पदे ३०१ ते ३५०

ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.


सर्वात तो हा वर मानलाहे । याकारणे हा वरमान लाहे ॥
आणीक याची उपमा न लाहे । आनंदशेजे सुख मान लाहे ॥३०१॥
जयासुखे वर्णन पूर्ण झाले । सभे विदेहे मग काय केले ॥
बोलावुनी सेवक मल्ल वाडे । कोदंड तें आणविले निवार्डे॥३०२॥
गळे जयांची बहुवस्त मस्ती । लावोनि ऐसे मदमस्त हस्ती ॥
विदेह बोलोनि अलोभ वाचे । कोदंड ते आणविले भवाचे ॥३०३॥
स्वयंवराचा पण एकमाने । आरोपिता जो गुण ये कमाने ॥
स्वयंवरी हे नवरी तयाला । जो अन्यथा हे न वरी तयाला ॥
कार्मुका लवकरी उचलावे । काय येथुनि उठोनि चलावे ॥
माळ घेउनि करी नवरी ते । जो पराङमुख तया न वरीते ॥३०४॥
स्थापिला पण असा जनकाने । आयके मग सभाजन काने ॥
बोलती सभय सद्गद वाचा । लागला ज्वलन कंप दवाचा ॥३०५॥
सभेपुढे पर्वत काय आला । की सर्प हा पर्वत काय झाला ॥
की ही सभा शुध्द सुधा सुरा हे । याचेपुढे जीवित काय राहे ॥३०६॥
धनुष्यरुपे पृथु काळदंड । हा येइजे काय महा प्रचंड ॥
कोदंडरुपे वर विघ्न आले । स्वयंवरी अर्गळरुप झाले ॥३०७॥
की आमुचे थोर अभाग्य हो ते । सीते वराया मग आड होते ॥
की हा महामृत्यु असेल साचा । याचेपुढे सर्वहि काय वांचा ॥३०८॥
सीता ह्मणे ते विजयेस पाही । रामा वराया मज आस नाही ॥
अदृष्ट हे कोण असे उदले । धनुष्य सर्पाकृति आड ठेले ॥३०९॥
गोष्टि फार मजशी न करा हो । प्राप्त आजि मज कार्मुक राहो ॥
आठवा धनुबृहस्पति आला । वक्र केतु धनु तो मज झाला ॥३१०॥
माते सये कार्मुक मंगळाने । वेडाविले फार अमंगळाने ॥
किंवा असे हा शनि काय भोगी । कोदंडरुपे वर विघ्न योगी ॥३११॥
कोदंड केतुग्रहनाम लाहे । पीडा करी तो ग्रहणा मला हे ॥
विचित्रता साच धनुग्रहाची । नको मती सैवर आग्रहाची ॥३१२॥
हा भार कैसा सकमार साहे । याहो महादेव कुमार साहे ॥
पावेल माझी जननी रसा हे । कां होय कन्याजन नीरसा हे ॥३१३॥
लंबोदरा पूजिन सिंदुराने । लाडू तुला वाहिन आदराने ॥
विघ्नासि लांवोनि अनेक राने । धनुष्य याला उचलो कराने ॥३१४॥
तूं सर्व लोका जनके तुकाई । द्वारी उदेला धनुकेतु काई ॥
यावें तुवां सत्वर सैवरासी । धनुष्य होवो हळु या वरासी ॥३१५॥
शंकरा नवसिते नवसाते । मेहुणे करिन मी नव साते ॥
प्रार्थिते स्वजननी जगतीला । वंदिती सकळही जग तीला ॥३१६॥
धांवोनि पाव मज आसरा हो । माझे वराची झणि आस राहो ॥
दुर्गे मला दुर्गम फार वाटे । लावी धनुष्या हळुवार वाटे ॥३१७॥
घ्यावा तुह्मी सर्वहि भार याचा । रामासि द्यावा सहसारयाचा ॥
कोदंड उत्तुंग अभंग भंगो । सुरंग हा सैवररंग रंगो ॥३१८॥
बर वरी जरि हा मजला भला । सुकृतराशि पहा मज लाभला ।
धनुस हा चढवी तरि जीन मी । न चढवी तरि जीव त्यजीन मी ॥३१९॥
कमठ पृष्ठ कठोर धनुर्महा । मदन सुंदर तो रघुराम हा ॥
लघु कसा धनु लाविल पां गुणी । अहहहा ! पण दारुण, साजणी ॥३२०॥
" लघुहि केसरि तो करि मारितो । लघुहि वन्हि महावन जाळितो ॥
लघु अगस्तिहि नीराधे आचमी । लघुहि वामन सर्वजगाक्रमी ॥३२१॥
लघुहि चित्त चमत्कृति दाखवी । लघुहि दीप तमासहि घालवी ॥
लघुहि कामदुधा स्वसुखी करी । लघुहि राम तसा धनु सांवरी ॥३२२॥
सोडोनि देई धडका भयाचा । सीते तुला होइल लाभ याचा ।
सुवर्णमुद्रेवरि नीळजोडा । साजेल तैसा उभयांस जोडा ॥३२३॥
त्यानंतरे रावण उग्रवेशी । आला धडाडा समयी सभेसी ।
देखोनि त्याला सकलां जनांला । महाभये कंप विशेष जाला ॥३२४॥
थरथरा नृपती किति कांपती । खटखटा मग दंतहि वाजती ॥
ह्मणति पूर्वभये फूटलो उरी । सबळ हे तंव धोंडि बसे शिरी ॥३२५॥
कोणी वदे सत्य ह्मणे तिजा रे । आह्मासि येते बहुसाल शारे ॥
त्याची असे आजिच झाकपाळी । ह्मणोनि बांधे पटका कपाळी ॥३२६॥
कोणा मनी विंशतिनत्रशंका । वस्त्रांत येते मग मूत्रशंका ॥
आह्मांसि पाहा अति शैत्य झाले । याकारणे वस्त्र भिजोनि गेले ॥३२७॥
" दोघी स्त्रियांच्या बहुसाळ संगे । मी फार कामी रतिरंग रंगे ॥
याकारणे हे दुरुनीच पाहे । नाही तरी हे धनु काय आहे ॥३२८॥
धनुष्य आधी धरितां मरावे । सीतेसि कोणे मग हो वरावे ॥
पोटांत झाला बहु शूळ पाहा । धांवोनिया साधक वैद्यबाहा ॥३२९॥
हा घेतलासे तरि पंचभूती । पंचाक्षरी कोण करी विभूती ॥
ह्मै साभुराचा अनुभाव लक्षा । याला करावी तरि रामरक्षा ॥३३०॥
" बिंदूचे परि सिंधु मानित असे पृथ्वीस बांधो पुडी ।
मेरु सर्पपतुल्य भासत असे आभास घाली घडी ॥
दिकचक्रे घटिकेत आक्रमितसे वायूस सुष्टी धरी ।
कैलासपुरि कंदुकापरि करी देवांसि बांधी घरी ॥३३१॥
पुष्पे आणित इंद्र चंद्ररविला दीपप्रचर्यां घडे ।
ब्रह्मा वेद पढे जळाधिप जळे आणोनि घाली सडे ॥
वारा झाडितसे स्वये पचन ते वैश्वानराला पडे ।
द्वारा पाळित काळ रांडसटवी ते बंदखानी रडे ॥३३२॥
विघ्ने वारितसे गणेश नगरी विष्णू समुद्रांतरी ।
शेषाचा मणि मंडपासनि रुता ईशान वेत्रा धरी ॥
इंद्राणीप्रमुखा करीति सदनी योषांस वेणीफणी ।
हे तो कांबिट केवढे मजपुढे कैसे चढेना गुणी ॥३३३॥
आकाशास महीतळी धरिन मी पृथ्वी नभोमंडळी ।
मृत्यूची मुरडीन थोर नरडी घालीन पायांतळी ॥
कूर्माचे कवठीस काढूनि दिवा लावीन त्या भीतरी ।
तारांमौक्तिक वोढूनी मग तुरा खोवीन वेगे शिरी ॥३३४॥
ब्रह्मांडासि करीन दोन शकले भेदोनिया मी नखी ।
काढी दिग्गजकातडी उचटुनी लावीन त्यांचे मुखी ॥
काळाचे भुजदंड ते कुडपुनी वाजे दमामा झणी ।
आता कांबिट रोकडे धडफुडे मोडीन येक्या क्षणी ॥३३५॥
तों लक्ष्मणाला अति कोप आला । ह्मणे पहा हा  बरळो निघाला ॥
वेगी प्रचंडे निज बाहुदंडे । फोडीन याची दश मुख्य तुंडे ॥३३६॥
संदेह येथे मजला न वाटे । यालागिं आले भुलवीन वाटे ॥
मुनी ह्मणे त्यासि उगाच राहे । होणार तें यास पुढेच आहे ॥३३७॥
कोदंड पाहा मग रावणाने । जावोनि हेळे धरिले कराने ॥
प्रचंड कोदंड तया न तोले । सीता सखीलागुनि काय बोले ॥३३८॥
होईल माझी जननी धरा हे । ईचे मनी पूर्विल बोध राहे ॥
शरासना योजिल भंगकाळा । कोदंड याला नुचलो खळाला ॥३३९॥
कृपा करावी मज शंकराने । कोदंड याला नुचलो कराने ॥
दाहा शिरे वीस भुजा विपारे । कोणे ग वेगे फळ भावि परि ॥३४०॥
तो रावणे सज्जित देह ठेले । कोदंड झेली मग ते हटेले ॥
दोर्दड चोळी निज केश सोडी । अचाट मांडीवरि ठोक फोडी ॥३४१॥
मांडी खुटी येउनि तोलिताहे । तथा न तोले उर योजिताहे ॥
तो कर्करा वाजति दंतदाढा । कुंथोनिया तो उभवीत मेढा ॥३४२॥
उलथला पृथु मेरु जसा दिसे । उपरि तो परतोन उरी बसे ॥
अवनि राक्षस पाठिसि घांसते । अधर भोंकर भोंकहि वासते ॥३४३॥
गरगरा नयना फिरवीतसे । करकरा रदनासहि खातसे ॥
भडभडा मुखिं रक्तहि वाहते । विफळ ते फळते तरि लाहते ॥३४४॥
सुरवर बहु तूंवा दंडिले ब्रह्म अंडी । वदसि बहुत तुंडी बीरुदे लक्षखंडी ।
अवचित सुरकुंडी घातली भूमिखंडी । पडसि उघडगंडी फट्ट नामर्द लंडी ॥३४५॥
देव न मानित वानित आपण हा बहु बोलहि बोलत होता ।
फारसफेरत कुक्करु जे परि पिंजरियांतिल सुंदर तोता ॥
धोंड तयावरि आलि उरावरि या अधमा भलते तरि होका ॥३४६॥
कस्त करी बहु हस्तक चोळित मस्तक डोलित हे पडलेसे ।
रक्त मुखी बहु वाहत पाहत कार्मुक ते ह्र्दयी जडलेसे ॥
पादत पादत कुंथत काढितसे परि तेंचि निघेना ।
हस्ति जरा अति मस्तमदे तरि काय महाबळि कार्मुक घेना ॥३४७॥
जे खादले सरस फार हरामसंगे ।
ते आजि हे निचरते धनुषप्रसंगे ॥
जो सर्व लोक पर दु:खि करीत आला ।
त्याचाच हा तरि पहा परिपाक झाला ॥३४८॥
ग्लांति तो करित मानवलोका । हे व्यवस्थित तुह्मी अवलोका ॥
जो धनुष्य उचलील उरीचे । राज्य तो करिल हेमपुरीचे ॥३४९॥
पाहतां बहुत काय तमासा । पीडितो बहु जसा घृतमासा ॥
नेणतां उचलिले चपळाने । प्राण घे धनुष हेंच पळाने ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP