूं लागले. ॥७६॥
त्या वेळीं धारण केलेल्या भयंकर मुंडमाळांनीं मनोहर दिसणारा शंकर प्रमथांसह ( प्रथम गणांसह ) आनंदानें तेथें आला. ॥७७॥
अतिशय बुभुक्षित राक्षस त्याक्षणीं आनंदित होऊन पुष्कळ मांस मिळाल्यामुळें तृप्त झाले. ॥७८॥
त्या वेळीं बुभुक्षित पिशाच रक्तानें भरलेलें मुंडकें निर्भयपणें मांडीवर ठेवून भराभर खाऊं लागलें. ॥७९॥
त्या वेळीं स्वैर ( भयंकर ) उड्या मारण्यांत पटाईत ( निपुण ) अशा डाकिनींसह शाकिनींनी सैनिकांच्या मांसानें आपलीं शरीरें पुष्ट केलीं ( मांसावर ताव मारला. ). ॥८०॥
कवींद्र म्हणाला :-
अहो द्विजांनों, त्यासमयीं गोदाजीनें मुसेखानास कसें मारलें हें सर्व मी आतां सांगतो तें आपण ऐकावें. ॥८१॥
बलवान मुसेखानानें ( गोदाचा ) भाला मोडल्यावर तो क्रुद्ध होऊन त्यानें काळ्या कावळ्याच्या उदराप्रमाणें दिसणारी तरवार हातांत घेतली. ॥८२॥
तेथें त्या विजेसारख्या तरवारीनें शेंकडों पठाणांचे तुकडे तुकडे होऊन ते भूमीवर पडले. ॥८३॥
पण मुसेखाननें त्याचें तें अतिमानुष कृत्य पाहून त्याच्या डाव्या बाहूवर आपल्या तरवारीनें वार केला. ॥८४॥
वेगवान मुसेखानानें डाव्या भुजावर वार केला असतांहि तो महावीर वार्‍यानें जसा वनवृक्ष कंप पावत नाहीं त्याप्रमाणें, कंप पावला नाहीं. ॥८५॥
कपाळास खूप आठ्या घातलेले व क्रोधानें क्रूर दृष्टि झालेले ते दोघेहि हातांत भयंकर तरवारी घेऊन पुढें जात मागें येत, हत्तीप्रमाणें गर्जना करीत, परस्परांना प्रहार करीत असतां त्यांची शिरस्त्राणें व कवचें विदीर्ण होऊन ते शोभूं लागले. ॥८६॥८७॥
मग एकमेकांच्या शस्त्रप्रहारांनीं जखमी झालेले हे दोघेहि एकदम रक्ताच्या धारांनीं पृथ्वीला अभिषेक करूं लागले. ॥८८॥
अहो ! क्षणमात्र तेथें त्या दोघांचें बरोबरीचे युद्ध ( समसमान ) झालें. मग त्या युद्धामुळें होणार्‍या वेदना होत असतांहि गोदाजीनें मुसेखानावर वरचढ केली. ॥८९॥
मग पुष्कळ प्रहारांच्या योगें अत्यंत विव्हल झाला असतांहि त्या बलवान मुसेखानानें गोदाजीच्या मस्तकावर तरवार हाणली. ॥९०॥
जों याची तरवार आपल्या डोक्यावर पडते न पडते तोंच गोदाजीनें आपल्या तरवारीनें त्या शत्रूस मारलें. ॥९१॥
त्या वेळीं तेथें क्रुद्ध गोदाजीनें प्रहार केलेल्या तो मुसेखान खांद्यापासून मध्यभागांपर्यंत चिरला जाऊन त्याचे दोन तुकडे झाले. ॥९२॥
तेव्हां दोन तुकडे झालेलें त्याचें शरीर पाडण्यांत आलें आणि त्यामुळें रक्तप्रवाहाच्या योगें पृथ्वीतल ( भूमि ) तांबडें लाल झालें. ॥९३॥
गोदाजी जगतापानें मुसेखानास पाडलें असतां तेथें शेंकडों यवन यमराजाचें पाहुणे झाले. ॥९४॥
खङ्गधारी सदाजीशी खङ्गयुद्ध करण्यास असमर्थ असणार्‍या शत्रूनें मागें सरून गर्वानें उत्तम धनुष्य उचललें. ॥९५॥
नंतर तीक्ष्ण बाणांनीं विद्ध करणार्‍या अशरफशहानें दोरी ओढून क्षितिजापर्यंत वांकविलें, अनेक रंगांनीं रंगविलेलें, इंद्रधनुष्याप्रमाणें लांब असें धनुष्य खङ्गधारी सदाजीनें चालून जाऊन छेदून टाकलें. ॥९६॥९७॥
चलाख हाताच्या त्या शत्रूनें दोन तुकडे केलेलें, चित्रविचित्र रंगांचें, रुप्याच्या टिकल्यांनीं चमकणारें, युद्धांतील मित्र असें तें धनुष्य त्या वेळीं टाकून लगेच त्या शत्रूस मारण्यासाठीं त्यानें भयंकर परिघ ( लोखंडी कांटे लावलेला सोटा - अस्त्र ) घेतला. ॥९८॥९९॥
शरीरानें सिंहासारखा व अतिशय निकरानें युद्ध करणार्‍या त्या सदोजीनें त्याचें तें आयुध घेतांक्षणींच तोडून टाकलें. ॥१००॥
तेथें त्या यवनानें जें जें आयुध आपल्या हातीं घेतलें तें तें सदाजीनें तेव्हाच तोडून टाकलें. ॥१०१॥
तेव्हां निःशस्त्र होऊन, तोंड फिरवून तो यवन वाट फुटेल तिकडे पळत सुटला. ॥१०२॥
नंतर घांटगेहि त्या शत्रु योद्धपाशीं ( वाघाशीं ) बराच वेळ युद्ध करून एका हत्तीपासून दुसरा हत्ती जसा पळून जातो तसा त्याच्यापासून वेगानें पळून गेला. ॥१०३॥
मिनाद व रतनु यांनींहि भैरवास ( प्रत्यक्ष ) काळभैरव समजून प्रलयकाळासारख्या त्या युद्धांतून पाय काढला. ॥१०४॥
पुरंदराहून रक्षणार्थ परत फिरणार्‍या त्या सेनेकडे खिन्न फत्तेखानानें वळून पाहिलें नाहीं. ॥१०५॥
तेथें पुष्कळ सैन्यासह समोर चालून आलेल्या त्या फत्तेखानाचा त्या शहाजीच्या पुत्रानें - शिवाजीनें - बलानें मोड करून दैवोत्कर्षामुळें अप्रतिहतगति आणि चढत्या पराक्रमाचा तो शिवाजी विजापूरच्या सुलतानाला जिंकण्यास उद्युक्त झाला. ॥१०६॥
जोरानें लढून त्यांत शिवाजीमहाराजांकडून पराभव पावून खिन्न ( म्लान ) झालेल्या फत्तेखाननएं विजापूर गांठलें आणि ती बातमी दरबारांत एकदम ऐकून महमूदशहाचें मन दुःखी होऊन तो पुष्कळ काळपर्य्म्त चिंतासागरांत बुडाला. ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP