दिवाणखान्याची खोली
दुर्गा - ( मनाशीं ) अविचार म्हणजे दु:खाचें माहेर, असें जें म्हणतात तें मेलें काहीं खोटें नव्हे. आनंदरावांनी माझ्या बाळाचा प्राण वांचविला त्याबद्द्ल आनंदाच्या भरांत मीं त्यांना आपली काया अर्पण केली. हें माझें करणें चांगलें कीं वाईट याचा मला त्या वेळीं कांही विचार झाला नाही. पटकन तोंडांतून शब्द निघून गेले. बरें पण , माझ्या हातून तें पाप झालें कीं काय ? पाप म्हणावें तर आनंदरावांचे उपकार फेडायला मला दुसरा उपायच सुचला नाहीं . त्याला मी तरी काय करुं ? ( किंचित विचार करुन ) बरें , केलें तें जर चांगले म्हणावें तर मनाला रुखरुख कां लागली आहे ! बोलतें चालतें पण कालपासुन चैन नाहीं. मी काहीं तरी मोठे पातक केलें असें राहून राहून मनांत येतें. आणखी तेंही मेलें खरेंच . कारण , हें शरीर दुसर्याला देणार मी कोण ? याचे धनी दुसरेच आहेत - होते कां होईना - पण ( इतक्यांत आनंदराव घाईघाईनें येतो. दुर्गा उभी राहते. )
आनंद० - ( संचित ) मला अत्तांच्या अत्तां निघालें पाहिजे, हें पहा त्याचें पत्र . त्याचे नुसते हाल चालले असतील.जीव घुटमळत असेल. मला पाहिल्याशिवाय त्याचा प्राण सुखांत जायचा नाहीं.
दुर्गा - असें मेलें एकाएकीं काय झालें असावें बाई ! तिकडे तो मोठा उपद्रव तर नाहींना मेला ?
आनंद - तें काहीं लिहीलें नाहीं. पण मला भेटण्याकरितां येत होता. अमीरपुर सोडून दुसर्या मुक्कामाला आला तोंच अगदीं जेर होऊन पड्ला. एका गड्याशिवाय दुसरें कोणीच जवळ नाहीं. दुसरा गडी होता तो पत्र घेऊन इकडे आला. मला तर आतां गेलेंच पाहिजे, पण तुला सोडून जायचें म्हणजे प्राणच सोडून जायचें असें मला झालें आहे, काय करुं !
दुर्गा - खरेंच. ते वाटेंत आजारी पडले, हें काहीं मेलें चांगलें नाहीं झालें.
आनंद० - असो, इलाज नाहीं . पण एक गोष्ट माझ्या मनाला खाते. ती ही कीं , कालपासून मीं तुझें हंसरें असें केव्हांच पाहिलें नाहीं. विनोद नाहीं, गोड बोलणें नाहीं, काहीं नाहीं; म्हणून माझें धैर्य जास्त खचतें. ( इतक्यांत तुळाजीराव येतो. ) कां , मंडळी गेली का ? त्यांना सोडून तुम्ही कसे आलांत इकडे !
तुळाजी० - तर काय करुं ? पत्र वाचतांच वाईट तोंड करुन उठून आलांत, तेव्हां त्यांत काही आनंदाची खबर नाहीं असें समजून मंड्ळी उठून गेली; म्हणून काय प्रकार आहे तो पाहण्याकरितां मी इकडे आलों . पण कोणाकडून आलें पत्र तें ! काहीं -
आनंद० - ध्यानी मनीं देखील नव्हता असा अनर्थ येऊन कोसळ्ला, हें पहा वाचून.
तुळाजी० - ( पत्र वाचीत ) काय , गुणाजीराव बेमार आहेत ? अरे अरे अरे ! ! तुम्हाला भेटायला येत होते ? काय पहा नशीब ! मग तर आतांच तुम्हाला घोड्यावर बसलें पाहिजे ?
आनंद० - हो, सामानसुध्दां चढवायला सांगितलें. गुणाजीरावांसारखे भाऊ मिळणार नाहींत तुळाजीराव !
तुळाजी० - पण वयनीचा रुकार पडला का ? कां वयनी ?
दुर्गा - गेलेंच पाहिजे म्हणतात; मी कशी नको म्हणूं ?
आनंद० - हें शरीर जाणार, पण प्राण मागें राहणार !
तुळाजी० - तुमच्या बंधूंची प्रकृति बरी असली तर ताबडतोब यालाच त्यांना घेऊन, नाहीं तर - ( इतक्यांत मोतद्दार घोडा तयार आहे म्हणून सांगून जातो. )
आनंद० - बरें तर येतो आतां हं . तुळाजीराव, तुम्ही तर भावासारखेच आहांत, तेव्हां जास्त काय सांगायचें ? मी परत येइपर्यत इथें तुमचा बंदोबस्त . माझा प्राणच तुमच्या स्वाधीन आहे असें समजा म्हणजे झालें.
तुळाजी० - त्याची तुम्ही बिलकुल काळजी करुं नका. ( एकीकडे ) तुमचा प्राण माझ्या स्वाधीन आहे हें मी कधींपासून जाणून आहे ! ( आनंदराव निघाला, त्यास पोहोंचविण्याकरतां दुर्गा जाऊं लागते. )
आनंद० - नको नको. थंडी फार आहे. कशाला येतेस बाहेर ? जा, जाऊन नीज जा. कुणीं पोंचवायला आलें म्हणजे परत यायला उशीर लागतो. खरेंच जा. मी बहूतकरुन उद्यांच येतों परत.
दुर्गा - बरें, नीट संभाळून चला. रात्रीची वेळ आहे, वाटही नीट नसेल-
आनंद० - छे छे ! आतां चांदणे पडेल. भीति नको बाळगूं . ( असें म्हणून तुळाजीराव व आनंदराव निघून जातात. )
दुर्गा - अग बाई ! माझें मन एकाएकीं असें उदास कां बरें झालें ! आणखी मेलें कांहीं अरिष्ट यायचें आहे कीं काय कोण जाणे ! मी मोकळ्या मनानें वागत नाहीं म्हणून आनंदरावांना फार वाईट वाटतें खरें ; पण मी तरी काय करुं ? मनाला मेली कसली ती हौसच वाटत नाहीं . माझ्या मनांत कांही कपट असलें तर देवा ! त्याला तूंच साक्षी आहेस. बरें, पडतें आतां जाऊन अंथरुणावर . घटकाभर डोळा लागला तर तेवढेच बरें वाटेल मनाला. ( निघून जाते. )
( अंक तिसरा समाप्त. )