स्त्रीशूद्रद्विजबंधूनां त्रयी न श्रुतिगोचरा । कर्मश्रेयसि मूढानां श्रेय एवं भवेदिह ॥१७॥

वेदत्रयीचिया श्रवणीं । अनधिकार ज्यांलागूनि । स्त्रीशूद्रादि सामान्ययोनि । भवनिस्तरणीं असमर्थ ॥२१॥
त्यांचा लक्षूनि तरणोपाय । महाभारत पंचाम्नाय । तदुदित भवनिस्तरणीं सोय । दाविली स्वयें श्रीव्यासें ॥२२॥
परंतु व्यासास समाधान । न होतां झाला मनसोद्विग्र । तेणें सरस्वतीजीवन । स्पर्शोनि आसन घातलें ॥२३॥
तेथ नारद अकस्मात । येऊनि बोधिला वृत्तांत । जें कां श्रीमद्भागवत । जाणोनि चेष्टित व्यासाचें ॥२४॥
मूळ ब्रह्मोक्ति विवरून । अठरा सहस्र संहिताग्रथन । श्रुति पुराणें स्म्रुतिनिर्मथन । केलें निवडून भागवत ॥१२५॥
युगकालादि स्थल निमित्य । व्यासजन्म - ग्रंथकृत्य । प्रश्नानुरूप कथिलें तथ्य । परीक्षितिवृत्तांत तो ऐका ॥२६॥
विराटाची उत्तरा कुमारी । अभिमन्युवीर्यें तिच्या जठरीं । परीक्षिति नामा महा क्षत्री । जन्मला श्रीहरिगोपनें ॥२७॥
द्रौण्यस्त्राग्नि जाळितां जठरीं । तेथ रक्षिता झाला श्रीहरि । विष्णुरात या नामोच्चारीं । त्यातें द्विजवरीं पूजिलें ॥२८॥
विराटपौत्री उत्तरकन्यां । इरा नाम्नी वरांगना । तिचे जठरीं चौघांजणां । पुत्ररत्नां निर्मिलें ॥२९॥
अश्वमेध अव्याहत । गंगातटीं दक्षिणायुक्त । त्रिवार केले जगद्विख्यात । तो प्रतापवंत परीक्षिति ॥१३०॥
जेणें धुंडूणि भूमंडळीं । स्वऐश्वर्यें जिंकूनि कलि । द्यूतमद्यादि व्यसनमेळीं । आज्ञेतळीं रोधिला ॥३१॥
परीक्षितिशासन भूमंडळीं असतां उघड न शके कलि । त्या नृपाचिया निर्याणकाळीं । कथा वर्त्तली ते ऐका ॥३२॥
कोण एके दिवशीं भूप । सज्जमुष्टि कवळूनि चाप । मनीं धरूनि मृगयाटोप । चालिला प्रतापमार्तंड ॥३३॥
सेना सानुग सांडूनि मागें । वनीं धांवतां मृगानुलागें । क्षुधेतृष्णेच्या प्रवळ वेगें । नृपाचीं अंगें व्यापिलीं ॥३४॥
सर्वांग तापलें भास्करकरीं । ओष्ठ शुष्क जेवीं काचरी । श्रमतां आश्रम देखिला दूरी । त्वरें त्याभीतरीं प्रवेशला ॥१३५॥
तेथ देखिला योगासनीं । अंगिरसप्रवर शमीक मुनि । इंद्रियग्राम निरोधूनि । अंतर्लोचनी जितप्राण ॥३६॥
जागृत्यादि अवस्थात्रय । लंघूनि आश्रयिली तुरीय । तेथ परिपक्क स्वप्रत्यय । अविक्रिय ब्रह्मत्वें ॥३७॥
जटा मोकळ्या शरीरावरी । रुरुमृगाजिनकृतोत्तरी । ऐशिया मुनीतें देखोनि नेत्रीं । नृप सत्वरीं जल ॥३८॥
तंव तो ब्रह्मसुखीं निमग्न । नृपा नेदेच प्रतिवचन । रायें मानूनि आत्महेलन । कृतापमानें क्षोभला ॥३९॥
जन्मादारभ्य ब्राह्मणावरी । क्षोभ नुपजे नृपांतरीं । तो तेथ क्षुधेतृषेच्याभरीं । क्रोधवैरी संचरला ॥१४०॥
म्हणे मी राजा सार्वभौम । जरि हा झाला ब्राह्मणोत्तम । तथापि उचित आश्रमधर्म । करणें निगमप्रतिपाद्य ॥४१॥
तृणपर्णादि आसनसिद्धि । फलमूलादि पूजनविधि । जलमात्राची अनुपलब्धि । कपटबुद्धि ध्यानस्थ ॥४२॥
नीच मानूनि क्षात्रवर्ण । नेदूनि आसनजलसन्मान । उपेक्षेकारणें धरिलें ध्यान । किंवा निर्वाणयोगस्थ ॥४३॥
ऐसें आलेंचि अंतःकरणीं । तंव मृतसर्पाचें शरीर धरणी । आश्रमासमीप देखोनि नयनीं । नृपें निजमनीं विवरिलें ॥४४॥
जरि या मुनीचें साचार ध्यान । तरी या न स्मरे देहभान । कृत्रिम असतां उघडील नयन । भयें त्रासोन सर्पाच्या ॥१४५॥
ऐसें विवरूनि मानसांत । धनुष्याग्रें पन्नगप्रेत । मुनीचे कंठीं घालूनि त्वरित । निघे परिश्रांत भूपति ॥४६॥
भूप गेलिया आश्रमीहून । शृंगीनामा मुनिनंदन । अर्भकांमाजी क्रीडतां पूर्ण । विस्मय करून बोलिला ॥४७॥
जनकाकंठीं सर्पप्रेत । घालूनि गेला धरित्रीनाथ । हें ऐकूनि विषादवंत । म्हणे अद्भुत अनय हा ॥४८॥
सर्पकलेवर घालूनि गळां । स्पर्शें दूषिलें पुण्यशीळा । ऐसें अनुचित क्षत्रियकुळा । कीं भूपाळा अकरणीय ॥४९॥
अधर्मरूपी धरित्रीपाळ । अनार्त्य वृथापुष्ट केवळ । स्वामीद्रोही कुटिल खळ । ग्रामशार्दूळ ज्यापरी ॥१५०॥
दास स्वामीसि दंडूं धांवे । कीं पोषिलें श्वान डसों झेंपावें । तेवीं नृपांहीं दुष्टभावें । छळण करावें विप्राचें ॥५१॥
ब्राह्मणांहीं द्वारपाळ । आज्ञापूनि केला प्रवळ । तो तद्गृहीं रिघोनि कुटिळ । भांडीं केवळ भक्षूं शके ॥५२॥
ऐसें दुष्ट उत्पथगामी । त्यांसि दंडूनि नियमिता धर्मीं । तो श्रीकृष्ण त्रैलोक्यस्वामी । गेलिया भूमी हे दशा ॥५३॥
आजि मर्यादा लंघी तयातें । मी दंडीन या क्रूर निघातें । पहा माझिया सामर्थ्यातें । म्हणूनि बाळांतें बोलिला ॥५४॥
ऐसें बोलोनि शमीकपुत्र । सक्रोध खदिरांगारनेत्र । कौशिकीचें स्पर्शोनि नीर । शापशस्त्र सोडिलें ॥१५५॥
मर्यादारेखा उल्लंघून । मम जनकाचें केलें छलन । त्यास सप्त दिवसां आजपासून । तक्षक डंखोन मृत्यु हो ॥५६॥
मम जनकांचा द्रोहकर्त्ता । त्या कुलांगारकाचिया घाता । तक्षक प्रेरिला म्यां तत्त्वता । न शके विधाता निवारूं ॥५७॥
ऐसें प्रेरूनि वाग्वज्र । आश्रमा येऊनि शमीकपुत्र । जनककंठीं सर्पगात्र । देखतां नेत्र भयें झांकी ॥५८॥
मग पाहूनि जनकाकडे । धाय मोकलूनि दीर्घ रडे । समाधिअवसानीं श्रवणीं पडे । रुदन निवाडें मुनीच्या ॥५९॥
ऐकूनि स्वपुत्राचें रुदन शमीकमुनीनें उघडिले नयन । कंठींचा मृतसर्प काढून । करी प्रश्न श्रृंगीतें ॥१६०॥
कां पां बालका करिसि रुदन । कोणें अपराध केला कोण । कोणें दुखविलें अंतःकरण । तें मज संपूर्ण निवेदीं ॥६१॥
ऐकूनि जनकाचें उत्तर । म्हणे नृपें अपराध केला थोर । त्यावरी सोडिलें म्यां वाग्वज्र । देखिला अजगर तव कंठीं ॥६२॥
त्या भयें रुदन मी करीं । ऐशी ऐकूनि सुतवैखरी । मुनि खोंचला अभ्यंतरीं । म्हणे अश्लाघ्य परि हे घडली ॥६३॥
अल्प अपराध केला भूपें । त्यासि भस्म केलें शापें । आतां पृथ्वी दाटेल पापें । दस्यु प्रतापें पीडिती ॥६४॥
अपक्कबुद्धीस्तव लेंकुरा । तुवां शापिलें कुरुनरेंद्रा । विष्णूसमान भूपति खरा । असाम्य इतरां मनुजांशीं ॥१६५॥
अराजकी पृथ्वीवरी । कोणी कोणासि न निवारी । जारचोर बळात्कारीं । सदाचारिया जाचिती ॥६६॥
वृत्तिक्षेत्रगोत्रकलह । कांताकांचनलोभमोह । धरूनि पीडिती दुष्टसमूह । भल्याचे देह दुर्वैरें ॥६७॥
कार्तघ्न्य आणि विश्वासघात । वर्णसंकरादि असत्य । इत्यादि पातकें समस्त । नृपघातकामस्तकीं ॥६८॥
धर्मपालक हा नरपति । बृहच्छ्रवा चक्रवर्ती । महाभागवत परीक्षिति । हयमेधयाजी सुशील ॥६९॥
क्षुधातृषार्त्त आला मठा । त्यासि पूजूनि हरिजे कष्टा । की अल्पापराधें ऐशिया श्रेष्ठा । शाप ओखटा हा दिजे ॥१७०॥
अपकबुद्धीस्तव हें पाप । घडलें दुर्घट शापरूप । क्षमा करूनि कंदर्पबाप । करो निष्पाप आम्हांसि ॥७१॥
अनागसाचा अपराध करितां । तेणें प्रतिकारें दंडितां । तुल्यता घडोनि निर्दोषता । लाहे तत्त्वता तद्योगें ॥७२॥
तरी महाभागवत परीक्षिति । शाप नेदीच आम्हांप्रति । विष्णुभक्तांची हे स्थिति । छळितां न करिती प्रतिकार ॥७३॥
तिरस्कारिलें चाळविलें । शापिलें अथवा अवमानिलें । दंडिलें खंडिलें निर्भर्त्सिलें । हरिभक्त भले न कोपती ॥७४॥
ऐसा पुत्रापराधपापें । शमीक तापला परमानुतापें । छळ साहूनि नृपा न कूपे । तपप्रतापें तितिक्षु ॥१७५॥
तंव येरीकडे परीक्षिति । जाऊनि भद्रासनाप्रति । पश्चात्तापें दाटली मति । आठवी चित्तीं अपराध ॥७६॥
महाखेदें म्हणे अहो । निरपराधब्रह्मद्रोहो । केला तो हा माझा देहो । विपत्ति लाहो ये क्षणीं ॥७७॥
पुन्हा ऐशी न होय मति । तैशी घडो शीघ्र विपत्ति । विप्रशापें नृपसंपत्ति । क्षया जाति ते हो कां ॥७८॥
ऐसा करितां पश्चात्ताप । तंव शिष्यें कथिला शृंगीशाप । तक्षकरूपी डंखील सर्प । अवधि अल्प दिन सप्त ॥७९॥
ऐसें ऐकतां शापवचन । तोषलें नृपाचें अंतःकरण । म्हणे तुष्टला श्रीभगवान । विरक्तिकारण योजिलें ॥१८०॥
जनमेजय श्रेष्ठ कुमार । त्यासि देऊनि राज्यभार । प्रजा निरवूनि धरिलें छत्र । मग सत्वर निघाला ॥८१॥
भागीरथीच्या दक्षिणतटीं । आंथरूनिया कुशमुष्टी । प्रायोपविष्ट वैराग्यपुष्टी । विवेकदृष्टि उदड्मुख ॥८२॥
ऐकोनि नृपाचा निर्याणसमय । पातला मुनिवर्यसमुदाय । तीर्थासही जे तीर्थमय । मूर्त्ताम्नाय तपोधन ॥८३॥
अत्रि वसिष्ठ च्यवन अंगिरा । पराशर गाधिज विधाता दुसरा । शरद्वान् भृगु भार्गवप्रवरा । परमशुराम तपोधन ॥८४॥
उतथ्य गौतम अरिष्टनेमी । तपोधन लोपामुद्रस्वामी । देवल इंद्रप्रमदनामीं । मेघातिथी इध्मवाहो ॥१८५॥
आर्ष्टिषेण भारद्वाज । पिप्पलाद कण्व और्व सुतेज । मैत्रेय द्वैपायन तेजःपुंज । त्रिजगत्पूज्य नारदही ॥८६॥
ऐसे देवर्षि ब्रह्मर्षि । महर्षि राजर्षि तपोराशि । अरुणादिक नृपापाशीं । प्रवरशिष्यांशीं पातले ॥८७॥
येतां देखोनि मुनींचा मेळा । परमाल्हाद कुरुनृपाळा । यथोपचारें सन्मान केला । प्रश्न आदरिला याउपरी ॥८८॥
नृप म्हणे आजि आम्ही धन्य । जें तुमच्या अनुग्रहाचें भाजन । येर्‍हवीं परम अधम हीन । गर्हिताचरण आढ्यत्व ॥८९॥
तुमची पूर्ण कृपाब्धिलहरी । तेणें ब्रह्मशापरूपें हरि । मज तुष्टोनि ये संसारीं । विरक्ति अंतरीं ओपिली ॥१९०॥
तेणें दुस्तर संसारमोह । तुटोनि झालों निःसंदेह । यावरी तक्षकरूपें गृह । डंखूनि देह पडो कां ॥९१॥
आतां निर्याणअपेक्षा । ते स्वामीस याचितों भिक्षा । माझी न करूनि उपेक्षा । करूनि शिक्षा बोधिजे ॥९२॥
कर्मनिर्दिष्ट जें लाहीन जन्म । तेथ असो मज भगवत्प्रेम । भगवत्प्रियांचा समागम । सौजन्यधाम सर्वत्र ॥९३॥
इतुकें वांछी माझें मन । देइजे होऊनि सुप्रसन्न । द्विजवर्यांसि हें प्रार्थून । घातलें नमन कुरुभूपें ॥९४॥
तंव अंतरिक्षदुंदुभीघोष । विमानीं देव मानिती तोष । पुष्पें वर्षती अशेष । कुरुनरेशनिर्याणीं ॥१९५॥
मुनिवर म्हणती धन्य राजा । सद्गुणीं समान गरुडध्वजा । कैवल्यपदीं लाविली ध्वजा । पाळूनि प्रजा निर्ममत्वें ॥९६॥

ततश्च वः पृच्छ्यमिमं विपृच्छे विश्रम्य विप्रा इतिकृत्यतायाम् ।
सर्वात्मना म्रियमाणैश्च कृत्यं शुद्धं च तत्रामृशताभिरुक्ताः ॥१८॥

राजा म्हणे ब्राह्मणोत्तमा । आमुचें पुसणें इतुकेंचि तुम्हां । कल्याणार्थ कर्तव्य जन्मा - । पासून कोणतें सांगिजे ॥९७॥
विश्वासपूर्वक निश्चयात्मक । साधिजे जाणोनि भवतारक । विशेष झालिया मरणोन्मुख । जें कां निष्टंक कर्तव्य ॥९८॥
नित्य शुद्ध कलंकरहित । विवेकविचारें मुनिश्चित । तें मज सांगा मुनि समस्त । प्रार्थितों विनीत म्रियमाण ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP