मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३१ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ३१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २१ अध्याय ३१ वा - श्लोक ६ ते १० संग्रहभाषा श्लोकछंद ॥निराशा पुढती गोपी पातल्या पुलिनाप्रति । गाती कृष्णानुलक्षें त्या कृष्णागमन वांछिती ॥१॥चंद्रप्रभा होती जेथवरी । तंववरी हुडकूनि वनाभीतरी । तमःप्रचुरवृक्षान्तरीं । अप्राप्त हरि जाणोनि ॥३७॥फिरोनि पुढती यमुनापुलिना । येऊनि समस्त पशुपांगना । कृष्णवेधें करिती गायना । कुरुभूषणा तें ऐकें ॥३८॥सुमुखवृत्तमिदम् ॥ नमन ॥नमुनि सद्गुरू गोपिनायका । विरहिणी व्रजीं गाति बायका । कथिन ते कथा प्राकृतें खरी । जशिच हे शुकाचार्यवैखरी ॥१॥गोप्य ऊचुः - जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्र हि । दयित दृश्यतां दिक्षु तावकास्त्वयि धृतासवस्त्वा विचिन्वते ॥१॥समश्लोकी ॥उपजणें तुझें प्राप्त गोकुळीं । वसत इंदिरा ऊर्जितागळी । प्रकट हो सख्या धुंडितों दिशा । असु विगुंतले जाहलों पिशा ॥१॥ध्रुवपद ॥हरि दयार्णवा प्रेमगौरवा । प्रकट हो सख्या तोष दे जिवा ॥गोपी म्हणती जी प्रियतमा । तुझिये जन्में करूनि महिमा । ऊर्जित नंदव्रजाची गरिमा । उत्कृष्ट आम्हां दिसतसे ॥३९॥तुझिया जन्मास्तव वनमाळी । कमला सर्वस्वें ये स्थळीं । स्वऐश्वर्यें व्रजमंडळीं । शोभाबहळीं वर्त्ततसे ॥४०॥तस्मात् तुझिया जन्में करून । प्राणिमात्र व्रजींचे जन । ऊर्जित विजयश्रीसंपन्न । नित्य निमग्न स्वानंदीं ॥४१॥व्रजीं जन्मतां श्रीमुकुंद । सर्व भोगिती परमानंद । तेथ तावक गोपीवृंद । पावतो खेद तव विरहें ॥४२॥तावकी कैशा म्हणसी जाण । तरी त्वदर्थ धरूनि प्राण । लाहोनि विधीचें वरदान । गोपी होऊन जन्मलों ॥४३॥तुझ्या ठायीं धरूनि प्रीति । तव प्रिय करावयाची आर्ति । आम्ही जन्मलों हें श्रीपति । विदित तुजप्रति सर्वज्ञा ॥४४॥यास्तव जन्माचि पासून । तुझ्या ठायीं धरिले प्राण । तुजविण प्रियतम नेणों आन । निजसुख संपूर्ण तूं आमुचें ॥४५॥बाळपणींची तुझी गोठी । ऐकोनि हांव उपजे पोटीं । जे दोहीं बाहीं तुझ्या कंठीं । घालूनि मिठी कवळावें ॥४६॥विशेष झालिया दर्शन । मधुमक्षिकाकार नयन । नुठती तव तनूपासून । तनुमनप्राण वेधती ॥४७॥भाग्यें स्पर्श जेव्हां घडे । तैं मन्मथसुखाची खाणी उघडे । चुंबनालिंगनाचेनि पाडें । तुकितां नावडे कैवल्य ॥४८॥दर्शन स्पर्शन संस्तोभन । ऐसें वेधी तनुवाङ्मन । वियोगीं त्वन्निष्ठ आमुचे प्राण । अन्यचिंतन विसरले ॥४९॥एवं जन्मापासूनि आमुचें । तनुमनप्राण जीवित साचें । तुझेनि छंदें सदैव नाचे । दुसरें न वचे प्रिय कांहीं ॥५०॥जन्मादारभ्य जेंवि कुमुदिनी । ग्लौ लक्षितां न पवे ग्लानि । किंवा यावज्जन्म पद्मिनी । भोगी दिनमनि तन्निष्ठ ॥५१॥आम्ही त्वयिधृतासवा तशा । जन्मादारभ्य श्रीपरेशा । ज्यां दिवसांची धरूनि आशा । त्या या निशा संप्राप्ता ॥५२॥लांगलकर्षणादारभ्य कष्ट । धान्यपचनादि वाढिलें ताट । तें पळवितां हृदयस्फोट । तैसी चटपट हे आम्हां ॥५३॥तुझेनि जन्में व्रजसमग्र । असतां आनंदनिर्भर । तावक वधूगण विरहातुर । तूतें गह्वर हुडकीतसे ॥५४॥तुझेनि जन्में सुखसागरीं । निमग्न असतां चराचरीं । आम्हीं तावकी विरहातुरी । दुःखलहरी भोगितसों ॥५५॥चोष्यखाद्यादि पदार्थ जेंवि । दशनव्यापारें रसना सेवी । तेणें आपादतनु टवटवी । परी न फवे ते चवी दशनांतें ॥५६॥तैसें न करूनि जनार्दना । करी आमुची संभावना । नातरीं आमुच्या करितां हनना । अघ सर्वज्ञा तव माथां ॥५७॥आपणा प्रकट दावूनि नयनीं । आमुची निरसीं मनसिजग्लानि । सदयहृदया आमुचे हननीं । काय म्हणोनि प्रवर्तसी ॥५८॥अधोर्ध्व अग्रिं पश्चिमभागीं । दक्षिण उत्तर दिङ्मार्गीं । तुजचि पाहों जी सर्वांगीं । बाह्यांतरंगीं अखंड ॥५९॥ऐसा वधूगण तवासक्त । जाणोनि मारणें हें अनुचित । मारणें कैसें म्हणसी येथ । तरी तें यथार्थ अवधारीं ॥६०॥विरहविवश सर्व ललना । जैसी आवडी जिचिया मना । ते ते तैसी करी जल्पना । पृथक्सूचना सर्वत्र ॥६१॥त्यांमाजि एकी आभीरवनिता । आंगीं लावूनि हिंसकता । प्रतिपादिती त्या श्लोकार्था । धरित्रीनाथा शुक सांगे ॥६२॥शरदुदाशये साधुजातसत्सर सिजोदरश्रीमुषा दृशा । सुरतनाथ तेऽशुक्लदासिका वरद निघ्नतो नेह किं वधः ॥२॥सरसिजें शरत्काळिंचीं तळां । विकसितें तयांतिल चित्कळा ।हरुनि माखिल्या नेत्रमार्गणें । फुकट किंकरी हे न मारणें ॥२॥ हरिदया० शरत्काळीं उदकाशया । माजि सद्गुणसमुच्चया । सहित विकसितां कुशेशयां । अरुणकोमळ जे लक्ष्मी ॥६३॥अन्य ऋतूंचीं तडागअंभें । संभव सरसिरुहगतगर्भें । शरत्समसाम्य श्री न शोभे । वरवालभें साधुत्व ॥६४॥ते श्री हरूनि तव लोचनें । आम्ही विरहिणी कटाक्षबाणें । विंधितां हनना काय उणें । कीं शस्त्राविणें हा वध नोहें ॥६५॥प्रेष्ठ अभीष्ट सुरतनाथा । वरदा निरशी मन्मथव्यथा । फुकट दासी तव पदप्राप्ता । आम्ही समस्ता - विरहिणी ॥६६॥शरत्सरसिजलक्ष्मीहरणें । तद्भासादृशकटाक्षबाणें । फुकट दासी कां वधितां प्राणें । तुज हीं दूषणें न लगती ॥६७॥कीं यासि वध म्हणों नये । शस्त्रासारिखे न दिसती घाये । परी मारणें मंत्रप्रयोगप्राय । अक्षत प्रळय होतसे ॥६८॥रसाळ स्वादिष्ट शुभ पक्कान्नें । भोक्ता सेवितां प्रियतमपणें । मरण पावे दृग्दूषणें । स्मराक्त नयनें हें तैसें ॥६९॥मोल न वेचितां किंकरी । आम्ही अनुकूळ मन्मथसमरीं । असतां विंधूनि लोचनशरीं । नव्हे श्रीहरि वध काय ॥७०॥जरी तुज मारणें होतें आम्हां । तरी कासया मेघश्यामा । बहुधा निरसूनिया दुर्गमा । रक्षणकामा आंगविलें ॥७१॥मागें रक्षूनि बहु संकटीं । स्मराक्तदृग्बाणांची वृष्टि । करितां पशुघ्ना परिपाटी । पोसून शेवटीं पशुहनना ॥७२॥म्यां कैं कोण्हां रक्षिलें म्हणसी । तरी तें गोविंदा परियेसी । विदित मर्त्यां अमर्त्यांसी । तें तुजपाशीं निवेदितों ॥७३॥विषजलाप्ययाद्व्यालराक्षसाद्वर्षमारुताद्वैद्युतानलात् ।वृषमयात्मजाद्विश्वतोभयादृषभ ते वयं रक्षिता मुहुः ॥३॥विषजलें क्षया पावतेक्षणीं । अघअरिष्टकां वातवर्षणीं ।मयसुतादिकां पासुनी अम्हां । जिवविणें तुझें व्यर्थ काय मा ॥३॥ हरिदया० ऋषभ ऐसें संबोधन । श्रेष्ठत्वाचें प्रशंसन । कीं जें अंगीकृताचें हनन । श्रेष्ठांपासून न घडावें ॥७४॥तुझें श्रेष्ठत्व म्हणसी कैसें । निजकृपाकटाक्षपीयूषें । ब्रह्मांडपाळणीं अनायासें । पटुतर ऐसें श्रुति गाती ॥७५॥कालियविषाक्तयमुनावारि । प्राशितां गोगोपां बोहरी । त्याच्या शोकें हे व्रजपुरी । प्रळयपरवरीं प्रविष्ट ॥७६॥तेव्हां कृपावलोकामृतें । जीवविलीं समस्तें प्राणियें मृतें । विदित तव यश हें त्रिजगातें । कीं आमुतें ना म्हणसी ॥७७॥वत्सें वत्सप अधासुरें । बकानुजें राक्षसें क्रूरें । गिळिलें त्यांच्या शोकभरें । समग्र व्रजपुरें संहरतां ॥७८॥तुवां फोडून अघाचा घसा । व्रजवत्सपां वत्सांसरिसा । कृपाकटाक्षपीयूषरसा । वर्षोनि आपैसा वांचविला ॥७९॥वनीं गिळितां वडवानळा । प्राशून वांचविलें गोकुळा । इंद्र वर्षतां प्रळयजळा । धरिलें अचळा कारुण्यें ॥८०॥विद्युत्पात जळ अचाट । माजि जलगारा घनदाट । तेणें व्रजपुर पावतां कष्ट । तुवां उद्भट गिरि धरिला ॥८१॥अरिष्टनामा वृषभासुर । व्योम जो मयासुराचा कुमर । त्यांचा करूनिया संहार । अक्षत व्रजपुर रक्षिलें ॥८२॥कृष्णविरहें विवशवाणी । हरियश गाती व्रजकामिनी । भूतभविष्यद्वर्तमानीं तृणावर्त्तादि व्योमांत ॥८३॥रासक्रीडेच्या प्रसंगीं । वृषभासुरा श्रीकृष्ण भंगी । ऐसिया महाविघ्नीं अनेगीं । कृपेनें वेगीं रक्षिलें ॥८४॥ऐसिया प्रळयीं वांचविणें । आजि मारावें कटाक्षबाणें । ऋषभ येणें संबोधनें । कीं न लवीं हें उणें श्रेष्ठत्वा ॥८५॥वारंवार संरक्षिलें । शेखीं कटाक्षबाणें वधिलें । हेंही यशाचिया माजि पडिलें । तरी मिरविलें पाहिजे ॥८६॥स्वगृहीं त्रिजगा पाहुणेर । कुटुंबालागीं निराहार । तेंवि विश्वअवनार्थ तवावतार । स्वभक्तनिकर उपेक्षूनी ॥८७॥तरी हें अनुचित जगदात्मया । जरी म्हणसी तूं नंदजाया । स्वभक्त म्हणोनि तोषवावया । आलों निलया तयेच्या ॥८८॥अनपत्य नंदनारी । म्हणोनि चिंती मज अंतरीं । यास्तव जन्मोनि तिचे उदरीं । केलें दूरी वंध्यत्व ॥८९॥ऐसें न म्हणावें श्रीपति । वृत्तांत विदित आम्हांप्रति । विरिंचीनें केली विनति । तैं तूं क्षितीं अवतरसी ॥९०॥न खलु गोपिकानंदनो भवानाखिलदेहिनामंतरात्मदृक् ।बिखनसार्थितो विश्वगुप्तये सख उदेयिवान्सात्वतां कुले ॥४॥नव्हसि गोपिकातोषदायक । हृदयसाक्षि तूं विश्वनायक । विनवितां विधी विश्वरक्षणीं । यदुकुळीं तुझें जन्म ते क्षणीं ॥४॥ हरिदया० सख्या निश्चयेशीं तूं पाहीं । यशोदानंदन नव्हसी कांहीं । विश्वात्मा तूं सर्वां देहीं । बुद्धिसाक्षी विश्वदृक् ॥९१॥म्हणसी बुद्धिसाक्षी जो विश्वदृक् । तो व्यापक सर्वात्मक । मी गोरक्ष नंदतोक । सगुण पृथक् परिच्छिन्न ॥९२॥यदर्थीं ऐकें पुरुषोत्तमा । विश्वपाळणाकारणें ब्रह्मा । तुज प्रार्थूनि मेघश्यामा । धरवी जन्मा यदुकुळीं ॥९३॥ते ब्रह्मयाची मानूनि विनति । विश्वपाळणार्थ श्रीपति । यदुकुळीं जन्मलासि निश्चितीं । आम्हांप्रति विदित हें ॥९४॥जरी त्वा विश्व प्रतिपाळणें । तरी आम्हांसीच कां संहारणें । नेत्रकटाक्षें कामबाणें । कवण्या गुणें हें सांग ॥९५॥न दाखवूनियां विषमभेदा । स्वभक्तपाळक आनंदकंदा । पुरवीं मनोरथा चतुर्विधा । चतुःश्लोकीक्ता परिसोनी ॥९६॥मस्तकीं ठेवीं पद्मकर । जीववीं दावूनि वदनचंद्र । चरणें मर्दीं पयोधर । देईं अधरामृतपान ॥९७॥विरचिताभयं वृष्णिधुर्य ते चरणमीयुषां संसृतेर्भयात् ।करसरोरुहं कांत कामदं शिरसि धेहि नः श्रीकरगृहम् ॥५॥शरण संसृति भ्याड जे अले । अभय श्रीकरें त्यांसि वोपिलें ।परिणिली हरी ज्या करें रमा । धरिं शिरीं तया पाणि शंतमा ॥५॥ हरिदया० प्रथम प्रार्थना निजकर शिरसा । ठेवीं म्हणोनि तुज परेशा । प्रार्थितसों तो शंतम कैसा । पद्म हस्त हें अवधारीं ॥९८॥वृष्णिवरिष्ठा परिसें वहिलें । जे संशृति भय पावले । ते तव चरणा शरण आले । श्रमित झाले म्हणोनी ॥९९॥पचतां विष्ठेच्या दाथरीं । विसंचितां षड्विकारीं । तापत्रयाग्नीमाझारीं । बळें षड्वैरि भाजितां ॥१००॥स्वर्गीं नरकीं मानवलोकीं । भ्रमतां पचतां कुंभपाकीं । मरमरू उपजतां योनिमुखीं । जे भवदुःखीं भयभीत ॥१॥बुडतां सांपडे जेंवि उथळ । क्षुधिता अन्न तृषिता जळ । तेंवि त्यां सत्संगें तव पदकमळ । निर्भय स्थळ सांपडलें ॥२॥पुन्हा संसृति लागेल पाठीं । ऐसिया भयास्तव सदृढ मिठी । घालूनि अभेदप्रेमा पोटीं । धरूनि मुकुटीं पद धरिले ॥३॥तयां संसारशत्रुभीतां । जाणोनि स्वचरणशरणप्राप्तां । होसी ज्या हस्तें अभयदाता । तो पद्मकर माथां धरीं आमुचे ॥४॥आणि दैत्यीं त्रासिता सुरवर । समरीं होऊनि पराजयपर । करिती कारुण्यें नामोच्चार । तैं त्यां वरद कर कामद जो ॥१०५॥कीं स्वभक्तांचे अनेक काम । पुरविता जो कल्पद्रुम । आमुचे शिरीं पाणिपद्म । ठेवीं शंतम श्रीकांता ॥६॥तैसीच कमला चंचलपणें । सर्वत्र शिणतां विश्रांति नेणे । तयेसि हृदयीं निश्चळ करणें । पाणिग्रहणें ज्या हस्तें ॥७॥शर्मद तें करसरोरुह । आमुचे माथां करूनि स्नेह । ठेवूनि निरसीं दुस्तर विरह । निःसंदेह सुख वोपीं ॥८॥ Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर व्रजजनार्तिहन्वीतर योषितां निजजनस्मयध्वंसनस्मित ।भज सखे भवत्किंकरीः स्म नो जलरुहाननं चारु दर्शय ॥६॥व्रजविपत्ति तूं नाशितां हरी । स्वजनगर्व जो सस्मितें हरी । प्रकटवी सख्या किंकरीं अम्हां । कुमुदकानना वक्त्रचन्द्रमा ॥६॥ हरिदया० तंव आणिखी म्हणती व्रजयोषिता । स्वभक्ताचा तूं गर्वहर्त्ता । व्रजजनदुःखाचा निहंता । आमुचा तत्त्वता प्राणसखा ॥९॥दीक्षित स्मरयज्वा तूं चतुर । म्हणोनि संबोधन हे वीर । तुझ्या किंकरी विरहातुर । वदन फुल्लार दावीं आम्हां ॥११०॥ईषन्मात्र हास्यवदन । करूनि करिसी स्मयभंजन । योषितांचें नवल कोण । तैं गर्वापहरण विधिहरां ॥११॥तव किंकरी प्रार्थितों तुज । आमुचे कामने सरिसा भज । परम सुंदर वदनांबुज । दावीं सहज जगदीशा ॥१२॥आम्हां योषितांचा अंगीकार । करूनि मस्तकीं ठेवीं कर । दावीं वदनांबुज सुंदर । करुणाउत्तर परिसोनी ॥१३॥तंव आणिखी म्हणती करुणानिधि । अवघड न मगों तुज त्रिशुद्धी । स्वजनासमान आमुचा आधि । करुणानिधि छेदावा ॥१४॥प्रणतदेहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनम् ।फणिफणार्पितं ते पदांबुजं वृणु कुचेषु नः कृंधि हृच्छयम् ॥७॥पशुपथीं वनीं जाति जीं पदें । जगदघांतकें इंदिरास्पदें ।फणिफणांवरी रम्य नर्त्तकें । कुचयुगीं धरीं कामकृंतकें ॥७॥ हरिदया० प्रणतजनाहूनि विशेष । आम्ही न मगों तुज निःशेष । सहजस्वभावें निजशरणास । जें निर्दोष पद करिती ॥११५॥कृपेकरूनि गोपाळणीं । तूं जैं प्रवर्त्तसी चक्रपाणि । तैं तृणचरांमागें वनीं । चालतां चरणीं कारुण्यें ॥१६॥तेथ उधळती जे पदरज । भाग्यें ज्यातें स्पर्शती सहज । त्यांचा भंगिती पापपुंज । तैं ते अधोक्षजमय होती ॥१७॥यामाजि तुझें वेंचे काय । सहज स्वभावें लागतां पाय । चराचराचें कल्मष जाय । भास्करोदयें तम जैसें ॥१८॥हें व्हावया काय कारण । विश्वश्रियेचें चरणीं स्थान । सुरसरितेचें जन्मभुवन । ऐश्वर्यदान अघहरणें ॥१९॥तें पद आमुच्या स्तनावरी । ठेवूनि मदीं शंकरवैरि । जरी तो म्हणसी बळिष्ठ भारी । तरी अवधारी श्रीरमणा ॥१२०॥कालियफणी दुर्मददर्प । चरणीं मर्दिला सप्रताप । तेथ बापुडा वधूकंदर्प । पदप्रक्षेप सहावया ॥२१॥म्हणसी कामें जिंकिलें त्रिजग । त्याचा चरणें न घडे भंग । तो कामविजयाचा प्रसंग । वर्त्ते सांग तव चरणीं ॥२२॥तव पदपंकज केवळ रथ । विजयोर्जित केतुसहित । कंदर्पमदगज मदोन्मत्त । तद्दमनार्थ अंकुश ॥२३॥निर्दयकंदर्पगिरि कठोर । भंगावया चरणीं वज्र । मन्मथ चंचळ भ्रमराकार । पद्म फुल्लार वेधक त्या ॥२४॥स्मरनिवासें दे अपयश । अशदव त्या करी नाश । मन्मथोदयें अगाध दोष । गमति निःशेष ते नाशी ॥१२५॥ऐशी मन्मथजयसामग्री । तव पदकमळीं लक्षूनि पुरी । आम्ही प्रार्थूं विरहातुरी । कुचीं क्षणभरी पद ठेवीं ॥२६॥इत्यादि ऐश्वरमंडितपद । आमुचे कुचीं ठेवूनि विशद । कामशत्रूचा करीं छेद । वोपीं आनंद दासींतें ॥२७॥कुचसंज्ञा हे रतिगौरवें । साधकीं हृत्पंकज लक्षावें । हृदयीं पदाब्ज स्थिर व्हावें । येणें भावें वधूग्लानि ॥२८॥तंव एकी म्हणती मन्मथशरीं । मरोनि पडिलों स्मरपंजरीं । अधरामृतें त्वां झडकरीं । निजकिंकरीं जीववाव्या ॥२९॥मधुरय्या गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षण । विधिकरीरिमा वीर मुह्यतीरधरसीधुनाप्याययस्व नः ॥८॥मधुर उत्तरें पंडितप्रियें । कमललोचना बोलती स्वयें ।अनुचरी तिहीं व्याकुळा हरी । अधरअमृतें प्राण मोहरीं ॥८॥ हरिदया० फुल्लारपुंडरीकनयना । म्हणसी किमर्थ पावलां मरणा । तुझिये वाणीच्या मधुरपणा । समस्त अंगना मोहग्रस्ता ॥१३०॥कैसी मधुर म्हणसी गिरा । सुंदर वाक्यांचा उभारा । जीच्या ठायीं प्रकटोनि खरा । भुलवी चतुरां विपश्चितां ॥३१॥शुकप्रमुखमहर्षिमांदी । वैरीचनीच्या मखसंसदीं । वल्गुवाक्याच्या प्रबंधीं । सुखसंवादीं भुलविली ॥३२॥सकळज्ञानियांच्या जो मुकुटीं । हंसविग्रहें तो परमेष्ठी । वल्गुवाक्यप्रबोधपाठीं । सदसद्गांठी उगविली ॥३३॥कमला भुलोनि मृदुभाषणा । किंकरी होऊन सेवी चरणा । ऐसी वाणी बुधमनोज्ञा । तिणें अंगना वेधिल्या ॥३४॥मोहग्रस्ता तव किंकरी । विरहें जर्जर मन्मथशरीं । अधरामृतपानें झडकरी । जीववीं श्रीहरि स्मरतप्ता ॥१३५॥आम्हांसि तुझिया विरहें करून । निश्चयेंशींच आलें मरण । परी जे करविती कथामृतपान । तेंही संपूर्ण चालविलें ॥३६॥तें कथामृत म्हणसी कैसें । नव्हे शतमखभाग्या ऐसें । त्याहूनि अनंतगुणविशेषें । पुण्योत्कर्षें संप्राप्त ॥३७॥तव कथामृतं तप्तजीवन कविभिरीडितं कल्मषापहम् ।श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृणंति ते भूरिदा जनाः ॥९॥तव कथासुधा तप्त वांचवी । अघहरा कवी वर्णिती चवी ।श्रवणमंगला श्रीमदाकुला । कथक देति भू भूरि सोहळा ॥९॥ हरिदया० स्वर्गसुधेहूनि आगळें । कथामृत हें कैसेनि कळे । तरी जें शुकें प्रज्ञाबळें । तुकिलें स्वलीले संवादीं ॥३८॥तव गुणमहिमेची जे कथा । तेंचि परमामृत तत्त्वता । म्हणसी यदर्थीं हेतु कोणता । तो तत्त्वता अवधारीं ॥३९॥सुधा स्वर्गस्थ पिती अमर । ते तप्त त्रितापीं शतमखप्रवर । कथामृत हें त्रितापहर । निववी सत्वर संतप्तां ॥१४०॥आणि ब्रह्मनिष्ठ सनकादि जे जे । तिहीं तव कथामृतातें स्तविजे । अमृतासहित आमुष्मिका जे । वांतवोजे मानिती ॥४१॥स्वर्गामृतें पातक पोषे । मुख्य अमरेंद्र अहल्यादोषें । लिप्त झाला कामवेशें । मा इतर कायसे सुरसाध्ये ॥४२॥कथापीयूष कल्मषहरणीं । समर्थ जैसा तमोहर तरणि । कीं अघौघहंत्री मंदाकिनी । जे हरिचरणीं जन्मली ॥४३॥अमृतपानें अमरांप्रति । पुण्यक्षयें स्वर्गच्युति । कल्मषवृद्धि भवदुर्मति । पुनरावृत्तिप्रद होय ॥४४॥अमृतपानें अनंग वाढे । अप्सरासुरतीं मग पवाडे । कृतसुकृता हानि घडे । कर्म उघडे तैं तें कीं ॥१४५॥श्रवणें कथामृतपान करितां । भंग होय आकल्पदुरिता । अविद्याकामकर्मांची वार्ता । निरसी तत्त्वता निःशेष ॥४६॥अविद्याकामकर्मा जैं क्षय । तैं कैवल्यामृत स्वयेंचि होय । परी सुरासहोदरा ऐसें नोहे । पुन्हा भवभयप्रद हें कीं ॥४७॥श्रवणमात्रें मंगलकारी । बुडतां तारी भवदुस्तरीं । पामर मोक्षश्रियेतें वरी । श्रवणाधिकारी झालिया ॥४८॥कथामृत पडतां अळुमाळ श्रवणीं । वाढवी अक्षय मंगळश्रेणी । अमंगळकळिमळप्रक्षाळूनी । बैसवी मूर्ध्नी अमरांचे ॥४९॥अमरामृताचें होतां श्रवण । असुरनिर्जरीं मांडिला प्रयत्न । तेणें त्रिजगा उदेलें विघ्न । क्षीराब्धिमथनप्रसंगें ॥१५०॥ज्याचा उदय होतां विशद । असुरां सुरां जे कलहप्रद । प्रथम राहूनें घेतां स्वाद । मौळच्छेद पावला ॥५१॥अद्यापि मीमांसेचें कथन । सकामयाज्ञिका होतां श्रवण । हांवे भरूनि करिती यज्ञ । अप्सरामैथुन वांछूनी ॥५२॥एवं अविद्याकामकर्मबुद्धी । अमरामृतामाजि हे सिद्धि । कथामृत छेदी भयोपाधि । परमानंदीं समरसवी ॥५३॥श्रीमत्पदाचें व्याख्यान । अमरामृत श्रीसंपन्न । तो श्रीमदमादक पूर्ण । स्वदौर्जन्य विस्तारी ॥५४॥कथामृताची कैसी शोभा । प्रकटे शांतिक्षमेची प्रभा । चाखवी स्वानंदाचा गाभा । कीर्ति स्वलाभाविस्तारी ॥१५५॥ऐसें कथामृत भूतळीं । विस्तारिती जे कीर्तनशाली । अनुग्रहरूपें सप्रेमळीं । श्रोतृमंडळीं प्रबोधिती ॥५६॥ते भूतळींचे कल्पतरु । तुकितां बहुधा ते उदार । अमरद्रुमदाता नश्वर । अक्षयईश्वर हे करिती ॥५७॥ज्याच्या कथामृतश्रवणपानें । पामरें मोक्षश्रीसंपन्नें । होती ज्ञाते निर्जर नमनें । करिती स्तवनें विधिहरही ॥५८॥अनंतकल्पीं दानें बहळ । करूनि तोषविला घननीळ । त्या सुकृतें कीर्तनशील । सप्रेमळ हरिजन ते ॥५९॥कथामृताच्या अनुग्रहें करून । त्रिजगीं तेचि वदान्य मान्य । मा प्रत्यक्ष ज्यांसि घडे दर्शन । ते जन धन्य कें पुनः ॥१६०॥यास्तव आतां प्रकट होईं । आम्हां प्रत्यक्ष दर्शन देईं । आनंदनिर्भर आमुच्या ठायीं । सुरतनवाई विस्तारीं ॥६१॥जरी म्हणसी तूं मत्कथाश्रवणें । फावती समस्त सुखकल्याणें । तरी तुम्हींही कथामृतश्रवणपानें । अभीष्ट भोगणें रतिलास्य ॥६२॥किमर्थ वाढवीं दर्शनीं हांव । ऐसा स्वामि न धरीं भाव । तव विलासें कामोद्भव । आमुचे जीव जाचितसे ॥६३॥कथाश्रवणें त्याचें शमन । न घडे म्हणोनि तव दर्शन । इच्छितसों तरी कृपा करून । प्रकट होऊनि निववावें ॥६४॥ते मद्विलास म्हणसी कैसे । कथिले न वचती जे विखनसें । संकेतार्थ अळुमाळसें । वदतां परेशें परिसावें ॥१६५॥प्रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं विरहणं च ते ध्यानमंगलम् ।रहसि संविदो याहृदिस्पृशः कुहक नो मनः क्षोभयंति हि ॥१०॥हसित पाहणें प्रेमउत्सहें । विचरणें तुझें ध्यानभाग्य हें ।झुरतसों मनीं एकल्या घरीं । स्मरभरें मनें क्षोभवी शरीं ॥१०॥ हरिदया० भो भो प्रियतमा शार्ङ्गी । विलासरसिकता तुझ्या आंगीं । एकांत रतिरंगप्रसंगीं । ज्या ज्या लिंगीं विहरसी ॥६६॥स्मित प्रहसित मंदस्मित । हास्यप्रभेद ऐसे बहुत । स्निग्धास्निग्ध विशद मुदित । सूचक संकेत वदनींचे ॥६७॥प्रेमापांग करुणापांग । व्रीडाक्रीडाबिभीषापांग । कटाक्षमोक्ष ऐसे अनेग । दाविसी अनंगक्षोभक ॥६८॥ओष्ठमुद्रा विविधापरी । अर्धमुकुलित अर्धप्रसरी । व्यात्त आकुंचित आवर्त्ताकारीं । बहुप्रकारीं स्मररसिका ॥६९॥अर्ध अधर ऊर्ध्वदशनीं । धरूनि विंधिसी कटाक्षबाणीं । तरल कपोल भ्रूकंपनीं । आमुच्या मनीं ते कडतरती ॥१७०॥आजानुं चंचल पाणियुगळ । नाभि गंभीर नितंब पृथुल । हंसविन्यासें चरणकमळ । तव गति मंगळ ध्यानस्थां ॥७१॥ठाणमाणगुणलक्षण । रूपरेखा रसिकध्यान । कोटिमन्मथ कुरवंडून । तव लावण्य निरखिजे ॥७२॥ध्यान योगियां मंगळप्रद । सविलास तव सौंदर्य हें विशद । आमुचे हृदयीं स्मरउद्बोध । करी प्रसिद्ध कपटिया ॥७३॥एकांतविलाससभेच्या ठायीं । कुशलविलासिनी कवळूनि बाहीं । चुंबनकुचालिंगनीं कांहीं । संकेतनर्मोक्ति ज्या वदसी ॥७४॥त्या आमुच्या हृदयाप्रति । स्मरणमात्रें क्षोभविती । स्मरवेदना न साहती । माघमा सेगवापरी ॥१७५॥माघमानामें वृश्चिकमाता । सेगवनाम तिच्या अपत्यां । उदरांतूनि ते देती व्यथा । तेंवि हृदयीं स्मरतां नर्मोक्ति ॥७६॥ऐसी कथूनि विरहग्लानि । पुढती म्हणती चक्रपाणी । तुझ्या ठायीं आत्मार्पणीं । आम्ही विरहिणी अनुरक्ता ॥७७॥ऐसें असतां तूं आमुशीं । कां हें कपट आचरशीं । श्लोकयुग्में तदुक्तीसी । शुक नृपासि निवेदी ॥७८॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP