कृष्णामाहात्म्य - अध्याय पांचवा

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


(गीतिवृत्त)

मुनितें वंदुनि, आलीं तीं नरनारायणाश्रमीं दोघें;
ओघें प्रमुदित केलीं; झालींच अघें तयांपुढें मोघें. ॥१॥
त्या अघनिकृंतनीतें गणिका तत्सुत करूनियां प्रणती,
‘माते ! कृष्णे ! सद्‌गति आम्हां शरणागतांसि दे’ म्हणती. ॥२॥
स्नान करुनि अभयवर, ‘होइन नि:संग मीं’ असा याची.
ती गणिका, तो तत्सुत, इछा धरि संगमीं वसायाची. ॥३॥
पाहुनि मुनीश्वरातें, दोघें लाजोनि दोंकडे गेलीं;
रोहोनि दक्षिणोत्तरतीईं स्नानें, उपोषणें, केलीं. ॥४॥

(वृत्त - शिखरिणी)

स्मरे ती, जावूं दे लवहि न रिकामा दिसवड;
करी तीन स्नानें; जपुनि अरि कामादि सवड
न पावे; वैराग्यें तृणचि गणिकायापरिभावा,
सुखें साहे, वेंची तपुनि गणिका यापरि भवा. ॥५॥

(गीतिवृत्त)

प्रायोपवेश करि ती गणिका, निश्चय धरी मरायाचा;
हरिहरनामस्मरणें सुचला सद्योग हा तरायाचा. ॥६॥
दर्शन देवूनि पुसे ‘कोण मनोरथ तुझा ?’ असें नंदी:
ऐकुनि गणिका हर्षे, त्या वृषरूपेश्वरासि ती वंदी ॥७॥
हांसोनि म्हणे, ‘वृषभा ! तुज काय कथूं ? स्वयें तुझा भर्ता
कर्ता सफल मनोरथ, कोठें तो नतभवव्यथाहर्ता ? ॥८॥
प्रभुला नंदी वंदी, बंदी ज्याचे समस्तही वेद;
गणिकोक्त तया सांगे, तच्चित्तींचा हरावया खेद. ॥९॥
परम प्रसन्न सांगुनि नंदीनें वृत्त देवमणिकेला
गणिकेला तो भेटे जैसा पवमान वन्हिकणिकेला. ॥१०॥
देव म्हणे, ‘पावसि कां, सेवुनि हें दिव्य वारि, खेदास ?
कृष्णेनें उद्धरिले, हर्षविले, सर्व सारिखे दास. ॥११॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

ते मुक्त, जे या कृष्णेचें करिती तटसेवन;
न जाणोनिहि माहात्म्य, प्राशिती घटसे वन. ॥१२॥

(वृत्त - स्रग्धरा)

जे कोणी योगयागव्रतनिरत सदा, तापस, ब्रम्हाचारी,
दाते विद्याभयांचे, द्दढ गुरुभजनीं, गोद्विजत्राणकारी,
त्यांला जें प्राप्त होतें शुभ फळ, गणिके ! जाण त्याहूनि भारी
कृष्णेचें तीर्थकोटिस्तुतशुचियश हें सेवितां भव्य वारी. ॥१३॥

(वृत्त - शार्दूलविक्रीडित)

कृष्णेच्या तपलीस पावनन तटीं; दुष्कर्म तें क्षाळिलें;
झालें शुद्ध तुझें कलेवर, पुटीं सोनें जसें जाळिलें;
आतां सुभ्रु ! असेल कृत्य उरलें. तें सांग शक्तास या;
मान्या तूं विजयादि जेंवि गिरिजासेवातिसक्ता सया.’ ॥१४॥

(गीतिवृत्त)

ऐसें ऐकुनि, पडली गणिका त्या प्रभुपुढें, जसा दंड;
थंड क्षणांत झाली. कीं करि जगदीश सुयश जें भंड. ॥१५॥
गणिका म्हणे, ‘प्रभुवरा ! माजें दुष्कृत तुला सकळ कळतें;
द्रवलासि, कीं जनकमन, दु:खित पाहुनि मुलास, कळकळतें. ॥१६॥
नच तरत्यें मीं, करितां शतजन्में अतितपा वनामाजी;
त्वां लाज राखिली बा ! सदयवरा ! पतितपावना ! माजी. ॥१७॥
जरि सुप्रसन्न मजवरि झालासि दयार्णवा ! अगा ! धात्या !
ज्यांत असें दु:खभय, प्रभुजी ! नाशीं भवा अगाधा त्या. ॥१८॥
‘गणिकेश्वर’ या नामें तूं या कृष्णातटीं रहा देवा !
‘गणिकातीर्थ’ असें या तीर्थातें जग म्हणो महादेवा ! ॥१९॥
या तीर्थीं माघव्रत करितां. व्हावेचि सर्वही मुक्त;
उक्त प्रणतांचें तूं सफळ करिसि, तुजचि होय हें युक्त. ॥२०॥
जे न्हातिल या तीर्थीं ! त्यांचें त्वां पापबीज जाळावें;
टाळावें विन्घ विभो ! सकळां शरणागतांसि पाळावें.’ ॥२१॥
नंदीवरि बैसुनि , घे गणिकेसहि, म्हणुनियां ‘तथास्तु’ तिला.
केली प्रभुनें ऐशी विश्वाच्या पात्र हे कथा स्तुतिला. ॥२२॥
श्रीसिद्धेश्वरतीर्थीं माघस्नानें करुनियां शुचिता,
तोहि सुदामा पावे सद्नति, जीब्रम्हाविज्जना उचिता. ॥२३॥
ज्याच्या श्रवणीं भिजवी पाप्याचें देह, वस्त्रही, घाम;
तें धुतलें जेणें, त्या तीर्थाचें ‘धूतपाप’ हें नाम. ॥२४॥

(वृत्त - द्रुतविलंबित)

स्वगुरुपुत्रसदाशिवपंडितें, सुरसिकें, निजसद्‌गुणमंडितें,
लिहविलें परमाद्‌भुत सहयजा - यश, म्हणे कळिकाळ असहय ज्या. ॥२५॥

(वृत्त -म्शार्दूलविक्रीडित)

कृष्णेचें निजपूर्वजांसि लिहिलें माहात्म्य तर्पावया;
हें नि:सीम अनंत भक्तहृदया आनंद अर्पावया;
ऐकावें रसिकाननेंचि रसिकें साधावया मुक्तितें;
श्रीकृष्णाप्रियभक्तहो ! सुजन हो ! द्या मान या उक्तितें. ॥२६॥

(वृत्त - वसंततिलका)

श्रीरामनंदन मयूर लिहोनि पाहे, हें कृष्णशंकरपदांबरि पुष्प वाहे;
कृष्णाप्रसाद शुभ हा गुण यांत आहे; जो शंभुविष्णुजन, तो बहु हर्ष लाहे. ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP