गोप्य ऊचु :- भजतोऽनुभजंत्येक एक एतद्विपर्ययम् ।
नो भयांश्च भजंत्येक एतन्नो ब्रूहि साधु भोः ॥१६॥

गोपी म्हणती चक्रपाणि । त्रैलोक्यचातुर्यचूडामणि । आमुचा प्रश्न वाखाणूनी । त्रिविध विवरूनि बोधावा ॥६२॥
त्रिविध प्रश्न कैसा कोण । त्याचीं रूपें भिन्न भिन्न । जया करितां त्रिविध जन । एक असोन म्हणवीतसे ॥६३॥
एक इच्छूनि प्रत्युपकार । करिती भजनाचा आदर । त्या भजकांसि भजरपर । होती अपर परस्परें ॥६४॥
एक न भजतयातें भजती । प्रत्युपकार नापेक्षिती । एक भजतयातेंही न भजती । ऐसी पंक्ति त्रिविधांची ॥१६५॥
भो भो चतुरा जगदीश्वरा । या तिघांमाजि कोण तो बरा । साधु साधुत्वें निर्धारा । आणूनि श्रीधरा बोलवा ॥६६॥
हें ऐकोनि सर्वज्ञनाथ । जाणोनि प्रश्नाचा गुह्यार्थ । बोले प्रत्युत्तर यथार्थ । स्वार्थ परमार्थ प्रकटूनी ॥६७॥
ते भगवन्मुखीची प्रश्नव्याख्या । सावध ऐकें कौरवमुख्या । पूर्णचंद्रींची जेंवि अभिव्याख्या । आप्यायका त्रिजगातें ॥६८॥

श्रीभगवान् उवाच - मिथो भजंति ये सख्यः स्वार्थैकांतोद्यमा हि ते ।
न तत्र सौहृदं धर्मः स्वार्थार्थं तद्दि नान्यथा ॥१७॥

पथम प्रश्नाचें उत्तर । ऐका सख्या हो सादर । प्रत्युपकारीं भजनपर । तें यदुवीर वाखाणी ॥६९॥
प्रत्युपकार लक्षूनि दृष्टि । भजनादर विशेष पोटीं । हे रजोगुणाची राहटी । सकळसृष्टिप्रवर्तक ॥१७०॥
कृष्ण म्हणे गोपिकांसी । सख्या हो ऐका रहस्यासी । सकाम लक्षूनि निजस्वार्थासी । येरयेरांसि उपकरती ॥७१॥
तें परमार्थ सहसा भजन नोहे । स्वार्थमूळचि उघड होय । अविद्याजनित मोहप्रवाहें । मिथ्या होय फळसिद्धि ॥७२॥
गृहस्थ यज्ञें भजती सुरां । सुरवर भजती वृष्टिद्वारा । भजनादर हा परस्परां । स्वार्थवर्धक उभयत्र ॥७३॥
जल अर्पूनि द्रुमामूळीं निशिदिनीं वना भजती माळी । तें वन दुभतां पुष्पीं फळीं । भजले समूळीं आपणांतें ॥७४॥
धेनूसि भजती अर्पूनि तृण । देखुनी दुग्धाचें उपकरण । भजन नव्हे तो उद्यम जाण । स्वार्थसाधन परस्परें ॥१७५॥
नरनारींचा मिथा काम । मिथा वार्धूषणसंभ्रम । ना तें सौहार्द ना तो धर्म । स्वार्थोद्यम आन नोहे ॥७६॥
परस्परें स्नेहें स्नेह । रूढविती तेणें वाढे मोह । येणेंचि प्रौढजनसमूह । प्रीतिवर्धक रजोगुणें ॥७७॥
परस्परें द्वेष वाढे । तेथ शत्रुत्वें भजन घडे । परार्थ मानूनि आपणाकडे । करिती कुडें अवघे ते ॥७८॥
परस्परें राग द्वेष । धरिती भजनाचा आवेश । ते परार्थ नोहे आपणास । ऐसें परेश प्रतिपादी ॥७९॥
तेथ क्षणिक सुखावाप्ति । नोहे सुहृद्भावप्रीति । ना ते धर्मतत्त्वप्रतीति । स्वार्थसंपत्ति अवघी ते ॥१८०॥
आतां ऐका द्वितीय प्रश्न । न भजतयां जे भजती जाण । ते जन केवळ सत्त्वसंपन्न । सुहृत्स्वजन धर्मात्मे ॥८१॥

भजंत्यभजतो ये वै करुणाः पितरो यथा । धर्मो निरपवादोऽत्र सौहृदं च सुमध्यमाः ॥१८॥

तयां माजि दोनी कोटी । एक कारुण्यें सदयदृष्टि । दुजे स्नेहाळ समूहसृष्टि । ऐका राहटी दोहींची ॥८२॥
स्नेहदृष्टि मातापितरें । भजती प्रजांतें अत्यादरें । तैसे सर्वत्र करुणाभरें । भूतमात्रीं कळवळिती ॥८३॥
भूतमात्रांचें कल्याण । ज्यांसि मुख्यार्थ इतुकाचि जाण । यावेगळें अणुप्रमाण । प्रत्युपकरण नेच्छिती ॥८४॥
द्वितीय केवळ मातापितर । होऊनि चाळिती जगासि मैत्र । अणुसम नेच्छिती प्रत्युपकार । हृदयीं अपार स्नेहाळ ॥१८५॥
संततीसाठीं नवस नाना । गर्भ वाहतां सोसिती शिणा । प्रसूतिवेदना सहपोषणा । मूत्रमेहना सोशिती ॥८६॥
देवी गोवर दुःखश्रेणी । सोशितां निद्रा नेणती नयनीं । प्रत्युपकार न इच्छूनी । तत्कल्याणीं स्नेहाळें ॥८७॥
त्यांमाजि प्रथम धर्ममूर्ति । द्वितीय स्नेहाचीच व्यक्ति । एवं धर्मकामपुरुषार्थी । म्हणे श्रीपति ते दोघे ॥८८॥
धर्मनिष्ठा सुहृद्भाव । दोघांमाजी वर्त्ते सदैव । निरपवाद हा अभिप्राव । वासुदेव वाखाणी ॥८९॥
आतां तृतीय प्रश्नोत्तर । भजतयां न भजती जे कां अपर । त्यांचा चतुर्विध अधिकार । वर्णी श्रीधर तो ऐका ॥१९०॥

भजतोऽपि न वै केचिद्भजंत्यभजतः कुतः । आत्मारामा ह्याप्तकामा अकृतज्ञा गुरुद्रुहः ॥१९॥

जे भजतयांसीच न भजती । ते अभजतया केंवि भजती । जनका पितृत्वें न मानिती । तें कें मानिती पितृव्या ॥९१॥
कृष्णसर्प दावानळी - । हूनि काढितांही स्नेहाळीं । तत्काळ झोंबे मर्मस्थळीं । केंवि कळवळी तो इतरां ॥९२॥
किंवा अग्निसेवनीं निरत । निष्ठापूर्वक स्मार्त श्रौत । त्यांतें न रक्षी मानूनि आप्त । जेंवि प्रज्वलित पावक ॥९३॥
अदृष्टकर्मफळ कर्त्ता लाहो । परी आपणा भजकां न धरी स्नेहो । तो इतरांचा न करी दाहो । हा कें मोहो कल्पावा ॥९४॥
ऐसें द्विविध कृतोपकार । करिती विसरोनियां अपकार । परी ते प्रथगत्वें अधिकार । जाणती चतुर चतुर्विध ॥१९५॥
अग्निदृष्टांत जाणिजे विविध । दृष्टादृष्टार्थीं फलदाफलद । एक आत्माराम प्रसिद्ध । दुजा विशद आप्तकाम ॥९६॥
निर्विकल्प समाधिस्थ । स्वस्वरूपानंदीं स्वस्थ । त्यासि भजती संसारग्रस्त । ते अनाथ तद्भजना ॥९७॥
ते भजकातें न प्रार्थिती । भजल्या सत्कारही न करिती । परी ते खांकर म्हणों न येती । उद्भिज्जपंक्ति सुरविटप ॥९८॥
त्यांसि भजतां न दिसे फळ । वाटती कृतघ्नचि केवळ । परि ते भजकांची कामना सफळ । अक्षय अमळ सुखलाभें ॥९९॥
उपासकांसि जैसा अग्नि । तुष्टे अदृष्टफळप्रदानीं । परी न रक्षी प्रज्वळलेनी । प्रत्युपकरणीं स्निग्धत्वें ॥२००॥
आतां द्वितीय आप्तकाम । अग्नि इंधनार्थ सकाम । होऊनि न चाळी स्नेहधर्म । भजनीं प्रेम तेंवि न धरी ॥१॥
विषयार्पणें भजती लोक । परीत तो नोहे तत्कामुक । प्रत्युपकारें त्या सम्मुख । नोहे निष्टंक अनपेक्ष ॥२॥
आतां सर्पदृष्टांत्तरीती । एक कृतघ्न क्रूरजाति । केवळ दुर्जन खळ दुर्मति । कृतघ्नवृत्ति जो दुरात्मा ॥३॥
ऐका सख्या हो म्हणे कृष्ण । मूढजाति सर्प कृतघ्न । म्हणोनि तो उपकृति न जाणोन । करी विघ्न भजकातें ॥४॥
तैसा जो कां मूढमति । कृतघ्न दुरात्मा क्रूरवृत्ति । कृतोपकार नाठवे चित्तीं । सद्य निघातीं प्रवर्ते ॥२०५॥
याहूनि दुसरा जो कां दुष्ट । प्रवृत्तिज्ञान जाणोनि स्पष्ट । परम निष्ठुर कृतघ्न शठ । कठिण पापिष्ठ गुरुद्रोही ॥६॥
गुरु म्हणिजे जननीजनक । कीं संकटीं जे प्राणरक्षक । हितोपदेष्टे उपकारक । कां जे पोषक सर्वस्वें ॥७॥
विद्योपदेष्टे हितोपदेष्टे । कृपाकटाक्षें सर्वाभीष्टें । जे इच्छिती ते गुरुत्वनिष्ठे । कथिती स्रष्टे शास्त्रज्ञ ॥८॥
ऐसिया गुरुत्वें जे द्रोहिती । त्यांचा उपकार नाठविती । केवळ कृतघ्न पापमूर्ति । ते कें भजती इतरांतें ॥९॥
गुरूचा द्वेष धरिती मनीं । गुरूची निंदा वदती वदनीं । गुरूची करिती कार्यहानि । ते कृतघ्न दुर्योनीं जांचती ॥२१०॥
त्यांच्या दर्शनें संस्पर्शनें । एकत्रवासें संभाषणें । पुण्यशीळांचीं नाशती पुण्यें । सर्व दूषणें संक्रमती ॥११॥
ऐसी प्रश्नप्रत्युत्तरें । विवरूनि कथितां नंदकुमरें । भ्रूसंकेतें वक्रनेत्रें । गोपी परस्परें । खुणाविती ॥१२॥
हें देखोनि विधीचा जनक । सवेग हृदयीं करूनि तर्क । गोपीप्रश्नांचा विवेक । मनीं निष्टंक समजला ॥१३॥
सकळप्रश्नांच्या शेवटीं । गुरुद्रोही कृतघ्नां मुकुटीं । त्याची मजवरी आणूनि कुटी । गोपी भ्रुकुटी खुणाविती ॥१४॥
परस्परें हास्यवदनें । नेत्रें सूचिती न वदोनि वचनें । हे जाणोनि वधूंचीं चिह्नें । काय श्रीकृष्णें बोलिलें ॥२१५॥

नाहं तु सख्यो भजतोऽपि जंतून्भजाम्यमीषामनुवृत्तिवृत्तये ।
यथाऽधनो लब्धधने विनष्टे तच्चिंतयाऽन्यन्निभृतो न वेद ॥२०॥

अवो सख्या हो कथिल्या जना । माजि एकही मी नोहे जाणा । तुम्ही माझी त्यां माजि गणना । न कीजे नयना खुणावुनी ॥१६॥
मी भजकांसि करुणावंत । परम सुहृद परम आप्त । भजकां न भजे तो वृत्तांत । ऐका निवांत वनिता हो ॥१७॥
प्रेम पोखूनि भजकांप्रति । वियोगें घालीं विरहावर्तीं । या माजि कृपेची अभिव्यक्ति । तुमच्या चित्तीं तें नुमजे ॥१८॥
कृपणा जैसी धनाची प्राप्ति । होऊनि हातींचें जाय पुढती । तैं त्या धनचिंतेची व्याप्ति । विषयप्रवृत्ति विसरवी ॥१९॥
होऊनि ठाके तैं धनपिसें । जागृति स्वप्नीं धनचि भासे । विसरे क्षुधा तृषा मानसें । मा येर कायसे उपचार ॥२२०॥
तो धनाविण नेणे कांहीं । तेंवि ध्यान मी भजकां हृदयीं । वेधें लावूनि प्रेमप्रवाहीं । विषय सर्वही विसरवी ॥२१॥
तरी त्यां भजकांमाजि प्रस्तुत । सर्व प्रकारें तुम्हीच येथ । कैशा म्हणाल तरी वृत्तांत । कथी अनंत श्लोकार्थें ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP