निरंजन स्वामी कृत - अभंग दत्तजन्माचे
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
ॐ नमोजी गुरु स्वामी दत्तात्रया । कृपाळू सखया दीनबंधू ॥१॥
तुझे कीर्तीगूण वर्णाया लागून । इच्छितसे मन माझे बहू ॥२॥
तरि देई मती वदावया वाणी । आनंदाची खाणी प्रगटाया ॥३॥
आयका हो तुह्मी श्रोते संतजन । जन्म सुलक्षण श्रीदत्ताचा ॥४॥
सावित्री आणिक लक्ष्मी पार्वती । एके ठायीं स्थीति जाली होती ॥५॥
अकस्मात आली नारदाची फेरी । विणा स्कंधावरी घेउनीया ॥६॥
देवोनिया त्यातें बैसाया आसन । पुसती वर्तमान त्रैलोकींचें ॥७॥
अहो नारदमुनी त्रैलोक्यभुवनी । आह्मा ऐशा कोणी असती काय ॥८॥
पतिव्रता आणि सर्व सत्ता आंगीं । ऐशा कोणी जगीं असती काय ॥९॥
ऐशा गर्विष्ट पाहे तिघीजणी । बोले नारदमुनी तयांलागीं ॥१०॥
तुमचीयाहुनि श्रेष्ठ कोटीगूण । देखिलीसे जाण पतिव्रता ॥११॥
भूलोकाचे ठायीं अत्रिमुनिजाया । सती अनुसूया नाम तिचें ॥१२॥
तुम्हां ऐशा दासी तिजला शोभती । काय सांगू ख्याती तिचि तुह्मा ॥१३॥
ऐसें आयकोनी मुनीचें वचन । मनामाजीं खिन्न जाल्या तीघी ॥१४॥
आपुलिया घरा उठोनिया गेल्या । पतीसी बोलल्या जाऊनियां ॥१५॥
आइका हो तुह्मी आमुचें वचन । कासावीस प्राण होती बहू ॥१६॥
अनुसूयेची कीर्ती नारदमुनीनीं । वर्णिली येवोनि आम्हांपाशीं ॥१७॥
तरि तुह्मी जावें मृत्युलोकाठायीं । अनुसूयेचे गृहीं लागवेगीं ॥१८॥
हरोनिया तीच्या सत्वालागीं जाण । यावें परतून नीजघरा ॥१९॥
स्त्रियांचें वचन आयकोनी कानीं । तिघे तत्क्षणीं उठीयेले ॥२०॥
ब्रह्मा विष्णू आणि तिजा चंद्रमौळी । निघाले ते काळीं मृत्युलोकां ॥२१॥
स्नानसंध्येलागीं अत्रिमुनि गेला । माध्यान्हीं पातला दिनमणी ॥२२॥
तयाकाळीं तिघे होवोनि अतीत । गले अकस्मात भिक्षेलागीं ॥२३॥
अनुसूयेलागीं मारूनीया हाक । बोलती कौतुक करोनीयां ॥२४॥
भिक्षा घाली माते आम्हासी सत्वर । नग्न दिगंबर होवोनीयां ॥२५॥
नाहीं तरि आम्ही जातों परतोनि । सत्वासी घेउनी तुझ्या आतां ॥२६॥
आयकोनि ऐसें अतिथिवचन । पतिव्रतारत्न चिंतावलें ॥२७॥
करोनीया मनीं पतीचें चिंतन । तीर्थातें घेऊन शिंपीयलें ॥२८॥
तंव ते तिघेजण झाले चिमणेबाळ । रांगती लाडिवाळ होवोनियां ॥२९॥
अनुसूया नग्म होवोनि आपण । करि दुग्धापान तयां लागीं ॥३०॥
तिघेजण एक्या पालखीं घालून । ओविया गाऊन हालवीत ॥३१॥
इतुकियामाजी अत्रिमुनी आले । बाळांतें पाहिलें निज डोळां ॥३२॥
विस्मित होवोनि आपुलीया मनीं । ह्मणे श्रेष्ठ कोणी असती हे ॥३३॥
असो या लागून झाले बहुदिन । स्वर्गीचें भुवन शून्य ठेलें ॥३४॥
लक्षुमी पार्वती सावित्री या तीन्ही । चिंताग्रस्त मनीं जाल्या बहू ॥३५॥
एके ठायीं सर्व होवोनीया गोळा । चिंता वेळोवेळां करिताती ॥३६॥
इतुक्यांत आली नारदाची फेरी । मंजुळ उच्चारी नाममंत्र ॥३७॥
देवोनि आसन बैसवीले मुनी । करिती विनवणी तयालागीं ॥३८॥
आमुचे भ्रतार गेले कोणीकडे । आम्हांसी सांकडें घालोनीयां ॥३९॥
तयांवीण आम्हां नगमेचि क्षण । जाले बहुदिन तयालागीं ॥४०॥
तयांवीण सर्व शोभीत मंदीर । दिसति भयंकर आम्हांलागीं ॥४१॥
तुम्हांप्रती कोठें भेटतील तरी । सांगावें सत्वरीं आम्हांलागीं ॥४२॥
तंव बोले मुनि तया स्त्रियांप्रती । देखियेले पती तुमचे म्यां ॥४३॥
अनुसुयेचे घरीं तिघेजण बाळ । होवोनि लडिवाळ खेळताती ॥४४॥
आयकोनि ऐसें मुनीचें वचन । विस्मित होऊन बोलति त्या ॥४५॥
आमुचीया बोला गेले सतीघरीं । आम्हांलागीं घोरीं घालूनियां ॥४६॥
चला जाऊं आतां तयेचिया घरा । मागूनि भ्रतारा घेऊं आजी ॥४७॥
अभिमान दूर सांडुनिया जाण । पातल्या शरण अनुसयेसी ॥४८॥
म्हणती ‘ वो माते देई चूडेदान । करि बोळवण आम्हांलागीं ॥४९॥
भ्रतारावांचूनि आमुचे पंचप्राण । कंठापाशीं जाण आले माते ॥५०॥
सर्वभावें आतां शरणागत आह्मी । द्यावे आमुचे स्वामी आह्मांलागीं ’ ॥५१॥
पतिव्रता ह्मणे ‘ न्यावे आपुले पती । धरुनीया हातीं आपुलाले ॥५२॥
तंव त्या बोलती तिघीजणी तीतें । ओळख आह्मांतें नपडेची ॥५३॥
समान दिसती ब्रह्माविष्णुरुद्र । तिन्ही मुखचंद्र सारिखेची ॥५४॥
माय होवोनियां न होय मावशी । द्यावे हो आम्हांसी ओळखूनी ॥५५॥
ऐशा त्या वेल्हाळा पाहूनियां दीन । केलेंसें विंदान अनुसूयेनें ॥५६॥
पतीच्या तीर्थासी शिंपूनी मागुती । तिघींचेही पती दाखवीले ॥५७॥
ब्रह्माविष्णुरुद्र होवोनि प्रसन्न । म्हणे ‘ वरदान मागें कांहीं ’ ॥५८॥
म्हणे अनुसूया ‘ द्यावे ऐसे वर । तिघे कुमार तुम्हां ऐसे ’ ॥५९॥
तथास्तु म्हणोनि देऊनीयां वर । ब्रह्मा हरीहर जाते झाले ॥६०॥
तयांच्या प्रसादें जाले तिघे पुत्र । उत्तम पवित्र पुण्यशीळ ॥६१॥
विरंचीचा चंद्र शिवाचा दुर्वास । विष्णूचा तो अंश दत्तात्रय ॥६२॥
तया काळीं हर्ष जाला जयजयकार । येती सुरवर तया ठायां ॥६३॥
आनंदोनि देव वर्षति सुमनें । करिति निंबलोण सर्व जग ॥६४॥
निरंजन ह्मणे धन्य आजि दिन । पाहिलें निधान दत्तात्रय ॥६५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 23, 2016
TOP