अध्याय २४ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - भगवानपि तत्रैव बलदेवेन संयुतः । अपश्यन्निवसन् गोपानिंद्रयागकृतोद्यमान् ॥१॥
भुसूर म्हणिजेत ते ब्राह्मण । त्यांचा भंगूनि क्रियाभिमान । आतां स्वर्गींचे सुरगण । त्यांचा अभिमान भंगितसे ॥२८॥
अमरपति जो पुरंदर । त्याचा निवारूनि अध्वर । करी गर्वाचा परिहार । तो विस्तार अवधारा ॥२९॥
सतीसान्निध्यें ब्राह्मणांसी । चित्तशुद्धीच्या प्रकाशीं । कृष्णमहिमा प्रतीतीसी । आलिया कंसासि ब्याहाले ॥३०॥
जावया श्रीकृष्णदर्शना । धीर नुपजेचि ब्राह्मणा । मग निजाश्रमींच कृष्णभजना । करीत दुर्जना भिऊनी ॥३१॥
श्रीकृष्णही तेचि क्षणीं । व्रजीं असतां गोपपणीं । देखता झाला आपुले नयनीं । गोपांलागूनि उद्युक्त ॥३२॥
धरिलें कंसभय ब्राह्मणीं । कृष्ण निर्भय ऐश्वर्यगुणीं । अमरां क्षोभवी अवगणूनी । मख रोधूनि शक्राचा ॥३३॥
षड्गुणैश्वर्यसंपत्तिमंत । संकर्षणेंशीं समवेत । व्रजीं वसतां गोप समस्त । उद्योगवंत देखतसे ॥३४॥
उद्योग म्हणाल कैसा काय । इंद्रक्रतूचा उपाय । द्रव्यदक्षिणा विप्रवर्य । स्थानमानादि योजना ॥३५॥
ऐसें देखोनि चक्रपाणि । ऐश्वर्य लपवूनि बाळपणीं । करी शैशवसंपादणी । लीलाचरणीं चिन्मात्र ॥३६॥
तदभिज्ञोऽपि भगवान् सर्वात्मा सर्वदर्शनः । प्रश्रयावनतोऽपृच्छद् वृद्धान्नंदपुरोगमान् ॥२॥
त्यांचिया उद्योगाचें तत्त्व । जाणें ऐसें अभिज्ञत्व । असोनि लपवी जो महत्त्व । नाट्यलाघव प्रकटूनी ॥३७॥
भूत भविष्य वर्तमान । अबाधित त्रिकालज्ञ । यालागीं तो सर्वदर्शन । साक्षी सर्वज्ञ सर्वात्मा ॥३८॥
ऐसा असोनि बाळपणें । समर्याद अंतःकरणें । परम नम्र करी पुसणें । कलभाषणें मन मोही ॥३९॥
नंद सुनंद उपनंद । वृषभानादि गोपवृंद । मुख्य जे जे बल्लववृद्ध । पुसे मुकुंद तयांसी ॥४०॥
कथ्यतां मे पितः कोऽयं संभ्रमो व उपागतः । किं फलं कस्य चोद्देशः केन वा साध्यते मखः ॥३॥
कृष्ण म्हणे अहो ताता । कोण हा संभ्रम तुमच्या चित्ता । आजि आठवला तत्त्वता । तत्कार्यार्था उद्युक्त ॥४१॥
म्हणाल वृथा संभ्रम नोहे । कोणी एक हा यज्ञ आहे । तेणें करूनि जें फल होये । तें मज स्नेहें निरोपा ॥४२॥
येथ प्रधानदेवता कोण । कोण अधिकारी यजमान । मंत्र तंत्र द्रव्यसाधन । कैसें कोण निरोपा ॥४३॥
एतद् ब्रूहि महान्कामो मह्यं शुश्रूषवे पितः । न हि गोप्यं हि साधूनां कृत्यं सर्वात्मनामिह ॥४॥
श्रवणेच्छा मजकारणें । म्हणोनि तुम्हीं हें बोलणें । जैसें जैसें प्रार्थिलें प्रश्नें । तें तें कथणें भो ताता ॥४४॥
हें सविस्तर परिसावयासी । मोठा अबिलाष मम मानसीं । महामनोरथें उद्योगासी । तुम्हां सर्वांसी प्रवृत्ति ॥४५॥
कांहीं कार्यावांचूनि प्राणी । न प्रवर्तती कर्माचरणीं । कोण कामना अंतःकरणीं । तें मजलागूनि निरूपा ॥४६॥
ऐसें पुसतां यदुनायक । मौन धरूनि ठेला जनक । तयाप्रति प्रासंगिक । सकौतुक हरि बोले ॥४७॥
सर्वात्मकत्वें ज्यांची दृष्टि । अभेदभावना ज्यांचे पोटीं । ऐसे धन्य साधु सृष्टीं । ते काय गोष्टी लपविती ॥४८॥
विश्वीं पाहती आपणांसी । गोप्य करिती कोणापाशीं । म्हणोनि साधु समचित्तांसीं । निज कृत्यासी न झांकवे ॥४९॥
मी तंव तुमचें निज लेंकरूं । पुसावयाचा मज अधिकारू । तुम्हीं नये गोप्य करूं । कांहीं विचार मजपुढें ॥५०॥
येथ या उद्योगाच्या ठायीं । मजशीं गोप्य न कीजे कांहीं । साधु सर्वात्मकत्वें पाहीं । कृत्य कोणाही न वंचिती ॥५१॥
अस्त्यस्वपरदृष्टीनाममित्रोदास्तविद्विषाम् । उदासीनोऽरिवद्वर्ज्य आत्मवत्सुहृदुच्यते ॥५॥
ज्यासि नाहीं आपपर । जे नेणती मित्रामित्र । उदासीन का स्नेहपात्र । नेणती सर्वज्ञ जे द्वेष्टा ॥५२॥
ऐशी समान दृष्टि ज्यांची । प्रकट सर्व कृत्यें त्यांचीं । सर्वात्मा तो कोणा वंची । स्थिति साधूंची हे सहज ॥५३॥
भेदही असतां बहुतापरी । विवरूनि पाहतां विचारचतुरीं । गोप्य करणीय कृत्य जरी । तरी निर्धारीं विवरिजे ॥५४॥
अमित्र द्वेष्टा कीं उदासीन । विचारीं वर्ज्य परकीय म्हणोन । सुहृद आप्तत्वें समान । त्यांसि गोपन न करावें ॥५५॥
सुहृद वुद्धिकुशल आप्त । मिळोनि मंत्र विवरिजे गुप्त । स्वबुद्धि प्रवर्तती जे दृप्त । त्यांसी प्राप्त फळ नोहे ॥५६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP