भद्रकालीं समानर्चुर्भूयान्नंदसुतः पतिः । उषस्युत्थाय गोत्रैः स्वैरन्योन्याबद्धबाहव्घः ॥६॥

एवं मास संपल्यावरी । महामहोत्साहगजरीं । भद्रकाली यथोपचारीं । अर्चित्या झाल्या सप्रेमें ॥६५॥
व्रतसाङ्गतेकारणें । भद्रकाली महदर्चनें । कुमारिकांहीं विशुद्धमतें । सप्रेमभजनें तोषविलीं ॥६६॥
नंदतनय व्हावा पति । परमाभीष्ट हें वांछिती । यथापूर्व यमुनेप्रति । स्नाना जाती अनुदिनीं ॥६७॥
उषःकाळीं अवघ्याजणी । शौचाचार संपादूनी । गोत्रें म्हणिजे नामग्रहणीं । पाचारूनि परस्परें ॥६८॥
परस्परें बाहु खांदा । घालुनि हर्षें चालती मुग्धा । प्रेमें गाती परमानंदा । श्रीमुकुंदा कृष्णातें ॥६९॥

कृष्णमुच्चैर्जगुर्यांत्यः कालिंद्यां स्नातुमन्वहम् । नद्यां कदाचिदागत्य तीरे निक्षिप्य पूर्ववत् ॥
वांसासि कृष्णं गायंत्यो विजह्रुः सलिले मुदा ॥७॥

श्याम राजीवलोचन । रूपरेखा ठाणमाण । वदनमूर्ती मनमोहन । गाती कृष्ण सप्रेमें ॥७०॥
नंदयशोदेचा सुत । महदैश्वर्य रमाकांत । रूपलावण्यमन्मथतात । बुद्धिमंत सर्वज्ञ ॥७१॥
पंकजभवभवांचा गुरु । अगाधगुणरत्नाकरु । अतुल अनुपम अपारु । सर्वांतर वेदक ॥७२॥
सुरभूसुरस्रभिगोप्ता । जो तोषद नंदादिआप्तां । तोचि आम्हां विरहतप्तां । निववूं प्राप्तां प्रपन्नां ॥७३॥
वामबाहु वामकर्ण । वक्रभृकुटि देहुडें ठाण । चंचलांगुळीं वाजवी वेणु । गोपीमोहन गोविंद ॥७४॥
ऐशा गाती उच्चस्वरीं । गांधारादि निषादवरी । पदोपदीं सप्रेमगजरीं । पंचमस्वरीं पिककंठ्या ॥७५॥
भूमीवरी न्यसितां पदें । नेणती हरिगुनगायनवेधें । यमुनास्नानार्थ अनुदिनीं छंदें । परमानंदें त्या जाती ॥७६॥
ऐशा संपूर्ण मासावरी । यमुनातीरीं पूजिती गौरी । जो गौरीचें अभ्यंतरीं । तो मुरारि तुष्टला ॥७७॥
लभते च ततः कामान् । गीते सप्तमाध्यायीं भगवान् । बोलिला तो भक्तिसंपन्न । गोपी देखोन तोषला ॥७८॥
कात्यायनीच्या पूजनें । अभीष्ट वांछिती गोपीमनें । तें द्यावया जगज्जीवनें । लीलाविंदान आदरिलें ॥७९॥
जो कोण्ही एक हरिवरदाचा । दिवस उदेला सोनियाचा । जिये दिवशीं हरिकृपेचा । अमृतघन ओळला ॥८०॥
तये दिवशीं यथापूर्व । शौचाचार सारूनि सर्व । घेऊनि सामग्री पूजनार्ह । जाती अपूर्व हरितोषा ॥८१॥
ऐशा व्रतस्था व्रजकुमारी । यथापूर्व यमुनातीरीं । वस्त्रें ठेऊनि जलांतरीं । हरिगुणगजरीं प्रवेशल्या ॥८२॥
श्रीकृष्णातें गाती वदनीं । कृष्णरूप पाहती नयनीं । कृष्ण रुचला ध्यानीं मनीं । वेधें कामिनी कृष्णमय ॥८३॥
श्रीकृष्णाची श्यामलतनु । तेचि भावूनि यमुनाजीवन । वेधें देती आलिंगन । म्हणती श्रीकृष्ण कवळिला ॥८४॥
जीवनीं बिंबलीं आपुलीं वदनें । कृष्णवेधें देती चुंबनें । सर्वेंद्रियें प्रांजळपणें । कृष्णार्पणें अर्पिती ॥८५॥
कृष्ण सांपडला एकांतीं । आतां स्वेच्छा भोगा रति । कायशी हरिविरहाची खंती । आम्हां श्रीपति तुष्टला ॥८६॥
कृष्णविलास विस्तीर्ण । म्हणोनि क्रमिती रविजावन । श्रीकृष्ण अगाध म्हणोन । होती निमग्न हरिरूपीं ॥८७॥
एकीपुढें एकी पळती । एकीमेकींतें आकळिती । तेणें छंदें हरिगुण गाती । सलिलीं विहरती स्वानंदें ॥८८॥

भगवांस्तदभिप्रेत्य कृष्णो योगेश्वरेश्वरः । वयस्यैरावृतस्तत्र गतस्तत्कर्मसिद्धये ॥८॥

भूत भविष्य्त वर्तमान । यांचे उदय अस्तमान । ज्यामाजीं तो श्रीभगवान । सर्वीं सर्वज्ञ सर्वगत ॥८९॥
सर्वांचिये हृदयदेशीं । नांदे उभयप्रतीतीशीं । यालागीं जाणोनि भविष्यासी । अपयशासी अस्पृष्ट ॥९०॥
कालानुरूप अर्थज्ञान । हृसवृद्धींसी कारण । ज्याच्या प्रकाशें प्रकाशमान । श्रीसंपन्न कीं ना तो ॥९१॥
ज्याचे श्रीसि नाहीं ह्रास । तोचि आश्रय औदार्यास । ज्याचे ज्ञानीं याचा वास । तो उदास म्हणिजे ना ॥९२॥
भूत भविष्य वर्तमान । म्हणाल जाणती दैवज्ञ । तरी तेचि म्हणावे सर्वज्ञ । हा अनुमान नाथिला ॥९३॥
दैवज्ञ जीवकर्मतंत्र । त्यांवरी कर्माचा बलात्कार । यालागीं ऐश्वर्यें ईश्वर । कृष्ण स्वतंत्र भगवान ॥९४॥
म्हणोनि जाणे सर्वांतर । साङ्ग असाङ्ग प्रकार । कुमारींचा व्रताचार । साङ्ग अच्छिद्र जाणोनी ॥९५॥
त्यांच्या कर्माची फलसिद्धि । अर्पावया कृपानिधि । लीलाविनोदें योजी बुद्धि । मन्मथआधिशमनार्थ ॥९६॥
यमुनाजळीं वस्त्ररहिता । कृष्णप्रेमें गोपी निरता । संवगडियांशीं रमाभर्ता । झाला येता ते ठायीं ॥९७॥
योगी नाना योगाभ्यासीं । श्रमोनि पावती सिद्धीसी । ज्यापासूनि तो हृषीकेशी । ऐश्वर्येंशीं योगीश ॥९८॥
गोपकुमारीं बहुताजनीं । कृष्णैकांत वांछिती मनीं । त्यांची पुरवावया आयणी । जो बहुपणीं हों जाणे ॥९९॥
हें तों रासक्रीडाकाळीं । प्रकट दावील श्रीवन्माळी । सूचनार्थ नृपाजवळी । शुक ये वेळीं बोलिला ॥१००॥

तासां वासांस्युपादाय नीपमारुह्य सत्वरः । हसद्भिः प्रहसन् बालैः परिहासमुवाच ह ॥९॥

कृष्णप्रेमें जलांतरीं । गोपी क्रीडतां स्वानंदगजरीं । वस्त्रें घेऊनि कदंबावरी । वेंघे मुरारि सवेग ॥१॥
देखोनि कृष्णाचें लाघव । कौतुकें हांसती गोप सर्व । तयांसहित वासुदेव । हास्य करीत होत्साता ॥२॥
गोपकुमारींशीं विनोदवचन । हांसोनि बोले मधुसूदन । शब्दलाघवें मनमोहन । वेधी तनुमन अबलांचें ॥३॥

अत्रागत्याबलाः कामं स्वं स्वं वासः प्रगृह्यताम् । सत्यं ब्रवाणि नो नर्म यद्यूयं व्रतकर्शिताः ॥१०॥

सस्मित वदनें जगज्जीवन । म्हणे अबला हो ऐका वचन । सहसा नव्हे प्रतारण । न मना गौण उपहास ॥४॥
तुम्ही व्रतस्था तपस्विनी । श्रांता व्रतनियमेंकरूनी । यालागीं यथार्थ माझी वाणी । उपहास म्हणोनि न गणावी ॥१०५॥
वयें धाकुटीं हांव मोठी । काय कामना असे पोटीं । ते सफळ माझिये दृष्टीं । बांधा गांठी शकुनाची ॥६॥
आंगीं असोनि बाल्यावस्था । झालां दृढनियमें व्रतस्था । एकभक्ता शीतार्दिता । अतिश्रमिता चिरकाळ ॥७॥
यालागीं विनोद सहसा न करीं । सत्य मानूनि मग वैखरी । अवघ्याजणी या बाहेरी । शंका दुरी ठेऊनी ॥८॥
आपुलालीं यथासुखें । वस्त्रें घ्या हो निजहस्तकें । प्रत्ययार्थ प्रांजळसुखें । पुढतीं कौतुकें हरि बोले ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP