अध्याय २४ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कृषिवाणिज्यगोरक्षा कुसीदं तुर्यमुच्यते । वार्ता चतुर्विधा तत्र वयं गोवृत्तयोऽनिशम् ॥२१॥
वार्ता चतुर्विध ते कैशी । त्यामाजि प्रथम बोलिजे कृषि । हलादि अनेक उपकरणेंशीं । शुद्ध क्षितीसी करावें ॥४७॥
क्षिति शोधूनि कीजे क्षेत्र । माजी प्रेरिजे बीज मात्र । तेणें लाभेंशीं सर्वत्र । चाले स्वतंत्र वर्तन ॥४८॥
वर्तन जीवन चाले जेणें । वृत्ति ऐसें तयासि म्हणणें । म्हणोनि कृषीच्या कर्माचरणें । वृत्तिजीवनें वैश्यांचीं ॥४९॥
बीज पेरूनि अल्पमात्र । अपार लाभा होइजे पात्र । यालागीं कृषि म्हणिजे क्षेत्र । कर्म स्वतंत्र वैश्यांचें ॥१५०॥
कृषिकर्में वर्तन ज्यांचें । दुर्भिक्ष दास्य करी त्यांचें । अभयस्थान जें त्रिजगाचें । कर्म वैश्यांचें प्रथम हें ॥५१॥
सफळ वृक्षांचीं राजीवनें । पुष्पवाटिका शृगारवनें । इक्षुपानवाडिया उपवनें । अनेक धान्यें शुष्कार्द्रें ॥५२॥
फळें मूळें शाकपत्रां । सजळें निर्जळें प्रसवे गोत्रा । यवगोधूमादिविचित्रा । धान्यसंभारा कृषिकर्में ॥५३॥
प्रथम कृषीवळा हे कृषि । आतां ऐका वाणिज्यासी । यत्नें जाऊनि देशोदेशीं । समग्र वस्तूंसी संग्रहणें ॥५४॥
मग वृषभादि अनेक याति । यानें करूनि शीघ्रगति । दुर्भिक्ष असेल जिये प्रांतीं । तेथें विक्रयार्थीं नेइजे ॥१५५॥
मार्गरक्षकां देऊनि कर । निर्भय कीजे पथसंचार । महार्घ विकोनि लाभ अपार । तें साचार वाणिज्य ॥५६॥
आतां तृतीय गोरक्षण । ऐका तयाचें लक्षण । अरोग पाहोनि तृणजीवन । तेथें गोधन रक्षावें ॥५७॥
शेळ्या मेंढ्या गाई महिषी । चतुर्विध या गोधनासी । संरक्षूनि जीविकेसी । कीजे वैश्यीं स्वधर्में ॥५८॥
नाना रोगीं संरक्षणें । श्वापदभया निवारणें । संग्रहूनि बहुविध तृणें । प्रतिपाळणें तद्योगें ॥५९॥
वसंतीं ग्रीष्मीं येवं सजळ । अर्पूनि करावा सांभाळ । वातवृष्टिरहित स्थळ । प्रावृट्काळभयहरणीं ॥१६०॥
अनेक जंतु गोमक्षिका । नित्य निरसूनि देइजे सुखा । ऐसिया पाळणें निजजीविका । कीजे ऐका ते कैशी ॥६१॥
अर्धपयें वत्सपाळणें । अर्ध घेइजे दोहून । तत्क्रयविक्रयें आपण । जीविकावर्तन करावें ॥६२॥
दुग्धदधितक्रलोणी - । घृतादिकांच्या विक्रयें करूनी । जीविकावृत्ति बल्लवगणीं । श्रुतिपुराणीं कथिलीसें ॥६३॥
क्षौद्रमधुफळसंग्रह । ऊणीलाक्षानिर्याससमूह । इत्यादिवर्तनप्रवाह । गोरक्षणवृत्तीचा ॥६४॥
कुसीद म्हणिजे वृद्धिजीवन । पराचें हेमरौप्य ठेवून । वृद्धिस्वार्थें देइजे धन । शताम्स मान नियमूनी ॥१६५॥
कीं धान्याची वाढीदिढी । अनेकपदार्थघडमोडी । बैसले ठायीं कीजे सुघडी । कुसीद उघडी हे वृत्ति ॥६६॥
ख्रिस्ती खांदे काळांतरें । हुंडीपत्रें देशांतरें । द्रव्य जोडिजे या व्यापारें । इत्यादि प्रकारें कुसीद ॥६७॥
चतुर्विध हे वार्ता एक । त्यामाजि आम्ही गोरक्षक । नित्य गोधनें अवनात्मक । कर्म निष्टंक आमुचें ॥६८॥
ताता म्हणसी जगाचा जनक । विघ्न भंगोनि संरक्षक । अंतीं मुत्किप्रदायक । कोणी एक सुरेंद्र ॥६९॥
तरी हे ऐसे सहसा न घडे । अनादि कर्में घडे मोडे । इंद्र किमात्मक बापुडें । ऐक निवाडें सांगतों ॥१७०॥
सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्यंतहेतवः । रजसोत्पद्यते विश्वमन्योऽन्यं विविधं जगत् ॥२२॥
जरी तू म्हणसी गोरक्षण । तेंही असे इंद्राधीन । इंद्र वर्षतां तृण जीवन । तेणें पाळण पशूंचें ॥७१॥
ये शंकेच्या निराकरणीं । सांख्यमत अवलंबूनी । निरीश्वरवाद प्रतिपादूनी । चक्रपाणि बोलतसे ॥७२॥
सत्त्व रज आणि तम । तिहीं गुणीं त्रिविध कर्म । स्थिति उत्पत्ति लय संभ्रम । प्रसवे काम क्षोभोनी ॥७३॥
काम खवळे रजोगुणीं । तेथ दांपत्यभावें अनेक योनि । परस्परें होतां मिळणी । घडे खाणी त्रिजगाची ॥७४॥
सत्त्वगुणें विवेक प्रचुर । परस्परें पडोनि मैत्र । पुष्टि भावे भूतमात्र । स्थिति स्वतंत्र गुणकर्में ॥१७५॥
तमोद्रेकें प्रमादबहळें । विषयस्वार्थीं भेद खवळे । परस्परें विरोधबळें । मग मावळे सहजेंची ॥७६॥
ऐसा स्थिति उत्पत्ति लय । गुणात्मकें कर्म होय । तरी इंद्र ईश्वर येथें काय । आम्हां भजनीय केंउता ॥७७॥
रजसा चोदिता मेघा वर्तंत्यंबूनि सर्वतः । प्रजास्तैरेव सिध्यंति महेंद्रः किं करिष्यति ॥२३॥
रजोगुणाच्या क्षोभेंकरून । प्रावृट्काळीं खवळती घन । सर्वत्र वर्षती तें जीवन । तें लक्षण अवधारीं ॥७८॥
समुद्रीं पर्वतीं काननीं महीं । जळ वर्षतां चहूं ठायीं । तेणें जीवन सर्वां देहीं । तरी इंद्रें काय करावें ॥७९॥
धेनूपासूनि पयाचा लाभ । वृथा व्याघ्रीचा समारंभ । वृष्टीकारणें जैं गुणक्षोभ । तरी कां वालभ शक्राचें ॥१८०॥
मही प्रसवे अनेक सस्यें । काननीं होती विविध यवसें । पर्वतीं गुल्मलता वृक्ष आपैसें । सुखसंतोषें वाढती ॥८१॥
नाना पदार्थ रत्नें लवणें । समुद्र वोपी वर्षता घन । येथ इंद्रमखाचें कोण । प्रयोजन मज सांगा ॥८२॥
ताता म्हणसी देवताभजनें । संततिसंपत्ति संरक्षणें । अप्राप्यांची प्राप्ति होणें । याकारणें सुर पूज्य ॥८३॥
न नः पुरो जनपदा न ग्रामा न गृहा वयम् । वनौकसस्तात नित्यं वनशैलनिवासिनः ॥२४॥
तरी त्या प्रजा बहुतां परी । भजती योगक्षेमानुसारीं । पुरीं पट्टणीं ग्रामीं नगरीं । गृहव्यापारीं हव्यास ॥८४॥
आम्ही नागर ना ग्रामवासी । अथवा न फिरों देशोदेशीं । नित्य आम्हां वनौकसांसी । गिरिवनवासीं नांदणुक ॥१८५॥
ज्यांचें जीवन ज्यांपासून । तेंचि पूज्य त्यांलागून । तस्मात् गोधनगिरिकानन । पूज्य पावन आम्हांसी ॥८६॥
तस्माद्गवां ब्राह्मणानामद्रेश्चारभ्यतां मखः । य इंद्रमखसंभारास्तैरयं साध्यतां मखः ॥२५॥
या कारणास्तव ताता । हेंचि कर्तव्य आम्हां समस्तां । धेनुविप्रार्चनें तत्त्वता । सिद्धि सांगता यज्ञाची ॥८७॥
धेनुब्राह्मणपूजनात्मक । गोवर्द्धनाख्य जो कां मख । आतांचि आरंभिजे सम्यक् । नंदप्रमुखसमस्तीं ॥८८॥
विधिविधान येथ कैसें । जाणों इच्छिजेल मानसें । तरी ऐका तें होय तैसें । निजसंतोषें मम मुखें ॥८९॥
निगमागमप्रकाशक । तो हा प्रत्यक्ष यदुनायक । स्वमुखें संशी अद्रिमख । विधिपूर्व तो ऐका ॥१९०॥
इंद्रयागाचे संभार । तिहींच साधिजे हा अध्वर । पांचां श्लोकीं नंदकुमर । तो विस्तार निरूपी ॥९१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP