भर चौकात

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ आपल्या मनातील अत्यंत आवडते विचार किंवा हातून होणारी कार्ये हीच काय ती महत्त्वाची अशा डौलाने खाली ’ भर चौकात ’ प्रवेश करा, आणि पहा मग आपल्या विचारांचा आणि कृत्यांचा जगातील विविध व भिन्न विचारांशी कितपत संबंध पोहोचतो तो! ]

नवा माल ! नवा मेवा !
हॉस्पिटलमधुन, यायलाच उशीर झाला, त्या बाईची बॉडी फाडायची होती.
एक स्वारी, स्टेशन ! एक स्वारी !
मनिहंटरचाच अलजिब्रा घे ! तोच छान आहे.
रावसाहेब, जोडे स्वस्त द्यायचे कोटून ! कातडेच किती महागले आहे !
करायचं कसं बाई ! ऐकलं नाही तर लाथा बसतील !
थांबा लेका ! तिच्याशिवाय कसं होईल ! आधी अफू विकत घेऊ आणि -
माझा नेमच आहे ! गीतेची ओळ वाचल्याशिवाय अन्नच ग्रहण करायचे नाही !
जन्मच मुळी आपला खाण्यासाठी आहे !
तर काय हो ! उद्या आता पेन्शन घेणार, तो आपला कालचं स्वारीनं राम -
बाबा ! मला बोजा घेऊन देताना ?
आपला सॉनेटवरचा लेख खरोखरच वंडरफुल आहे ! क्रांती उडवून देईल !
नकोसे झाले आहे ! हजामत म्हणून मनासारखी होत नाही !
आच्छा पेपरमीट ! पैसी पचास आच्छा पेपरमीट !
चलो ! हटो ! रस्तेमे गर्दी मत करो !
दोन लुगडी त्यांना पसंत पडली ! बाकीची -
आsय् कुल्पे छत्र्या नीट करायची !
फर्ग्युसन् कॉलेजमध्ये असता नाही आपण ? ज्यांची लग्ने व्हायची आहेत, अशा मुलांची यादी -
वावौ ! वावौ !
नाव कशाला काढता ! वाकस मारावा असा म्हादबा सुतारानंच !
वा ! हेच तर राजकारण ! आठ वर्षांनी कायम केला ! तेव्हा नियमाप्रमाणे पहिली चार वर्ष आत गट्ट्म !
र्रर्र ! आपला कोट का ? केव्हाच तयार झाला आहे !
हं, मामा आहात झालं ! दाढी केल्याशिवाय एक दिवस कॉलेजमध्ये जाणं म्हणजे शुध्द निग्रोपणा आहे.
अरे नारायणा ! कोणाला तरी या आंधळ्याची दया येऊ देरे !
हेडक्लर्कवर साहेब खूपच संतापला आहे !
ठणण ! ठणण ! चलो बाsजू !
कसं जुळावं हो ! लग्न ही संस्थाच मी म्हणतो अननॅचरल् आहे !
गरम चिवडा ! चिवडा सोलापुरी !
लॉ स्टडी करण्यात मोठी गंमत असते, नाही ?
पोंs ! पोंs ! पोंs !
कशाचा आला आहे संसार ! निव्वळ स्वप्न आहे झालं !
अस्सं ! याचं नाव शिताफी ! गर्दीतून सायकल न्यायला हवी !
हा: ! हा: ! काय आपटला पण !
काय कृष्णंभट ! उद्याची काही सोय ?
एकुलते एक पोर ! पुरवली पाहिजे बाबा हौस.
मी तर म्हणतो की दारु प्यायल्यावरच मनुष्य खरा शुध्दीत -
किती गोड फोनोग्राफ आहे ! थांब -
’ मन माझे ! मन माsझे भडकुनि गेले ’
अढी आना कुइबी चीज उठाव ! अढी आना !
वा ! काय थाटाची अक्षत निघाली आहे हो !
बापरे ! पीअर्स सोपची पेटी घ्यायचे तसेच राहिले ! आता !
राsम बोलो, भाई राsम ! राsम बोलो !
ब्राउनिंग् तुम्ही वाचला नाहीत अजून ? शेम् !
अहो, काखेत गाठ आली आहे ! मधून मधून वाताचे झटके -
डबर नीट कसं मिळेल आता ?
राव ! पाखरु पण पाखरु आहे की नाही !
आग लागली ? कुठे ?
अरे रडायला काय झालं ? गोंधळलास काय असा ?
कोण धांदल आणि गर्दी ही ! कशास काही पत्ता असेल तर शपथ !
पण भाई, जिवंतपणा किती आहे सगळ्यांत !
रेवडी ! गुलाब रेवडी !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP