एका भ्रुकुटिमाबध्य प्रेमसंरंभविह्वला । घ्नंतीवैक्षत्कटाक्षेपैः संदष्टदशनच्छदा ॥६॥

प्रीतिप्रचुर क्रोधोद्गम । प्रेमसंरंभ तयासि नाम । तेणें विह्वळ हृदयपद्म । पाहे सकाम अपांगीं ॥६६॥
ऊर्ध्वदशनीं अधर दष्ट । आकर्ण भृकुटी कार्मुककृष्ट । कटाक्षविक्षेप स्मरशरतिखट । मारी उद्धट ईक्षणीं ॥६७॥
ललनालोचनकटाक्षबाण । रतिरसरसिक वयसा तरुण । स्मरसमरंगीं साहे कोण । तो एक श्रीकृष्ण स्मरविजयीं ॥६८॥
धीर वीर जे रणचत्वारीं । मृगेंद्र मर्दिती बाहुप्रहारीं । तेही ललनालोचनशरीं । क्षणामाझारीं भंगती ॥६९॥
योषिताआसव मादकपणें । तुकितां योषिता बहुतां गुणें । आगळी कीजे मादकस्मरणें । येर अवघ्राणें जरी तीव्र ॥७०॥
वामदृशांचे कटाक्षबाण । विलासमंडित सस्मितठाण । अवयवईक्षण प्रियभाषण । घडतां कोण स्मरजेता ॥७१॥
काम जाळूनि स्मरांतक । म्हणवी प्रतापें त्र्यंबक । तो शबरीनें केला रंक । वनीं निःशंक स्मरवेधें ॥७२॥
आबद्ध भृकुटी कुटिलापांगीं । सुबद्धठाणीं स्मरसमरंगीं । कटाक्षबाणीं यूनाआंगीं । जंव तन्वंगी न विंधी ॥७३॥
तंववरी कामजयाच्या गोठी । करिती नर सुर योगी हठी । ललनालोचनसायकवृष्टि । हर परमेष्ठी न साहती ॥७४॥
ऐसिया असंख्य बल्लववामा । रतिरसरसिका क्षोभक कामा । जिंकूं न शकती मेघश्यामा । कीं तो परमात्मा स्वात्मरत ॥७५॥
तदुपरी एकी आभीरवनिता । कृष्ण जाणोनि मन्मथजेता । चकोरवृत्ति हृच्छयव्यथा । शमवी तत्त्वता तें ऐका ॥७६॥

अपराऽनिमिषदृग्भ्यां जुषाणां तन्मुखांबुजम् । आपीतमपि नातृप्यत्संतस्तच्चरणं यथा ॥७॥

कृष्ण नाफळे सकामयोगें । म्हणोनि आकळी लोचनमार्गें । निमेषवर्जित सानुरागें । बद्धापांगें ऐकाग्र्‍यें ॥७७॥
पूर्णशरदिंदु चकोरें । लक्षिती अनिमेषें नीहारें । निवती वेधामृततुपारें । प्रेमसुभरें रसपुष्टि ॥७८॥
कृष्णवदनेंदु तैसा नयनीं । अनिमेष प्राशितां मानिनी । चिरकाळेंही तृप्ति न मनीं । तनुवाग्मनीं ताटस्थ्यें ॥७९॥
तैसे सज्जन हरिपदकंज । हृदयीं ध्याती तेजःपुंज । नित्यनूतन सुखाची वोज । नाचवी भोज अविसंबें ॥८०॥
असो हे लक्षयोगीयाची कळा । तंव एकी बल्लवी ध्यानकुशला । आपाद श्रीकृष्ण लक्षूनि डोळा । आणी हृत्कमळा सप्रेमें ॥८१॥

तं काचिन्नेत्ररंध्रेण हृदिकृत्य निमील्य च । पुलकांग्युपगुह्या‍ऽस्ते योगीवाऽनंदसंप्लुता ॥८॥

मग बैसोनि एकांतीं । हृदयीं पाहूनि श्रीकृष्णमूर्ति । आलिंगूनिया स्वसुखस्थिती । भोगी विश्रांति पूर्णत्वें ॥८२॥
पूर्णविश्रांतीची ठेव । सबाह्य उमटती अष्टभाव । स्वेद रोमांच पुलकोद्भव । बाष्पादि सर्व सुखचिह्नें ॥८३॥
जैसे योगी आनंदकंद । चिंतिती हृत्कमळीं गोविंद । अमृतोदधीमाजि ते बिंद । होती अभेद सुखलाभें ॥८४॥
असो गोपींची ऐशी हांव । पृथगाकारें वासुदेव । कवळिला तो कथिता भाव । अपार अथाव प्रेमाब्धि ॥८५॥
आतां समुच्चयात्मकरीति । शुक निवेदी रायाप्रति । समस्ताही बल्लवयुवति । देखोनि श्रीपति हरिखेल्या ॥८६॥

सर्वास्ताः केशवालोकपरमोत्सवनिर्वृताः । जहर्विरहजं तापं प्राज्ञं प्राप्य यथा जनाः ॥९॥

केशव म्हणिजे क्लेशनाशन । अभीष्ट प्रेष्ठ प्राणांहून । त्याचें होतांचि दर्शन । सर्व वधूजन निवाला ॥८७॥
परमोत्साहें निर्भर मनीं । झाल्या त्यागून विरहग्लानि । जैसे प्राज्ञांतें पावोनि । ताप सांडूनि जन निवती ॥८८॥
कोण प्राज्ञ कैसे जन । ऐका त्रिविध हें लक्षण । मुमुक्षु जे ईश्वर प्राज्ञ । त्यांतें पावोनि श्रम त्यजिती ॥८९॥
जीवत्वभेदें वियोगविरहें । अनादिअविद्याभ्रमप्रवाहें । संतप्त तापत्रयाच्या दाहें । ते लवलाहें सांडिती ॥९०॥
शुद्ध सात्त्विकां हे प्राज्ञभेटी । राजसाची ऐका गोठी । अहंममपदरा देऊनि गांठीं । संसारखुंटीं निबद्ध जे ॥९१॥
मी सबळ तरुण लावण्यरूप । माझी माय माझा बाप । माझें कुळशीळ प्रताप । वृत्ति अमूप पैं माझी ॥९२॥
माझी विद्या अव्याहत । माझें द्रव्य अपरिमित । माझी यशकीर्ति विख्यात । ऐश्वर्य ऊर्जित पैं माझें ॥९३॥
ऐसा ऐश्वर्यसंपदामदें । नाचों लागे ममताछंदें । तंव काळवैगुण्यप्रारब्धें । सवेंचि खेदें जाजावे ॥९४॥
द्रव्यहानि स्वजनशोक । मानभंग होतां दुःख । शिणे जाजावे बहुतेक । न वटे सुख संसारीं ॥९५॥
त्यासि प्राज्ञ ब्रह्मनिष्ठ गुरु । भेटतां बोधी भव नैश्वरु । इहामुत्र असाचारु । कळतां विरागपर होय ॥९६॥
विवेकसुविचारपरिपाटीं । साधनसंपत्ति लावी पाठीं । व्यतिरेकान्वयबोधें तुष्टि । दुःखराहटी पारुषवी ॥९७॥
सविश्वासें दृढ निष्ठा । भंगूनि अनादि अनुभूत कष्टां । स्वानंदभुवनीं करी प्रतिष्ठा । योनिसंकटा निरसूनी ॥९८॥
आतां तामस मूढ जन । खेचर भूचर जलचर पूर्ण । सुषुप्तिकालीं पावती प्राज्ञ । द्वय अभिमानें लययोगें ॥९९॥
विक्षेपगर्भीं दंवदंव केली । तितुकी तेथ लया गेली । प्रचुर आनंदावाप्ति झाली । प्राज्ञसंगें त्या जैसी ॥१००॥
केशवदर्शनें गोपी तैशा । पावल्या परमानंदोत्कर्षा । विरहजनिता तापलेशा । त्यजिलें मानसामाजूनी ॥१॥
ऐसा संतुष्ट बल्लवीगण । वेष्टित प्रेष्ठतम भगवान । तिष्ठतसे त्या उपमा कोण । व्यासनंदन अनुवादे ॥२॥

ताभिर्विधूतशोकाभिर्भगवानच्युतो वृतः । व्यरोचताधिकं तात पुरुषः शक्तिभिर्यथा ॥१०॥

साधनसंपत्तिपूर्वक । निर्धूत सर्वाशत सम्यक । त्या गोपिका विधोतोअशोक । जैसें कनकपुट शुद्ध ॥३॥
कीं जहदजहल्लक्षणायोगें । शबलवाच्यांशपरित्यागें । शुद्धलक्ष्यांश सांख्यमार्गें । प्रत्यगात्मत्वें निवडती ॥४॥
तैसिया पावोनि अनंता । समस्त गोपी शोकविगता । तिहीं वेष्टित मन्मथजनिता । शोभे सविता जेंवि किरणीं ॥१०५॥
किंवा वेष्टित षोडशकला । शोभा आगळी शशिमंडळा । कीं सजीववेष्टित अमरपाळा । शोभे स्वलीला पुरुहूत ॥६॥
कीं परमात्मा चित्प्रकृति । अचिंत्यैश्वर्य अनंतशक्ति । मंडित मिरवी अगाध व्याप्ति । तैसा श्रीपति शोभतसे ॥७॥
किंवा उपासकपुरुषभक्ती - । पूर्वक ज्ञानबळादि शक्ति - । संपन्न आणि जेंवि अभिव्यक्ति । यथापद्धति औपास्या ॥८॥
किंवा कुंकुमतिलक निडळीं । पदकरकंठीं श्रवणीं मौळीं । भूषणीं मिरवे सौभाग्यशाली । तेंवि वनमाळी वधूयुक्त ॥९॥
किंवा प्रकृतिविकृतिसहित । चतुर्विंशतितत्त्वान्वित । जीवचैतन्य विग्रहवंत । विद्यामंडित ज्यापरी ॥११०॥
विधूतशोक गोपींमाजि । प्रेमोत्फुल्लित नयनांबुजीं । कृष्ण मिरवे जेंवि पंकजीं । केशरराजीमाजि भ्रमर ॥११॥
ऐसा विशेषें कोणे ठायीं । गोपीवेष्टित शेषशायी । मिरवला तें व्याख्यान दोहीं । श्लोकीं श्रोतीं परिसावें ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP