पदे २५१ ते ३००
ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.
बत्तीस ठायी विधु कर्वतूनी । केले तिचे वंदन असेचि मानी ॥
कलंक तैसाचि वसे निराळा । त्याच्याचि केल्या चिरिया सुनीळा ॥२५१॥
सोळा कळा, की चिरिल्या समाना । हे युक्ति तीच्या रदनांस माना ॥
पूर्वी कळांनी तम खादिलेसे । ते कापितां काय चिर्यांत बैसे ? ॥२५२॥
हांसे तियेच्या वदनास यावे । चंद्रोदये काय तदा करावे ॥
ते नोबले कीं वचनासि जेव्हा । तमिस्त्ररुपी जन होय तेव्हा ॥२५३॥
महादीप्ति मोठी कपोलद्वयासी । जशी दीधली वोप ते कांचनासी ॥
कपोलद्वयी बिंबते रुप साचे । जणों ठेविले आरसे कांचनाचे ॥२५४॥
नासा शुकाची जरि नीट होती । नाकास तीच्या उपमेस येती ॥
नासा तियेची अति उच्च माने । पुष्पे तिळांची गळती भयाने ॥२५५॥
सौंदर्य तीच्या नयनांस पाहे ।तद्वर्णनी कोण समर्थ आहे ? ॥
देखोनि तीच्या नयनांस कांती । पळोनि जाती हरिणी वनांती ॥२५६॥
इचे नेत्रलावण्य आह्मांस नाही । चकोरे कशी भक्षिती वन्हि पाही ॥
बरे साजती चांगले नेत्र कैसे । जळामाजि हो पाहतां मीन जैसे ॥२५७॥
नेत्र धांवतचि सत्वर आले । कर्णकूपकुहरा मग भ्याले ॥
अन्यथा बहुत लांबत जाते । स्थान आश्रवण यास्तव त्याते ॥२५८॥
अहो नेत्र शोभेति मोठ्या विलासे । जणो खेळती मन्मथाचेच फांसे ॥
ललाटी प्रभा साजिरी पूर्ण देखा । जशी अष्टमीमाजि शुभ्रा सुरेखा ॥२५९॥
धि:कारिला चंद्र तदाननाने । तो अंतरी दाह महाsपमान ॥
मध्ये विधू यास्तव नीळ झाला । कलंक ऐसे ह्मणती तयाला ॥२६०॥
तिचे केश देखोनिया चामराते । जग्नामाजि तात्काळ धि:कार येते ॥
तथा देखिल्या सुंदरा केशपाशा । मयूरे कशी सांडिती पिच्छ आशा ॥२६१॥
नसे वेणिका ते असे भृंगरेखा । सुखा जातसे पाठिशी येत देखा ॥
तिची पाठि मोठ्या विलासे विराजे । जसे हेमकेळीदळी तेज साजे ॥२६२॥
धम्मिल्लराहूदरभेद झाला । त्या आंत की तो मुखचंद्र आला ॥
तो धाक अद्यापि तसाच आहे । यालागिं की बोलति भांग पाहे ॥२६३॥
केशावली की समहेम लेखा । विद्युल्लता की मुदिरांत देखा ॥
मंदाकिनी की गगनी विराजे । अथोमुखे वेणि कटीस साज ॥२६४॥
नखारंभ्य हो केशपर्यत पाहा । तियेचे असे अंगसौदर्य माहा ॥
प्रभेने तिचे लोक हा दीप्त झाला । नभामाजि तो सूर्य लोपोनि गेला ॥२६५॥
त्यानंतरे सुंदर माडियेसी । आली सखीवेष्टित ती सुकेशी ॥
उच्चसनी बैसत पंकजाक्षी । महदरे सर्व सभा निरीक्षी ॥२६६॥
झरोक्यावरी बैसली राजबाळा । पुढे ठेविली चांगली पुष्पमाळा ॥
वधू पाहते ज्यां नृपांलागिं दृष्टी । तयां होतसे काय पीयूषवृष्टी ॥२६७॥
जे कीं महा आप्त न पारखी ते । जे सर्वही लक्ष्मण पारखी ते ॥
नामे जया दूरुनि जानकीते । सभासदां दाखविते सखी ते ॥२६८॥
कोकणस्थ नृप हा जळधीचा । स्वामि तो चतुर निर्मळधीचा ॥
घालिशील जरि माळ कराने । देखसी तरि तमालकराने ॥२६९॥
ज्या घरी बहुत हे शतवाजी । ज्यासमोर रिपु हेशतवाजी ॥
तो नृपाळवर माळवराजा । यास देइं वर माळ वरा जा ॥२७०॥
दाक्षणांत बहु दक्ष पहा हा । जो सुलक्षण विचक्षण माहा ॥
शोभतें करिं शरासन एका । हा तुझ्या तरि मनास नये का ? ॥२७१॥
ज्याची अभंगा परि भा विराजे । जो कीं स्वतेजे परिभावि राजे ।
काशीनिवासी अनुभावराशी । वरीसि ना तूं तरि या वरासी ? ॥२७२॥
कोणी पहा थोर मिशांसि तावी । आकर्ण कोणी रदनांसि दावी ॥
कोणी तसा आंगहि मोडिताहे । कोणी विलासें अति वक्र पाहे ॥२७३॥
कोणी महा मस्तकि हात ठेवी । तांबूल कोणी सविलास सेवी ॥
कोणी करां चोळित फार देखा । कोणी मही वोढिति वक्र रेखा ॥२७४॥
स्वांगास कोणी तरि खाजवीतो । कोणी स्वये वस्त्रहि पालवीतो ॥
अधोमुखे आणिक बैसताहे । आणीक कोणी कर चोळिताहे ॥२७५॥
हे समस्त नृपपुत्र देखिले । काय चित्रपट भूमि रेखिले ॥
दाखवी सखि पाहिन राजसा । सर्वरत्ननिचयी हिरा जसा ॥२७६॥
सर्वात तो हा सिरताज पाहा । श्रीरामपायी निरता जपा हा ॥
वंशावळी आइक राजयाची । नसेल संख्याच जया जयाची ॥२७७॥
वैवस्वताचा मनु वंशधर्ता । दिलीप नव्यण्णव यज्ञ कर्ता ॥
जो नंदिनी धेनु पुजूं रिघाला । तेणे गुणे तो रघु पुत्र झाला ॥२७८॥
शास्त्रस्त्रविद्या बहुसाल ज्याते । युध्दांत जो मानवि वासवाते ॥
करुनियां विश्वजिती दिगंती । भूपात्र सेवा वरिली विभूती ॥२७९॥
तो कुत्स आला शुभ लक्षणेसी । नृपास मागे गुरुदक्षिणेसी ॥
विशेष संतोष तयास पोटी । द्रव्यासि मागे मनुसंख्य कोटी ॥२८०॥
नभीहुनी द्रव्य पडे पवाडे । पावोनियां विप्र वदे पवाडे ॥
सुपुत्र आशीर्वदला तयाला । त्याच्या प्रसादें अज पुत्र झाला ॥२८१॥
वरुनियां इंदुमती अजाने । केली समस्ते समरी अजाने ॥
जो सर्वदा सर्व घटी समान । आले पहा आत्मगृहा समान ॥२८२॥
दशरथ सुत कैसा, ख्यात, झाला अजाला ।
सुलभ कलभ कैसा होतसे दिग्गजाला ॥
समरि विजित शुक्राचार्य जेणे नृपाने ।
सकल सुरवरांची घेतली प्रीतिपाने ॥२८३॥
पुत्रेष्टि केली बहुतां विचारी । तयासि झाले मग पुत्र चारी ॥
त्यांमाजि हा मुख्य महावतारी । श्रीराम, नामे सकलांस तारी ॥२८४॥
विचार माझा ह्रदयी धरावा । सीते तुवां हा ह्रदयी वरावा ॥
याचेपुढे भासति सर्व तैशी । सिंहापुढे की मृगजाति जैशी ॥२८५॥
खद्योत जैसे द्युमणीस येतां । चंद्रोदयी की नलिनी पहातां ॥
मूर्खै जशी पंडितभाविलोके । दिवा जशी की दिसती उलूके ॥२८६॥
भूपाळवृंदे अति तेजमंदे । झाली पहा रामसुखारविंदे ॥
वरा वराया स्वमनीच पाहे । रामापुढे आणिक कोण आहे ॥२८७॥
काय भासत विभा वदनाची । कोण दीप्ति झळके रदनांची ॥
देवता त्रिजगतीसदनाची । काय मूर्ति मिरवे मदनाची ॥२८८॥
तोरा महासा गरजो जयाचा । तो राम हा सागर जो जयाचा ॥
पाहा वयाचा भवभाव लाहे । पाहावयाचा भवभावलाहे ॥२८९॥
उपमा न दिसे शरासनाते । मग तें वैरिउरा शरासनाते ॥
नृप घे तुरगीं बसोनि भाला । मग ये बहु कंप तया नभाला ॥२९०॥
महा थोर उत्कर्ष वाणे जयाचा । टिका घेतलासे जयाने जयाचा ॥
नभस्पर्शनाते महामान लाहे । ह्मणोनी नृपांलागिं हा मानला हे ॥२९१॥
बागदार समशेर पुराणी । देखतांचि पळतो रिपु रानी ॥
चीरली अति विभाकरबाडे । जीपुढे रिपुकुळे करबाडे ॥२९२॥
थोर तेज मिरवे तरवारे । जीसमोर रिपुचे दळ वारे ॥
संमरी झळकतां परजाला । दिव्यमार्गपर तो पर जाला ॥२९३॥
तेज फार दिसते जमदाडे । क्रूर फार अति तीक्षण गाढे ॥
देखतांचि परजीभ वळेना । लागतां करिल काय कळेना ॥२९४॥
चामरी अति सुशोभित वाजी । ज्यासमोर रिपुचे शत वाजी ॥
साजताति पर ते हुमियांचे । देखतां बळ गळे भुमि याचे ॥२९५॥
महा साजिरा अश्व तो राजयाचा । जगन्मंडळी थोर थोरा जयाचा ॥
कसे नेत्र संतोषती सज्जनांचे । असा अश्व तो हा क्षिती सज्ज नाचे ॥२९६॥
अरब्बी बदक्षान ताजी तुरक्की । रुमी पर्वती घुट्ट कच्छी इराखी ।
सुरंग सारंग सुभेद दक्ष माहा । असे राघवाचे घरी अश्व पाहा ॥२९७॥
सुरंग सारंग सुभेद नीळे । ज्र पंचकल्याण विशेष काळे ॥
जर्दे बनोजी अबलख्ख तेजी । नृपा घरी ते बहुवेग वाजी ॥२९८॥
हस्ती पहा वर्षति फार दानी । जे चित्रिले चित्रविशारदांनी ॥
शोभा दिसे त्यांस बरी रदांनी । नेणो मही व्यापित नीरदांनी ॥२९९॥
तुळता न जरा सुखासना ही । तरि याच्याच जरा सुखास नाही ॥
वसते अभिराम वासनाही । नृप देशांतक हीमवासनाही ॥३००॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP