श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णदयार्णवसद्गुरवे नमः ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चंद्रवलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥१॥
जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्येष्वमिज्ञः स्वराट् । तेने ब्रह्म हृदा य आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः ॥ तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा । धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ॥२॥
हरिं विधिं नारदं च दत्तात्रेयं जनार्दनम् । एकनाथं चिदानंदं स्वानंदानंदवर्धनम् । गोविंद सद्गुरुं वन्दे श्रीमत्कृष्णदयार्णवम् ॥३॥
त्रिकालमेककालं वा ये पठन्ति परंपराम् । तेषां विघ्नानि नश्यन्ति सिद्धिं विन्दन्ति शाश्वतीम् ॥४॥

श्रीमत्सच्चिदानंदघन - ।
स्वरूपीं विरूनि भेदभान । अनुभव नुरे अनुभवित्यावीण । अभिन्न नमन एकत्वीं ॥१॥
जेथवरी सत्पदें सत्ता प्रकाशे । चित्पदें चैतन्य विलसे । आनंदपदें सुख उल्हासे । तेथ तेथ मी नमीं ॥२॥
वाच्य अभेदपईं भेद । तैसाचि नमनानुवाद । गणेश सरस्वती गोविंद । सद्गुरु वरद वंदिला ॥३॥
पदत्रयाचा एकगण । वस्तु तेथें जे अभिन्न । तोचि गणेश अभिवंदून । मंगलाचरण ग्रंथार्था ॥४॥
मूलाधारीं ज्याचें स्थान । ग्रंथाधारीं त्या वंदन । स्थूलादि जें महाकारण । चतुर्दलभुवन जयाचें ॥५॥
औट मात्रा औट पीठें । जयाचीं अधिष्ठानें प्रगटें । सृजनकालीं लखलखाटें । आरक्त रंगीं राजस ॥६॥
मुख्य काळाचें जन्मस्थान । तो शककालमूषक गहन । तयावरी सदा आरोहण । गमनागमन न चळतां ॥७॥
माया अविद्या दोन्ही शक्ति । दोहीं भागीं सहज स्थिति । सिद्धिबुद्धि मिरवताति । अगुणगुणीं लावण्यें ॥८॥
सिद्धिपुत्र लक्ष्य स्वयें । बुद्धिपुत्र लोभ होय । दोन्ही ठायीं आनंदमय । यथाधिकारें तव सत्ता ॥९॥
गजपंकजउपमा वदनीं । चार सहा कां सहस्रपाणी । नाना आयुधांचिया श्रेणी । हे अवतारगणीं गुणलीला ॥१०॥
गुण वर्णितां गणना नव्हे । निर्गुणीं शब्दही न संभवे । यालागीं स्तुतिस्तवन हावें । अलंबुद्धि होतसे ॥११॥
तथापि चिदात्मसत्तायोगें । जें जें निर्माण होऊं लागे । तें तें उपयोगानुपयोगें । तुझ्या ठायीं समर्पे ॥१२॥
औषधि वल्ली वृक्ष केले । फळीं पुष्पीं विस्तारले । रोगभोगीं उपचारिले । अथवा गेले नासोनि ॥१३॥
परंतु वारंवार फळती । नाशतोषा नाठवती । तैशी चित्सत्ता वाग्वृत्ति । अनुवादिती बिसाट ॥१४॥
गंगा स्नानीं कां अपानीं । परंतु वाहे निर्मळपणीं । सूर्यप्रकाश अनुष्ठानीं । अथवा शयनीं लोळतां ॥१५॥
तैशी स्वयंभ वाज्ट वाणी । प्रवर्त्तवावी श्रीकृष्णगुणीं । उपयोगानुपयोगाकारणीं । अलिप्तपणीं उत्साह ॥१६॥
भक्तवत्सत्ता फळें औषधी । उपयोग जाणे तो यत्नें साधी । इतर तुडविती पाणेंधी । समानबुद्धि दों ठायीं ॥१७॥
तैशी वाग्वल्ली कृष्णकीर्तनीं । फळली देखोनी वदनवनीं । गुणज्ञ घेती भवरोगहननीं । इतर चरणीं लोटिती ॥१८॥
येथें दोघांसही समान मान । व्यर्थ किमर्थ अभिमान । सामर्थ्यवंत श्रीकृष्णगुण । वीर सज्जन नुपेक्षिती ॥१९॥
सामर्थ्यहीन जैं श्रीकृष्णकीर्ति । तैं कविकवित्वा येकी गति । विफल सफल कृष्णप्राप्ति । व्यर्थ विपत्तिपरिहारु ॥२०॥
कायावाचामनोवर्तन । सहजीं सहज कृष्णार्पण । गणेशसरस्वती सज्जन । मंगलायतन गुरुनाथ ॥२१॥
आतां ग्रंथारंभपीठिका । बोलिजेल सकौतुका । जिणें ग्रंथाचा आवांका । बोधे नेटका श्रोतयां ॥२२॥
सह्याद्रिशिखरीं कृष्णातीरीं । श्रीकरहाटकक्षेत्रोत्तरीं । कोपारूढ नाम नगरी । जेथ नरहरि श्रीयुक्त ॥२३॥
तत्पूजन ग्रामलेखन । दैवज्ञादि धर्माधिकरण । इत्यादिवृत्तिक माध्यंदिन । गोत्र पावन गौतम ॥२४॥
तदन्वयीं शंभुशर्मा । कुशल अखिलवृत्तिककर्मा । त्याचा जो कां औरस आत्मा । यथार्थनामा नारायण ॥२५॥
आश्वलायनीं माध्यंदिनीं । पारग शाखाद्वयाध्ययनी । चतुःशास्त्री विहिताचरणी । निगमदर्शनी विदितात्मा ॥२६॥
तया नारायणापासून । बहिणादेवीचे जठरीं जनन । द्वादशाब्द अश्वत्थसेवन । करितां झालें तद्यत्नें ॥२७॥
आनंदाब्दीं पूर्वरात्रीं । अक्षयतृतीया मृगनक्षत्रीं । तृतीय चरणीं प्रथम प्रहरीं । शुभ वासरीं सुप्रसव ॥२८॥
नामकरणीं नरहरि नामा । ठेवूनि पाळिलें संपूर्ण समा । वत्सरांतीं कैवल्यधामा । बहिणादेवी पावली ॥२९॥
पंचमाब्दी कृतोपनयन । नवप्रवेशीं कृतगोदान । दुंदुभि वत्सरीं करूनि लग्न । जनकें निर्याण स्वीकारिले ॥३०॥
त्यानंतरें जनार्दन । सोदर अग्रज वृत्तिप्रवीण । तेणें केलें तनुपालन । देशोपप्लवआवर्तीं ॥३१॥
शिव भूपति पावतां मुक्ति । दक्षिणे येऊनि ताम्रपति । केली विजयपुरा समाप्ति । महा विपत्ति राष्ट्रातें ॥३२॥
मग सोडूनि कृष्णातीर । भ्रमतां कालचक्रानुसार । आश्रयूनि ठेलों अंबापुर । सपरिवार साग्रज ॥३३॥
तेथ युवाब्दीं करुणासिंधु । भेटला सद्गुरु श्रीगोविंदु । श्रावणवद्याष्टमीस वरदु । कृष्णोपासन निरूपिलें ॥३४॥
कालचक्रें आचारहीन । जठरचिंतनें अभ्यासविहीन । एवं जड मूड अज्ञान । कथिलें संपूर्ण स्वामीसि ॥३५॥
तिहीं पाहन कृपादृष्टीं । म्हणती भजनप्रेम पोटीं । आहे म्हणूनि निष्कपटी । वदसि गोष्टी निजवृत्तें ॥३६॥
येथूनि उर्ज्जित अभ्युदय । सुप्रसन्न वैकुंठराय । तुजपासूनि अभीष्ट कार्य । अमृतप्राय घेईल ॥३७॥
करूनि निरपेक्ष कोरान्न । कृष्णदयार्णवनामस्मरण । स्नानसंध्या गीतापठण । पारायण ज्ञानेश्वरी ॥३८॥
कृष्णदयार्णव दीर्घ वाणी । कोरान्नकाळीं ऐकोनि जनीं । सद्गुरुस्वमुखें जनसज्जनीं । त्याचि अभिधानीं आळविलें ॥३९॥
अंबापुरीची अधिष्ठात्री । योगसिद्धीची जनयित्री । ते वंदूनि योगेश्वरी । नियमाचारीं प्रवृत्ति ॥४०॥
स्वामीचिये परिचर्येसि । ईश्वराब्दीं वाराणसी । सहित उत्तरमानसासि । त्रयाब्दिकीं कृतयात्रा ॥४१॥
दक्षिणमानस त्यानंतरें । सुभानु तारण द्विवत्सरें । पिचुमंदपत्राशनाधारें । पुरश्चर्या सार्धाब्दीं ॥४२॥
सर्वजिताब्दीं द्वारावती । यात्रा संपूर्ण कन्यागतीं । पुन्हा येऊनि स्वाश्रमाप्रति । पूर्वस्थितिनिवास ॥४३॥
महाराष्ट्रचक्रें अंबापुर । विध्वंसितां बिडोजनगर । प्रांतीं सेविलें पिप्पलनेर । कित्येक वासरपर्यंत ॥४४॥
तेथ विकृतिवत्सरीं जाया । मुक्ति पावली त्यजूनि काया । कन्या पुत्र अपत्यद्वया । ठेवूनिया स्वाश्रमीं ॥४५॥
पुढती काश्यपगोत्रोत्पन्ना गुरु आज्ञेनें द्वितीयांगना । खरवत्सरीं करूनि लग्ना । अग्निसेवना आदरिलें ॥४६॥
तेथूनि विलंबीपर्यंत । काळ क्रमिला प्रारब्धजनित । पुढें उदेला प्रसुप्तवात । रक्तपित तुळणेचा ॥४७॥
कित्येक काळ शरीरश्रम । एकनाथ कृपाळु परम । तेणें केला रोगोपशम । देऊनि प्रेम निजभजनीं ॥४८॥
पूर्वीं गोविंदें गयेमाझारीं । कृपामृतें पाहूनि नेत्रीं । भाषाव्याख्यान दशमावरी । वरदोत्तरीं करविलें ॥४९॥
परंतु मानूनि अल्पमति । ग्रथनीं हाव नुपजे चित्तीं । पुढती तेंचि श्रीएकनाथीं । भेषजार्थीं अनुग्रहिलें ॥५०॥

निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतम् ।

निगमकल्पतरूचें फळ । विशेष शुकमुखसुधेचा मेळ । श्रीमद्भागवत परम रसाळ । दशमीं प्रांजळ हरिलीला ॥५१॥
हें सेवितां दिव्यौषध । तोडील अशेष रोग विरुद्द । ऐसा प्रभूचा स्वाप्नानुवाद । कथिला विशद संतांसि ॥५२॥
प्लवंगाब्दीं प्रतिष्ठानीं । एकनाथीं वृंदावनीं । पुण्योत्साहीं सर्वसज्जनीं । आज्ञा केलीं ग्रंथाची ॥५३॥
बाबजी जगन्नाथ रघुनाथ । संततिरूपी जे एकनाथ । आणीकही गुरुभक्त समर्थ । निगमशास्त्रार्थ अभिवेत्ते ॥५४॥
एका शिवराम रामप्रमुख । कृपासुधाकर प्रबोधार्क । यतिवर सगुण सच्चित्सुख । सद्विवेक उपदेष्टे ॥५५॥
इहीं कृपेनें उचंवळोनि । म्हणती तुझिया बोबड्या वचनीं । दशमस्कंधाच्या व्याख्यानीं । सादर श्रवणीं बैसावें ॥५६॥
गोविंद सद्गुरूची हे आज्ञा । विशेष मान्य सर्वां सुज्ञां । श्रीकृष्णवरद स्फुरेल प्रज्ञा । भाषाव्याख्याना निरूपीं ॥५७॥
रोगें शरीर झालें क्षीण । त्यासि औषध भगवद्गुण । श्रीमद्भागवतव्याख्यान । अमृतपूर्ण प्रभुवरें ॥५८॥
करितां पदपदार्थविवरण । भागवतार्थीं रंगतां मन । स्वयेंचि परमामृत होऊन । श्रवणें सज्जन तोषविसि ॥५९॥
यदर्थी भागवताश्रित । ऐकें इतिहास समस्त । प्रथमस्कंधींचा वृत्तांत । परमामृतप्रापक जो ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP