अध्याय ३३ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कर्णोत्पलालकविटंककपोलघर्मवक्त्रश्रियो वलयनूपुरघोषवाद्यैः ।
गोप्यः समं भगवता ननृतुः स्वकेशस्रस्तस्रजो भ्रमरगायकरासगोष्ठ्याम् ॥१६॥
भगवंतेंशींसह गोपिका । नाचत्या झाल्या प्रेमोत्सुका । नर्त्तनश्रमें । कुरुनायका । मुखमयंका घर्मांबु ॥५९॥
पखे बाळ्या कर्णसुमनें । बुगड्या भोंवर्या जडितरत्नें । ताटंकादि श्रवणाभरणें । वदनलक्ष्मी शोभविती ॥१६०॥
श्रवणनयनकपोलस्पर्शी । कुंतळ रुळती उभयप्रदेशीं । श्रमाक्त शोभा श्रीमुखासी । सालंकृता सस्वेद ॥६१॥
करकंकणें किंकिणी कांची । वांकीनूपुरपदकटकांची । ध्वनिसाम्यता वादित्रांची । रासमंडळीं वैशिष्ट्यें ॥६२॥
तये राससभेच्या ठायीं । गूढ गंधर्व म्रमरदेहीं । सप्तस्वरांची नवाई । गुंजारवें आळविती ॥६३॥
मौलग्रथितें विविधें सुमनें । पुष्पमाळा पुष्पभूषणें । गळोनि पडती जैसीं घनें । वृष्टि कीजे सुमनांची ॥६४॥
नृत्यगीतगायनें हरिख । पावोनि डोलतां सत्यलोक । तौर्यात्रका त्याग विशेष । लब्ध अनेक कुसुमांचा ॥१६५॥
तेथ शंका करिती चतुर । जे नृत्यापाशीं कैंचे भ्रमर । सुगंधलोधें सुकृत सधर । होते तत्पर ते तेथें ॥६६॥
ऐसिया गोपी कृष्णप्रेमें । रासमंडळीं कृष्णकामें । विह्वळ देखोनि पुरुषोत्तमें । आत्मारामें रमविल्या ॥६७॥
जैसे ज्यांचे मनोस्थ । जैशा नामाविभ्रमयुक्त । तैसतैसा मन्मथतात । रमता झाला तच्छंदें ॥६८॥
एवं परिष्वंगकराभिमर्शस्निग्धेक्षणोद्दामविलासहासैः ।
रेमे रमेशो व्रजसुंदरीभिर्यथाऽर्भकः स्वप्रतिबिंबविभ्रमः ॥१७॥
गोपी नेणती चातुर्यकळा । घुरटा रानटा बल्लवअबळा । त्यांमाजि नवजलद सांवला । प्रकटी लीला स्वसत्ता ॥६९॥
कोकिलकंठ्या सप्तस्वरीं । सुधा लाजवी स्वरमाधुरी । गीतमूर्च्छनाप्रभेदकुसरी । प्रकाशी हरि ऐश्वर्यें ॥१७०॥
लावण्यकुशल विलासकळा । सौरभ्यचातुर्यभूषा सकळा । स्वसत्ता निर्मूनि घनसांवळा । करी व्रजअबळा संगार्ह ॥७१॥
जेंवि जाह्नवीवोघोदक । आपणा मीनले जे वोघ अनेक । त्यांमाजि भरूनि पूर्णत्व देख । करी सम्य्क प्रावृटीं ॥७२॥
तेंवि अचिंत्यगुणपरिपूर्णहरि । तिहीं डवरिल्या व्रजसुंदरी । क्रीडार्थ प्रतिबिंबाचिये परी । मन्मथसमरीं सज्जिल्या ॥७३॥
एवं रासविलासनर्त्तनरीति । ज्या ज्या कथिल्या विभ्रमयुक्ति । चुंबनालिंगन अपांगपातीं । करकुचप्रांतीं संस्पृष्ट ॥७४॥
नर्मोक्तिभाषणें स्निग्धेक्षणें । बाहुकपोलहनुस्पर्शनें । उद्दाम विनोद हास्यवदनें । कामोद्दीपनें प्रकटिलीं ॥१७५॥
जेंवि समर्थ स्वसामग्री । देऊनि अकिंचनाच्या घरीं । भोगाविष्ट सर्वोपचारीं । तेंवि श्रीहरि वनितांसी ॥७६॥
बिंब हांसतां प्रतिबिंब हासे । करपदचांचल्य बिंबासरिसें । तैसा रमला आत्मविलासें । व्रजवनितांशीं जगदात्मा ॥७७॥
रासमंडळीं ऐसी लीला । करितां कंदर्पबाणें विकळा । जाल्या कैशा त्या व्रजबाळा । कुरुभूपाळा तें ऐक ॥७८॥
तदंगसंगप्रमुदाकुलेंद्रियाः केशान्दुकूलं कुचपट्टिकां वा ।
नांजः प्रतिव्योढुमलं व्रजस्त्रियो विस्रस्तमालाभरणाः कुरूद्वह ॥१८॥
कृष्णांगसंगसंस्पर्शनें । प्रकृष्टमुदिता मन्मथबाणें । विकळ झालीं सकळ करणें । वसनाभरणें न सांवरिती ॥७९॥
शिथिलसपुष्पकेशग्रथनें । विमुक्तग्रंथि विगलित वसनें । उत्तरीयें कुचाच्छादनें । रुळतां चरणें तुडविती ॥१८०॥
मुक्ताप्रवाळवैदूर्यमणि । करमुद्रिका विविधाभरणीं । श्रवणकंठशिरोभूषणीं । गळतां कामिनी नुमजती ॥८१॥
अमोघसुगंधसुमनमाळा । बाहुमस्तकीं आणि गळां । आपाद गळतां व्रजवेल्हाळा । नेणती विकळा कंदर्पें ॥८२॥
कबरांबरें वसनाभरणें । गळतां सावरूं न शकती करणें । ऐशा गोपी मन्मथबाणें । रासक्रीडनें मोहिता ॥८३॥
केवळ गोपीच पावल्या मोह । ऐसा न धरिजे संदेह । गगनीं सुरस्त्रियांचा समूह । कृष्णक्रीडनें मोहिला ॥८४॥
कृष्णविक्रीडितं वीक्ष्य मुमुहुः खेचरस्त्रियः । कामार्दिताः शशांकश्च स गणो विस्मितोऽभवत् ॥१९॥
कृष्णक्रीडानिरीक्षणें । वेधलीं देवांगनांचीं मनें । नेणती विगलित वस्त्राभरणें । मन्मथबाणें विद्धांगा ॥१८५॥
वल्लभ असतां निकटवर्ती । खेचरांगना विगतस्मृति । विवश करणांची प्रवृत्ति । पाहतां जगतीं हरिक्रीडा ॥८६॥
आपुले वंशीं वंशधर । रसिक रासक्रीडाचतुर । देखूनि भुलला रजनीकर । सऋक्षखेचरवलयेंशीं ॥८७॥
ईषन्मात्र शशिमंडळ । गगनीं न होतां चंचल । स्तब्ध झाली नक्षत्रमाळ । नवग्रह निश्चळ ते काळीं ॥८८॥
चंद्र न वचतां अस्तमाना । उदय न करवे चंडकिरणा । ऐसियास्तव रात्रिमाना । नेणीव द्रुहिणा शिवशक्रां ॥८९॥
ब्राह्मशण्मासांची रजनी । कष्णें केली रासनर्त्तनीं । व्रजस्त्रियांचे प्रीतीकरूनी । साच ते वाणी या हेतु ॥१९०॥
रासक्रीडेच्या अवसरीं । निश्चळ राहिले ग्रह अंबरीं । तेणें कुंठित भास्करभंवरी । बृहच्छर्वरी षाण्मासी ॥९१॥
ब्राह्मषण्मासांची राती । रासमंडळीं कमलापति । करूनि प्रेमळा गोपयुवति । निजात्मरति रंगविल्या ॥९२॥
आतां तेंचि रतिरहस्य । जैसें गोपींचें मानस । तैसतैसा आदिपुरुष । अर्पी संतोष तें ऐका ॥९३॥
कृत्वा तावंतमात्मानं यावतीर्व्रजयोषितः । रेमे स भगवांस्ताभिरात्मारामोऽपि लीलया ॥२०॥
कात्यायनीव्रताचरणीं । प्रार्थिली पृथक्त्वें भवानी । नंदनंदन पति दे म्हणोनि । पुरश्चरणीं स्तुतिनमनें ॥९४॥
त्या व्रताची सांगतासिद्धि । झाली म्हणोनि कृपानिधि । येऊनि चीरापहरणविधि । लीलाविनोदीं गौरविल्या ॥१९५॥
तेव्हां त्यांचें अभ्यंतर । जाणोनि वदला वरदोत्तर । तें येथ करावया साचार । पृथकाकार नट धरिले ॥९६॥
जितुक्या होत्या बल्लवयुवति । तितुक्या पृथक् कृष्णमूर्त्ति । होऊनि रमला त्यांचिये प्रीती । निजात्मरतिरसभोक्ता ॥९७॥
तया सुरतामाजि पूर्ण । प्रकटी आपुलें कृपाळुपण । तें निरूपी व्यासनंदन । परिसे सर्वज्ञ कुरुवर्य ॥९८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP