निजलेले मूल

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : एक खोली. अंधार असल्यामुळे खोलीत काय काय आहे, हे मुळीच दिसत नाही. आसपास अगदी शांत आहे, चार पाच मिनिटानंतर एकदम स्वच्छ पांढरा प्रकाश पडतो. एक पाळणा टांगलेला असून, त्याच्या किंचित् वरच लहानशा चेंडूयेवढा एक तेजस्वी गोळा चमकू लागतो. पाळण्याच्या पलीकडे गादीवर एक पंचवीस तीस वर्षाची बाई निजलेली दिसते आहे. इतक्यांत तो तेजस्वी पांढरा गोळा जोराने गरगर फिरु लागतो. ]

मी ! जगात येऊन मला चार महिने झाले.
[ मोठा आवाज होतो. तो गोळा फुटून त्याचे निरनिराळ्या रंगाचे पाचपंचवीस तुकडे होतात व ते एकमेकांशी गरगर फिरु लागतात.]
बाळ ! मी तुझा आजा आहे. पाहिलेस का माझ्याकडे ? संतापी नाहीना व्हायचास माझ्यासारखा ?
अगबाई ! या माझ्या पणत्वंडाच्या नाकाची ठेवण थेट माझ्या नाकासारखीच आहे की !
नाक असेल तुमच्यासारखे ! पण तोंडवळा बहुतेक माझ्यासारखा - या त्याच्या चुलत आजासारखा आहे म्हटले !
पण मी त्याला डाव्या पायाने थोडासा अधू करीन याची काय वाट ? लांबचा असलो म्हणून काय झाले !
- आणि मी ? मी सोडीन होय ? तुमच्याही पेक्षा लांबची आहे मी ! पहा त्याला नीट ऐकू देते का !
काही असो ! डोळे तर मी त्याचे तेजस्वी ठेवीन !
अरे जा ! काय ठेवतोस तू ! सगळा जर मी सडून गेलो होतो ? नाही त्याला आंधळा केला तर नाव दुसरे ! कधी म्हणूनच चैनच पडू द्यायचा नाही मी !
बरे बरे ! पहातो कसा चैन पडू देत नाहीस तो ! असाल आपण एक सडलेले ! पण मी तर धडधाकट होतो की नाही ?
अरे पण माझ्याकडे कुणी पहातो आहे ? रामराम ! कोण पोटदुखी ही ! बाळा !
काय हवे ते म्हणा ? मी काही त्याला आपल्या कचाट्यातून सोडणार नाही !
आणि मीही नाही !
मीही पण नाही !!
[ सर्व ’ मीही ’ पण नाही ! मीही पण नाही !’ असे म्हणून अधिकच जोराने फिरु लागतात. पुन्हा मोठा आवाज होतो ! सर्व गोळे फुटून, निरनिराळ्या रंगाचे शेदोनशे तुकडे होतात. व ते एकमेकांभोवती गरगर फिरु लागतत. ]
अरे हो हो, भांडता काय ! तुमच्या हातातूनही तो जात नाही, आणि आमच्याही हातचा सुटत नाही !
आणि आम्ही तर तुमच्याही पेक्षा आधीचे ! उगीचच भांडायचे ?
तेच की ! बाळ ! - माझ्या इतकी दारु पिशील ना ? निदान एक थेंब तरी ?
तू लागेल तितकी पाजशील ! मी पिऊ दिली पाहिजे ना !
उगीच बडबड आहे झाले तुमची ही ! म्हणे अमुक करु देणार नाही, अन् तमुक करु देणार नाही ! इथे काय स्वस्थ बसलो आहोत होय आम्ही ?
चोरी करायला लावीन त्याला, चोरी करायला ! निदान चोरी करावी असे त्याच्या मनात तरी खास आणीन ! कधी सोडणार नाही ! ऐसा बिलंदर चोर होतो मी - कमीत कमी दोनशे घरफोड्या केल्या असतील !
मोठा पराक्रमच की नाही ! बरे झाले बाई ! माझे दिवस आपले चांगले सदाचरणात गेले !
विचारतो कोण तुमच्या सदाचरणाला ! कुकर्मे करावी अशी मीच !
छे छे ! नको ते जिणे बोवा ! इतका वैतागलो मी, की शेवटी गळफास दिला आणि घेतली एकदाची सुटका करुन ! पण माझ्या मुळेच याला जीव द्यावासा वाटेल की काय न कळे !
जीव देतोय् ! दुसर्‍याचाच घेईल तो ! मी काय इथे झोपा का घेत आहे ? अश्शी भांडणे लावण्यात मी पटाईत होते, की सांगता सोय नाही ! खोटेनाटे भरवून एकीचा तर तिच्या नवर्‍याकडून खून करवला !
भलतेच ! आपले देवाला भिऊन असावे हे बरे !
खुशाल असा भिऊन ! इथे देवावर विश्वास असेल तर शपथ !
भाई देवावरच काय, पण भुताखेतांवर सुध्दा माझा विश्वास आहे ! भूत म्हटले की, अंगाचा कसा थरकाप होतो ! भुताची धास्ती घेऊनच मी -
भेकडच की नाही ! कुच डरना नाही ! ऐशी मजा मारावी की पार सगळ्या संसाराचे वाटोळे !
हं:, माझाच मुलगा तू !
आणि वाटोळे न होईल तर काय होईल ? परस्त्रीचा लोभ हा या घराण्यात कायमचा करुन ठेविला आहे मी ! आणि तोही कैक वर्षांपासून ! या गुणापायी भर बाजारात जोडे खाल्ले होते मी ! उगीच नाही !
ऍं ! काय, काही तरी सांगतोस ? मला नाही वाटत कधी कोणा परस्त्रीचा मी -
कोणरे तो ? - चोरा, सगळे आयुष्य ठीक घालवलेस, कबूल आहे ! पण मरता मरता तोंडाला काळे फासलेस ते विसरलास वाटते ?
अरे, लबाडी करणे हे आमच्या पाचवीला पुजलेले ! विसरतोस कशाचा !
कोण आपणा बोललात वाटते ? पाणी पाहिले की कसा थरकाप होतो, हे छान ठाऊक आहे आम्हाला ! आपण जाऊन नदीत जीव दिलात आणि ते भोवते आहे आम्हाला !
बडबडा खुशाल हवे ते ! मी माझ्या बाळाला गायला शिकवणार आहे ! अशी सुरेख कथा करील, की डोलत राहतील सगळे ! काही झाले तरी तो आपल्या आईच्याच वळणावर जाणार ! सूनबाई माझी हजारातली आहे, सांगून ठेवते !
आहे, ठाऊक आहे ! पण मेमे त्याला मुळी चित्रे काढायला शिकवणार आहे !
आणि मी शिकवणार आहे त्याला आगी लावायला !
वा ! मोठा शहाणाच की नाही !
चूप बैस नाही तर थोबाड फोडीन !
ये कोणाचे थोबाड फोडतोस रे - ?
[ सर्वजण हातघाईवर येतात, व पुष्कळ जोराने फिरु लागतात, मोठा आवाज होऊन, सर्व गोळे फुटतात. त्यांचे हजारो तुकडे होऊन ते एकमेकांभोवती गरगर फिरु लागतात. ]
रामराम ! पहावे तेव्हा आपली भांडणे ! कधी आपल्याला अंतच नाही का ?
नाही, सर्व आपण अविनाशी - अमर आहोत !
पण काय अमर असून उपयोग ? जर इथे काही आपले चालत नाही -
मी सुध्दा तेच म्हणतो की, आपल्यात जे हे हजारो येऊन मिसळले आहेत, ते आपले फारसे चालू देत नाहीत ! मग उगीच अमर राहण्यात काय अर्थ ?
का ? त्यांचेच नेहमी चालते असे थोडेच आहे ! आपणही मधून मधून ठोठावतोच की ! आणि असे हातपाय गाळून कसे चालेल ? हजारो वर्षांचे आपण म्हातारे आहोत ! गोष्ट खरी आहे ! पण जिवंत आहोत ना ! जरा नेट धरा, की माणसाचे मन ताब्यात आलेच म्हणून समजा !
पण फार गर्दी होत चालली आहे बुवा आपल्यात इथे !
ती तर व्हायचीच ! दिवसेंदिवस आत्मा हा अधिक गुंतागुंतीचा आणि कितीतरी अणुरेणूंचा होणार आहे ! हो !
खरेच मग बाळ, माझ्यासारखा झाडपाला आणि गवत कधी खाशील का रे ?
तसे नको बाळ, नरडीचा चांगला घोट घे ! आम्ही जसे एकमेकांना फाडून खात होतो, तस्से तू कर !
काही असो ! आपण जिवंत राहणार !
आम्हीही जिवंत राहणार !
[ सर्व ’ आम्हीही जिवंत राहणार ! आम्हीही जिवंत राहणार ! ’ असे म्हणत अतिशय वेगाने गरगर एकदम फिरतात, व एकमेकांत मिसळून शेवटी त्यांचा एक मोठा गोळा होतो. तो पाळण्यावर गरगर फिरु लागतो. ]
मी ! मीही जिवंत राहणार !
[ असे म्हणून तो गोळा पाळण्यात एकदम नाहीसा होतो. अंधार पडतो. इतक्यांत मूल रडूं लागते. गादीवर निजलेली स्त्री जागी होते, व उठून दिवा लावते. नंतर मुलाला मांडीवर घेऊन त्याला पाजीत बसते. ]


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP