चतुर्थ पटल - उड्ड्यानबन्धकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
बेंबीच्या वरील व खालील भाग असे आकुंचन करावेत किंवा ताणावेत की, ते दोन्ही भाग पाठीला जाऊन लागतील. याला उड्ड्यानबंध म्हणतात. हा बंध सर्व दु:खांच्या समूहाचा नाश करणारा आहे. ( श्वास किंवा पोटातील सर्व वायू बाहेर सोडून ) पोटाला पाठीकडे आकर्षित करीत बेंबीचे वरील भागाकडे अर्थात् ऊर्ध्व आकुंचन किंवा आकर्षण करावे अगर बेंबी वर खेचावी. हा उड्ड्यानबंध होय. हा बंध मृत्युरूपी हत्तीला मारणारा सिंहच आहे. याचा अर्थ असा की, या बंधाच्या अभ्यासाने साधक मृत्युरूपी दु:खाचे उल्लंघन करून पलीकडे जातो किंवा तो जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतो.
जो योगीसाधक या उड्ड्यानबंधाचा दररोज चार वेळा अभ्यास करतो त्याचे नाभिचक्र म्हणजे मणिपूरचक्र शुद्ध होते अर्थात् तेथील सर्व बंधने दूर होतात व त्याचा वायूही सिद्ध म्हणजे सुषुम्नागामी होतो.
जो योगीसाधक सहा महिने या उड्ड्यानबंधाचा नित्यनियमित अभ्यास करतो तो निश्चितपणे मृत्यूला जिंकतो किंवा मृत्यू जिंकण्यास समर्थ होतो आणि त्याचा जठराग्नी विशेष रूपाने प्रदीप्त होतो व ( त्याच्या शरीरातील ) रसाची वृद्धी होऊ लागते म्हणजे सर्व प्रकारचे रस शरीरात उपस्थित झाल्याने त्याचे शरीर पुष्टीदायक व कांतिमान होते.
या उड्ड्यानबंधाच्या प्रभावाने योगीसाधकाचे शरीर आपोआप सिद्ध होते अर्थात् त्याची काय अजरामर होते व त्याच्या सर्व रोगांचा निश्चितपणे नाश होतो.
बुद्धिमान् साधकाने या परमदुर्लभ बंधाचा गुरूपासून प्रयत्नपूर्वक लाभ करून घेऊन म्हणजे तो शिकून घेऊन एकान्त व सुस्थितीने सपन्न अशा स्थानात स्वस्थचित्ताने राहून त्याचे साधन करावे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP