बहीणभाऊ - रसपरिचय १
चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.
या प्रकरणांत बहिणभावासंबंधीच्या ओंव्या दिल्या आहेत. या रसाळ व प्रेमळ ओंव्या वाचून ज्याचें हृदय उचंबळणार नाहीं असा माणूस क्वचित् असेल. बहिणीचे भावासाठीं ह्रदय किती तुटतें, तिचें त्याच्यावर किती प्रेम, भावाचें वर्णन करतांना तिला सार्या उपमा कशा कमी वाटतात, तें सारें या ओंव्यांत पहावयास मिळेल. सासरीं गेलेली बहीण माहेरच्या प्रेमासाठीं, भावाच्या भेटीसाठीं, त्याच्याकडून निरोप वा पत्र यावें यासाठीं कशी अधीर झालेली असते तें या ओंव्यांतून फार सुरेख रीतीनें दाखविलें गेलें आहे. पावसाळा संपत आलेला असावा, नदीनाले शांत झालेले असावेत. शेतेंभाते पिकलेलीं असावीमं, दिवाळी जवळ आलेली असावी. मग बहिणीचे डोळे भावाकडे लागतात. ती म्हणते :
“पूर ओसरले, नदीनाले शांत झाले
अजुन कां न भाई आले बहिणीसाठीं ॥
नवराव गेलें द्सरा दूर गेला
नेण्याला कां न आला भाईराया ॥”
इतर भाऊ आपल्या बहिणी नेतात. बहिणींना आणण्यासाठी प्रेमळ भाऊ रंगीत गाडया पाठवतात. तें सारें पाहून जिचा भाऊ येत नाहीं तिच्या जिवाची फारच तगमग होते. त्यांत शेजारच्या बायका आणखी विचारूं लागतात :
“शेजी मला पुसे येऊन घडी घडी
कधीं माहेराची गाडी येणारसे ॥”
असें कोणी विचारलें म्हणजे फारच वाईट वाटतें. घरांत मुलेंहि विचारूं अगतात, “आई, केव्हां ग मामा येईल ?” आई काय उत्तर देणार ? ती मामाची बाजू घेते. “बाळांनो, त्याला काम असेल, नाहीं तर आल्याशिवाय राहता ना” असें सांगते :
“मुलें पुसताती येई ना कां ग मामा
गुंतला कांहीं कामा माय बोले ॥”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP