शहाजीला पांचवें वर्ष लागलें असतां, मोठें व उत्तम चिलखत चढवून आणि आपलें आवडतें धनुष्य घेऊन मालोजी राजा मोठ्या सैन्यासह निजामशाहाच्या आज्ञेनें इंदापुरच्या स्वारीवर गेला. ॥१॥२॥
तेथें त्याच्यावर हल्ला करून गराडा घालणार्या पुष्कळ योद्धयांचे प्रहार घेत त्यांच्याशीं लढत असतां त्यानें पायदळ, मदोन्मत्त हत्ती व घोडे यांच्या रक्ताची एक मोठी नदी धों धों वहावयास लाविली. व यमाप्रमाणें क्रुद्ध व तेजस्वी, अशा त्या मालोजीनें शत्रुपक्षाच्या योद्धयांस पुढें पाठवून त्यांच्या मागोमाग आपण स्वतःहि स्वर्गाची वाट धरली. ॥२॥३॥४॥५॥
वज्रपाताप्रमाणें भयंकर अशी ती वार्ता ऐकून ती साध्वी उमा वार्यानें केळ जशी उपटून पडते तशी भूमीवर पडली. ॥६॥
सूर्याच्या वियोगानें ज्याप्रमाणें दिनश्री अंधारांत बुडते त्याप्रमाणें ती आधार तुटलेली उमा दुःखसागरांत बुडाली. ॥७॥
मग स्वतःचे डोळे अश्रूंनीं भरले असतांहि तो महाबुद्धिमान् विठोजी, पतिशोकानें विव्हळ झालेल्या आणि क्रौंचीप्रमाणें विलाप करणार्या आपल्याभावजयीचें सांत्वन करण्यासाठीं, गळा दाटून येऊन तिला म्हणाला, “ हे थोर मनाच्या स्त्रिये, हा मृत्युलोक अनित्य आहे हें लक्षांत आणून तूं शोक टाकून दे. तुझा पति आपल्या आप्तजनांस सोडून स्वर्गास गेला आहे. शत्रूंच्या शस्त्रप्रहारांनीं मरण यावें असेंच शत्रूस पाठ न दाखविणारे शूर योद्धे इच्छितात. स्वर्गलोकीं शीघ्र जाऊन अमृत प्राशन करूं इच्छिणार्या स्वार्थदृष्टि वीरांस खरोखर आप्तजनांविषयींचें प्रेम अडवूं शकत नाहीं. हाय हाय ! तुझीं मुलें लहान असतांना तुला साध्वीला सोडून तुझा पति परलोकास गेला तेव्हां त्याचें हृदय कठोर असलें पाहिजे. खरोखर मनुष्यांचीं शरीरें नशर आहेत आणि तीं महाप्रयासानें रक्षिलीं असतांही आयुष्यावी दोरी संपली असतां नाश पावतातच ! ॥८॥९॥१०॥११॥१२॥१३॥१४॥
अहो वैद्यांकडून उपचार करवून या शरीरास निरोगी ठेविलें; उत्तम व मृदु रेशमी वस्त्रें आणि रजया यांनीं आच्छादिलें; हलका, स्निग्ध, मधुर, प्रिय, हितावह, पौष्टिक अशा चोप्य, खाद्य, पेय, लेह्य वगैरे नानाप्रकारच्या आहारानें यास पुष्ट केलें; कृष्णचंदनाच्या चूर्णानें बनविलेल्या अगरबत्त्यांच्या आणि दिव्य रत्नांनीं प्रकाशणार्या रम्य महालांत शिरीष पुष्पाप्रमाणें मृदु आणि सुंदर बिछाना टाकून त्यावर निजविलें आणि पाणी शिंपडलेल्या थंडगार वाळ्याच्या पंख्यानें वारा घातला; सुंदरींनीं आपल्या करकमलांनीं त्याचे पाय चुरले ( रगडले; ) अशा रीतीनें त्याच्यावर पुष्कळ उत्तम उपाय करून त्याला मोठ्या काळजीनें धारण केलें तरी जणूं काय कृतघ्न होऊन हें शरीर कोणाच्याही बरोबर जात नाहीं ! म्हणून या लोकांत कोणी कोणाचें नाहीं हेंच खरें. ॥१५॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥
प्रेम करणार्या स्त्रिया, गुणवान् पुत्र, ते प्रेमळ आईबाप, तसेंच सख्ये भाऊ, मित्र, शत्रु, संपत्ति, विपत्ति हें सर्व देह आहे, तोंपर्यंतच माणसाला असतात. ॥२१॥२२॥
हे देवी, शहाजी, आणि शरीफजी हे तुझे दोन्ही पाणीदार पुत्र उगवलल्या चंद्रसूर्याप्रमाणें शोभत आहेत. ॥२३॥
वीरमातेच्या पोटीं जन्मास आलेल्या या तुझ्या दोघां कुलदीपक पुत्रांचें अखिल जगतांत अद्भुत आणि उज्वळ यश पसरेल. हे दोघेहि कोवळ्या वयाचे असून त्यांचे जीवित तुझ्यावरच अवलंबून आहे. या लोकीं तुझ्याशिवाय ते क्षणभरही राहूं शकणार नाहींत. म्हणून तूं आतां माझ्या विनंतीला मान देऊन तरी धैर्य धर व या दोघांच्या रक्षणासाठीं तरी प्राण धारण कर. ॥२४॥२५॥२६॥
आपल्या कुलाच्या व विशेषतः राज्याच्या सुस्थितीसाठीं विठोजीनें अशा रीतीनें तिचें सांत्वन केलें. ॥२७॥
त्या सच्छील राणी उमाबाईनें आपल्या दोन्हीं पुत्रांवर नजर देऊन शोक टाकला व जीवित धारण केलें. ( सती जाण्याचा बेत रहित केला. ) ॥२८॥
त्या महामति विठोजीस जरी अत्यंत शोक झाला होता तरी तो आवरून त्यानें आपल्या भावाचें और्ध्वदैहिक कर्म केलें. ॥२९॥
नंतर प्रतापी विठोजीनें शहाजी आणि शरीफजी यांच्या नांवानें राज्यकारभार चालवून अखिल राज्यास स्थैर्य आणलें. ॥३०॥
मालोजीच्या निधनाची ही वार्ता ऐकून निजामशहाससुद्धां आपल्या सेनेचे पंख तुटलें असें वाटूं लागलें. ॥३१॥
तेव्हां मालोजीच्या शहाजी व शरीफजी या दोन्ही पुत्रांना विठोजीसह बोलावून आणवून उदारधी निजामशहानें त्यांचें स्वतः सांत्वन केलें आणि बापाची जहागीरही त्यांच्याकडे चालू केली. तसेंच सुवर्णालंकार, सुंदर वस्त्रें, मौल्यवान् रत्नमाला आणि हत्ती घोडे देऊन त्यांचा सत्कार केला व संतोषानें त्यांस घरीं जाण्यास निरोप दिला. ॥३२॥३३॥३४॥
त्यांचा चुलता विठोजी यानें त्या दोघांस वाढविलें व तेव्हां त्यांच्या त्या बालशरीरांवर विशेष तेज चमकूं लागलें. ॥३५॥
उत्तम लक्षणांनीं युक्त व सर्व संपत्तीचें आगर असा शरीफजीचा भाऊ जो शहाजी त्यास ‘ राजा ’ शब्द शोभूं लागला. ( तो राजा झाला. ) ॥३६॥
तो महाबाहू, मेचा पुत्र शहाजी लहान असतांही त्यास सर्व सरदार मान देऊन वंद्न करूं लागले. ॥३७॥
शहाजीच्या शरीरांत जसजसें यौवन प्रवेश करूं लागलें, तसतशी बाल्यदशेला जणूं काय अडचण होऊन ती हळू हळू संकोच पावूं लागली. ॥३८॥
हत्तीचा छावा जसा गंडस्थळाच्या मदस्रावधारांनीं शोभतो तशी नुकत्याच फुटूं लागलेल्या मिसूडीनें देवाप्रमाणें सुंदर अशा शहाजीच्या मुखास शोभा आली. ॥३९॥
त्याची कांती सुवर्णासारखी असून, त्याचे नेत्र दीर्घ होते आणि त्याची सुंदर नासिका अतिशय बांकदार असल्यामुळें पोपटांच्या मनांत भीति उत्पन्न करीत होती. ॥४०॥
त्या शहाजीचें मुख चंद्राला सुद्धां मागें सारील असें सुंदर होतें. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असून त्याचें शरीर ( अलौकिक ) दिव्य होतें. ॥४१॥
उत्तम लक्षणांनीं युक्त, दानशील, दयाशील, युद्धकुशल, महातेजस्वी अशा शहाजी नांवाच्या मालोजी राजाच्या पुत्रास पाहून कुबेराप्रमाणें संपत्तिमान् जाधवरावानें, अनुकूल ग्रह असलेल्या अशा ज्योतिष्यानें सांगितलेल्या मुहूर्तावर आपली विजलक्षणा, कमलनेत्रा आणि कुलास शोभा आणणारी, कुळवान मुलगी जिजा हुंड्यासह अर्पण केली. ॥४२॥४३॥४४॥
ज्याप्रमाणें शुभ्र व खोल गंगा सागरास मिळाली असतां शोभते त्या प्रमाणें तेजःपुंज शरीर धारण करणारी ती गुणवती जिजाबाई गुणगंभीर थोर मनाच्या शहाजी पतीशीं संयोग पावून शोभूं लागली. ॥४५॥
तिचे हात कमलासारखे असून ती जणू काय पृथ्वीची शोभा होती. ती लावण्यवती असून तिचें कुळ उच्च होतें.
तिचा काळा व तुळतुळीत केशकलाप नितंबभागापर्यंत लोळत होता. तिचा भालप्रदेश पाहून जणूं काय हा अर्धचन्द्रच आहे असा भास होत होता, व तिच्या भुंवया धनुष्याप्रमाणें होत्या. ती प्रत्यक्ष मदनाची सत्ताच होती. तिचे डोळे कमलाप्रमाणें पाणीदार, कान सोन्याच्या शिंपल्याप्रमाणें, नाशिका सरळ, दांत कुंदाच्या ताज्या फुलांप्रमाणें शुभ्र, ओंठ आरक्त, आणि मुख प्रफुल्लित कमलाप्रमाणें होतें. नुकत्याच यौवनांत प्रवेश करणार्या तिचे भुज कमलांतील कोमल तंतूप्रमाणें नाजूक असून, तिचे हात विकसित कमलाप्रमाणें आरक्त व बोटें पल्लवाप्रमाणें लालसर होतीं. नखें तुळतुळीत व लाल होतीं. तिची नाभि खोल, पोट कृश व मांड्या केळीच्या खांबासारख्या सुंदर होत्या, व घोटे आंत लपून गेले होते. तिच्या पायावर राजलक्ष्मीचें चिन्ह दिसत होतें. ती सर्व संपत्तीचा कळस होती. तिच्या वेणींत नानाप्रकारच्या अलंकारांची गर्दी झाली होती. मोत्यें व रत्नें यांच्या मालांनीं, रक्तवर्ण, तेजस्वी अशा डोकींतल्या फुलांनीं तिचा शिरोभाग सुशोभित झाला होता. तिच्या ललाटभागावर रत्नें लटकत असून तिच्या कानांत सभोंवती मोत्यें ओंवलेलीं अशीं कुंडलें झळकत होतीं. मोत्यें रत्नें यांचे मोठमोठे हार व गुच्छ तिच्या गळ्यांत घातलेले होते. दंडांत बाजूबंद असून हातांत रत्नजडित बांगड्या होत्या. कृश अशा कटिप्रदेशावर कमरपट्टा, पायांत रुमझुम वाजणारे पैंजण, पायांच्या बोटांत मौल्यवान रत्नाभरणें, आंगावर चकाकणारीं जरतारी वस्त्रें, अंगांत रत्नजडित काठांची जरतारी चोळी धारण करणार्या त्या प्रसन्नवदन हंसगति व प्रेमळ जिजाईस त्या सूर्यवंशदीपक आणि प्रसन्नमनाच्या शहाजीनें वाद्यांच्या घोषांत घरीं आणिलें. ॥४६॥४७॥४८॥४९॥५०॥५१॥५२॥५३॥५४॥५५॥५६॥५७॥५८॥५९॥
त्या विनयशील जिजाईनें आपल्या पतीसह गृहप्रवेश केला, तेव्हां तीं दोघें लक्ष्मीनारायणाच्या जोड्याप्रमाणें भासलीं. ॥६०॥
शीघ्र जमलेल्या व आश्चर्यानें पाहाणार्या पोक्त सुवासिनीनीं मिळून तिला निरांजनानें ओवाळिलें. ॥६१॥
तेव्हां तिनें नमस्कार केला असतां तिला फलप्रद होणारे अनेक आशीर्वाद देऊन, त्या आपल्या सुनेस सासूनें अत्यंत कौतुकानें पाहिलें. ॥६२॥
सासूच्या सेवेंत तत्पर, पतीला अत्यंत प्रिय बोलणारी, आपल्या शीलाचें संरक्षण करण्यांत दक्ष, विनयाची मूर्तिमंत देवता, पतीव्रता स्त्रियांस वर्तनाचा मार्ग दाखविणारी, दोन्ही कुलांस मान्य आणि आपल्या परिजनांस आनंद देणारी, अशा त्या सुनेचें साध्वी स्त्रियांनीं अतिशय अभिनंदन केलें. ॥६३॥६४॥
विश्वासराजाची दुर्गा नांवाचीं सुंदर व सद्गुणी मुलगी ही महाबाहु शरीफजीस बायको मिळाली. ॥६५॥
ती व सुंदर जिजाई या दोघी आपली सेवा करणार्या सुना आणि आपले दोघे पुत्र यांच्यायोगें उमेस अतिशय आनंद होत गेला. ॥६६॥
अमूल्य गुणांनीं शोभणार्या त्या दोघी वधूंच्या योगानें शोभणारे हे दोघेही सद्गुणी पुत्र लागलींच आपल्या यशामुळें सर्व पृथ्वीस आणि आपल्या मातेस आनंद देऊं लागले. ॥६७॥
ज्याप्रमाणें अत्यंत वेगवान् वायूनें अग्नि प्रखर होतो, त्याप्रमानें आपल्या पराक्रमी भावासह तो भीष्मापेक्षांहि उग्र कर्में करणारा, प्रत्येक युद्धांत विजयी होणारा, व धनुष्य बाण घेणारा अतुळ बळवान् शहाजीराजा निजामाचें प्रिय करण्यासाठीं सर्व राजांमध्यें श्रेष्ठ अशा पृथुराजाप्रमाणें ( पृथ्वीचा शास्ता ) झाला. ( पृथ्वीवर राज्य करूं लागला. ) ॥६८॥