बहीणभाऊ - रसपरिचय ९

चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.


रसपरिचय ९
बहीण आपल्या आयुष्याच्या शेल्यानें भावाला पांघुरवीत आहे. भाऊ आहे तोंपर्यंत चोळीबांगची चिंता नाहीं. शेजीला बहीण म्हणते :

शेजी चोळी ग फाटली चिंता नाहीं ग वाटली
दुसरी पाठावीली भाईरायांनीं ॥

असा संसार चालतो. बहिणीची एकच इच्छा शेवटीं असते कीं, सौभाग्यपणीं मरण यावें. त्या क्षणीं भावानेंहि यावें. अहेवपणीं आलेलें मरण भाग्याचें. भावानें शेवटचें चोळीपातळ नेसवावें. जर चंद्र नसतां कृष्णपक्षांत मरण आले तर मोक्ष नाहीं. भावानें चंद्रज्योती पाजळून प्रकाश करावा. भरल्या कपाळानें बहीण गेली. तिचें सोनें झालें. भावानें आनंद मानावा :

अहेवा मरण सोमवारीं आलें
भाऊ म्हणती सोनें झालें बहिणीचें ॥
अहेवा मरणाचा आहे मला वांटा
चोळी पातळ कर सांठा भाईराया ॥
जीव जरी गेला कुडी ठेवावी झांकून
येईल सर्वही टाकून  भाईराया ॥
जिव माझा गेला जर काळोख्या रे रात्रीं
सख्या लाव चंद्रज्योती भाईराया ॥


अशा हया बहीणभावंडांच्या प्रेमाच्या ओंव्या आहेत. हया प्रेमाचें मी किती वर्णन करूं ? स्त्रियांचाच अभिप्राय ऐका :

भावा ग बहिणीच्या प्रेमाला नाहीं सरी
गंगेच्या पाण्यापरी पवित्रता ॥
भावा ग बहिणीचें गोड किती असे नातें
कळे एका हृदयातें ज्याच्या त्याच्या ॥
संसारीं कितीक असती नातीं गोतीं
मोलाचीं माणीकमोतीं बहिणभावांचें ॥
जन्मून जन्मून संसारांत यावें
प्रेम तें चाखावें बहिणभावांचें ॥

असो. हया ओंव्या वाचा व धन्य व्हा. नाशिकजेलमध्यें असतांना बहिणभावंडांच्या प्रेमाच्या या ओंव्या मी म्हणून दाखवीत होतों. आणि प. खान्देशांतील सुप्रसिद्ध, कळकळीचे तरुण कार्यकर्ते माजे मित्र श्री. नवल भाऊ पाटील यांचे डोळे भरून आले होते. ते मला म्हणाले “गुरुजी, माझ्या डोळ्यांतून क्वचितच पाणी येतें. परंतु आज माझ्या डोळ्यांतून तुम्हीं पाणी आणलें. माझा रडूं न येण्याचा अहंकार आज दूर झाला.” मीं म्हटलें, “ही शक्ति माझी नव्हे. स्वत:चे अनुभव ज्या स्त्रीयांनीं सहृदय भाषेंत उत्कटपणें ओतून ठेवले, त्या स्त्रियांच्या अनुभवपूर्ण, अपूर्व व जिवंत अशा हया ओंव्यांतील ती शक्ति आहे.”

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:37.3730000