य एवं विसृजेद्धर्मं पारंपर्यागतं नरः । कामाल्लोभाद्भयाद् द्वेषात्स वै नाप्नोति शोभनम् ॥११॥

ऐसे वृद्ध पूर्वापर । करीत आले जो अध्वर । त्यातें टाकील जो कां नर । कामी तत्पर होत्साता ॥७६॥
विषयकाम पुरवावया । प्रवर्तोनि स्वधर्मक्रिया । अव्हेरितां दुःखालया । नांदावया पवाडे ॥७७॥
कीं द्रव्याचा लोभ धरी । पूर्वधर्मातें अव्हेरी । तेणें बुडे दुःखसागरीं । न पवे परतीरीं सुखाच्या ॥७८॥
अथवा कायक्लेशभयें । धर्म जो का पारंपर्य । विसर्जूनि मोकाट होय । तो न लाहे कल्याण ॥७९॥
अथवा विपरीत प्रारब्धगति । देव आम्हां जो कां न पवती । म्हणोनि द्वेषें धर्म त्यजिती । ते पावती दुःखातें ॥८०॥
कामें लोभें भयें द्वेषें । पूर्वधर्मावरी जो रुसे । त्यास कल्याण प्राप्त नसे । भोगी अवदशे विमुखत्वें ॥८१॥
जो धर्मासि विमुख झाला । स्वप्नीं कल्याण विमुख त्याला । म्हणूनि आम्हां समस्तांला । न वचे त्यजिला कुळधर्म ॥८२॥
यथाशास्त्र नंदवचन । वृद्धापरंपरा मान्य । ऐकोनि तोषला जनार्दन । परी हृदयीं आन अभिप्राय ॥८३॥

श्रीशुक उवाच - वचो निशम्य नंदस्य तथान्येषां व्रजौकसाम् ।
इंद्राय मन्युं जनयन् पितरं प्राह केशवः ॥१२॥

शुक म्हणे गा गोत्रापति । नंद बोलिला जे रीती । तैसेंच गोपवृद्धीं समस्तीं । कृष्णाप्रति प्रशंसिलें ॥८४॥
कृष्णें ऐकोनि नंदोक्तीस । तैसेंच समस्तांचिया वचनास । परिसोनि झाला परमतोष । अन्योद्देश तथापि ॥८५॥
इंद्रासि उपजावया क्रोध । बोले जनकेंशीं प्रसिद्ध । नानायुक्ति हेतुवाद । जें विरुद्ध पूर्वोक्ती ॥८६॥
इंद्रासि क्रोध उपजवणें । स्वसामर्थें प्रसंग तेणें । गर्व परतोनि उतरवणें । याचि कारणें व्यंगोक्ति ॥८७॥
येर्‍हवीं परंपरागतधर्म । सहसा न खंडी पुरुषोत्तम । इंद्रमदभंगाचा काम । धरूनि विषम प्रतिपादी ॥८८॥
इंद्रासि क्रोधाचा उद्भव । शीघ्र होय तो धरूनि भाव । बोले पितरेंशीं केशव । तें सदैव परिसोत ॥८९॥

श्रीभगवानुवाच :- कर्मणा जायते जंतुः कर्मणैव प्रलीयते ।
सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते ॥१३॥

कृष्ण म्हणे अहोजी जनका । कां पां भजिजे इंद्रादिकां । कर्मेंचि पाविजे सुखदुःखा । कर्म भयशोका दायक ॥९०॥
कर्में करूनि जंतु जन्मे । पुढतीं कर्मेंच करूनि निमे । सुखें दुःखें भयें क्षेमें । अवघीं कर्में संपादी ॥९१॥
कर्मेंचि जन्म स्थिति लय । सुखदुःखें कां क्षेमभयें । इत्यादि अवघें कर्मचि विये । तरी इंद्रादि काय भजोनी ॥९२॥
स्नानीं पानीं प्रक्षाळणीं । अथवा पचनादि अन्योपकरणीं । सामर्थ्य असतां गंगावनीं । तरी मृगांभशिराणी किमर्थ ॥९३॥
ताता आशंका जरी तूं घेसी । कर्म जडें एकदेशी । केंवि देती फळसिद्धीसी । तरी येविशीं ऐकावें ॥९४॥
चलन वलन आकुंचन । उत्क्षेपण अपक्षेपण । पंचविध कर्म म्हणोन । कीजे कथन नैयायिकीं ॥९५॥
वायुवेगें वस्त्र उडे । लांब पसरे गगनीं मुरडे । ऊर्ध्व चढोनि मागुतें पडे । कर्में जडें तेंवि म्हणती ॥९६॥
अहो हें आश्चर्य केवढें । न वचोनि मीमांसा उजियेडें । खद्योत स्वमत तेज गाढें । सूर्यापुढें प्रकाशिती ॥९७॥
जलप्राशनें तृषाहरण । येथ फलद ईश्वर कोण । तस्मात्कर्मचि फळाचें कारण । प्रकट जाण असतांही ॥९८॥
करणी करितां कर्माचरण । सिद्धि पावे अन्नादि पवन । तद्भोक्तृत्वें इंद्रियगण । षटुतर पूर्ण तत्कर्मीं ॥९९॥
ऐसें बोधा आलें असतां । सांगा काय अनुपपन्नता । कर्मासि जडत्व आणि फलदाता । ईश्वर म्हणतां न लाजावें ॥१००॥
तथापि ताता ऐसें म्हणसी । जीव अज्ञान एकदेशी । तो स्वकर्मसंग्रहासी । केंवि संरक्षी भवनिधनीं ॥१॥
अनिष्ट इष्ट मिश्र कर्म । फलही उत्तम मिश्र अधम । जीव अज्ञान केंवि हें कर्म । जाणे सुगम प्राप्तीचें ॥२॥
यालागीं भावें ईश्वरासी । भजतां अधर्म मिश्र निरसी । उत्तम सत्कर्में संरक्षी । मग भोगासि नियोजी ॥३॥
तरी हें वायांचि म्हणणें ताता । ईश्वर कर्माचा फलदाता । होऊनि उठवाठेवी करितां । लिप्त होता मग तोही ॥४॥

अस्ति चेदीश्वरः कश्चित् फलरूप्यन्यकर्मणाम् । कर्तारं भजते सोऽपि न ह्यकर्तुः प्रभुर्हि सः ॥१४॥

जरी ईश्वर असतां कोणी एक । अन्य जीवाचा कर्मपरिपाक । तोही तत्कर्मचि दायक । न्यून अधिक न करितां ॥१०५॥
अकर्ता जो जीव आहे । त्यासि कर्मजनितें भोग समूहें । गोवावया समर्थ नोहे । ईश्वर तोही प्रभुत्वें ॥६॥
अनिष्ट मिश्र ईश्वर मोडी । तरी उत्तमचि पावतें वाढी । अनेक योनींची घडामोडी । कोणे प्रौढी वाढती ॥७॥
तस्मात्कर्मांचे संस्कार । अनिष्ट इष्ट आणि मिश्र । कर्मेंचि घेऊनि अंकुर । कर्मांकार प्रसवती ॥८॥

किमिंद्रेणेह भूतानां स्वस्वकर्मानुवर्तिनाम् । अनीशेनान्यथा कर्तुं स्वभावविहितं नृणाम् ॥१५॥

तरी इंद्रें येथ काय करणें । कर्मावांवूनि सामर्थ्यहीनें । अजागळस्तनांचें जिणें । उपयोगें विणें न शोभे ॥९॥
आपुलाल्या कर्मानुसार । येथ भूतांचा व्यवहार । अन्यथा करूं न शके इंद्र । विवितविहार कर्माचा ॥११०॥
कर्त्यासि जें ईप्सिततम । त्यासि वैयाकरणी म्हणती कर्म । तो व्याक्यविभक्तियोजनक्रम । कर्ताकर्मयादि ॥११॥
जेथ प्रथमांतकर्ता होय । तो द्वितीयान्त कर्म पाहे । तदनुरूप क्रियाठाय । दशलकारीं निर्दिष्ट ॥१२॥
तृतीयांत कर्ता जरी । तैं प्रथमांत कर्म निर्धारीं । ऐशा विभक्ति परोपरी । सुप्तिङ्तीं कारकें ॥१३॥
एवं कर्ता कर्म क्रिया । अवघी शब्दांची प्रक्रिया । वैयाकरणमतकर्तया । प्रेरावया असमर्थ ॥१४॥
उपासनाकांडींचा नेम । कर्तया प्रेरक होय कर्म । तें कर्म प्रवृत्तीचें वर्म । देवताप्रेमउपयोगें ॥११५॥
म्हणोनि इंद्रादिदेवताभजन । कर्मप्रवृत्तीसी कारण । ऐसें ताता सहसा न म्हण । स्वभावजन्य तें अवघें ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP