संकर्षणस्ताः कृष्णस्य संदेशैर्हृदयंगमैः । सांत्वयामास भगवान्नानाऽनुनयकोविदः ॥१६॥

त्या गोपी विरहतप्ता । कृष्णलीलास्मरणाभिभूता । त्यांतें सान्तवी रेवतीभर्ता । संदेशवार्ता कथूनियां ॥१२५॥
गोपीहृदया आनंदकर । कृष्णसंदेश परम रुचिर । सांगोनि शमवी विरहज्वर । परम चतुर बळराम ॥२६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । यालागीं सर्वज्ञ संकर्षण । त्यांचें अभ्यंतर जाणोन । निववी संपूर्ण व्रजललना ॥२७॥
भुजंगदौत्यप्रकारप्रवीण । अनुनयकोविद त्या अभिधान । साक्षात् ईश्वर संकर्षण । त्रिजगन्मोहन जगदात्मा ॥२८॥
जेणें जीचें मन नोहरे । ऐसीं रसिकें मधुरोत्तरें । कृष्णसंदेशें रहस्य स्मरे । तियें त्यां आदरें बोधियलीं ॥२९॥
कृष्ण तुम्हांसि स्मरतो हृदयीं । तुमचा कृष्णासि विसर नाहीं । कृष्णीं अनुरक्त तुम्ही सर्वही । तुमच्या ठायीं तो तैसा ॥१३०॥
जो जो जैसा भजे मज । त्या तैसाचि भजें मी सहज । ऐसिया निश्चयाचें गुज । घालूनि पैज हरि वदला ॥२१॥
माता पिता भर्ता स्वजन । त्यागून झालां कृष्णप्रवण । तुम्हांवांचूनि नेणे कृष्ण । नित्य निमग्न प्रेमरसीं ॥३२॥
तुमचें कृष्णा सदैव ध्यान । तुम्हांवांचोनि न कल्पी मन । कृष्णा प्रियतम तुमचे गुण । करी श्रवण प्रेमसुखें ॥३३॥
कृष्ण तुम्हांसि पाहे नयनीं । कृष्ण तुम्हांसि ऐके श्रवणीं । कृष्ण तुमच्या आलिङ्गनीं । आह्लाद मानी त्वगिंद्रियें ॥३४॥
तुमच्या कवळालागीं नावेक । नित्यतृप्तासि लागे भूक । तुमच्या सुमनें घ्राणसुख । कृष्ण सर्वांङ्गें भोगीतसे ॥१३५॥
तुमच्या कामें कृष्णासि काम । तुमच्या प्रेमें कृष्ण सप्रेम । तुमच्या नामें कृष्णासि नाम । गोपीविश्राम म्हणवीतसे ॥३६॥
इत्यादि अनेक अनुनयवचनें । प्रबोधितां संकर्षणें । व्रजललनांचीं विकसित मनें । कृष्णदर्शनें जेंवि होती ॥३७॥
रामकृष्णामाजी कांहीं । म्हणती सहसा भेद नाहीं । संदेश वदला जे ते सर्वही । आमुच्या देहीं अनुभूत ॥३८॥
कृष्णपक्ष शुक्लपक्ष । तद्वत् दोघांचें अनुलक्ष । दोहींमाजी अंतरिक्ष । अभेद प्रत्यक्ष आत्मत्वें ॥३९॥
उभयतांची समान क्रीडा । उभयतांची समान व्रीडा । उभयतांचा समान जोडा । मर्दिती होडा सम शत्रु ॥१४०॥
इत्यादि हॄत्पद्मफुल्लारा । रामवचनें बल्लवदारा । होतां रामही अभ्यंतरा । माजे उल्लास पावला ॥४१॥

द्वौ मासौ तत्र चाऽवात्सीन्मधुं माधवमेव च । रामः क्षपासु भगवान्गोपीनां रतिमावहन् ॥१७॥

चैत्र वैशाख दोनी मास । गोपीप्रेमें व्रजीं वास । करिता झाला सावकाश । पुराणपुरुष बळराम ॥४२॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । गोपीप्रेमोत्कर्ष देखोन । त्यांचा रतिरस अनुभवून । निशा संपूर्ण क्रीडला ॥४३॥
म्हणाल कृष्णेंसी व्रजललना । रमल्या ऐसें संकर्षणा । विदित असतां त्यांसीच पुन्हा । मन्मथकदना केंवि करी ॥४४॥
तरी ये श्लोकींचें व्याख्यान । श्रीधरस्वामिमुखींचें कथन । श्रोतीं निःसंशय होऊन । कीजे श्रवण सद्भावें ॥१४५॥
कृष्णीं रमल्या ज्या सुन्दरी । उद्धववचनें त्य अंतरीं । ध्यानसुखें सेविती हरि । बाह्यविकारीं सांडवल्या ॥४६॥
कृष्णध्यानें मनमूर्छिता । कृष्णाचि होवोनि कृष्णीं निरता । करूं विसरल्या बाह्य चरिता । झाल्या विरता भवभानीं ॥४७॥
हरिगुणगायनें रसने रति । हरिगुणश्रवणीं श्रवणां प्रीति । हरिमय नयनीं जग देखती । त्यामाजी विरति तद्बोधें ॥४८॥
कृष्णात्मकता अपरोक्ष असतां । करणां भवभ्रम भासे नसता । विपरीतबोधामाजी जो वसता । त्यांपें नुसता तो नवसे ॥४९॥
ऐसिया बोधें कृष्णात्मका । कृष्णीं रमल्या ज्या बायका । त्या नागवती रतिनायका । पुण्यश्लोकरसरंगें ॥१५०॥
परंतु नवीना अबळा मुग्धा । त्याचिया गडिणी ज्या अनुरक्ता । कृष्णरतिरससुखअभुक्ता । रामीं निरता त्या झाल्या ॥५१॥
कृष्ण संकर्षण अभिन्न । ऐकतां द्रवलें त्यांचें मन । कृष्णरमणी गातां गुण । होतें श्रवण ज्यां पूर्वीं ॥५२॥
त्यांचिया उत्कटप्रेमादरें । संकर्षणही स्मरसंचारें । झळंबला मग तत्स्नेहसुभरें । स्वेच्छा विचरे रतिलास्यें ॥५३॥
तया रतिलास्याची परी । आणि रामाची ऐश्वर्यथोरी । समासें राया श्रवण करीं । शुकवैखरी वाखाणी ॥५४॥

पूर्णचंद्रकलामृष्टे कौमुदीगंधवायुना । यमुनोपवने रेमे सेविते स्त्रीगुणैर्वृतः ॥१८॥

यमुने समीप जें कानन । तया म्हणिजे यमुनोपवन । त्यामाझारी रेवतीरमण । वेष्टितस्त्रीगण क्रीडतसे ॥१५५॥
तया वनाचें विशेषण । पूर्णचंद्राचे शुभ्र किरण । षोडश कळांचें लावण्य । उज्ज्वळ कानन तिहींकरून ॥५६॥
चंद्रिका कौमुदी जोत्स्ना । कोश प्रकाशी ऐसिया संज्ञा । कौमुदीयोगें विकसितां नलिनां । कुमुदाभिधानें बोलिजे ॥५७॥
तयां विकसितां कुमुदांवरून । सुगंध शीतळ यमुनापवन । तत्सेवित जें यमुनावन । त्यामाजी स्त्रीगण बळ रमवी ॥५८॥
नाना सत्त्वांचीं अनुकरणें । विविध चौर्‍यांशीं आसनें । बहु वनितांसीं संकर्षणें । बहुधा रमणें नटनाट्यें ॥५९॥
कथिली स्मरसंगरकुसरी । यावरी ऐकें ऐश्वर्यथोरी । ज्याचे क्रीडेचे अवसरीं । वारुणी प्रेरी वरुण जया ॥१६०॥

वरुणप्रेरिता देवी वारुणी वृक्षकोटरात् । पतंती तद्वनं सर्व स्वगंधेना‍ऽध्यवासयत् ॥१९॥

जयाचा ऐश्वर्यसत्तायोग । वरुणें जाणोनि क्रीडाप्रसंग । वारुणीदेवी प्रेरिली साङ्ग । जियेचा उपयोग रतिरंगीं ॥६१॥
वरुणाचिये आज्ञेसरसी । वृक्षकोटरापासूनि आपैसी । धारा लागली भूमीसी । स्वगंधें वनासी मत्त करी ॥६२॥
अवघें वनचि स्वगंधेंकरून । जिनें केलें उन्मत्त पूर्ण । भ्रमर तद्गंधें वेधून । झाले लीन प्रसूनीं ॥६३॥
पक्षी उन्मत्त विराव करिती । मृगादिश्वपदां मन्मथभ्रान्ति । कुञरकरिणी संलग्न होती । उन्मत्त क्रीडती जलाशयीं ॥६४॥
सर्व वनस्पतींच्या ठायीं गंध । वारूणीसंभवें पैं प्रसिद्ध । तेणें अवघे प्राणी मुग्ध । होवोनि आमोद सेविती तो ॥१६५॥
तंव तो राम सौनन्दपाणि । क्रीडत असतां बल्लवीगणीं । वारुणीगंध सेवितां घ्राणीं । केली करणी ते ऐका ॥६६॥

तं गंधं मधुधाराया वायुनोपहृतं बलः । आघ्रायोपगतस्तत्र ललनाभिः पपौ समम् ॥२०॥

वारुणीमधुधारांचा गंध । वायुवेगें येतां प्रसिद्ध । त्यातें सेवितां बळ अगाध । झाला सिद्ध तद्ग्रहणीं ॥६७॥
त्या वायूच्या अवघ्राणपथें । ललनांसहित गेला तेथें । प्राशिता झाला वारुणीतें । वनितांसहित वनजाक्ष ॥६८॥
वारुणीमदें मदोन्मत्त । सकामबल्लवीप्रेमासक्त । तत्कृतक्रीडा इत्थंभूत । श्रोतीं समस्त परिसावी ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP