अध्याय २२ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीकृष्णदयार्णवः प्रसन्नः ।
ॐ नमो गोपीमानसहरणा । सप्रेमविरहप्रवर्धना । कृपाकटाक्षें करूनि करुणा । स्वपादशरणा उद्धरिसी ॥१॥
परब्रह्म जें निर्धिकार । करूनि चित्शक्ति अंगिकार । तोचि सगुण प्रणवांकुर । ईश्वर गुरु विश्वाचा ॥२॥
तेथूनि सबळमायायोग । गुणत्रयात्मक विविध जग । भासवूनि दृश्य वाउगें तेथ निजांगें अभिरमसी ॥३॥
परी तो अनंत मायारोळ । ज्यामाजीं असंख्य ब्रह्मांडगोळ । होती जाती एवढा काळ । तव निहाळ न भरतां ॥४॥
जेंवि लचकलियाची दिठी । रज्जुसर्पादि विवर्तकोटी । हर्षशोका आणिती भेटी । यथार्थ पोटीं उमजे तो ॥५॥
तेंवि विश्वाकारें आभासोन । तादात्म्य अवलंबी चैतन्य । तेंचि ठसावें विपरीत ज्ञान । भोगी भवभान नाथिलें ॥६॥
तेव्हां आपुलिये सोडवणें । पूर्णप्रबाधें आविर्भवणें । करूनि गुरुत्वें धांवणें । विपरीत निरसणें नाथिलें ॥७॥
त्या तुज नमोजी गोविंदा । इंद्रियवृत्ति गोपीप्रमदा । विषयीं रमोनि पावल्या खेदा । जाणोनि आनंदा ओपिसी ॥८॥
अहो चुकोनि चोखी मान । त्या वत्सातें दाविता स्तन । प्रतीति येतां अमृतपान । होय संलग्न ज्यापरी ॥९॥
गोपी म्हणिजे तैसी करणें । विषयाभा तैशीं शिणलीं शीणें । त्या तुवां वेधितां स्वानंदघनें । विपरीत स्मरणें सांडविलीं ॥१०॥
मग त्या वियोगें विह्वळ । संयोगार्थ सप्रेमळ । इये अधिकारदशेचें मूळ । कृपा केवळ पैं तुझी ॥११॥
ऐसे जे कां स्वपादशरण । करिसी स्ववेधें लांचवून । मग त्यां न रुचेचि विषयभान । तैं उद्धरणें सहजेंची ॥१२॥
ऐशिया स्वामी प्रणतपाळा । पूर्णकृपेचा जिव्हाळा । ओपूनि वाढवी मज बाळा । गुणगणमाळाग्रथनार्थ ॥१३॥
हें ऐकोनि करुणावंत । म्हणती चालवीं आरब्धग्रंथ । कैसें कात्यायनीव्रत । गोपी समस्त आचरल्या ॥१४॥
श्रवणीं सादर महानुभाव । त्यांचे चरणीं धरूनि भाव । ये अध्यायीं यादवराव । करी अपूर्व जें चरित ॥१५॥
शुकोक्तीवरूनि तें वाखाणीं । ऐशी वदतां प्रभूची वाणी । हर्षें माथा ठेवूनि चरणीं । आज्ञा मूर्ध्नी वंदिली ॥१६॥
कृपामृताची मंदाकिनी । अपांगपातें उचंबळोनी । दयार्णवगर्ता प्रज्ञानिम्नीं । सांठवूनी राहिली ॥१७॥
संवादमथनीं तेथींचीं रत्नें । श्रोतीं श्रवणीं लेइजेत यत्नें । क्षणैक बैसोनि सावधमनें । इतुकें प्रार्थणें सेवेसी ॥१८॥
श्रीकृष्णप्राप्तीचीं कारणें । कात्यायनीव्रताचरणें । सप्रेम कृष्णीं जडलीं मनें । निःसीमपणें गोपींचीं ॥१९॥
त्यांहीं ऐकोनि वेणुगीत । जाल्या हरिविरहें संतप्त । परस्परें कृष्णचरित । एकविसांत त्या वदल्या ॥२०॥
हें जाणोनि सर्ववेत्ता । सफल करावया त्यांचिया व्रता । लीलाविनोदें उदारचरिता । करी तें आतां परिसावें ॥२१॥
इतुकें कथेचे अवसानीं । संपली द्वितीय एकादशिनी । जे हे परीक्षितीचे कानीं । घाली शुकमुनि तें ऐका ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP