कवीन्द्र म्हणतात :- नंतर आपला चुलता, विठोजी राजा हाही परलोकवासी झाला असतां राजनीति जाणणार्या, आईच्या आज्ञेंत वागणार्या, महापराक्रमी धैर्यवान् व बुद्धिमान् शहाजी राजानें तो राज्याचा मोठा भार आपल्या शिरावर घेतला. ॥१॥२॥
विठोजी राजाचे मुलगे संभाजी, खेळाजी, मल्लाजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकजी आणि वक्काजी हे सख्खे भाऊ इंद्राप्रमाणें पराक्रमी होते. आणि मालोजी राजाला शहाजी व शरीफजी असे दोन प्रभावशाली पुत्र होते. ॥३॥४॥
मुलुखगिरी करण्यास उत्सुक, युद्धामध्यें पृथ्वी पादाक्रांत करण्यास समर्थ, निजामाचे प्रिय करणारे, हातामध्यें नेहमीं धनुष्य सज्ज ठेवणारे, पर्वताप्रमाणें धिप्पाड, सूर्याप्रमाणें तेजस्वी, आपलें प्रचंड बाहुबळ, मोठा परिवार, सैन्य आणि इतर गुण यांमुळें अद्वितीय पराक्रमी झालेले हे सर्व भाऊ मलिकंबराच्या तंत्रानें चालत आणि शत्रूस जुमानीत नसत. ॥५॥६॥७॥
एकदां अंतःपुरांतून आपल्या विश्वासू नोकरांसह व अमात्यासह निजामशहा सभास्थानीं येऊन सिंहासनावर बसला असतां जाधवराव इत्यादि सर्व सरदार त्यास यथानुक्रम भेटून आणि मुजरे करून आपापल्या घरीं जलदीनें जाऊं लागले. ॥८॥९॥
एकमेकांचीं स्पर्धा करणारे ते राजे जाण्यास निघाले असतां सभागृहाच्या दारासमोर एकच गर्दी झाली. ॥१०॥
तेथें असलेले भालदार लोकांना बाजूस सारू लागले. आणि अप्रतिहत सामर्थ्य असलेले ते राजे, कोणी घोड्यांवरून, कोणी हत्तींवरून, कोणी पालख्यांत बसून जाऊं लागले. त्या राजांचे खांदे उंच व पुष्ट होते. त्यांचीं वक्षःस्थलें विस्तीर्ण असून ते ( नेहमीं ) सज्ज असत. त्या सुलक्षणी राजांचें नेत्र कमलाप्रमाणें दीर्घ असून आंगांत चिलखतें घातलीं होतीं; आणि ते आपापल्या सैन्यांनीं वेष्टित असून त्यांच्यापुढें निशाणें उभारलेलीं होतीं. ॥११॥१२॥१३॥१४॥
त्या वेळेस खंडार्गळ नांवाच्या राजाचा अघाडीचा बळवान् हत्ती दुसर्यांचीं सैन्यें तुडवीत वेगानें निघाला. ॥१५॥
माहुतानें अंकुशानें टोंचून पदोंपदीं प्रतिबंध केला असतांही त्या हत्तीनें सैनिकांचें खूब कंदन केलें. ॥१६॥
सैन्यांचा चुराडा करणार्या, निर्भयपणें गर्जणार्या व प्रळयकाळच्या मेघाप्रमाणें भासणार्या त्या हत्तीस कोणीही अडवूं शकले नाहींत. ॥१७॥
एकाद्या हत्तीनें गर्जना केली असतां दुसर्या कळपांतल्या हत्तीस ज्याप्रमाणें ती सहन होत नाहीं; त्याप्रमाणें या हत्तीची गर्जना जाधवरावांच्या दत्ताजीप्रभृति पुत्रांस सहन झाली नाहीं. ॥१८॥
नंतर दत्ताजीच्या आज्ञेनें शूर योद्धे त्या मदोन्मत्त हत्तीस बाण, तरवारी, भाले, तोमर ( रवीसारखें ) आणि शक्ति यांनीं प्रहार करूं लागले. ॥१९॥
त्या मदोन्मत्त, आणि घ्रो कर्में करणार्या हत्तीला पुष्कळांनी भोंसकलें असतांही, घोडेस्वारांना सोंडेच्या टोंकानें ओढून त्यानें कित्येकांना खालीं आदळलें; व कित्येकांना आपल्या पायांनीं खालीं पाडून त्यांच्या तलव्यांखालीं तुडविलें. ॥२०॥२१॥
अशा रीतीनें आपल्या सैन्याचा पराभव झालेला पाहून दत्ताजी त्या हत्तीवर सिंहाप्रमाणें दृष्टी रोखून चालून गेला. ॥२२॥
नंतर, त्यानें जोराच्या शस्त्रप्रहारांनीं जेरीस आणलेला तो हत्ती आपलें डोकें हलवीत रणांगणाच्या अघाडीस चीं चीं करूं लागला. ॥२३॥
तेव्हां विठोजीचे संभाजी व खेळोजी हे दोघे पुत्र खंडार्गळाच्या मदतीस धांवून आले. ॥२४॥
ते दत्ताजीच्या तावडींत सांपडलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या आणि गेरूच्या डोंगराप्रमाणें दिसणार्या त्या हत्तीचें रक्षण करूं लागले. ॥२५॥
तेव्हां दत्ताजीनें त्या सोंड तुंटलेल्या मदोन्मत्त हत्तीस सोडून देऊन धाकटा भाऊ जो पराक्रमी संभाजी, त्याच्यावर हल्ला केला. ॥२६॥
क्रोधायमान झालेल्या त्या दोघांमध्यें द्वंद्वयुद्ध चाललें असतां तेथें खूब योद्धें धांवून आले व त्यांची एकच गर्दी झाली. तेव्हां त्या दोन्ही सैन्यांमध्यें हातघाईची लढाई झाली. इंद्राप्रमाणें पराक्रमी संभाजी हा दत्ताजी जाधवावर चालून गेला असतां जाधवांच्या संबंधाकडे उघड उघड डोळेझांक करून संभाजीचा भाऊ शहाजी राजा यानें त्याची बाजू संभाळली. ॥२७॥२८॥२९॥
तेव्हां, हातांत ढाल घेतलेल्या प्रतापी दत्ताजीनें तरवार फिरवून आपल्या भोंवती जणूं काय एक तेजोवलयच बनविलें. ॥३०॥
त्या आकस्मिक युद्धामध्यें गोळा झालेल्या वीरांच्या गर्जनांनीं आणि दंड थोपटणार्या दणक्यानें दिशा बधिर झाल्या. ॥३१॥
तेव्हां तो वीर दत्ताजी पट्टा फिरवीत असतां त्या अफाट रणभूमीवर नाचूं लागला. ॥३२॥
श्रेष्ठ वीरांचीं किरीट - युक्त डोकीं जमिनीवर लोळूं लागलीं; तरवारींनीं धनुष्यासहित दंड तोडले जाऊं लागले; तरवारी, बाण, परशु, भाले यांनीं चिलखतें छिन्नभिन्न झालीं; तीव्र चक्रांनीं सशर हस्त तोडले जाऊं लागले; घोडे व मस्त हत्ती यांच्या अंगांत बाण शिरल्यामुळें वाहणार्या रक्ताच्या धारांनीं धुरळा चांगला बसला.
समरांगण निशाणांच्या वस्त्रांनीं आच्छादित झालें; बाणांनीं शरीरें विद्ध होऊन माणसें पडूं लागलीं; अशा वेळीं त्या धैर्यवान व शत्रूचा नाश करणार्या यादव वीराची संभाजीशी गांठ पडली असतां तो सूर्यलोकीं गेला ( ठार झाला. ) ॥३३॥३४॥३५॥३६॥३७॥
अद्वितीय कर्में करणारा असा आपला मुलगा दत्ताजी युद्धांत संभाजीकडून मारला गेला ही बातमी पुढें निघून गेलेल्या जाधवरावास समजली तेव्हां त्याचे डोळे क्रोधानें तांबडे लाल झाले आणि संभाजीस मारण्याच्या हेतूनें तो अर्ध्या रस्त्यावरूनच परत फिरला. ॥३८॥३९॥
त्या जाधवाधिपतीस क्रोधाविष्ट झालेला पाहून पृथ्वी, तिच्यावरचे पर्वत, अरण्यें, द्वीपें हीं कापूं लागलें. ॥४०॥
प्राणापेक्षांहि प्रिय असलेल्या माझ्या पुत्रास ज्या दुष्टानें मारलें त्यास ठार करून माझी इच्छा पूर्ण करी ( सूड उगवीन ). ॥४१॥
अशा रीतीनें क्रोधाविष्ट झालेला आणि देवाप्रमाणें पराक्रमी असा जो आपला सासरा जाधवराव त्याच्याशीं शहाजी स्वपक्षाचें रक्षण करणाच्या हेतूनें युद्ध करूं लागला. ॥४२॥
आपला जांवई लढत आहे असें पाहून शत्रूंचा निःपात करणार्या त्या धाडसी जाधवरावानें शहाजीच्या, वासुकीप्रमाणें प्रचंड, दंडावर प्रहार केला. ॥४३॥
त्या तरवारीच्या प्रहारानें शहाजीस जबर मूर्च्छा आली. आणि त्यानें धैर्यानें आपले प्राण कसे तरी वांचवले. ॥४४॥
त्यावेळेस खेळोजी इतर राजे व निजामाची शिद्दी लोकांची फौज यांचा पराभव करून क्रुद्ध झालेल्या त्या गाढमुष्टि जाधवरावानें खङ्ग उगारून समरांत अजिंक्य अशा संभाजीवर वेगानें चाल केली.
तेव्हां प्रसन्नचित्त संभाजीनें शत्रूंचा जणूं काय उपहास करीत वेगानें आपल्या तरवारीस हात घातला. ॥४५॥४६॥४७॥
दोन मदोन्मत्त हत्तींचें ज्याप्रमाणें एकमेकांशीं भयंकर युद्ध होतें त्याप्रमाणें एकमेकांशीं स्पर्धा करणार्या त्या दोघांमध्यें लोकांच्या अन्तःकरणांत धडकी भरविणारें असें युद्ध झालें. ॥४८॥
त्या शत्रुजेत्या जाधवरावानें संभाजीच्या तरवारीचे पुष्कळ आघात सहन केले आणि नंतर त्याला तरवारीनेंच जमिनीवर लोळविलें. ॥४९॥
आपल्या पुत्राचा वध करणार्या संभाजीस जमिनीवव लोळवून त्या जाधवरावानें सूड घेतला. ॥५०॥
हरहर ! जाधवरावानें विठ्ठलराजाच्या ज्येष्ठ पुत्रास युद्धांत ठार केलें तेव्हां निजामशहाचें अखिल सैन्य कांहींसुद्धां प्रतिकार करूं शकलें नाहीं, व त्याचें धैर्य खचलें. ॥५१॥५२॥
मग अत्यंत क्षुब्ध अशा त्या दोन्ही सेना, स्वामी निजामशहानें सांत्वन करून निवारिलें असतां, आपआपसांतील झगड्यापासून परावृत्त झाल्या व रणभूमीवरून संभाजी व दत्ताजी यांचीं प्रेतें घेऊन शोक करीत खिन्नपणें आपआपल्या शिबिरास गेल्या. ॥५३॥५४॥
खेळकर्णप्रभृति संभाजीचे धाकटे भाऊ विषण्णचित्त होऊन आपल्या वडिल भावाबद्दल शोक करूं लागले. ॥५५॥
जाधवरावानें आपल्या मुलाचें उत्तरकार्य केलें आणि खेळकर्णानेंहि आपल्या वडील भावाचें उत्तरकार्यं यथाविधि केलें. ॥५६॥
निकट सोयरीकसंबंधाच्या अगदीं विरुद्ध असें, स्पर्धा ( मत्सर ) करणार्या भोंसल्यांशीं जें युद्ध झालें, त्याचा आपल्या गर्विष्ठ अंतःकरणांत कांहींसा विचार केला, त्या वेळेस त्याला पश्चात्ताप झाला असें आम्हांस वाटतें. ॥५७॥