अध्याय ६५ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
उपगीयमानचरितो वनिताभिर्हलायुधः । वनेषु व्यचरत्क्षीबो मदविह्वललोचनः ॥२१॥
बल्लवी गाती उद्दाम चरित । तो हलायुध रोहिणीसुत । वारुणी प्राशूनि मदोन्मत्त । वनीं विचरत घूर्णाक्ष ॥१७०॥
तिये काळींचें उन्मत्त ध्यान । कथिता झाला व्यासनंदन । वसनाभरणीं विराजमान । सावधान तें ऐका ॥७१॥
स्रग्व्येककुंडलो मत्तो वैजयंत्या च मालया । बिभ्रत्स्मितमुखांभोजं स्वेदप्रालेयभूषितम् ॥२२॥
पूर्णचंद्रासारिखी कान्ति । आपाद मिरवे वैजयंती । कंठीं वनमाळा शोभती । आयुधें हातीं हल मुसळ ॥७२॥
कुण्डलमंडित एक श्रवण । कासे कसी नीळ वसन । वारुणीमदिरामदेंकरून । हास्यवदन स्वेदाक्त ॥७३॥
हिमाचळींचे जेंवि हिमकण । तैसिया प्रस्वेदकणिकापूर्ण । मन्मथसमरश्रमेंकरून । वदनभूषण तें ज्यासी ॥७४॥
वनीं वनजाक्ष वनितासंगें । रमतां घर्माक्त झालीं आंगें । म्हणोनि यमुना तत्प्रसंगें । जलक्रीडार्थ पाचारी ॥१७५॥
स आजुहाव यमुनां जलक्रीडार्थमीश्वरः । निजं वाक्यमनादृत्य मत्त इत्यापगां बलः ॥
अनागतां हलाग्रेण कुपितो विचकर्षताम् ॥२३॥
जो ऐश्वर्यें परमेश्वर । तो बळराम क्रीडापर । जलक्रीडार्थ अतिसत्वर । यमुना सादर पचारी ॥७६॥
तंव ते स्वभावें प्रवाहशीला । निम्नगामिनी अगाधजळा । वीच्यावर्तकल्लोळबहळा । न येतां कोपला बळभद्र ॥७७॥
आपुलें वाक्य अनादरून । यमुना उन्मत्त झाली पूर्ण । आतां ईतें आकर्षून । आणीन म्हणोन क्षोभला ॥७८॥
समीप न ये मी पाचारितां । म्हणोनि क्षोभला होत्साता । नांगरदंतें आकर्षिता । झाला तत्वता तें ऐका ॥७९॥
पापे त्वं मामवज्ञाय यन्नाऽऽयासि मयाहुता । नेष्ये त्वां लाङ्गलाग्रेण शतधा कामचारिणीम् ॥२४॥
पापरूपे आपगे दुष्टे । माजी अवज्ञा करूनि हठें । पुढें तूं जासील प्रवाहलोटें । येथून कोठें सांग पां ॥१८०॥
ज्यास्तव माझी अवज्ञा करून । पाचारितां मी न येसी पूर्ण । नांगरदंतें शतधा भिन्न । करितां तुज कोण रक्षील ॥८१॥
अगे तूं कामचारिणी कुटिले । उन्मत झालीस अगाधजळें । हलाग्रें करीन शतधा बळें । कोण वेळे तुज त्राता ॥८२॥
एका प्रवाहें उन्मत्तपण । हलाग्रें शतधा करीन जाण । क्षुद्रदशेतें पाववीन । कुल्येतुल्य गौणत्व ॥८३॥
ऐसें बोलूनि तिये क्षणीं । यमुनाकर्षणा सीरपाणि । उदित झाला हें देखोनी । प्रार्थी वचनीं तें ऐका ॥८४॥
एवं निर्भर्त्सिता भीता यमुना यदुनंदनम् । उवाच चकिता वाचं पतिता पादयोर्नृप ॥२५॥
कुरुकुळमानसमराळप्रवरा । ऐकें हरिगुण श्रवणचतुरा । इत्यादिवचनीं सरिद्वरा । निर्भर्त्सितां बळरामें ॥१८५॥
भय पावोनि अभ्यंतरीं । पातली दिव्यरूपें बाहेरी । बळरामाचे चरण धरी । विनति करी मृदुवचनें ॥८६॥
यदुनंदन जो लाङ्गलपाणि । त्यांतें विनवी विनीत वचनीं । चकित होऊनि अंतःकरणीं । तेंही श्रवणीं अवधारा ॥८७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP