अध्याय ६५ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
मातरं पितरं भ्रातॄन्पतीन्पुत्रान्स्वसॄरपि । यदर्थे जहिम दाशार्ह दुस्त्यजान्स्वजनान्प्रभो ॥११॥
जयाचे प्रीतीकारणें आम्हीं । मातापितरें त्यजिलीं स्वामी । बंधुवर्गाच्या स्नेहसंभ्रमीं । गोत्रधर्मीं सांडवलों ॥७६॥
मातापितरीं जयाचे हातीं । विवाह करूनि गृह्योक्तरीती । अर्पिलें तया तनूचें पति । त्यागूनि श्रीपति आश्रयिला ॥७७॥
पुन्नाम नरकापासूनि त्राते । त्यागूनि ऐसिया स्वपुत्रांतें । आम्ही अनुसरलों श्रीकृष्णातें । चित्तें वित्तें जीवितेंसी ॥७८॥
स्वया म्हणिजे आत्मभगिनी । आता माउशा नणंदा वहिनी । त्यागूं न शकवे दुःखेंकरूनी । त्यांतें त्यागूनि हरि भजलों ॥७९॥
दुस्त्यज स्वजनांचा समुदाय । आम्हीं त्यागिला वमनप्राय । ज्याकारणें तो यादवराय । आम्हां तृणप्राय त्यजूनि गेला ॥८०॥
आमुचें ऐसें अनन्यपण । ऐकें यावरी तयाचें नैर्घृण्य । अल्पसें कथितों तुजलागून । सावधान तें ऐक ॥८१॥
ता नः सद्यः परित्यज्य गतः संच्छिन्नसौहृदः । कथं नु तादृशं स्त्रीभिर्न श्रद्धीयेत भाषितम् ॥१२॥
आम्ही सर्वस्वत्यागपरा । कृष्णपदभजनीं तत्परा । आणि तो स्नेह छेदूनि त्वरा । गेला चोरासमसाम्य ॥८२॥
चोर जैसा प्रवेशे मळां । पुष्पां पल्लवां फळां मूळां । छेदूनि जातां त्या कळवळा । न वसे कोवळा हृत्पद्मीं ॥८३॥
आपुल्या कार्यापुरता रिगे । पुढती परतोनि न पाहे मागें । आम्हां तैसेंचि या श्रीरंगें । सौहार्दभंगें उपेक्षिलें ॥८४॥
ऐसें ऐकूनि बळराम म्हणे । तुम्ही प्रतिबंध त्याकारणें । जाते समयीं कवण्या गुणें । न केला हें मज सांगा ॥८५॥
त्याचिया वचनाच्या विश्वासें । तुम्ही म्हणाल गुंतलों ऐसें । विश्वास कवणेपरीचा असे । चित्तोल्लासें तो वदिजे ॥८६॥
तरी बहु वाचाळ ज्याची वाणी । वक्तृत्व अमृता उणें आणी । नानाविधा कौशल्यश्रेणी । जो निज वचनीं जग भुलवी ॥८७॥
तैसिये परीचें मृदु भाषित । ऐकोनि स्त्रिया श्रद्धान्वित । कां पां न होती विश्वासवंत । हें निश्चित जाणावें ॥८८॥
ऐशा बोलिल्या एक वनिता । तंव अपरा वदती विरहतप्ता । तें तूं ऐकें कौरवनाथा । पुण्यवंता परीक्षिति ॥८९॥
कथं नु गृह्णंत्यनवस्थितात्मनो वचः कृतघ्नस्य बुधाः पुरस्त्रियः ।
गृह्णंति वै चित्रकथस्य सुंदरस्मितावलोकोच्छ्वसितस्मरातुराः ॥१३॥
अपरा बल्लवी म्हणती बाई । जेथ वसतो तये ठायीं । नागरा ललना तरी काई । विश्वासती तद्वचनीं ॥९०॥
आत्मा म्हणिजे मानस कुटिळ । देहचेष्टांचें तैसेंचि शीळ । तद्वाक्य मानूनि सत्य केवळ । अंगिकारिती केंवि वधू ॥९१॥
कायावाचामनेंकरून । अनवस्थित जो निर्वाहहीन । सत्य मानूनि त्याचें वचन । पुरस्त्रीजन केंवि भुले ॥९२॥
आम्ही मुग्धा कुग्रामवंता । स्मरमोहिता चातुर्यरहिता । कृतघ्नाचिया वचनामृता । भुललों निश्चिता अबुधपणें ॥९३॥
त्या तंव नागरी चातुर्यराशि । केंवि ऐसिया कृतघ्नासी । जाणत्या भुलल्या हें मानसीं । आश्चर्य आम्हांसी बहु वाटे ॥९४॥
हें ऐकोनि आणिका वदती । त्याचें नवल मानणें किती । कितवाचिया कैतवयुक्ति । भुलवूं शकतीं ब्रह्मादिकां ॥९५॥
रुचिर मधुर विचित्र कथा । डोळे मोडूनि हांसे कथितां । युवा लावण्यभरित पुरता । स्मरक्षोभकता या चिह्नीं ॥९६॥
ऐसिया कृतघ्नाचिया वाणी । रसाळ रुचती ऐकतां श्रवणीं । लावण्यइंगितें पाहतां नयनीं । स्मर क्षोभूनि तनु तावी ॥९७॥
यास्तव स्मरातुरा नागरा । कृतघ्नाचिया मधुरोत्तरा । गृहिणी सादर मन्मथतंत्रा । हें वधूनिकरा नवल नव्हे ॥९८॥
आंगीं नवयौवनाचें पिसें । कामज्वराचा पाचवा असे । त्यावरी कितवें मंत्रविशेषें । माधुर्यरसें भुलविल्या ॥९९॥
कां पां न घेती त्याचें वचन । यदर्थी मानिजे आश्चर्य कोण । हरिणा गोरीचें गायन । कीं करणा मोहन तन्मात्रीं ॥१००॥
हें ऐकूनि अपरा म्हणती । ऐका गोपी हो समस्ती । काय न सरे तुम्हांप्रति । गोष्टींवाचूनि तयाचिया ॥१॥
किं नस्तत्कथया गोप्यः कथाः कथयताऽपराः । यात्यस्माभिर्विना कालो यदि तस्य तथैव नः ॥१४॥
त्यावांचूनि आमुचा काळ । क्रमत आहे कीं केवळ । आम्हांवांचूनिं घटिका पळ । त्याचें अळुमाळ अडलेंसे ॥२॥
त्याचिया कथा कथूनि वृथा । किमर्थ सखेद करितां चित्ता । इत्यर्थ मम मुखें आइका पुरता । हेतुगर्भिता वाक्यांचा ॥३॥
एवं काळ दोनी ठायीं । क्रमत असे राहत नाहें । त्यामाजी रहस्य तें चतुरांहीं । इतुकें हृदयीं जाणावें ॥४॥
पुरवनितांसीं त्याचा काळ । सुखें क्रमतो सदा सफळ । आम्हां दुःखाची तळमळ । सर्वकाळ तद्विरहें ॥१०५॥
ये श्लोकींचा हा ध्वनितार्थ । वाखाणिला इत्थंभूत । यावरी कृष्णाचें इंगित । स्मरोनि रुदत तें ऐका ॥६॥
इति प्रहसितं शौरेर्जल्पितं चारु वीक्षितम् । गतिं प्रेमपरिष्वंगं स्मरंत्यो रुरुदुः स्त्रियः ॥१५॥
इत्यादिवचनीं चाटु चटुल । श्रीकृष्णाचें कैतवशीळ । रामा वदोनि बल्लवीमेळ । इंगितें सकळ स्मरताती ॥७॥
श्रीकृष्णाचें सुन्दर हास्य । जेणें प्रकटें मन्मथावेश । जल्पित म्हणिजे भाषण सुरस । जें सुधारस तुच्छ करी ॥८॥
व्यंकटकटाक्षनिरीक्षणें । स्मितापाङ्गें तरळ पाहणें । श्रीकृष्णाच्या अवलोकनें । होय पारणें देखणिया ॥९॥
कुंजर मयूर हंस गति । कृष्ण चालतां शिक्षा घेती । मल्लमर्दना वीरवृत्ति । चाले मृगपतिविक्रमें ॥११०॥
ज्याचे गतीचा पदविन्यास । लक्षूनि शिक्षिती निजमानस । होऊनि भवस्वर्गीं उदास । परमहंस आत्मरत ॥११॥
श्रीकृष्णाची विन्यासगति । मानससरोवरीं वसती । करूनि हंस अभ्यासिती । मुक्तप्रवृत्ति गिळूनियां ॥१२॥
दुर्लभ श्रीकृष्णचरणीं गति । पावावया गिरिजापति । आनंदवनीं धरूनि वसती । अद्यापि करिती तपश्चर्या ॥१३॥
कृष्णप्रेमाचा परिष्वंग । लक्षूनि अनंग झाला साङ्ग । कमला पदसेवाप्रसंग । आदरी संग वांछूनियां ॥१४॥
कृष्णहृदय हृदयीं जडे । प्रेमसुखाच्या सुरवाडें । तेव्हां आकल्प हृद्रोग उडे । मागें पुढें आनंद ॥११५॥
वांछूनि कृष्णाचें आलिङ्गन । निष्काय सत्कर्मफळाशा स्तन । सगुण निर्गुण भावना कठिन । पावती समाधान परिष्वंगें ॥१६॥
कृष्णपरिष्वंगाची गोडी । एक लक्ष्मीच जाणे फुडी । अभेदभावाचिये आवडी । चरण न सोडी अद्यापि ॥१७॥
प्रेमपरिष्वंगाची इच्छा । झालिया न रमे विषयां तुच्छा । इहामुत्रार्थीं करूनि कुत्सा । रमिजे स्वइच्छा हरिहृदयीं ॥१८॥
कृष्णहृदया हृदय मिळे । द्वैतदैन्य तैं मावळे । अपरोक्षस्वानंदसुखसोहळे । भोगिजे स्वलीलेमाजिवडे ॥१९॥
वनस्थ शीतोष्णसहनशील । त्वग्मूळ पत्र पुष्प सफळ । अवंचक जे भूतदयाळ । तपस्वी केवळ दृढनेमी ॥१२०॥
ऐसे तरुवर वृंदावनीं । लवले पल्लवफळप्रसूनीं । पतिव्रतालतालिङ्गनीं । कॄष्णालिङ्गना सकाम जे ॥२१॥
जाणोनि तयांचें तपःसाहस । कृपेनें द्रवोनि हृषीकेश । करूनि वनमाळेचें मिस । हृदयीं तयांसि आलिङ्गी ॥२२॥
हास्य भाषण अवलोकन । गतिविन्यास आलिङ्गन । हृदयीं स्मरोनि गोपीगण । करिती रुदन कुरुवर्या ॥२३॥
विरहविह्वळ बल्लवीगण । कृष्णप्रेमें करितां रुदन । कृपेनें द्रवला संकर्षण । करी सान्त्वन तें ऐका ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP