ध्रुवचरित्र - भाग १६ ते २०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१६.
केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगें ॥१॥
वनीं बैसोनियां धरोनी विश्वास । आळवावा ईश ऐसें चित्तीं ॥२॥
हाक मारीत मागें माउली चालली । तियेसवें बोली करीना ते ॥३॥
एकाकी तो नीट चालीला त्वरेनें । पाहोंनियां जन स्तब्ध झाले ॥४॥
बोलवितां कांहीं बोलेना कोणासी । अघोर स्थळासी प्रवेशला ॥५॥
मातेसी ठाउकें तयाचें अंतर । म्हणोनी ते स्थिर झाली ठाईं ॥६॥
नामा म्हणे पूर्व पुण्याचिया बळें । मन त्याचें झालें स्थीर तेथें ॥७॥
१७.
नगरीं नरनारी समस्तही । म्हणती झालें कांहीं राजयाला ॥१॥
बाळ तें केवढें धाडीलें वनासी । याचीया धैर्यासी दुजा नाहीं ॥२॥
मागें बहु झालें नाहीं हें देखीलें । हें तों नव्हे भलें विचारितां ॥३॥
सर्वांदिकीं त्यासी सांगितली वृत्त । कांरे तूं निवांत बैसलासी ॥४॥
नामा म्हणे राजा ध्रुवापाठीं गेला । कायतो बोलीला ऐका त्यासी ॥५॥
१८.
म्हणे बा आतां करिशील कायी । एकाला ये ठायीं येऊनियां ॥१॥
वय हें केवढें बुद्धि हे केवढी । वांयां काढाकाढी तपाची कां ॥२॥
व्याघ्र आणि सिंह जंबुक विखार । नांदती या घोर वनामाजी ॥३॥
म्हैषा मसको भूतें वसती रानीं । तुज माये रानीं झोंबतील ॥४॥
नको बा या ठाईं राहूं चाल घराप्रती । जाऊं जोकां प्रीति तेचि देऊं ॥५॥
नामा म्हणे ध्रुव पाहेना बोलेना । आपुलिया ध्यानामाजीं मग्न ॥६॥
१९.
मधुवन चांगलें लोचनीं देखीलें । तेथें मन रंगलें बाळकाचें ॥१॥
राहूं येथें करूं देवाची प्रार्थना । म्हणोनियां मना बोधवीत ॥२॥
सरोवर दिव्य त्यामाजी कल्हारें । भोंवताले मयुर नाचताती ॥३॥
साउली सुंदर सुमनें मनोहर । देवाचा विहार तये ठायीं ॥४॥
नामा म्हणे ऐसा निश्चय नेमून । ध्रुव तये वनीं स्थिरावला ॥५॥
२०.
राजा म्हणे बाळा देतों पंच ग्राम । तो म्हणे आत्माराम देता आहे ॥१॥
आशा सांडोनियां निराश जाहला । शरण देवाला जावयासी ॥२॥
चतुर्थ भागानें राज्य घे वांटोनी । म्हणे चक्रपाणी देता आहे ॥३॥
अर्धें भूमंडळ घेईंरे उदारा । म्हणे विश्वंभरा लाज माझी ॥४॥
संपूर्ण हे महि तुजचि वोपीन । म्हणे नारायण सांभाळील ॥५॥
नामा म्हणे ऐसा गणीना भूपातें । निश्चय चितांत एक झाला ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP