अंक तिसरा - प्रवेश ३ रा
नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.
दुर्गाच्या वाड्यातील दिवाणखाना
[ एका बाजुस कलावंतीणीचा नाच चालला आहे. दुसर्या बाजूस आनंदरावाचे कांहीं मित्र बिछायतीवर लोडाशी टेंकून बसले आहेत. वरचेवर पानसुपारी अत्तरगुलाब चालला आहे. आनंदरावाचे मित्र मधून हळूच त्याची थट्टा करीत आहेत व तोही त्यांस आनंदानें उत्तरें देत आहे. अशा वेळेस तुळाजीराच प्रसन्न मुद्रा करुन लगबगीने येतो. सर्वजण त्यास ’या या’ म्हणून योग्य ठिकाणीं बसवितात. त्यास अत्तगुलाब वगैरे दिल्यावर लौकरच नाच बंद होतो. ]
आनंद० - वा तुळाजीराव ! अगदीं आज वेळेवर आलांत ना ?तरी मित्र ! तरी सांगून ठेवलें होतें !
तुळाजी० - झाला खरा बुवा थोडासा उशीर , पण इलाज नाहीं. अगदीं यायला निघालों, आणि बाबासाहेबांच्या पोटांत जी तिडीक उठली म्हणतां-
आनंद० - ( मध्येंच ) हा सर्व प्रकार त्यांना कळला का ?
तुळाजी० - होय, कालच कळला.
आनंद० - तरीच तिडीक उठली बरें का !
तुळाजी० - ( हसून ) छे छे ! मग मी तसाच वैद्यबुवांकडे गेलों. त्यांनी मात्रा दिली ती उगाळून बाबासाहेबांना देवविली. तेव्हां त्यांची तिडीक दबली. आणि मी इकडे आलों . म्हणून जरा उशीर झाला. नाहीं तर अशा वेळेला का मी राहिलों असतों !
आनंद० - काय राहिलों म्हणतां ! दुसरे काय, तुम्ही असतां ,म्हणजे तितकी मजा झाली असती.
तुळाजी० - अहो, आतां काय मजेला कमी ! ( हळूच ) मजेचें झाडच तुमच्या हातीं लागलें आहे. सांगितलें तर तुम्हाला खोटें वाटेल, पण पोटांत मावत नाहीं म्हणून सांगतों कीं, या विवाहाबद्दल तुमच्यापेक्षां देखील मला अधिक आनंद झाले आहे !
आनंद० - यांत मोठें नवलच सांगितलेंत ! जिवलग मित्राला जर आनंद होऊ नये तर व्हावा कोणाला ! माझें सुदैव आणि तुमची खटपट , मग काय कमी !
तुळाजी० - खटपट कसली त्यांत ? बरें जरी केली तरी काय परक्यासाठी केली ? परंतु हे पहा, तुम्हाला आनंदराव हें नांव आतां खरें शोभूं लागलें.
आनंद० - खरेंच, ( हंसून ) आणि ही दुसरीही तशीच गंमत पहा कीं, तुमच्या वयनीचें - आतां दुहेरी वयनींचे- पहीलें नाव दुर्गा. म्हणूनच दुर्गा हस्तगत करुन घ्यायला जितके प्रयास पडतात, त्याच्यापेक्षां सातपट प्रयास ही दुर्गा हस्तगत व्हायला पडले !
तुळाजी० - मी तुम्हांला सांगत नव्हतों, कीं पाठ सोडूं नका. सात वर्षे आराधना केलीत, पण शेवटीं प्रसन्न करुन घेतलीत.
( इतक्यांत भोजनाची तयारी झाल्याची वर्दी आल्यावरुन सर्वजण उठून जातात. )
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP