मनु व याज्ञवल्क्य
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
या वचनाच्या पूर्वीचे मनूचे वचन “ अमंत्रिका तु कार्येयं स्त्रीणामावृदशेषत: ” इत्यादी असून, त्यात जातकर्मापासून गोदानविधी म्हणजे केशान्त, येथपर्यंतचे पुरुषजातीस वेदमंत्रांनी होणारे सर्व संस्कार स्त्रियांना वेदमंत्रावाचून करावे असे सांगितले आहे. या ठिकाणी ‘ सर्व संस्कार ’ ह्याचा मूळ वचनतील ‘ अशेषत: ’ या पदाचा अर्थ आहे. या सर्व संस्कराच्या पोटी उपनयसंस्काराचा अंतर्भाव होतो, यावरून स्त्रियांची मुंजही पुरुषांप्रमाणे करण्याची साहजिकच पाळी येते. मात्र फ़रक इतकाच की, पुरुषांच्या मुंजीत वेदमंत्रांचा उपयोग करावयाचा असतो, तसा स्त्रियांच्या मुंजीत करावयाचा नाही. ‘ वैवाहिको विधि: ... ’ या वचनाच्या पूर्वार्धाचा सरळ अर्थ केला, तर तो स्त्रियांचा विवाहविधी हा वेदमंत्रांनी होणारा संस्कार होय असे मानिले आहे इतकाच होतो; व याज्ञवल्क्य स्मृतीतील “ तूष्णीमेता: क्रिया: स्त्रीणं विवाहस्तु समंत्रक: ” या वचनाच्या अर्थाशी बरोबर जुळतोही.
मात्र याज्ञवल्क्याने या वचनाच्या अगोदरच्या वचनात पुरुष व स्त्रिया यांचे जावळापर्यंतचे सर्व संस्कार सांगितले असल्यामुळे, त्याच्या वचनावरून स्त्रियांची मुंज करण्याबद्दलचा प्रश्न मुळी निघत नाही. मनुवचनाची स्थिती याहून निराळी आहे. कारण त्याने जावळापुढे मुंज, मुंजीच्या पुढे ब्रह्मचर्य, व ब्रह्मचर्याच्या अखेअर गोदानाचा अथवा केशान्ताचा विधी, याप्रमाणे विधी सांगितले असल्यामुळे समंत्रक विवाहाच्या पूर्वीचे हे सर्व विधी वेदमंत्रांवाचून व्हावयाचे, असा मनुवचनाचा सरळ क्रमप्राप्त अर्थ घ्यावा लागतो. परंतु स्मृतिकारास हा अर्थ इष्ट वाटत नाही; कारण तो जर इष्ट म्हटला, तर स्त्रियांच्या मुंजीनंतर त्यांना गुरुगृही वास पत्करून ब्रह्मचर्यव्रत पाळावे लागणार, गुरूच्या सेवेसंबंधाने त्याच्या इष्टी वगैरेत गुंतून राहावे लागणार, आणि शेवटी ब्रह्मचर्यातून सुटून पुढल्या आश्रमात शिरण्यापूर्वी पुरुषांप्रमाणे मस्तकावरील केशकलापही उतरण्याची पाळी येणार !!
या तीन परिणामांपैकी शेवटला परिणाम मनुस्मृतिकारास मान्य असावा असे वाटते; कारण त्याचा त्याने कोठे निषेध केल्याचे आढळत नाही. पण पहिले दोन परिणाम टाळण्याची मात्र त्याने तजवीज आपल्या वचनात करून ठेविली आहे. मुंज न करिता मुंजीचे फ़ळ मिळण्यासाठी पतिसेवा आणि गुरुगृही वास याची योग्यता सारखीच म्हणून त्याने सांगितले आहे; व गुरूच्या गृही अग्निहोत्राच्या संबंधाने अगर गृहसंसारकृत्यांच्या रूपाने करीत राहाव्या म्हणून ही तडजोड काढली आहे.
वास्तविक विचार करिता ही स्थिती मूळची नसून मागाहून काढिलेली तडजोड होय असेच मानिले पाहिजे. कारण तिचे तसे स्वरूप नसते, तर ‘ गुरुसेवा ’ इत्यादी पदे योजिण्याच्या खटपटीत न पडता त्याला याज्ञवल्क्याप्रमाणे आपला मनोगत आशय सहज सांगता आला असता. परंतु ही तडजोड मनुस्मृतिकारास सांगावा लागली, व याज्ञवल्क्याने तिचे नावही घेतले नाही, याचे कारण इतकेच की, ‘ न स्ती स्वातंत्र्य मर्हति ’ इत्यादि स्त्रियांसंबंधाचे जुलुमी शास्त्र मनूच्या वेळेस नुकते नुकते चालू झाले होते, व याज्ञवक्ल्याच्या वेळेस स्त्रीस्वातंत्र्यनाश हा विषय फ़ार दिवसांचा जुना होऊन जाऊन त्याचे अस्तित्वही कोणास भासेनासे झाले होते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP