कृष्णामाहात्म्य - अध्याय पहिला

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


(वृत्त - मंदाक्रांता)

श्रीकृष्णेची परम सुखदा सत्कथा आयका,
या. हे बाळाच्या शुचि करि, जसी वत्सला माय काया
वक्त्रीं, चित्तीं, हितकर इचें सर्वदा नाव राहो.
तीर्था योगा हयमखशता सर्वदाना वरा हो ! ॥१॥

(वृत्त - वसंततिलका)

भाग्यें विलोकुनि, महामुनि नारदातें,
पूजूनियां, ऋषि भवांबुधिपारदातें,
जोडूनि हस्त, वदले, ‘कलिदोषदावा !
भ्यालों प्रभो ! सुपथ, देवुनि तोष, दावा. ॥२॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

जोडूनि पापें नरकीं भरावें; कैसें महोग्रा कलितें तरावें ?
अन्नोदक त्यागुनियां मरावें; सांग प्रभो ! काय कसें करावें ?’ ॥३॥

(गीतिवृत्त)

देवर्षि म्हणे, “ऋषि हो ! जेणें पुरुषार्थ सर्व जोडावा,
ब्राम्हाणदेह सुदुर्लभ, तो न कलिभयें कदापि सोडावा. ॥४॥

श्रीहरिहरयश असतां तत्संकीर्तन करावया रसना,
कां मरण वांछितां हो ! दुस्तर मानुनि मनीं कलिव्यसना ? ॥५॥

(वृत्त - मालिनी)

प्रकट हरिहरांची कीर्ति जी, या नदीनें
धुवुनि मळ, करावें सत्पदा यान दीनें,
कळिस बळ न कांहीं, सेतु हा बाळवेचा,
त्यजुनि अघभयातें, कीर्तनीं काळ वेंचा. ॥६॥

(वृत्त - स्वागता)

कर्षणें जसि कृषीवल भुक्ति, कीर्तनें कुशल साधिति मुक्ति:
त्यागिती न बुध मौक्तिकशुक्ति, हे धरा स्वहृदयीं शुचि उक्ति. ॥७॥

(वृत्त - रथोद्धता)

कीर्तनेंचि पुरुषार्थ साधती, पातकें हरिजना न बाधती;
या युगीं गुण असे असा; रहा स्वस्थधी; कळि नव्हे असार हा. ॥८॥

(गीतिवृत्त)

ऋषि हो ! विष्णुप्रभुनें आणिकही निर्मिलें असे त्राण;
कथितों तेंहि, कलिभयें होवुनि विकळ, त्यजूं नका प्राण. ॥९॥

(वृत्त - शार्दूलविक्रीडित)

पूर्वीं ‘सृष्टि करीं’ असी प्रभु हरि ब्रम्हायासि आज्ञा करी;
तो प्रार्थी गुरुतें, ‘सुकीर्ति सुगति त्वत्सेवकातें वरी;
हें मीं जाणतसें, तुज्याचि करुणायोगें, मुकुंदा ! परी,
चिंतेची, मम चित्त, पावुनि भया, या आदरी बा ! दरी. ॥१०॥

(गीतिवृत्त)

कलियुग अघसागर कीं त्यांत त्रैलोक्यनायका ! देवा !
कैसी स्थिति प्रजांची कल्पावी. म्यां घडावया सेवा ? ॥११॥

(वृत्त - इंद्रवज्रा)

पापें प्रजा व्याकुळ आपदानीं, होतील सिद्ध मग शापदानीं;
स्वर्गार्थ धर्मीं चिर या सजाव्या, देवा ! न दोषें निरयास जाव्या.’ ॥१२॥

(गीतिवृत्त)

कृष्ण म्हणे, ‘इर्मावीं तिर्थे, कलिदोष सर्व हरितील;
करितील पुण्यसंग्रह जीव, सुखें सद्नतीस वरितील. ॥१३॥

धात्या ! मत्करुणेनें केली विज्ञप्ति मजहि निर्माया
तीर्थांच्या मातेतें, झालों उद्युक्त मींहि निर्माया. ॥१४॥

(वृत्त - स्वागता)

जीस मीं उठवितों प्रतिकल्पीं. वर्तती सुतनु यत्तनुतल्पीं,
धातया ! प्रकटितों, कलि, तीतें; त्रस्त हो, बहु अघ छळिती तें.’ ॥१५॥

(गीतिवृत्त)

ऐसें वदोनि, कृष्णें कृष्णा नद्यग्रजा, सुकृतसलिला,
निजतनुपासुनि केली प्रकट, कराया सदा सभय कलिला. ॥१६॥

(वृत्त - अनुष्टुभ्‌)

आधीं श्रीकृष्ण कृष्णेतें पुण्यकीर्तिसह स्रजी;
धाता भगवदाज्ञेनें मग तीर्थसहस्र जी ! ॥१७॥

(गीतिवृत्त)

मंत्रमहौषधिधारी पडतां ज्वाळांतही न भाजावा;
ज्या प्राप्त सिद्धिगुटिका, तो लंघुनि सागरा नभा जावा. ॥१८॥
यापरि कृष्णाश्रित जे, ते पडतांहि न कळींत मळतील.
जळतील दोष, त्यांच्या स्पर्शें प्रत्यूह दूर पळतील.” ॥१९॥

(वृत्त - प्रहर्षिणी)

जे होते ऋषि कलिभीत, सारदानें केले ते प्रमुदित सर्व नारदानें,
हें कृष्णायश, वश यास जे तयांतें, षड्वैरी नमितिल मोहजेतयांतें. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP