महापूर

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


मुसळधार पाऊस अंगावर कोसळतेला आणि पंढरीच्या दाराशी चंद्रभागा आनंदानं उसळ्या घेतेली. म्हणताना त्या दिवशी विठूदेवाच्या दर्शनाला आलेले आम्ही जरा बुचकळ्यातच पडलो. अशा महापूरातून जायचं कसं ? जीव उडून गेला. आम्ही विचार केला. वाट्टेल ते होऊ दे हरीनाम घेत इथंच ऐलतीरावर उभं रहायचं. देवाचं दर्शन घडल्याखेरीज माघारी परतायचंच नाही. जन्माची खोट लागेल.
इतक्यात चमत्कार घडला. गुलालाच्या लाटांचं तांडवनृत्य सुरू झालं. फ़ुलांच्या पायघड्या आल्या. चंद्रभागा पंढरीत शिरली. कंजाळ्यावरून पाणी गेलं. आणि त्या धांदलीत स्वत: औलं मारीत विठूदेव आम्हांला सामोरं आला ! फ़ुलांच्या नावेत बसून भरल्या पुरात त्यानं नाव घातलई. आणि पाठोपाठ चंद्रभागेची खणा-नारळांनी ओटी भरत दुसर्‍या नावेतून रुक्मिणी आली ! त्यासरशी त्यांच्याभोवती नावांचा घोळका जमला आणि आमचा जीव खाली पडला. नव्हं स्वत: देवच भेटायला आल्यावर कुणाची तहानभूक हरपणार नाही ?
गळ्यातील तुळशीमाळांचं वज्जं विठूदेवानं चंद्रभागेच्या अंगावर फ़ेकलं तशी ती दरवळून गेली. मनोहारी सुवास सगळीकडे पसरला. आणि सोन्याच्या शिलेवर जनीनं देवाचा शेला धुवावा म्हटलं ! म्हणताना भरधाव घोड्यागत धावा घेणार्‍या पाण्यात विठूदेवानं तिला सोबत केली. चंद्रभागेचा ऊर दाटून आला. म्हणाली कशी, “ देवा, जनीवर तुमचा केवढा जीव ! आईनं काय करावी एवढी तुमी जनीची जोपा करता. ”
तेवढ्यात भर पुरात डेरा दिलेल्या कुंडलिक बंधूला रखुमाई भेटली. पतिव्रता भावजईनं - चंद्रभागेनं - तिचे पाय धुतले. त्यासरशी रुक्मिणीनं तिचा पंचारती केली. खुतनीच्या डेर्‍यात काठावर बसलेल्या ज्ञानदेव - तुकारामांना खुशालीत रहा म्हणाली. आणिक आम्हांला पण ह्या दोघांनी नावेत बसवून पैलतीराकडे नेलं ! त्यासरशी विष्णुपदावर उभ्या असलेल्या विठूदेवाचेही पाय चंद्रभावेनं धुतले. त्याच्यापुढं लाटाचं आंथरूण घातलं ! म्हणाली की, मोत्यापवळ्यांची खाण असलेलं माझ्या देवाच्या पायाचं धन मला गवसलं. म्हणताना सावळ्या हरीनं तिची अलाबला घेतली. सौभाग्यवती हो म्हणाला.
देवानं मग हाती कावड घेतली. लोकांच्या घरात शिरलेलं पाणी स्वत: काढलं. पोथी वाचली. आणि चंद्रभागेला जरा मागं सर म्हणाला. ओंजळभर मोत्यापवळ्यांचं त्यानं तिला माहेर केलं.
इकडे तोवर माझा पुंडलीक बुडाला म्हणून आक्रोश करतेल्या रुक्मिणीला चंद्रभागा भेटली. पुंडलिकाच्या खुशालीची तिनं वर्दी दिली.
तितक्यात आषाढीच्या वारीची घनदाट यात्रा जमली. आणि मग आम्ही चंद्रभागेच्या पाण्याचा घोट सोन्याच्या चरवीतून घेत विठूदेवाला अभिषेक करावा म्हटलं. तशी रुक्मिणीनं आपल्या माडीवर नेऊन आम्हांला चंद्रभागेची शोभा दाखवली. आणिक स्वत: गरुडखांबाला टेकून उभा रहात तिनं आल्यागेल्यांची विचारपूस सुरू केली. त्यासरशी चंद्रभागेनं उतार दिला आणिक ती सपाट्यानं पुढच्या रानात निघून गेली.
त्या घटकेला जनाई विठूदेवाचा टोपीझगा धूत नदीवर बसली आणि त्या वासानं दरवळून गेलेल्या चंद्रभागेला आम्ही मुहूर्ताचा नारळ सोडला.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP