मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३२ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ३२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २२ अध्याय ३२ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर ताः समादाय कालिंद्या निर्विश्य पुलिनं विभुः । विकसत्कुंदमंदारमुरभ्यनिलषट्पदम् ॥११॥शरच्चंद्रांसुसंदोहध्वस्तदोषातमः शिवम् । कृष्णाया हस्ततरलाचितकोमलबालुकम् ॥१२॥महापूरप्रवाहघृष्ट । तें बोलिजे वाळुवंट । जेथूनि दृष्ट जळाचा पाट । महानदीतट तेथवरी ॥१३॥जें कां सदैव प्रावृट्काळीं । निमग्न राहे सरिज्जळीं । शरत्समयीं प्रवाहाजवळी । मॄदुळ स्थळीं पुलिनाख्य ॥१४॥पूर्वीं गोपिका पूरपुलिनीं रुदती गाती विरहग्लानि । कृष्ण तयांसि घेऊनी । सरित्पुलिनीं पातला ॥११५॥दोघी स्त्रियांसि एक कांत । तेथ सापत्नता आकांत । विभु श्रीकृष्ण समर्थ । रमवी समस्त एकात्मा ॥१६॥कृष्णें आणिल्या जया पुलिना । ऐका तयाच्या गुणलक्षणा । जाणोनि नृपाच्या आगमना । दासी शयना जेंवि रची ॥१७॥तेंवि यमुने सप्रेमभरें । तरळतरंगहस्ताकारें । पुलिन सुखशयनप्रकारें । रचिलें साजिरें मृदुतर ॥१८॥जाणोनि स्वामीचा विलास । वसंत शोभवी काननास । कुंदकल्प द्रुमादि अशेष । पुष्पीं विकास सौरभ्यें ॥१९॥तया कुसुमित काननावरून । मंद सुगंध झुळुके पवन । तया पंथें भ्रमरगण । कुमुदोदरीं रुणझुणिती ॥१२०॥शरच्चंद्रींचे संपूर्ण किरण । निशिगर्भींचें तमोपहरण । करिती तेणें शोभायमान । मिरवी कल्याण शर्वरी ॥२१॥इत्यादि गुणीं गुणसंपन्न । रम्य म्रुदुल जाणोनि पुलिन । वधूगणवेष्टित मधुसूदन । तेथ संपूर्ण शोभला ॥२२॥पूर्विलाहूनि वसंतीं वन । सभूषा अंजित युवतिनयन । किंवा साम्राज्याश्रीसंपन्न । शोभे संपूर्ण भूपत्व ॥२३॥स्वरत सप्रेम गोपीगण । वेष्टित तैसा मधुसूदन । शोभता झाला अमृतकिरण । मिथा मंडन उडुवलयीं ॥२४॥जीवनें टवटविती काननें । कीं मनुजादि अन्नपानें । तेंवि चित्प्रभा समस्त भुवनें । एक्या श्रीकृष्णें शोभती ॥१२५॥त्या कृष्णाची अधिकतर । गोपीवेष्टित लक्ष्मी रुचिर । वर्णितां वर्णपंक्तीचे भार । न पवे पार वाक्पतिही ॥२६॥परंतु गोपींचा उत्साह । कृष्णप्रेमा निःसंदेह । एकाग्र करूनि वृत्तिसमूह । श्रवणप्रवाह सांठविजे ॥२७॥तद्दर्शनाह्लादविधूतहृद्रुजो मनोरथांतं श्रुतयो यथा ययुः ।स्वैरुत्तरीयैः कुचकुंकुमांकितैरचीक्लृपन्नासनमात्मबंधवे ॥१३॥कृष्णदर्शनें परमाह्लाद । पावला संपूर्ण बल्लवीवृंद । तेणें पुलिनशोभा विशद । उत्साहप्रद त्यां झाली ॥२८॥विरहकाळीं तींचि पुलिनें । भासत होतीं सम श्मशानें । कृष्णावाप्तितोषांजनें । सुखनिधानें प्रकटलीं ॥२९॥विरहदःखाचा हृद्रोग । मनामाजील पावला भंग । पूर्णचंद्रींचा लांछनडाग । निघतां सुधांग शशी जैसा ॥१३०॥हृद्रोगविगता तैशा युवति । मनोरथाची पावल्या शांति । संकल्पविकल्पातीतवृत्ति । तेंवि शोभती पूर्णत्वें ॥३१॥जेंवि कां श्रुतीचा समुदाय । कर्मकांडीं साधनोपाय । लक्षूनि जैसा सकाम ज्ञेय । निजात्मप्रत्यय न फवोनी ॥३२॥तेथ साधनें अतिदुर्घट । आत्मलाभार्थ मानिलीं इष्ट । तया काम्यकष्टांचा शेवट । आत्मा स्पष्ट अवगमतां ॥३३॥ज्ञानकांडीं निजात्मप्राप्ति । लाहूनि निष्काम झाल्या श्रुति । कृष्णदर्शनें गोपयुवति । तेंवि विश्रांति लाभल्या ॥३४॥वृद्धकाळीं पतिव्रता । धनसुतऐश्वर्यसंप्राप्ता । तथापि प्राणप्रियत्वें भर्ता । भजे तत्त्वता सप्रेमें ॥१३५॥तेंवि अत्मोपलब्धा श्रुति । सप्रपंचभेदवृत्ति । झालियाही निजात्मरति । सप्रेमभक्ति अनुरक्ता ॥३६॥त्या येथ गोपिका कृष्णागमनें । हृद्रोगवर्जित समाधानें । पावल्या असतां पूर्णपणें । सप्रेमभजनीं अनुसरल्या ॥३७॥अंतर्यामीं परमानंदु । तोचि श्रीकृष्ण आत्मबंधु । त्याकारणें गोपीवृंदु । भजता झाला आह्लादें ॥३८॥फेडूनि उत्तरीयें वसनें । आसनें रचिती त्याकारणें । कुचकुंकुमाचीं ज्यांवरी चिह्नें । तीं सर्वज्ञें स्वीकेलीं ॥३९॥तत्रोपविष्टो भगवान्स ईश्वरो योगेश्वरांतर्हृदि कल्पितासनः ।चकास गोपीपरिषद्गतोर्चितस्त्रैलोक्यलक्ष्म्यैकपदं वपुर्दधत् ॥१४॥गोपीदत्तोत्तरीयासनीं । अचिंत्यैश्वर्यसुखाची खाणी । तो बैसला पंकजपाणि । प्रेमा जाणोनि गोपींचा ॥१४०॥योगियांमाजि थोर थोर । कपिलप्रमुख विरिंचि हर । हृदयांबुजीं बैसकार । ध्यानीं एकाग्र कल्पिती ॥४१॥तो हा येथ यमुनापुलिनीं । गोपीप्रेमाच्या सम्मानीं । अर्चिला असतां अंतःकरणीं । आनंदोनि क्रीडतसे ॥४२॥विश्वश्रियेचें लावण्य । त्रैलोक्यमंजूपागर्भीं पूर्ण । ठेविलें होतें तें काढून । एकला लेऊन मिरवला ॥४३॥त्रैलोक्याच्या लावण्यराशि । लेऊनि लक्ष्मी सौंदर्येशीं । झाली कृष्णरूपीं मिराशी । तैसें वपूशीं धरियेलें ॥४४॥ऐसा पावोनि गोपीसभा । तिहीं पूजितां पंकजनाभा । त्रिजगच्छ्रीची लावण्यशोभा । तो कंदर्पनाभा नट धरिला ॥१४५॥सभाजयित्वा तमनंगदीपनं सहासलीलेक्षणविभ्रमभ्रुवा । संस्पर्शनेनांककृतांघ्रिहस्तयोः संस्तुत्य ईषत्कुपिता बभाषिरे ॥१५॥ऐसा उत्तरीयवसनासनीं । पूजूनि सस्निग्ध मृदुभाषणीं । सम्मानिला पंकजपाणि । यमुनापुलिनीं गोपींहीं ॥४६॥श्रीपद अंकावरी धरून । करिती करकमळें मर्दन । जैसी कमला मदीं चरण । अंकीं ठेवून विष्णूचे ॥४७॥तैसे चरण अंकावरी । धरूनि सादर वामकरीं । दक्षिणपाणि भ्रमरापरी । चंचळ करूनि मर्दिती ॥४८॥उभय हस्तांचे स्पर्शनीं । सम्यक्प्रकारें चक्रपाणि । स्पर्शोनियां नानास्तवनीं । स्तविती वदनीं सस्मिता ॥४९॥कामकौशल्यविलासचतुरा । भो भो लावण्यरत्नाकरा । गोपीमानसपंकजभ्रमरा । श्रीसुखकरा रतिरसिका ॥१५०॥जय जय कंदर्पोद्दीपना । जय जय अमोघनवयौवना । जय जय मानिनीमानसहरणा । जगज्जीवना जगन्मया ॥५१॥वनितायौवनवनश्रृंगारा । विरहप्रदा खदिरांगारा । प्रमदावदनपद्माकरा । सम भास्करा प्रकाशका ॥५२॥गोपीनयनचकोरचंद्रा । अगाध अक्षय सुखमुद्रा । ऐशा विकसित मानसमुद्रा । स्तवनीं यदुवीरा तोषविती ॥५३॥शुष्केंधनीं इंधनाशन । बळेंचि चेतवी प्रभंजन । तेंवि जो अनंगोद्दीपन । लीलावलोकनप्रसंगें ॥५४॥तया कृष्णातें गोपनारी । स्तवनीं स्तवोनि नानापरी । चरण चुरिती ये अवसरीं । सकोप कुसरी बोलती ॥१५५॥कोपामाजि प्रेमोत्कर्ष । कोपकैवाडें वर्धिती तोप । त्रिविध प्रश्नाचें करूनि मिष । भाषणीं ईश तोषविती ॥५६॥सकोप म्हणाल कैशा कळल्या । हास्यकटाक्षमोक्षणलीला । विभ्रमविलासें उपलक्षिल्या । प्रेमकोपिष्ठा म्हणोनि ॥५७॥वक्र भ्रुकुटीं सूची कोपा । स्मितवक्त्रें तो भासे सोपा । ऐसिया प्रेमसंरंभरूपा । प्रश्नीं विकल्पा जल्पती ॥५८॥यावरी त्यांची वक्रता । परमचातुर्यकौशल्यता । प्रश्नलाघवें मन्मथताता । छळूं पाहती तद्वदन ॥५९॥कृष्ण मानुनि अकृतज्ञ । त्याच्या वचनें त्या दूषण । ठेवावया करिती प्रश्न । हेतु लपवून गूढत्वें ॥१६०॥लौकिकप्रवृत्तीची गोठी । त्रिविध प्रश्नाच्या परिपाठी । निरोपूं जातां ठेवूं कुटी । हा हेतु पोटीं तयांचे ॥६१॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP