शेवटची किंकाळी

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


".... कसे कोवळे ऊन पडले आहे पण ! अशा वेळेला नाचण्याबागडण्याने जिवाला किती आनंद वाटतो ! -
हो, हा माझा देह सडलेला असला म्हणून काय झाले ? जीव कोठे सडला आहे, आणि या कुत्र्याच्या आयुष्याला कंटाळला आहे ! -
अरे ! आज असे छातीस धसके बसल्यासारखे काय होत आहे ! मघाशी त्या माणसाने हसत हसत माझ्यापुढे काय बरे खायला टाकले होते ? - असेल काही तरी ! गोड होते ना ? झाले तर ! - रात्रभर या देहाला ओरबडून - कुरतडून - खाणार्‍या यातना जर आता अमळ थकून भागून निजल्या आहेत,तर आता मजेने इकडे तिकडे फिरायला काय हरकत आहे ? - चला ! जरा त्या बाजूला धावत धावत जाऊ ! -
क्या ! क्या !! - अरे, सोड मला, इतक्या जोराने - कडकडून - चावू नकोस ! सोड मला !!
- हसत आहे कोण ? मला कासावीस होऊन ओरडताना ऐकून, कोणाचे बरे राक्षसी ह्रदय खिदळले हे !
- अरे ! हा तर रस्त्यातून खरडत - खरडत - गावात भीक मागत फिरणारा तो महारोगी ! काय रे ए ! पांगळ्या - सडक्या - महारोग्या ! माझे ओरडणे ऐकून तू का रे असा खदखदा हसलास ? काय ? - काय म्हटलेस ? मला गोळी - विष - घातले आहे ? आणि मी आता मरणार ? अस्से !
- पण मी - आ ! माझ्या मस्तकावर व छातीवर उभे राहून कोण बरे मला एकसारखे दडपतो आहे ? - पण मी कोठे आधी मरायला तयार होतो ? माझी इच्छा नसताना मला का मारले रे ? - तुम्ही माणसांनी माझा का जीव घेतला रे !
काय ? - थांब ! पुन:  पुन: बोल ! माझा त्रास होतो म्हणून मला मारले ? आपल्या वेद्सनांनी विव्हळ होऊन मी रात्रभर रडत होतो - तुम्हाला त्रास देत होतो - म्हणून मला विष घातले ? मी पिसाळेन ?तुम्हांला चावेन ? म्हणून माझा जीव घेतला ? होय ! - आणखी काय म्हटलेस ? माझ्या जीवाला होत असलेल्या यातना तुम्हाला पाहवत नाहीत म्हणून मला विष चारले ?
बरे तर ! आपल्या जगण्याने जर इतरांना त्रास होतो तर कशाला उगीच जगा ?  - पण हो ! कायरे महारोग्या ! माझ्याप्रमाणे तूही सडलेला नाहीस का ? माझ्याप्रमाणे तूही का आपल्या रडण्याने - गागण्याने - जगाला त्रास देत ? आपल्या भटकण्याने तू नाही का गावात महारोग पसरीत ? तुझ्या यातनांही नाही जगाला कीव येत ? आणि माझ्या यातनांची तेवढी येते काय ?
- आ ! आ !! मला भाजले मला जाळले ! हा ! - दुष्टा ! चल, नीघ येथून ! - अरेरे ! या जगात देहाने तडफडून सडाणारी - मनाने पिसाळलेली - एकमेकांच्चे हसत हसत गळे कापणारी - भयंकर माणसे - किती ! - कितीतरी सापडतील ! - का नाही ? त्यांना का नाही गोळी घालून - विष घालून - जाळून पोळून मारीत ? "
" नाही ! तसे नाही ! अरे कुत्र्या ! ती माणसे ! ईश्वराची लाडकी शहाणी माणसे आहेत ! जग त्यांचे आहे ! तुम्हां कुत्र्यांचे नाही ! समजलास ! "
" नाही सोसवत मला या यातना ! देवा ! मला लवकर तरी मरु देरे ! अरेरे ! नासलेली कुत्री जशी मारतात - तशी नासलेली माणसे गोळ्या घालून का नाही ठार करीत !
दाबला ! माझा गळा कोणी दाबला ! "
" अरे कुतरड्या ! माणसाशी बरोबरी करु नकोस ! बरोबरी करु नकोस  ! - अरे ! मनुष्यदेहात प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेतलेले आहेत ! तुम्हां कुत्र्यांचे कधी - कधी तरी त्याने अवतार घेतला आहे का ? मग ! - आदळ ! आपट आपले टाळके एकदांचे या दगडावर ! - जीवाला त्रासून जर आपण होऊन कोणी माणूस मेले, तर परमेश्वर त्याला अनंत काल नरकात लोटतो - नरकात ! इतकी मनुष्याने आपल्या जिवाजी - आपल्या वर्तनाने ! - ईश्वराजवळ किंमत वाढवून ठेवलेली आहे ! ठाऊक आहे ! - अहा ! कसा तडफडत आहेस आता ! - नासलेलीच काय ! - पण चांगली - चांगली कुत्रीसुध्दा मारुन टाकू ! हो ! - नासलेली माणसेसुध्दा नाही मारायची आम्हाला ! मग ! - ओरड ! लागेल तितका ओरड ! - मनुष्याची शारीरिक असो ! - किंवा मानसिक असो ! ती घाण - तो गाळ - आम्हाला काढायचा नाही ! तर ती जतन करण्याकरिता आम्ही अनेक संस्था काढू ! लागतील तितके आश्रम काढू ! पण ती जपून ठेवू ! जपून ! हे जग कुत्र्यांसारख्या भिकार प्राण्यांकरिता नाही ! निव्वळ माणसांकरिता आहे ! माणसांकरिता ! - जा ! चालता हो ! "
" अरे काय ? आम्हां कुत्र्यांकरिता हे जग नाही काय ? ठीक आहे ! ठीक आहे ! प्रत्येक गोष्टीला अंत आहे ! तर याद राखून असा - याद राखून ! की आम्ही कुत्रीही कधी तरी जगाचे मालक होऊ ! क्या ! क्या !! आणि मग तुमची ह्रदये फाडून - नरड्यांना कडकडून चावा घेऊन रक्त पिऊ - रक्त ! कधीही सोडणार नाही !
- क्या !! .... "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP