अंक तिसरा - प्रवेश १ ला

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


स्थळ - दुर्गाचा वाडा
( पात्रें - काळ्या व कोंडाऊ )
काळ्या - आमासारख्या गरिबाच लगिन घाटायच झाल, तरी बी कमित कमी पंदरा रोज लागत्यात, आन ह्ये कसे झाले? काल सकाळच्या पारी मी वाइचसा भाइर ग्यलो , आन परत येतुया त्यो सगळाच रंग न्यारा दिसाय लागला . तुला दोन चार हाका मारल्या , पन तू बी आपल्याच कामात गरक. आनंदराव आल, त्येंच्या बरोबर गडीमानसे आली. आन सगळीच घाई. मांडव घाला, उपादबुवाला हट्का, अमक्यासनी बलावन करा, तमक्याला घेउनशी या , अशी येकुच धांदल उडाली बग. सांच्यापारीं म्होतुर लागून पार . मग ह्ये सम्द जुळल कस ? इक्ती घाई कशापायी आन बायसाबबी पाट लावाय कशा राजी झाल्या ?
कोंडाऊ - सगळें सांगते. पण लग्नाच्या घाइसारखीच विचारायची घाई करुं नकोस. एकेक विचार म्हणजे सांगतें.
काळ्या - इळ न्हाइ म्हुन मी हाका मारतुया आन येकेक इचार म्हन. बर , सांग बया. ह्ये ह्योतुराच जुळल कवा ? यकुच सांग आदुगर.
कोंडाऊ - काल सकाळीं तूं बाहेर गेलास तेव्हां आनंदराव इथे बसले होते ना ?
काळ्या - व्हय. अजारी मानसावानी वाईट तोंड करुन बसल व्हत.
कोंडाऊ - मेल्या ! नुसते बसले होते असें म्हट्लें असतेंस तर ?पण कुत्र्याचे शेपूट सरळ कसें होणार .
काळ्या - तस न्हव. मी हत राहिल्यापन बगतुया , कवाबी आनंदराव आल तरी गुमान बसत्याती. अस कशापायीं ?
कोंडाऊ - तुला आनंदरावांची पूर्वीची हकीकत थोडीशी सांगितली पाहीजे. आमच्या बाईसाहेबांचे वडील भगवानराव, त्यांच्या मनांतून बाईसाहेबांना आनंदरावाला द्यायचें होतें; व आनंदरावांच्या मनांतही बाईसाहेब फार भरल्या होत्या. पण नवज्वराची भाबना होऊन भवानराव एकाएकीं वारले, म्हणून तो बेत रहित झाला. ब्रह्मदेवाची योजना दुसरे ठिकाणीं होती, तिथें कोण काय करणार ? पुढे आनंदरावही कांही दिवस आजारी पडले होते; त्या संधीत चंद्ररावांनी बाईसाहेबांच्या मावशीकडून खट्पट करवून घाईघाईनें लग्न उरकून घेतलें. आनंदराव बरे झाल्यावर हें वर्तमान कळून त्यांना फार वाईट वाट्लें ; आणि त्याच तिड्केसरशी त्यांनी शपथ घेतली कीं मरेपर्यत दुसरीशी लग्न करणार नाहीं.
काळ्या - आं ! एकाद्या रडव्या पोरावानी शपथ घेयाच कंच कारन ! तिच्याच नशिबी न्है म्हंगल आन दिल सोडून . दुसरी तरनी गोरीपान बायकु का गावली नसती व्हय ? इचिभन पैसा असल्यावर बायकासनी काय दुष्काळ ! रोज धा मिळत्याल होव्या तर.
कोंडाऊ - तें खरें, पण हें बघ काळ्या , त्यांचे काय नी कुणाचे काय ? एखाद्या ठिकाणीं एकदां मन जडलें म्हणजे तिथून निघून दुसरीकडे लागायचे मोठे कठिण. त्यातून आनंदराव पड्ले सरळ स्वभावाचे , खर्‍या अंत:करणाचे. तूं म्हणतोस तसें दुसर्‍या एखाद्यानें केलें असतें. तें कांही असो ; त्यांनी त्या वेळी शपथ घेतली खरी, पुढे वर्षा- सव्वा वर्षानें चंद्रराव लढाईवर कसे गेले, कसे वारले, हें मी तुला सांगितलेच आहे. ती खबर तुळाजीरावानें आनंदरावाला कळवितांच त्याच्या मनांत बाईसाहेबांबरोबर पाट लावायची इच्छा पुन: उत्पन्न झाली.
काळ्या - पन हे अगोदरच सांग मला - आनंदराव मंजी एकाद्या मानकर्‍य़ावानी थाटांत र्‍हात्याती, घरानदार दिसत्याती . आन् त्येंच्यांत पाटाची बायकु करत्यात का ? थोर मराठ्यांत चाल न्है .
कोंडाऊ - अरे पैशानें थोर , एरवीं कुळी हलकीच . लेकवळ्यांची घराणी हीं . तुला नाही का माहीत ?
काळ्या - कुणी सांगितल्याबिगर कस म्हाइत असतया ? आतां झाल म्हाइत. पन् चंदरराव मरुन आज सात वरस झालीं, आन् इक्त रोज आनंदराव का झोंप घ्येत व्हते व्हय ! तवाच पाट लावला असता तर आजपातुर दोन पोरग झाल असत.
कोंडाऊ - मेल्याची कल्पना विलक्षणच कांही तरी ! सांगतें तें ऐकून घे, नी मग कल्पना करीत बैस हवा तर.
काळ्या - बर आतां तोंडाला मुसक घालतो. सांग म्होरं.
कोंडाऊ - चंद्रराव मेल्यावर चार पांच महिन्यानीं , आनंदराव बाईसाहेबांकडे समाचाराला म्हणून वरचेवर यायला लागले.
काळ्या - पन् मनांतल कावा मनांत अन् समाचार -
कोंडाऊ - ऐकरे अगोदर! पूर्वीपासूनच घरोबा होता, काहीं नवीनच नाहीं जायला लागलो. पुढे वर्ष दोन वर्षे दु:खातच गेली; पण मग मुलाचे बाळखेळ पाहून बाईसाहेबांचे दु:ख कमी व्हायला लागलें. नंतर आनंदराव मधूनमधून पर्यायाने गोष्ट काढीत होते. पण बाईसाहेब घट्ट मनाच्या . त्यांनी म्हणून कांही आनंदरावांची गोष्ट मनात घेतली नाही. खर्चावेंचाच्या संबंधाने अडचण पडूं लागली तरी त्या डगल्या नाहीत. तुळाजीरावानें पुष्कळ रदबदल्या केल्या , तरी मन वळले नाही; परवा नुकते आनंदरावांनी पदरचे हजार रुपये मोजावयाचे कबूल करुन देणेदारांचे तोंड बंद केलें तेव्हां तर तूं होतासच. त्या दिवशीं देखील बाईसाहेबांनी आनंदरावाच्या म्हणण्याला रुकार दिला नाहीं-
काळ्या - मग इचिभन कालच्या कालच काय झाल तर !काय घटकाच्या आतं ! का भुतखेळ झाला का काय ?
कोंडाऊ - भुतखेळापेक्षां अधिक . ऐक तर खरें. काल सकाळीं आनंदराव नेहमीप्रमाणे आले, बसले; तु बाहेर निघून गेलास. मुलगा माडीच्या कठड्यापाशीं उघड्या अंगानेच खेळत होता. मी मागच्या दारीं काही काम करीत होतें.
काळ्या - तूं तकड होतीस, ह्यो हकड व्हता , ह्ये कुनाला व्होव ?म्होर सांग -
कोंडाऊ - पुन: आणखी आपलें तेंच . कोणी काहीं सांगत असलें म्हणजे मध्यें मध्यें तोंड घालूं नये.
काळ्या - र्‍हायलं.
कोंडाऊ - मुलाला घालायला अंगारखा आणायचें निमित्त काढून बाईसाहेब तिथून उठून आंत गेल्या. बराच वेळ वाट पाहुन आनंदरावही घरी जावें म्हणून जिना उतरुन चौकांत गेले. इतक्यात ’अगबाई! मुलगा पडला, कोंडाऊ धावगं धांव ’ अशी बाईसाहेबांची किंकाळी ऐकून आनंदरावांनी वर पाहीलें तों मुलाचा तोल जाऊन तो खालीं पड्त होता, त्याला आनंदरावांनी झट्पट् धावून वरचेवर झेलला. हें पाहिल्याबरोबर बाईसाहेबांना जो आनंद झाला तो काय पुसूं नकोस. त्या आनंदाच्या भरातच बाईसाहेब आनंदरावाला म्हणाल्या कीं , "तुम्ही माझा प्राण मला परत दिलात. तेव्हां हा देह आजपासून तुमचा झाला. हें करुन सुध्दां तुमच्या आजच्या उपकाराची फेड व्हायची नाही." हे शब्द ऐकून आनंदरावाला तर स्वर्गसुख एकदम  हातीं लागणार, असें झालें. झालें;संपलें तुझें विचारणें ?
काळ्या - बग इचिभन ! कंच काम सादायच झाल मंजी अस एका खिनांत सात्त. नारायनाच करनन् दुसरं काय ! पन् इक्ती घाई कां क्येली ?म्होर चार रोजान म्होतुर बगितला असता तर ?
कोंडाऊ - आनंदरावाला जोशीबुवांनी सांगितालें कीं पुढें मुहूर्त नाहीं , सिंहस्थ लागतो. कालचाच शेवट्चा- ( इतक्यांत दुर्गा कोंडाऊला हाक मारते. ती ’ओ’ म्हणून उठून जाते. काळ्याही जातो. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP