अध्याय ३३ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नैतत्समाचरेज्जातु मनसाऽपि ह्यनीश्वरः । विनश्यत्याचरन्मौढ्याद्यथाऽरुद्रोऽब्धिजं विषम् ॥३१॥
यालागिं जो अनीश्वर । देहाभिमानी कर्मतंत्र । तेणें ईश्वराचें चरित्र । कदापि अणुमात्र नाचरिजे ॥३५५॥
ईश्वराचरिताचा संकल्प । मनेंकरूनि न कीजे अल्प । ईश्वराज्ञेचा क्रीडाकल्प । निर्विकल्प आचरिजे ॥५६॥
म्हणाल मनुष्यवेशें कृष्णें । जीं जीं केलीं क्रियाचरणें । तीं तीं मानवां स्पृहायमाणें । तरी हें झणें मानाल ॥५७॥
केवळ पूतना राक्षसी । कृष्णें घोटिली विषासरिसी । येरा मानवां न जिरे माशी । हें मानसीं नुमजावें ॥५८॥
कृष्णें शकट मोडिला पायें । येरां त्रिमासिका केंवि हें होये । तृणावर्ताचें न धरी भय । प्राणप्रळय त्या केला ॥५९॥
कृष्णें मृत्तिका भक्षूनि पोटीं । दाविल्या अनंतब्रह्मांडकोटी । इतरांसमान केंवि हे गोठी । वृथा चावटी समतेची ॥३६०॥
मनुष्याभेणें इतरां त्रास । कृष्णें मर्दिलें अघासुरास । कृष्णें नाथिलें कालियास । पोरें जंतांस कांपती ॥६१॥
वत्सें वत्सप कृष्ण झाला । लाजोनि ब्रह्मा शरण आला । चुकलें वत्स सांपडावयाला । येर देवाला नवसिती ॥६२॥
कृष्णें दावानळ प्राशिला । येरा उष्ण ग्रास नवचे गिळिला । कृष्णें इंद्र अव्हेरिला । येरां दूतांला नाक्रमवे ॥६३॥
कृष्णें उचलिला गोवर्धन । येरां भाराभरीं नुचले तृण । कृष्णें वरुणलोका जाऊन । नंद आणून तोषविला ॥६४॥
कृष्ण प्रतापमार्तंड । येरां न उठे हागती रांड । त्या कृष्णाचा पडिपाड । कराया तोंड कोण्हाचें ॥३६५॥
कृष्ण निर्जरीं अभिषेकिला । ऐसा मानवी कोण दादुला । कृष्ण गोपींशीं क्रीडिन्नला । परी नाहीं भुलविला कंदर्पें ॥६६॥
वेणुरवें भुलविल्या नारीं । विवश धांवती भ्रमितापरी । कृष्ण बोधी त्या स्वधर्माचारीं । परी नोहे अंतरीं सकाम ॥६७॥
निष्कामभजनें अभेदें गोपी । स्वरत रमवी विश्वव्यापी । परंतु गोपींहीं कंदर्पकल्पीं । नवचे कदापि भुलविला ॥६८॥
रासक्रीडेच्या प्रसंगीं । अनंतमूर्ति वधूगण संगीं । रमला निःसंग शार्ङ्गी । परी न मोडे भोगीं ब्रह्मचर्य ॥६९॥
रडत विरहिणी लागती पाठी । परी ज्या न भेदी मन्मथकाठी । त्या कृष्णाची समतागोठी । मानवकोटी केंवि करी ॥७०॥
तस्मात् ईश्वराचें जें आचरण । अचिंत्यैश्वर्यें अगाध पूर्ण । तें आचरावया अनीश्वरजन । सहसा प्रमाण न म्हवावें ॥७१॥
ईश्वराणां वचः सत्यं तथैवाऽचरितं क्कचित् । तेषां यत्स्ववचोयुक्तं बुद्धिमांस्तत्समाचरेत् ॥३२॥
ईश्वराचें वाक्यचि सत्य । त्यांतही वर्णाश्रमें नियमित । तेंचि आचरावें निश्चित । सहसा तत्कृत नाचरिजे ॥७२॥
क्कचित् आचारही प्रमाण । मनुष्यनाट्यें अवतरोन । केलें धर्मसंस्थापन । तें तें लक्षून करावा ॥७३॥
एकपत्नीदृढव्रत । सत्यशौचस्वधर्मनिरत । सदय क्षमस्वी पितृभक्त । हें रामचरित प्रमाण ॥७४॥
श्रीरामाचें ईश्वराचरण । म्हणाल कोणतें अप्रमाण । तरी सीतेसि पावकीं करविलें स्नान । केंवि हें सामान्य करूं शके ॥३७५॥
लपोनि वाळीचा घेतला प्राण । कीं समुद्रशोषणा काढिला बाण । जानकी त्यागिली निष्पाप कळोन । ईश्वर म्हणोन त्या शोभे ॥७६॥
बिभीषणासि अभिषेचन । समराआधीं केलें पूर्ण । श्रीराम ईश्वरचि म्हणोन । इतरीं प्रमाण हें न कीजे ॥७७॥
आम्ही कौरवां जिंकूं रणीं । कीं ते जिंकिती आम्हांलागुनी । न कळे ईश्वराची हे करणी । अर्जुनवाणी प्रमाण हे ॥७८॥
एवं वर्णाश्रमासि जो अनुकूल । तोचि ईश्वराचारही प्रांजळ । येर जो अगाध ऐश्वर्यबहळ । तो मनुजीं केवळ नाचरिजे ॥७९॥
यास्तव ईश्वरीं जें आज्ञापिलें । तितुकेंचि मानवीं आचरतां भलें । येर त्याचें करितां केलें । नाशे जोडलें कल्याण ॥३८०॥
बुद्धिमंत तोचि नर । जो ईश्वराज्ञेसीं तत्पर । होऊनि करी सदाचार । साधी इहपर अपवर्ग ॥८१॥
जरी तूं शंका करिसी राया । कीं ईश्वराही उत्पथचर्या । महा साहसें करूनियां । जग संशया भेटविजे ॥८२॥
तिहीं सन्मार्गचि आचरोन । न कीजे त्रिजगाचें कल्याण । उत्पथें जोडिती सुकृत कोण । सन्मार्गलंघन किमर्थ ॥८३॥
तूं हे शंका धरिसी पोटीं । तरी यदर्थीं ऐकें गोठी । ईश्वर पुरुषाचे राहटीं । न येती भेटी शुभाशुभें ॥८४॥
कुशलाचरितेनैषामिह स्वार्थो न विद्यते । विपर्ययेण वाऽनर्थो निरहंकारिणां प्रभो ॥३३॥
तरी जे ब्रह्मात्मबोधें पूर्ण । जेथ न संभवती त्रिगुण । त्यांचा देहचि मिथ्या जाण । देहाभिमान मग कोणां ॥३८५॥
देहातीत निरहंकार । जीवन्मुक्त निर्विकार । ते नोहती विधिकिंकर । पूर्णावतार ऐश्वर्यें ॥८६॥
त्यांसी विधिप्रणीत कर्म कुशल । ईहामूत्रार्थ नोहे सफळ । अथवा उत्पथाचारें जें कां विकळ । तें अमंगळ हों न शके ॥८७॥
प्रभुसमर्था नृपोत्तमा । प्रतापें कळिकाळदमनक्षमा । स्वसामार्थ्यें पाळिसी क्षमा । दुष्टां अधमां दंडूनी ॥८८॥
त्यांमाजि जे जीवन्मुक्त । निर्विकल्प समाधिस्थ । ईश्वरावतार मूर्तिमंत । कर्मातीत जाणसी कीं ॥८९॥
त्यांसि कैचें पापपुण्य । स्वर्ग नरक जन्म मरण । प्रार्बधमात्र होय क्षीण । पुढें क्रियमाण हों न शके ॥३९०॥
एका अहंकाराच्या लयें । प्रपंचाचें निर्मूळ होये । विचरताती ब्रह्मान्वयें । त्यां कें काय शुभाशुभ ॥९१॥
ऐसिया प्राप्तदशेच्या पुरुषां । शुभाशुभाचा न गोवी फांसा । मा श्रीकृष्णा पूर्णपरेशा । उत्पथ ऐसा कोण वदे ॥९२॥
किमुताखिलसत्त्वानां तिर्यड्मर्त्यदिवौकसाम् । ईशितुश्चेशितव्यानां कुशलाकुशलान्वयः ॥३४॥
साधनक्रमें झाले सिद्ध । जीवन्मुक्त जे कां प्रसिद्ध । त्यांसि कुशल अथवा अकुशल विरुद्ध । न लवी बाध आचरणा ॥९३॥
मां सकळसत्त्वांचा नियंता । तिर्यड्मर्त्या आणि स्वर्गस्थां । ईश्वरत्वें ईशन कर्ता । त्या कृष्णनाथा शुभाशुभ ॥९४॥
कुशलाकुशलानुप्रवृत्ति । ब्रह्मादिस्थावरनियमस्थिति । वर्तवितां जो त्या श्रीपति । किमुत वदती शुभाशुभें ॥३९५॥
ज्या सूर्याच्या प्रकाशबळें । कर्मतिमिरा न गणिती डोळे । मां तो सूर्यचि त्या न कळे । मानिजे आगळें किमुत हें ॥९६॥
यत्पादपंकजपरागनिषेवतृप्ता । योगप्रभावविधुताखिलकर्मबंधाः ॥
स्वैरं चरंति मुनयोऽपि न नह्यमाना - । स्तस्येच्छयात्तवपुषः कुत एव बंध ॥३५॥
ज्या कृष्णाची पादाब्जधूळि । नितरां म्हणिजे सर्वकाळीं । सप्रेम धरूनि राहिले मौळीं । हृदयकमळीं संतुष्ट ॥९७॥
पद्मपराग सेविती भ्रमर । अन्यत्र विषयीं अनादर । तैसे पदाब्जसेवनपर । इहामुत्रपरित्यागें ॥९८॥
सप्रेम पदाब्जसेवननिरत । होऊनि झाले नित्य तृप्त । त्यांसि न बाधी कर्म उत्पथ । नोहे समर्थ बाधावया ॥९९॥
सप्रेमभक्तिध्यानयोगें । अभेद इहामुत्रादिविरागें । चित्सुखावाप्ति चैतन्यगंगे । क्षाळिले अवघे कर्मबंध ॥४००॥
अथवा मुनिही मननशील । नित्यानित्यविवेककुशल । क्षाळूनि दृश्यांचा विटाळ । निवडले केवळ चिद्रूपें ॥१॥
ऐसे अनेक हरिपदनिरत । चिदात्मबोधें नित्यतृप्त । स्वैराचरणीं पथउत्पथ । त्या न बधीत ज्या वेधें ॥२॥
अग्निसान्निध्यें तापलें पाणी । त्यामाजि पचल्या बीजश्रेणी । सुटल्या बीजत्वापासुनी । कीं सुटला अग्नि हा नवलाव ॥३॥
पिशाच पळती मारुतिस्मरणें । तो मारुति निर्भय पिशाचभेणें । ऐसें काय लागे म्हणणें । मा शंका करणें तें काय ॥४॥
कृष्णांघ्रिवेधें मातले मुनि । ते निर्मुक्त उत्पथाचरणीं । मा त्या कृष्णातें स्वैर करणी । न वधी म्हणोनि प्रशंसिजे ॥४०५॥
स्वेच्छेकरूनि मानवी तनु । धरूनि वर्त्ते स्वभक्ताधीन । त्या न वधी कर्मबंधन । हें प्रशंसन केतुलें ॥६॥
परदाराभिमर्शनभय । तुझा निरसला हा संशय । किंवा कांहीं उरला होय । कैसा काय तो सांगें ॥७॥
ईश्वरानीश्वरभेदें प्रांजळ । कथिलें तें तुज न कळे सकळ । तरी ज्या विवेकें बोधिती बाळ । तें सोपें केवळ अवधारीं ॥८॥
जेंवि वेगळें घटभरी जळ । उघडें झांकलें समळ अमळ । शुद्धाशुद्ध हा विटाळ । शास्त्रकुशळ बोलती ॥९॥
ते मर्यादा अगाधहृदीं । नियमिली न वचे शास्त्रकोविदीं । करिती क्षालनमज्जनादि । वसती सर्पादि जलचरें ॥४१०॥
तेथ उघडेपणाचें गरळभय । कीं स्पर्शास्पर्श रक्षिला जाय । तेंवि सामान्या नेम जो आहे । तो न राहे महत्त्वीं ॥११॥
कृष्ण ईश्वरांचा ईश्वर । सामान्य जीव अनीश्वर । त्या कृष्णाचा स्वैराचार । केंवि पामर करूं शकती ॥१२॥
एवं परदाराभिमर्शन - । कर्त्ता म्हणतां अलिप्त कृष्ण । आतां अभेदनिजात्मरमण । तें प्रतिपादन अवधारीं ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP